विवाहाच्या वेगवेगळ्या अटींमधून विवाह जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र कायदेकर्त्यांचे हेतू आणि सध्याची बदलती सामाजिक परिस्थिती याचा प्रत्येक वेळी ताळमेळ लागतोच आहे असे दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर वैवाहिक हक्कांची पुनस्र्थापना, कायदेशीर फारकत तसेच घटस्फोटाच्या अटी यांचीही चर्चा व्हायला हवी.
हिंदू विवाह कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी काही शतके समाजात प्रचलित विवाहासंदर्भातील धारणा, रीती यांची चर्चा आपण केली. परंतु डॉ. रखमाबाईंचा खटला विचारात घेतल्याशिवाय ही चर्चा पूर्ण होऊच शकणार नाही. त्या काळी अस्तित्वात असलेले कायदे हे धर्मशास्त्रावर आधारित व पुरुषांना झुकते माप देणारे होते याचे ठळक उदाहरण म्हणजे
डॉ. रखमाबाईंचा खटला. रखमाबाईंचा विवाह १९व्या शतकात तेव्हाच्या प्रथेनुसार लहान वयात लावून देण्यात आला. त्यांचे वडील पुढारलेल्या विचारांचे होते. विवाहानंतर सज्ञान होईपर्यंत रखमाबाई माहेरी होत्या. त्या दरम्यान वडिलांनी रखमाबाईंच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्यांनी डॉक्टरीचे शिक्षण घेतले. नवरा नांदायला बोलावत होता पण त्या येईनात म्हणून त्याने रखमाबाईंविरुद्ध फिर्याद केली. ‘‘मला हा विवाह मान्य नाही, मी नांदायला जाणार नाही,’’ असे रखमाबाईंनीही ठणकावून सांगितले. हा विवाह अजाणत्या वयात झाला आहे, माझे मत विचारात न घेता झालेला आहे. तेव्हा या विवाहबंधनातून मला मोकळे करा अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली; परंतु नांदायला न जाण्याच्या ‘गुन्ह्य़ासाठी’ रखमाबाईंना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
विवाह हे ‘पवित्र बंधन’ मानले जाते. त्यातून बाहेर पडण्यास ना समाज परवानगी देत असे ना धर्म किंवा संस्कार. पुरुष हा पालनकर्ता, कुटुंबप्रमुख म्हणून त्याला एकापेक्षा अधिक विवाह करण्यास परवानगी होती. पत्नीला मात्र ‘उभ्याने गेली ती आडव्यानेच बाहेर यायचे’ हे संस्कार घेऊन विवाहबंधन स्वीकारावे लागत असे. परंतु स्वाभिमान विवाह चळवळीला मात्र हे मान्य नव्हते. स्वाभिमान विवाहांचे प्रवर्तक इ. व्ही. रामस्वामी पेरियार यांच्या मते प्रेम आणि सहचाराची इच्छा ही मानवी आहे. विवाहाच्या जाचक नियमांमुळे ती नाकारली जाणे हे निसर्ग नियमाच्या विरोधात आणि क्रूर आहे. स्त्री-पुरुष समानतेबाबत अत्यंत स्पष्ट विचार ते मांडतात की, स्त्रिया गरोदर राहतात आणि मुलाला आपल्या गर्भात वाढवतात म्हणून त्या पुरुषाहून वेगळ्या ठरत नाहीत. धैर्य, क्रोध नियंत्रकाची सत्ता आणि हिंसा करण्याची इच्छा या गुणाच्या बाबतीत स्त्रिया या पुरुषांसारख्याच असतात आणि पुरुष हेसुद्धा मूल जन्माला घालत नाहीत म्हणून प्रेम, शांतता आणि संवर्धनाच्या बाबतीत स्त्रियांपेक्षा वेगळे असतात असे नाही. जरी पुरुष जैविकदृष्टय़ा गरोदर राहू शकत नसला तरी आपण जर समानतेचे मूल्य मानत असू आणि स्त्री-पुरुषांमध्ये खरे प्रेम असेल तर मूल जन्माला घालण्याची घटना सोडता इतर सर्व गोष्टींमध्ये ते दोघेही सहभागी होऊ शकतात. पेरियारांचे हे विचार खरे म्हणजे स्त्री-पुरुष नातेसंबंधांच्या मुळाशी असले पाहिजेत.
