आता बाळ मोठं झालं. सरकायला, रांगायला लागलं की खरी परीक्षेची वेळ येते. भीती, धोका, घाण, किळस अशा भावनांचा स्पर्श बाळाला अद्यापि झालेला नसतो. आपल्या अवकाशाचा सर्वार्थानं अनुभव घेण्याची त्याची धडपड असते. ‘हातांचा पाळणा आणि नेत्रांचा दिवा’ करून आई-बाबा बाळाला जपतात ते त्याची वाढ निर्विघ्नपणे व्हावी म्हणून. छोटय़ा बाळाला नेमकं कशापासून जपायचं याची माहिती असेल, तर हे काम थोडंफार सुलभ होतं.
जन्मानंतरचे पहिले काही महिने बाळ अगदी नाजूक असतं. त्याला पलंगावर किंवा पाळण्यात (उंचावर) निजवावं. त्याच्या गादीवरचं दुपटं सर्व बाजूंनी घट्ट खोचलेलं पाहिजे. बाळालाही दुपटय़ात घट्ट गुंडाळलेलं असावं. त्याच्या अंगावर सैलसर पांघरुण घालू नये. हातापायांच्या हालचालींनी पांघरूण चेहऱ्यावर ओढून घेऊन बाळ गुदमरू शकतं. बाळाला मुंग्या, ढेकूण वगैरे चावू नयेत म्हणून अंथरूण वरचेवर स्वच्छ झटकून घ्यावं. माश्या-डास यांच्यापासून संरक्षण म्हणून छत्रीसारखी मच्छरदाणी वापरावी.
घरातली मोठी भावंडं कुतूहलानं किंवा मत्सरानं बाळाचं पांघरूण, हातपाय ओढू शकतात. प्रेम करायला गेली, तरी त्याच्या चिमुकल्या चेहऱ्यावर ताई-दादाच्या वजनाचा दाब येऊ शकतो. त्यांना तुम्ही हजर असताना बाळाच्या पावलाची पापी घ्यायला शिकवावं. बाळ दूध पिऊन झोपलं असेल, तर त्याला दुधाची गुळणी येऊ शकते. त्यानंसुद्धा ते गुदमरतं. म्हणून खांद्यावर टाकून ढेकर काढल्याखेरीज झोपवू नये. त्याला पालथं टाकायचं असल्यास आपण सतत जवळ असावं. जेमतेम डोकं उचलणारं बाळ थोडय़ाच वेळात दमून नाकतोंड दाबून घेऊ शकतं म्हणून त्याला नेहमी उताणंच झोपवलं पाहिजे.
बाळाला एकटं सोडून दुसऱ्या खोलीत काम करण्याची वेळ शहरातल्या आईवर नेहमीच येते. दर दोन मिनिटांनी खोलीत डोकावून बघावंसं वाटतं. पण अलीकडे बाळाच्या हालचाली आणि आवाज टिपणारे, बाळ काय करतंय हे दाखवणारे बेबी मॉनिटर (अलार्मसहित) मिळायला लागलेत. मनुष्यबळाअभावी अशा मॉनिटरचा वापर ही काळाची गरज म्हणावी लागेल.
बाळ कुशीवर वळू लागलं. पालथं पडू लागलं की त्याला पलंगावर झोपवता येत नाही. त्याला उंच कठडय़ाच्या पाळण्यात किंवा जमिनीवरच गादी घालून झोपवावं लागतं.
कोणतीही वस्तू मुठीत घट्ट पकडणं हा छोटय़ा बाळांचा विशेष कार्यक्रम. अशा बाळमुठीत धारदार वस्तू-सुरी-कात्रीसारख्या कोणीच देणार नाही. पण चांदीच्या खुळखुळ्याला, वाळ्याला, सोन्याच्या लॉकेटलासुद्धा धार असू शकते. तिकडे लक्ष असं द्या. बाळाच्या हातांच्या हालचाली अनियंत्रित झटके मारत होत असतात. त्याच्या डोळ्यांसमोर हलणारी चिमणाळी हवीत पण हातात खेळणी देऊ नयेत. तेच खेळणं बाळ स्वत:च्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर मारून घेऊ शकतं.
आता बाळ मोठं झालं. सरकायला, रांगायला लागलं की खरी परीक्षेची वेळ येते. भीती, धोका, घाण, किळस अशा भावनांचा स्पर्श बाळाला अद्यापि झालेला नसतो. आपल्या अवकाशाचा सर्वार्थानं अनुभव घेण्याची त्याची धडपड असते. वस्तू दिसली की हातात पकडणं, चिवडणं, तोंडात घालणं या क्रिया सतत घडत राहतात. दोन बोटांच्या चिमटीत वस्तू पकडायला येऊ लागली की बाळ हातात काय काय घेईल त्याचा नेम नसतो. मांजराची शेपूट ओढ, कुत्र्याचे कान पकड, धावत्या मुंगळ्याला धरून ठेव, एक ना दोन! आईचं फेस क्रीम, बाबांचं दाढीचं सामान, दादाचे क्रेयॉन्स यापैकी मिळेल ते काय काय बरबटलं जातं. तेच भरलेले चिमणे हात तोंडात जातात, डोळे चोळले जातात. मांजरानं नख मारलं तर मोठय़ानं रडू येतं. पण काय झालं ते सांगता येत नाही.
जमिनीलगतचे ड्रॉवर्स उघडणं, जोरात बंद करणं हे आवडीचं काम याचा मुळी कंटाळाच येत नाही. दारांच्या बिजागऱ्यात हात घालणं, दारं आपटणं, इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये बोट किंवा दुसरी वस्तू घालणं, इस्त्री टेबलावरून ओढून खाली पाडणं, गरम पाण्याचा नळ उघडणं, औषधांच्या बाटल्यांची झाकणं काढणं अशा आईच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अनेक गोष्टी बाळ लीलया पार पाडत असतं. उभं राहायला शिकलेलं, धरून धरून चालणारं, उत्साहानं मुसमुसणारं बाळ म्हणजे ‘बुल इन चायना शॉप’प्रमाणे असंख्य उत्पात सहजगत्या घडवून आणतं.
दरवाजांच्या कडय़ा, बोल्ट लावणं, टी.व्ही. कॉम्प्युटर व इतर उपकरणांच्या केबल्सची ओढाताण करणं हा तर आवडीचा छंद. या सर्व बाललीलांमध्ये ठायी ठायी बाळाला दुखापत होऊ शकते. बोटं चिरडतात, किडा चावतो, गरम पाण्यानं भाजतं, जिन्याच्या पायऱ्या चढता-उतरताना पडापडी होते, फर्निचरचे कोपरे डोक्याला आपटतात, विजेचा शॉक लागतो. अरे बापरे! एकंदर बाळाला वाढवणं हे इतकं खतरनाक आहे तर!
बाळांना दुखापत होण्यासाठी काही वेळा आई-बाबापण जबाबदार ठरतात. छोटय़ा बाळांना हवेत उंच उडवून झेलणं हा खेळ मोठय़ांना खूप आवडतो. यात बाळ जरी हसताना दिसलं, तरी त्याच्या मेंदूला धोका आहे हे ध्यानात घ्यावं. बाळाला झोपाळ्यात बसवून खूप उंच उंच झोके देणंही सुरक्षित नाही. अंघोळीच्या वेळी बाळाचा हात गरम पाण्याच्या तोटीपर्यंत पोचणार नाही, ही काळजी घेतलीच पाहिजे ना! अंघोळीचे पाणी काय किंवा बाटलीतलं दूध काय, बाळाला भाजणार नाही इतपतच गरम असावं. याची खातरजमा आईनं केलीच पाहिजे.
