आईने ‘अन्नपूर्णा महिला मंडळ’ ही खाणावळीवाल्या स्त्रियांची संस्था स्थापन केली. बाबांच्या सक्रिय सल्ल्यानुसार खाणावळवाल्या स्त्रियांना सावकारी पाशातून सोडवण्यासाठी वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज मिळवून दिले. माझा अभ्यास सांभाळून मी हिशोब लिहिणे, वर्गणीच्या पावत्या बनविणे अशी मदत करत असे. माझे बाबा या स्त्रियांच्या आíथक शोषण व सक्षमीकरणाबद्दल बोलत असत, तेव्हा मी खूप रस घेऊन ऐकत असे. अगदी बालवयात माझ्या कानांवर अनेकविध चर्चा पडत होत्या. त्या सर्व चर्चा ऐकत ऐकत माझे विचार घडत गेले.. आणि पुढे गरिबीविरुद्ध लढा म्हणून बँकेतली नोकरी सोडून ‘अन्नपूर्णा लघुवित्त’ कार्यक्रमाला प्रारंभ केला..
मेधा सामंत या गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी पद्मश्री प्रेमाताई पुरव आणि प्रसिद्ध कामगार नेते कॉम्रेड दादा पुरव यांच्या कन्या. कष्टकऱ्यांचं जगणं आणि त्यांच्या नेमक्या समस्यांची ओळख मेधाताईंना लहानपणापासूनच झाली. गरीब कष्टकरी स्त्रियांसाठी कार्य करता यावे म्हणून त्यांनी १३ वर्षांनंतर ‘बँक ऑफ इंडिया’तील नोकरीला रामराम ठोकला आणि ‘अन्नपूर्णा लघुवित्त’ची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली. आपल्या आईच्या, प्रेमाताईंच्या विचाराला नवीन आर्थिक संकल्पांची जोड देऊन कामाचे क्षितिज पुढे विस्तारले. आज ‘अन्नपूर्णा महिला क्रेडिट को ऑॅप. सोसायटी’ या संस्थेचे काम पुण्यातील ६०० झोपडपट्टय़ांत तर मुंबईतील ५०० झोपडपट्टय़ांमध्ये चालू आहे. ‘अन्नपूर्णा परिवार’ तर्फे कष्टकरी स्त्रियांच्या मुलांना सांभाळण्याच्या प्रश्नांपासून ते आकस्मिक आजारपणं, घरातल्या मुख्य व्यक्तीचे निधन अशा अनेक संकटप्रसंगांमध्ये तसेच इतरही अनेक आघाडय़ांवरही मदत केली जाते. महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, नवी दिल्ली महापालिकेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, आंत्रप्रनर इंटरनॅशनल अवॉर्ड, वुमन लीडर इन मायक्रोफायनान्स अशा अनेक पुरस्कारांद्वारे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
माझं बालपण सामाजिक व राजकीय चळवळीच्या वातावरणात गेलं. माझे वडील कॉ. दादा पुरव व माझी आई पद्मश्री प्रेमाताई पुरव हे दोघेही डाव्या चळवळीत सक्रिय होते. मुंबईच्या दादर विभागातील आमच्या घरात अनेक कार्यकत्रे, तेव्हाचे राजकीय, सामाजिक पुढारी तसेच क्रांतिसिंह नाना पाटील, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे अशी आपापली क्षेत्र गाजवलेली मंडळीसुद्धा येत असत. माझी आई गोव्यातील स्वातंत्र्यसनिक होती, त्यामुळे गोवा-बेळगाव भागातील पुढारी येत असत तसेच बाबा बँक कर्मचाऱ्यांचे नेते होते त्यामुळे बँक कर्मचारी संघटनेचे नेते कॉ. प्रभातकार, कॉ. परवाना, कॉ. छड्डा अशी देशाच्या विविध राज्यांमधली नेते मंडळीसुद्धा येत असत. घरातील वातावरण उदारमतवादी, मोकळे, सर्व प्रकारच्या विचारधारा समजून घेणारे असे होते. माझे आजोबा, आजी, काका, आत्या अशी सर्व मंडळी सुशिक्षित, सुसंस्कृत व उदारमतवादी होते. समाजसेवेचे त्यांना कौतुक असे. अशा वातावरणात मी लहानाची मोठी झाले. दादर येथील बालमोहन विद्यामंदिर ही माझी शाळा व रुईया महाविद्यालय -जिथे अगदी सुशिक्षित वर्गातील मुलं, प्राध्यापक, शिक्षक होते. परंतु तरीही मला मात्र आईच्या व बाबांच्या सोबत गिरणगावात नेहमी जाण्यामुळे गरीब वर्गाबद्दल लहानपणापासून आस्था, आपुलकी वाटत असे.
महाविद्यालयात असताना मी एनसीसी/एनएसएस यापकी एनएसएस निवडले व त्यायोगे कामगार वस्तींमध्ये प्रौढ साक्षरतेचे वर्ग चालविणे, ‘श्रद्धानंद महिलाश्रम’ सारख्या संस्थामध्ये ठरावीक वारी जाऊन त्यांच्या कामकाजात भाग घेणे अशा प्रकारे समाजसेवेचा अनुभव मी घेत होते. संपूर्ण स्टॅटिस्टिक्स विषय घेऊन मी बी.ए. झाले व बँकिंगची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन मी ‘बँक ऑफ इंडिया’त कामाला लागले. मी बारावीमध्ये असतानाच खासगी शिकवणीच्या फीधोरणा विरुद्ध माझ्या मित्रमत्रिणींना संघटित करून बंड पुकारलं. ते यशस्वी झालं व त्याच वेळी माझ्या जीवनाचा जोडीदार जयंत सामंत मला भेटला. तोही डाव्या विद्यार्थी चळवळीत कार्यरत होता. त्याचे वडील स्वातंत्र्यसनिक होते. मी बँकेत नोकरी करू लागले व जयंत एम्.एस्सी. करून महाविद्यालयामध्ये लेक्चररचे काम करू लागला त्यानंतर आम्ही विवाहबद्ध झालो.
आमचे दोघांचे विचार इतके जुळत होते की लग्नानंतर एकाने कुटुंबासाठी काम करायचे आणि एकाने समाजासाठी, याबद्दल आमचे पूर्ण एकमत होते. मी बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीत आपसूकच खेचली गेले. महिला प्रतिनिधी म्हणून निवडली गेले. युनियन एआयबीईएच्या सर्व कार्यक्रमात सक्रिय भाग घेऊ लागले. विविध बँकांमधील स्त्री कर्मचाऱ्यांच्या समान प्रश्नांवर ‘महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशन’च्या माध्यमातून जास्तच कृतिशील झाले.
या कालखंडात म्हणजे १९७५ ते ८५ दरम्यान माझ्या कुटुंबात व देशातील राजकीय व सामाजिक वातावरणात अनेक उलथापालथी झाल्या. १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष होते. आईने त्यावर्षी ‘अन्नपूर्णा महिला मंडळ’ ही खाणावळीवाल्या स्त्रियांची संस्था स्थापन केली. बाबांच्या सक्रिय सल्ल्यानुसार खाणावळवाल्या स्त्रियांना सावकारी पाशातून सोडवण्यासाठी वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज मिळवून दिले. मी त्या वर्षी दहावीला होते. पण माझा अभ्यास सांभाळून मी हिशोब लिहिणे, वर्गणीच्या पावत्या बनविणे अशी मदत आईला करत असे. बाबा सातत्याने या स्त्रियांच्या आíथक शोषण व सक्षमीकरणाबद्दल बोलत असत, तेव्हा मी खूप रस घेऊन ऐकत असे. १९६९ला भारतातील बँका राष्ट्रीयीकृत झाल्या. बँकिंग सेवा खेडोपाडी, सर्वसामान्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत हा त्यामागील उद्देश होता. या चर्चा मी बाबा व त्यांचे कॉम्रेड्स यांच्यात बसून ऐकत असे.
१९७५ला आणीबाणी घोषित झाली आमचे घर म्हणजे सभा/बठकांचा अड्डाच झाला. आणीबाणीतील २० कलमी कार्यक्रमांपकी एक कलम गरीब गरजू व्यक्तींना स्वस्त दराने कर्जपुरवठा झाला पाहिजे हे होते. अगदी बालवयात माझ्या कानांवर या चर्चा पडत होत्या. त्या सर्व चर्चा ऐकत ऐकत माझे विचार घडत गेले. १९८१ मध्ये माझं लग्न झालं व १९८२ मध्ये बाबांचा अकाली मृत्यू झाला. त्याच वर्षी गिरणी कामगारांचा अभूतपूर्व संप झाला व या संपानंतर गिरण्या बंद पडल्या त्या कधी सुरूच झाल्या नाहीत. मुंबईचा संपूर्ण गिरणगाव बकाल झाला. यानंतर आईने खाणावळवाल्या स्त्रियांना स्वयंपाकशास्त्राचे धडे द्यायला व त्यांचे पदार्थ बँका, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये अशा ठिकाणी विक्री करायला सुरुवात केली व पुढे ‘अन्नपूर्णा महिला मंडळ’ खाद्यपदार्थासाठीच प्रसिद्ध झाले.
या दरम्यान माझं लग्न, बँकेची नोकरी, युनियनचं काम व माझं बाळंतपण अशा गोष्टीत मी पूर्ण बुडालेली होते. पण तरीही मी अन्नपूर्णा महिला मंडळाच्या वाटचालीत आईला जमेल तशी मदत करत होते. परंतु स्त्रियांची आर्थिक पिळवणुकीतून सुटका करण्यासाठी त्यांना सुलभ-स्वस्त कर्ज मिळवून देणे या सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून ‘अन्नपूर्णा’ काहीशी दूर जात आहे, असं मला वाटत राहायचं. साधारणपणे १९९० च्या सुमारास आम्ही पुण्याला राहायला आलो. जयंतने त्याचा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय पुण्यात सुरू केला. त्यावेळी मुंबईच्या मानाने पुणे पुष्कळ लहान होते त्यामुळे मला बँक, घर, नचिकेतची शाळा व इतर उपक्रम सांभाळूनही विचार करायला वेळ मिळू लागला.
पुण्यात माझ्या बँकेच्या व घराच्या जवळ पौडफाटा भाजी मार्केट होतं. तिथून भाज्या घेता घेता मला तिथल्या भाजीवाल्यांची दैन्यावस्था नजरेला खटकू लागली. ज्यांच्याकडून मी नियमित भाजी घेत असे त्या शेवंताबाई, लक्ष्मीबाई खासगी सावकारांकडून भांडवलासाठी कर्ज घेतात हे वास्तव माझ्या डोळ्यात खुपू लागलं. बँका राष्ट्रीयीकृत झाल्या, त्यांचा खेडोपाडी विस्तार झाला, तरीही शहरातील झोपडवस्तीत राहणाऱ्या भाजीवाल्यांना कर्ज द्यायला मात्र त्या उदासीन आहेत हे मला पटेना. मला वाटायचं, आमच्या बँकेने या भाजीवाल्यांना कर्ज का देऊ नये? त्या जर सावकारांचं कर्ज फेडतायेत तर बँकेचंसुद्धा फेडतील की. पण आमच्या बँकेच्या मंडळीचं म्हणणं होतं असले नसते उद्योग आपण कशाला करायचे? बँकेचे पसे या बायकांनी बुडवले तर? उलटपक्षी मी शेवंताबाई- लक्ष्मीबाईंना समजावून सांगायचा प्रयत्न करायची की त्यांनी सावकाराऐवजी बँकेकडून कर्ज घ्यावं. पण त्यांना बँकेपेक्षा सावकार बरा वाटायचा. ‘‘बँकेत आम्हाला कोण विचारणार? आणि एखादा हप्ता थकला तरी बँकेवाले टाळं लावतात.’’ असे त्यांचे गरसमज होते.
मला काही गप्प बसवेना. एक प्रयोग म्हणून मी शेवंताबाईंना म्हटलं की तुम्ही एकमेकींच्या विश्वासातील १० बायकांचा गट केलात व सर्वानी एकमेकींची कर्जफेडीची हमी घेतलीत तर मी देते तुम्हाला कर्ज. त्यावेळी बचत गट मुळीच प्रसिद्ध झाले नव्हते किंवा ‘ग्रामीण बँक ऑफ बांगला देश’ यांच्या लघुवित्त प्रयोगाबद्दलसुद्धा फारशी माहिती मला नव्हती. परंतु १० बायका एकत्र आल्या तर सर्वच जणी काही कर्ज बुडवणार नाहीत. या भावनेतून मी त्यांना गट करायला सांगितला. त्यांनीसुद्धा मी स्वत: कर्ज देणार यामुळे उत्साहाने नात्याच्या, एकाच वस्तीत राहणाऱ्या अशा १० जणी गोळा केल्या, पण ऐन कर्ज देण्याच्या आधी त्यातली एक जण घाबरली व म्हणाली, ‘‘मला नको असलं कर्ज.’’ मग आम्ही नऊच जणींचा गट करून मी त्या सर्वाना पहिलं कर्ज एक हजार रुपयांचं दिलं. भाजीमार्केटमध्ये गोणपाटावर आमच्या दर शनिवारी बठका होत. त्यातून ठरलं की कर्जाची रक्कम किती द्यायची ते.
अण्णा देतो तेवढीच म्हणजे एक हजार रुपये. त्यात कांद्या-बटाटय़ाचं एक पोतं येतं! कर्जाचा हप्ता कसा घ्यायचा? ताईने (म्हणजे मी) दररोज भाजी मार्केटला जाऊन प्रत्येकीकडून २५ रुपये घ्यायचे. अण्णाप्रमाणेच! हा सिलसिला जुल १९९३ ला सुरू झाला. बँक सुटल्यावर मी दररोज भाजीमार्केट मध्ये जाऊन २५-२५ रुपये गोळा करत असे. घरी जाऊन रात्रीच मी सर्व हिशोब लिहून ठेवत असे. ५० दिवस हा सिलसिला चालला. या ५० दिवसांत मला त्या ९ भाजीवाल्यांबद्दल खूप जास्त आपुलकी वाटू लागली होती. त्यांच्या जीवनात किती प्रकारच्या चिंता, समस्या आहेत हे कळू लागलं होतं आणि त्यांनी संपूर्ण पसे चोख परत फेडले. त्यामुळे मलाच एखादी लढाई जिंकल्याएवढा आनंद झाला होता.
५० दिवसांनी आमच्या गोणपाटावरच्या बठकीत मी त्या ९ जणींना सांगितलं की, तुम्ही एकूण एक हजार रुपये घेतले व १२५० रुपये फेडले आता अडीचशे रुपये तुमची प्रत्येकीची बचत झाली आहे. त्यावर त्या इतक्या आनंदल्या, की शेवंताबाई उत्स्फूर्तपणे उद्गारल्या, ‘‘ताईच्या पशाला जादू आहे, अण्णांकडे कधीच बचत झाली नाही. पण ताईकडे झाली.’’ त्यावर मी म्हणाले ‘‘हे पसे माझे नाहीत, आपले आहेत.’’ त्या क्षणीच त्या ९ जणी मी एक असा आमचा १० जणींचा घट्ट गट झाला व मी बँक सोडून या लघुवित्त कार्यक्रमात स्वत:ला झोकून देण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या १२ वर्षांच्या कारकीर्दीत मला बँकांच्या कामकाजाची जी माहिती झाली होती त्याचा पुढे या लघुवित्त कार्यात मला खूप उपयोग झाला.
बँकेच्या युनियनमध्ये स्त्री प्रतिनिधी म्हणून केलेल्या कामामुळे स्त्रियांचे प्रश्न समजून घेणे, त्यावर लढा उभारणे, संघर्ष करणे याची सवय होतीच. परंतु मला आता लढा द्यायचा होता गरिबीशी. बँक कर्मचारी स्त्रियांच्या मध्यमवर्गीय समस्यांपेक्षा अगदी वेगळ्या समस्यांना तोंड द्यायचं होतं. तरीही मन उत्साहाने भारलेलं होतं. बँक सोडण्याच्या माझ्या निर्णयाला काही लोक अति ध्येयवादी मानत होते, तर काही जण हसत होते. पण मी ठाम निर्णय घेतला होता व माझ्या नवऱ्याचा त्या निर्णयाला भक्कम पाठिंबा होता. एवढय़ा पुंजीवर ‘अन्नपूर्णा लघुवित्त’ कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
डॉ.मेधा पुरव सामंत
dr.medha@annapurnapariwar.org