पेरियारांच्या मते विवाह म्हणजे स्त्रियांच्या लैंगिकतेचे संपत्ती व जात या संदर्भात केलेले संहितीकरण आहे. नाकात वेसण घालून गुरांना बाजारातून गोठय़ात ओढत आणणे आणि स्त्रियांनी स्वत:च्या शरीरावर विवाहाची मंगळसूत्रादी प्रतीके मिरवणे यात गुणात्मक फरक दिसत नाही. म्हणून स्वाभिमान विवाहामध्ये दोन्ही पक्षांचे विवाह मोडण्याचे व एकंदर स्वातंत्र्य अबाधित ठेवून परस्परांना जोडीदार म्हणून कबूल करणे याला महत्त्व दिले होते. स्त्रियांच्या शरीरावर प्रथा-परंपरांच्या चौकटी लादणारा पवित्र विधी असा विवाह त्यांना मान्य नाही. तर पुरोहिताच्या सेवा नाकारून, आपले आजपासून प्रेमावर आधारित असे सहजीवन सुरू होत आहे, जी मला प्रिय आहे तिला जोडीदार म्हणून मी स्वीकारतो अशा शपथेवर दोघांचे आयुष्य परस्परांशी बांधणारी एक घटना म्हणून ते विवाहाकडे पाहतात.
हिंदू विवाह कायद्यातील तरतुदी आणि पेरियारांची विवाहाची संकल्पना, रखमाबाईंसारख्या स्वाभिमानी स्त्रियांच्या मनातील स्वतंत्र आयुष्याची कल्पना यामध्ये तफावत दिसते. हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहाच्या वेळी वर-वधू दोघांपैकी कोणालाही आधीच्या विवाहातील जोडीदार असता कामा नये, दोघेही संमती देण्यास मानसिक दृष्टय़ा समर्थ असले पाहिजेत. म्हणजेच विवाहातून येणाऱ्या जबाबदाऱ्या, मूल जन्माला घालणे, पालकत्व स्वीकारणे इत्यादीमध्ये अडथळे येतील या प्रकारचा मानसिक आजार कोणालाही नसावा. मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ असावे. ते दोघे विवाहास वज्र्य अशा नातेसंबंधातील नसावेत. तसेच ते सपिंडही नसावेत. मात्र त्या-त्या जातीसमूहात अशा प्रकारचे विवाह मान्य असतील तर ते विवाह कायदेशीरच मानले जातील.
विवाहाच्या या अटींमधून विवाह जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याचा प्रयत्न दिसतो त्याचप्रमाणे काही प्रमाणात स्त्रीचे दुय्यमत्त्व ठसवण्याचाही प्रयत्न दिसतो. आत्याच्या मुलाने मामाच्या मुलीशी विवाह करणे हा केवळ दोन घरांना जोडण्याचा प्रयत्न आहे असे नाही. तर आत्या माहेराहून स्वत:च्या विवाहावेळी काही संपत्ती घेऊन आलेली असते, मुलाच्या विवाहाच्या वेळी समाज तिला सासरी स्वत:चे स्थान पक्के करण्याची एक संधी देतो. भावाची मुलगी सून म्हणून आल्याने सासूची पत वाढते तर संपत्तीची अजून विभागणी होणे टळते ही बाब दोन्ही घरांच्या फायद्याचीच असते. सगोत्र, सपिंड विवाह हे पुढच्या पिढीच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाहीत असे म्हणून ते वज्र्य मानले जातात. पती किंवा पत्नी वज्र्य नातेसंबंधांतील असतील किंवा ते सपिंड असतील तर कायद्याच्या नजरेतून असा विवाह अस्तित्वातच नसतो. अशा विवाहातील पत्नीला पतीकडून कोणतेही हक्क मिळू शकत नाही. काही जाती-समूहांमध्ये मावस किंवा चुलत भावंडांमध्ये विवाह मान्य नाही तर काहींमध्ये आत्ये-मामेभावंडांमध्ये विवाह लावून देण्याची परंपरा आहे. अशा समूहातील हे विवाह कायद्याला मान्य आहेत. विवाह करून घरात प्रवेश करणाऱ्या भावजयीचा तिची नणंद रस्ता अडवते आणि ‘तुझी पोरगी मला देशील तरच घरात येऊ देईन’ अशी गळ घालते असे प्रसंग पारंपरिक गीतांमध्ये रंगवलेले पाहायला मिळतात. शेतीप्रधान व्यवस्थेमध्ये अनेक वर्षे एकाच ठिकाणी राहिलेल्या कुटुंबाचा तिथेच विस्तार होतो. एका कुटुंबाची अनेक कुटुंबे होतात. अशा वस्तीतील मुले-मुली एकमेकांची जवळची नातेवाईक असण्याची खूप शक्यता असते. म्हणून पूर्वी गोत्र, देवक पाहणे समर्थनीय ठरू शकत होते; परंतु आता असंख्य कुटुंबांना आपले गोत्रही माहीत नसते. असंख्य विवाह या गोष्टी लक्षात न घेता लावले जातात.