आपल्या बाळाला घेऊन देवळात, पार्कमध्ये, मित्र-मैत्रिणींकडे किंवा उपाहारगृहात जावं असं अनेकांना वाटतं. पण तिथल्या परिस्थितीवर आपला ताबा नसल्यानं बाळावर खूप जास्त लक्ष ठेवावं लागतं. गाडीतून प्रवास करताना वास्तविक कार सीट वापरली पाहिजे. पण ती नसल्यास निदान बाळाला पुढच्या सीटवर तरी बसवू नये. मागच्या सीटचा मधला भाग यासाठी सर्वात सुरक्षित समजला जातो. अगदी छोटय़ांना दुचाकी वाहनावरून प्रदूषणातून न्यायचं शक्यतो टाळाच. अगदी अपरिहार्य असेल, तर डोक्याला रुमाल बांधून आणि खास बाळांसाठी मिळणाऱ्या कॅरियरचा वापर करून सावकाश न्या. सुळसुळीत नायलॉन साडीवर खाली खाली घसरणारं बाळ सिग्नलला धुराचे लोट खातंय, हे दृश्य भयंकरच आहे.
कोवळ्या आई-बाबांनो, वर उल्लेख केलेली यादी तशी अपूर्णच आहे. काय माहीत? तुमचं बाळ काहीतरी नवीन उद्योग करून दाखवील. तुमच्या हातात काय आहे ते आता पाहू या.
बाळाचं आगमन होणार, हे कळल्यापासून खरं तर तुम्हाला पुरेसा वेळ मिळालेला असतो, त्याचा उपयोग करा आणि घर बाळासाठी सुरक्षित करा. काही गोष्टी बदलाव्या लागतील. सर्व विजेची उपकरणं वरच्या पातळीवर हवीत. उघडे विजेचे सॉकेट्स खास चाइल्ड प्रूफ प्लग्जनी बंद करून टाका. ड्रॉवर्सना कुलपं बसवून घ्या. नवीन फर्निचर घेताना कडा आणि कोपरे गुळगुळीत असलेलंच घ्या. जुन्या फर्निचरच्या कोपऱ्यांवर रबर कॅप्स बसवून घ्या. बाथरूम, टॉयलेट, कोठीची खोली आणि घराचा मुख्य दरवाजा नेहमी बंद असू द्या. बाळाला काढता-लावता येतील असे बोल्ट कोणत्याच दरवाजाला नसावेत.
जिन्याच्या तळाशी आणि वरच्या पायरीलगत गेट्स बसवून घ्या. ही तयार मिळतात किंवा सुताराकडून बनवून घेता येतील. गॅस सिलिंडर, शेगडीत, धारदार वस्तूंच्या जवळ बाळाला पोचता येणार नाही अशी व्यवस्था करा. केरसुण्या, केराचे डबे, केर गोळा करण्याची सुपं, चपलांचा स्टॅण्ड या बाळाच्या अत्यंत आवडीच्या वस्तू त्याच्या हाती लागणार नाहीत अशी काळजी घ्या. रांगणाऱ्या बाळाला एका जागी खेळवत ठेवण्यासाठी आकर्षक प्लेपेन्स मिळतात. म्हणजे रंगीबेरंगी खेळण्यांनी सजलेला प्लॅस्टिकचा पिंजराच म्हणा ना!  पण आईला काही काळ तरी एकीकडे बाळाशी गप्पा मारत थोडं काम करता येऊ शकतं. अशी ही वस्तू आहे.
इतकं करूनही काही गोष्टी बदलता येत नाहीत. तिथे चाइल्डप्रूफ अडथळे निर्माण करून ठेवा म्हणजे बाळाला तिथपर्यंत पोचता येणार नाही. काही वेळा कपाटातल्या, शेल्फमधल्या वस्तूंची नुसती जागा जरी बदलली, तरी काम भागेल. खालच्या कप्प्यात बाळाची खेळणी, पुस्तकं ठेवली, तर त्याला काहीतरी उद्योग केल्याचं समाधान मिळतं. इतकी काळजी घेऊनही कधी ना कधी दुखापत होऊ शकते. फॅमिली डॉक्टर, बालरोगतज्ज्ञ, जवळचं हॉस्पिटल यांचे नंबर हाताशी हवेतच. पण अशा वेळी तुम्ही खंबीर राहायला शिका. गार पाणी, बर्फ, प्रेशर बॅण्डेजचा वापर आणि घाबरलेल्या, किंचाळून रडणाऱ्या बाळाला शांत करणं हे महत्त्वाचं. बाळाला सांभाळताना ‘नेत्रांचा दिवा’ करायला लागतो तो यासाठीच.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”