एकदा ५०० जणींची सभा भरली होती. या सभेत आपल्याला काय काय काम करता येईल याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेस उपस्थित असलेल्या अशिक्षित स्त्रियांनी, ‘‘आम्हाला गोधडीशिवाय काहीही येत नाही. ती बनवू का?’’ असं विचारलं. त्यांच्याच सूचनेनुसार गोधडी बनवण्यास सुरुवात केली. गोधडय़ा विक्रीही करू लागलो. या गोधडी उद्योगातून हजारो जणींना रोजगार मिळाला आणि स्त्रिया स्वयंपूर्ण होऊ लागल्या.
भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्थेची २००० मध्ये स्थापना करून पुढील २७ वर्षांचे नियोजन करण्यात आले. २७ वर्षांनंतर आपण ज्या परिसरात काम करतोय त्या परिसरात आपली गरज भासू नये, अशी त्यामागे भूमिका होती. या २७ वर्षांचे ९-९-९ वर्षांचे तीन टप्पे करण्यात आले.
सरकारी पैसा न घेता काम करण्याच्या आमच्या निर्णयाबाबत जवळजवळ सर्वाच्याच मनात शंका होती. सरकारकडून सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत नाही घेतली, तर पैसा कुठून उभा राहणार? याचे उत्तर माझ्याही जवळ नव्हते. मात्र सरकारकडून पैसे घ्यायचे नाही हे पक्के ठरवले होते. समाजासाठी काम करताना समाजाचे व स्वत:चे ऐकायचे होते. समाज काय विचार करतो, त्याला काय वाटते, परिस्थिती काय म्हणते, आपले मन काय म्हणते, या सगळ्या गोष्टींची सांगड घालायची होती. कामाची पद्धत ठरली होती आणि ती एकदम स्पष्ट होती. ज्या लोकांसाठी काम करायचे त्यांच्याबरोबर राहून, त्यांचे म्हणणे ऐकून, त्यांच्या गरजा समजून जे सुचेल त्या वाटेने जायचे. पैशाचे काय होईल माहीत नाही, पैसे नाही मिळालेत तर काय होईल, ही भीती मनात नव्हती. त्या वेळेस धुंदी होती ती फक्त विचार आणि कार्य यांच्या प्रक्रियेची. त्यात चिंता, काळजी, शंका या गोष्टींना स्थान नव्हते. होता तो फक्त उत्साह आणि उमेद!
विनोद आणि हेमराज हे दोघेही काम सुरू होण्याआधीच भेटलेले कार्यकर्ते. त्यांच्यासमोर अनेक विषयांवर अक्षरश: तासन्तास विचार मांडले. चर्चा केली. त्यांनीही त्या त्या विचारांवर, मार्गावर भरवसा ठेवला. त्यांचा भरवसा ही माझ्यासाठी ताकद ठरली आणि म्हणून का असेना प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीने निर्माण केलेल्या शंकांमुळे, कसे होणार? कसे शक्य आहे? इत्यादीचा थोडाही नकारात्मक परिणाम झाला नाही.
बालपणापासून गाव जवळून बघितले होते. तेथेच वाढले असल्याने गावकऱ्यांशी बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत तसेच त्यांच्या स्वभावाची जाणही होती. म्हणूनच कदाचित गावात काम करण्याआधी कुठल्याही प्रकारचे आश्वासन दिले नाही किंवा स्वप्न दाखवले नाही. त्यापूर्वी अनेक जणांनी विकासाच्या नावाखाली फक्त स्वप्न दाखविण्याचे व आश्वासने देण्याचे काम केले, केवळ भाषणे दिली. त्यासाठी प्रत्यक्ष कार्य मात्र झाले नसल्याने भाषणांवर लोकांचा विश्वास बसेल का? ही शंकाच होती. म्हणून फारशी चर्चा न करता शाळेतील गुरुजनांना घेऊन संस्थेची स्थापना केली. गावात त्या वेळी संगणक उपलब्ध नव्हते, म्हणून संगणक प्रशिक्षणाने कार्याची सुरुवात केली.
हे कार्य सुरू झाल्यावर एक दिवस शेतात काम करणारी एक स्त्री येऊन भेटली. म्हणाली की, ‘‘तुम्ही काही तरी वेगळं करणार आहात असं दिसतं आहे. मग स्त्रियांसाठी कार्य का करत नाही? आपला परिसर दुष्काळग्रस्त आहे. इथे चार महिने जेमतेम कामं असतात व आठ महिने बेकारी. रोजगार मिळवण्यासाठी काही तरी केलं तर गावातील स्त्रियांना खूप मोठी मदत होईल.’’ तिने सांगितलेली समस्या सोडवण्यासाठी बचत गटामार्फत स्त्रियांसाठी कार्य करावे असे ठरवले. त्या वेळी भारतीय स्टेट बँकेने बचत गट बांधणीविषयी माहिती दिली. आम्ही बचत गट बनवण्यासाठी स्त्रियांच्या सभा घेऊ लागलो. पहिल्याच सभेच्या वेळी स्त्रियांचा आक्रोश बाहेर पडला. काही लोकांनी ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून अनेक जणींना लुबाडले होते. एकंदरीत गावातील बायकांचा कोणावरही भरवसा राहिला नव्हता. आम्ही त्यांना बचत गटाची सविस्तर माहिती सांगितली. तुमचाच पैसा तुमच्याच बँक खात्यात जमा होणार व त्यातून एकमेकांना अल्पदराने कर्ज देऊन आपापल्या गरजा पूर्ण करता येणार, असे समजावले. आम्ही गावातले असल्याने एकदा यांच्यावरही विश्वास ठेवून पाहू या असे स्त्रियांना वाटले व या कार्याची चळवळ सुरू झाली.
या दरम्यान वेगवेगळ्या गरजा असलेले लोक भेटायला येऊ लागले. येणाऱ्या लोकांच्या जास्तीत जास्त गरजा या पैशाशी निगडित होत्या. लोकांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी पैसा हवा होता व घेतलेला पैसा ते परत करण्यासही तयार होते. आश्चर्य म्हणजे फुकट मदतीची कुणाचीही अपेक्षा नव्हती. लोकांना मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींची लग्नकार्ये, घरातले आजारपण, शेती, व्यवसाय सुरू करणे या आणि अशा वेगवेगळ्या गरजा होत्या. याचाच अर्थ अर्थव्यवस्थापनेची गरज लोकांना होती. याचे दोन पैलू होते. एक म्हणजे कर्ज व्यवस्था व दुसरे म्हणजे रोजगार व्यवस्था.
बचत गट स्थापनेच्या वेळी बचत गटाचे काय काय फायदे आहेत, असा प्रश्न स्त्रियांकडून विचारला जाई. आपल्याच बचतीतून अल्प व्याजदराने आपल्या स्वत:ला कर्ज उपलब्ध होते. त्याचबरोबर आपली बचतही होत असते. सामूहिकरीत्या आपल्याला उद्योगही करता येतात, असे त्या वेळी स्पष्ट केले. आपल्याला उद्योगही करता येतात, असे सांगितल्यावर कोणते उद्योग करणार? हा प्रश्न त्यांच्याकडून आला. उद्योगाचा आम्हालाही अनुभव नाही व त्यासाठी आमच्याकडे पैसेही नाहीत. त्यामुळे तुम्ही घरात जे वेगवेगळे पदार्थ बनवता तेच पदार्थ तयार करून त्याची विक्री करू या व त्यासाठी आवश्यक भांडवलसुद्धा तुम्हीच जमवा, असे आवाहन त्यांना केले. श्री स्वामी समर्थ बचत गटातील १४ स्त्री सदस्यांनी त्यानुसार काम करण्याचे ठरवले. २००४ ला प्रत्येकीने २००-२०० रुपये जमा करून ३३ प्रकारचे खाद्यपदार्थ बनविले. २००१ पासून सलग ३ वर्षे कमी पावसामुळे लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली होती. अशा स्थितीत घरातून दोनशे रुपये काढणे हेसुद्धा एक आव्हानच होते. तसेच त्या काळात स्त्रिया केवळ शेतात काम करण्यासाठीच घराबाहेर पडत. अशा काळात १४ स्त्रियांनी प्रथमच विविध खाद्यपदार्थ बनविण्यासाठी घरातून बाहेर पडणे हे महत्त्वाचे पाऊल होते. त्यांनी खाद्यपदार्थ तर बनवले, मात्र ते विकणार कसे, हा प्रश्न होता. त्यासाठी प्रदर्शन मांडायचे ठरले. प्रदर्शनात आपल्याला आपल्याच वस्तूंची विक्री करण्यासाठी गावासमोर उभे राहावे लागणार, ही कल्पनाच त्यांना पटेना. गावातील लोक, घरातील लोक काय म्हणतील अशा शंकांनी त्यांना घेरले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही थोडे कठोर झालो. त्या सगळ्या जणींना स्पष्टपणे सांगितले की, तुम्हाला प्रदर्शनात वस्तू विक्रीसाठी उभे राहायचे नसेल तर आम्ही प्रदर्शनच रद्द करतो, अशी भूमिका घेतल्यावर मात्र स्त्रियांनी विचार केला, की आता यानिमित्ताने घरातून बाहेर पडलो आहोतच, तर अजून काही पावले पुढे चालायला हरकत नाही, असा विचार करून त्या सगळ्या जणींनी वस्तू विकण्यासाठी उभे राहण्याची तयारी दर्शवली.
प्रत्येकी जवळ विशिष्ट वस्तू काही संख्येने विक्रीसाठी देण्यात आल्या. त्या वस्तू विकल्यानंतर प्रत्येकीकडून किती रक्कम येणे अपेक्षित आहे हेही सांगण्यात आले. त्यामुळे वस्तूंची संख्या व त्यांची विक्री करून येणारे अपेक्षित मूल्य याकडे त्यांचे लक्ष वेधले गेले आणि त्यामुळे आपल्याकडे कोण बघतेय, कोण काय म्हणतेय या गोष्टींवरून त्यांचे लक्ष आपोआप हटले. ते पाहून आम्हालाही एक धडा मिळाला तो म्हणजे, ‘आपण जर प्रत्यक्ष कार्यात गुंतलेलो असलो तर अनावश्यक प्रश्न डोक्यात येतच नाही.’ हे प्रदर्शन पाहून गावातील इतर स्त्रियांना प्रेरणा मिळाली. आम्हालाही या कार्यात सहभागी व्हायला आवडेल, अशा प्रतिक्रिया इतर स्त्रियांकडून येऊ लागल्या.
दरम्यान १०० स्त्रियांना संगणक शिकवण्याचा एक उपक्रम आम्हाला मिळाला. यातही स्त्रियांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यांचा आत्मविश्वास पाहता आम्हालाच त्यांच्यासाठी काम करणे हे आव्हान वाटू लागले. आता स्त्रियांनी आपल्या गरजा मांडण्यास सुरुवात केली. काहींनी सांगितले, ‘भरतकाम प्रशिक्षणाची सोय झाली पाहिजे, आमच्या मुलींना त्याचा लाभ घेता येईल.’ आम्ही त्याप्रमाणे सोय केली; पण आश्चर्य म्हणजे त्यांनी मुलींना न पाठवता त्यांनी स्वत:च शिकण्यास प्रारंभ केला. मुली का नाही येत, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘मुली शिकतील त्यांच्या सासरी जाऊन! आमचं काय वय झालंय. आम्हाला कोण शिकवेल? आम्हालाही शिकायचंय.’ त्यांच्या उत्तराने प्रौढ स्त्रियांचे प्रश्न समजले.
अॅनी गॉडफ्रे या पारोळा तालुक्यात रत्नापिंप्री गावाजवळ तपोवन केंद्र चालवतात. वैदिकशास्त्रातील अग्निहोत्र, वैदिक शेती, अशा अनेक शास्त्रांचा त्या अवलंब करतात. भारतातील अनेक भागांतील लोकांना त्याचे प्रशिक्षण देऊन प्रचार व प्रसार करतात. अॅनी गॉडफ्रे आपल्या परदेशी पाहुण्यांना घेऊन बहादरपूरला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी प्रौढ स्त्रियांना भरतकाम करताना बघितले. त्यांची शिकण्याची उत्स्फूर्तता पाहून त्यांनी या स्त्रियांना भरतकामाचे मोठे व दीर्घकाळ काम उपलब्ध करून दिले.
एकदा ५०० जणींची सभा भरली होती. या सभेत आपल्याला काय काय काम करता येईल याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेस उपस्थित असलेल्या अशिक्षित स्त्रियांनी, ‘‘आम्हाला गोधडीशिवाय काहीही येत नाही. ती बनवू का?’’ असं विचारलं. त्यांच्याच सूचनेनुसार गोधडी बनवण्यास सुरुवात केली. गोधडय़ा विक्रीही करू लागलो. दरम्यान जर्मनीमधून १०० गोधडय़ांची ऑर्डर आम्हाला मिळाली, मात्र त्यांनी सांगितलेल्या डिझाइन आम्हाला जमल्या नाहीत आणि आमची ऑर्डर रद्द झाली. हे समजताच अॅनी गॉडफ्रे या पुन्हा मदतीला धावून आल्या. त्यांनी पाश्चिमात्य देशांमध्ये चालणारी रंगसंगती व कापडविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वत: गोधडीच्या विविध डिझाइन शिकविल्या. त्यानंतर या गोधडय़ा देशातच काय, तर परदेशी लोकांनाही आवडू लागल्या. या गोधडी उद्योगातून हजारो जणींना रोजगार मिळाला. यापुढील लेखात अर्थव्यवस्था व उद्योग याकडून निघालेल्या वाटा शेतकरी व ग्रामविकासाकडे कशा जुळल्या याबद्दल आपण जाणून घेऊ या!
नीलिमा मिश्रा
nilammishra02@yahoo.com