कायद्यानुसार विवाह संमत वय हे १८ आणि २१ वर्षेच का? कन्या-जरठ विवाह, १२-१६ वर्षे, १४-१८ वर्षे वयापासून ते आता आपण १८ व २१ वयापर्यंत मजल मारली. बालविवाहाचे गौरवीकरण व समर्थन करताना म्हटले जाते की, लहान वय हे संस्कारक्षम असते. मुलगी तिला समज येण्यापूर्वीच सासरी गेली म्हणजे तेथील रीतीरिवाज अंगवळणी पाडून घेणे सोपे जाईल; परंतु हे पूर्ण उत्तर नाही. खरे पाहता ती वयात येऊन स्वत:च्या मर्जीने जोडीदार निवडण्यास सक्षम होण्यापूर्वी, पालकांना आणि सासरच्यांना विरोधही करू शकणार नाही; अशाच टप्प्यावर तिच्या वतीने तिच्या आयुष्याचा निर्णय घेणे पालकांच्या आणि एकंदर कुटुंब तसेच जातीव्यवस्थेच्या हिताचे असते. रीतीरिवाज, परंपरा या स्त्री-विरोधी, अन्याय्य आहेत हे लक्षात येण्यापूर्वीच तिला सवयीच्या होतात. नंतर सहजासहजी त्यांना विरोध केला जात नाही. शेवटी कुटुंब-विवाह हे जाती-धर्म व पुरुषप्रधानता टिकवणारे महत्त्वाचे खांब आहेत. तिने स्वत:च्या मर्जीने जोडीदार निवडला तर तो स्वत:च्या धर्म-जातीतील असेलच याची खात्री नाही. या सर्वामुळेही १९२९ पासून स्वतंत्र कायदा असूनही बालविवाहाची प्रथा टिकून राहिली; परंतु नवीन पिढी वाढीच्या लवकरच्या टप्प्यात सज्ञान, सक्षम होते आहे. आंतरजातीय विवाहांबाबतची कटूता काही समाजगटांमध्ये खूप घट्ट होत असतानाच काही समूहांमध्ये कमी होते आहे. विवाहानंतर पत्नीकडे बरोबरीने जबाबदाऱ्या सांभाळणारा जोडीदार म्हणून पाहिले जाते आहे. अशा वेळी मुलाचे आणि मुलीचे विवाहाचे वय हे समान का नाही? १८ आणि २१ पेक्षा दोघांसाठीही ते १८ का नाही? इतिहासात स्वयंवराची पद्धत प्रचलित होती असे म्हणताना आपण मुलांचे जोडीदार निवडीच्या हक्कांचे असे नकळत(?) आकुंचन तर करत नाही ना हे पाहाणे आवश्यक आहे.
पहिली पत्नी किंवा पती हयात असताना दुसरा विवाह बेकायदेशीर आहे. पहिली पत्नी हयात असताना, नांदत असताना पतीने दुसरी पत्नी आणणे हे एका अर्थाने दोघींसाठीही अन्यायकारक आहे. पण पतीला प्रेम वाटत नसेल, दोघांमध्ये जिव्हाळा नसेल तर अशा नात्याला अर्थच काय? अध्र्या दशकापूर्वीच इरावती कर्वे यांनी एकपत्नित्वाच्या प्रथेवर टीका केली आहे. विवाहात फसवणूक नको आणि स्त्रीला तसेच तिच्या मुलांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवता कामा नये. एकपत्नित्वाच्या अटीपेक्षा नवऱ्यावर पत्नी आणि मुलांच्या पालन-पोषण व पोटगीची जबाबदारी टाकणे इरावतीबाईंना महत्त्वाचे वाटते.
विवाह कायद्यामध्ये गरजेनुसार वेळोवेळी बदल होत गेले; परंतु कुटुंब-विवाह व्यवस्थेत सातत्य असावे, ती व्यवस्था टिकून राहावी याला आधुनिक काळातही कायद्याचा हातभार लागतोच आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आता आपल्याला रखमाबाई दिसणार नाहीत कदाचित; परंतु कायदेकर्त्यांचे हेतू आणि सध्याची बदलती सामाजिक परिस्थिती याचा प्रत्येकवेळी ताळमेळ लागतोच आहे असे दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर वैवाहिक हक्कांची पुनस्र्थापना, कायदेशीर फारकत तसेच घटस्फोटाच्या अटी यांचीही चर्चा व्हायला हवी. अनेक अटी-नियमांनी बांधून घेऊन नाते सुरू करायचे की; स्वाभिमान जागृत ठेवून, तर्काधिष्ठित व्यवहार व मुक्त जीवन महत्त्वाचे मानायचे हे त्या त्या पिढीच्या नीतिमत्तेवर अवलंबून आहे. विवाह बंधनाच्या अटी कोणत्याही असोत, ‘एक काळ असा येईल की स्त्री-पुरुष विवाहाशिवाय एकत्र राहतील’ हे पेरियारांचे म्हणणे खरे ठरते आहे.
marchana05@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा