प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com
‘केरळ म्युरल पेंटिंग’ आत्मसात करणं जितकं अवघड आहे, तितकंच ती भिंतींवर उतरवताना मन शांत, ध्यानस्थ स्थितीत नेऊन एकाग्रता साधणंही. परंतु अर्पिता रेड्डी या चित्रकर्तीनं वयाच्या चाळिशीत या कलेचा अभ्यास करून त्यात गती प्राप्त के ली, तर तिशीतल्या सुरभी उन्नीकृष्णन् या कलेत नवनवीन प्रयोग करीत आहेत. अजंठा भित्तिचित्रांचं तंत्र वापरून केरळमधील चित्रकारांनी भित्तिचित्रांची ही परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. त्याविषयी..
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्य़ातील विंध्य पर्वतात असलेली अजंठा गुहेतील चित्रं गौतम बुद्धांच्या जन्मापासून महानिर्वाणापर्यंतची कथा सांगतात. अजंठा भित्तिचित्रांचं तंत्र वापरून केरळमधील चित्रकारांनी ही परंपरा जिवंत ठेवली आहे. ‘केरळ म्युरल पेंटिंग’ या नावानं ही शैली ओळखली जाते. ‘म्युरल’ म्हणजे भित्तिचित्र. केरळची भित्तिचित्रं मंदिरं आणि चर्चच्या भिंतींवर रंगवली जातात.
‘म्युरल’ हा शब्द ‘मुरुस’ (Murus) या लॅटिन शब्दापासून आला असून त्याचा अर्थ भिंत असा होतो. अचूकता, सममिती (सिमेट्री), अचूक रेखांकन असलेल्या या चित्रांचे विषय हिंदूंच्या पौराणिक कथांवर आधारित असतात. तर चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मसंबंधित विषयांवर आधारित भित्तिचित्रं आढळतात. या भित्तिचित्रास प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम भिंत तयार करून घेतली जाते. स्वच्छ केलेली वाळू आणि चुना यांचं मिश्रण करून दोन आठवडय़ांकरता ते ओलं राहील अशी दक्षता बाळगली जाते. पाण्यात गूळ, हिरडा वनस्पतीचा रस, कांडवेलाचा अर्क घालतात. पहिला थर खरखरीत असतो. दुसरा थर गुळगुळीत असावा म्हणून त्यात चुन्याची बारीक भुकटी आणि कापूस वापरतात. कापूस रंग शोषून घेतो म्हणून वापरतात. तसंच पोपडे न निघता रंगाचा दर्जा उत्तम राहतो. पहिला थर वाळला की अध्र्या मिलिमीटरचा दुसरा पातळ थर दिला जातो. भिंत वाळली की शहाळ्याचं पाणी आणि लिंबू रस यांचं मिश्रण उभ्या-आडव्या दिशेत कुंचला फिरवून लावतात आणि तिसरं पटल गुळगुळीत करतात. भिंतीचा रंग सफेद असतो. पांढऱ्या रंगाचा परिणाम साधण्यासाठी भिंतीचा तेवढा भाग मोकळा सोडतात- अर्थात त्या ठिकाणी रंगानं रंगवत नाहीत. पिवळा, लाल, हिरवा, निळा या क्रमानं रंगलेपन केलं जातं. पिवळ्या रंगासाठी पिवळा दगड स्वच्छ धुऊन सावलीत वाळवून भुकटी करतात. लाल रंगासाठी लाल रंगाचा दगड घेऊन वरीलप्रमाणेच कृती करतात. हिरव्या रंगासाठी निलयामारी या वनस्पतीची हिरवी पानं बारीक वाटतात. हा रंग भिंतीला लावण्यापूर्वी मोरचूदचं (कॉपर सल्फेट) मिश्रण भिंतीला लावतात. रंगलेपनापूर्वी रंगात ‘नीम ग्लू’ (कडूनिंबापासून बनवलेला गोंद) मिसळतात. काळ्या रंगासाठी मातीच्या पणतीत तेलाची वात पेटवून काजळी मिळवतात. मऊ गवताची पेंडी बांबूला बांधून ब्रश बनवतात.
चित्र रंगवताना व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वानुसार रंग वापरले जात. सात्त्विक व्यक्तीसाठी हिरवा रंग, राजस व्यक्तिमत्त्वासाठी लाल, सोनेरी, पिवळा, तर दृष्ट, तामसी व्यक्तीसाठी पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचा वापर होई. या रंगपद्धतीला ‘पंचवर्ण’ असं म्हणतात. या रंगांच्या परिणामानं ही चित्रे पाहणाऱ्यांच्या मनात उदात्त भाव निर्माण होतात. पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या दृष्टीनं राजस्थाननंतर केरळ हे उत्तम भित्तिचित्रं असलेलं स्थान आहे. कृष्णपूरम पॅलेसमधील १४ फूट बाय ११ फूट आकारमान असलेलं ‘गजेंद्रमोक्ष’ हे मोठं म्युरल याची साक्ष देतं. ही परंपरा अखंडित राहण्याचं कारण गुरुवायुर येथील कलाशाळा. सतराव्या शतकातील प्राचीन केरळमधील या ठिकाणच्या मंदिरातील म्युरल्स १९७० मध्ये लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे पुन्हा भित्तिचित्रं निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. यासाठी चित्रकारांना भित्तिचित्रांचं प्रशिक्षण देण्यासाठी एक कलाशाळा सुरू करण्यात आली. कृष्णकुमार हे याचे प्राचार्य स्वत: चित्रकार असल्यामुळे या कलाशाळेतून अनेक चांगले चित्रकार निर्माण झाले.
हैदराबादच्या अर्पिता रेड्डी या चित्रकर्तीनं २००९ मध्ये गुरुवायुर येथे केरळ म्युरल चित्रशैलीचा अभ्यास केला. राज्यशास्त्र या विषयातील आणि रेखा आणि रंगकला विषयातील उच्च पदवी घेतलेल्या अर्पिता यांनी ‘केरळ म्युरल’च्या कार्यशाळेत भाग घेतला होता. या शैलीतील अलंकारिक डौलदार मनुष्याकृती, उघडलेले मोठे डोळे, लांब ओठ, उंचावलेल्या भुवया, सुंदर अलंकरण पाहून त्या भारावून गेल्या आणि त्यांनी पुन्हा अभ्यास करण्याचं ठरवलं. त्यापूर्वी पटचित्र, फडचित्र, तंजावर चित्रशैली, लघुचित्रशैली अशा अनेक भारतीय लोकचित्रशैलींचा त्यांनी अभ्यास केला होता. गेली जवळजवळ पंधरा र्वष त्या केरळ म्युरल चित्रशैलीमध्ये कलानिर्मिती करत आहेत. केरळच्या मंदिराच्या भिंतीवरील चित्रांसारखी चित्रं नावीन्यपूर्ण पद्धतीनं त्या कॅनव्हासवर चित्रित करतात. २०१२ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘कालिदास पुरस्कार’ मिळाला असून याखेरीज इतर चार पुरस्कारांच्या मानकरी आहेत. अनेक एकल आणि सांघिक प्रदर्शनांत त्यांचा सहभाग आहे. भारतीय आणि परदेशी कलारसिकांच्या संग्रही त्यांची चित्रं असून खास उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ‘म्युझियम ऑफ स्पिरिच्युअल आर्ट’ या बेल्जियमच्या कलासंग्रहालयानं त्यांचं चित्र संग्रहित केलं आहे. वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांनी गांभीर्यानं आपल्या पेंटिंगकडे पाहायला प्रारंभ केला. पती गोपाळ रेड्डी यांचंही प्रोत्साहन असल्यानं संसार, मुलं, घरातील वृद्ध मंडळींची सेवा या साऱ्या गोष्टी आणि आपलं पेंटिंग याचा सुंदर तोल त्यांनी साधला आहे. परदेशात ‘ध्यानम् माय इनर एनर्जी’ या विषयावर अटलांटा येथे २०१२ मध्ये त्यांनी एक चित्रप्रदर्शन केलं होतं. आपली बरीचशी चित्रं त्या ध्यान श्लोकातील नियमानुसार चित्रित करतात. विष्णू धर्मोत्तर पुराणातील या श्लोकात एखाद्या देवाचं किंवा देवतेचं चित्रण करताना तिचे हावभाव, आविर्भाव, अलंकार, वस्त्रं, शस्त्रं कशी असावीत या संबंधीचं वर्णन असतं. त्यानुसार अर्पिता चित्रण करतात.
केरळ भित्तिचित्रं देवळांच्या भिंतीवरून घरातील भिंतीवर आणण्याचं कलात्मक काम अर्पिता रेड्डी यांनी केलं आहे. अर्पिता भारतीय संस्कृती, पर्यावरण याविषयीची व्याख्यानं त्या-त्या विषयांतील तज्ज्ञांना आमंत्रित करून विनामूल्य आयोजित करतात. अलीकडे त्यांनी एका सात वर्षांच्या मुलीला रोज शिकवण्याचे काम हाती घेतलं असून तिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च त्यांनी उचलला आहे. त्यांच्या आजारी सासूबाईंसाठी परिचारिका येत असे तिला भरतकाम तर शिकवलंच शिवाय आर्ट स्कूलमधील एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा शिक्षणाचा खर्च दरवर्षी त्या करतात. भारतातील मांडणा, रांगोळी या विषयांवर विविध क्षेत्रांतील त्यांच्या मैत्रिणींना घेऊन त्यांनी पंधरा जणींचा एक समूह तयार केलाय आणि टाळेबंदीच्या काळात या सगळ्याजणी ‘ऑनलाइन’ अभ्यास आणि नवनवीन संकल्पचित्रांची देवाणघेवाण आणि सराव करतात. केरळ म्युरल पेंटिंगसाठी अर्पिता यांनी निवडलेलं माध्यम कागद, जलरंग, कॅनव्हास, अॅक्रेलिक रंग असं आहे.
देवळातील चित्रं नैसर्गिक रंगानं रंगवली जातात. केरळची मंदिरं फक्त देवभक्ती, पूजा-अर्चा याकरता नसून शिक्षणाची केंद्रंच आहेत. नृत्य, नाटय़, कथकली अशा अनेक कलाप्रकारांतील कलावंतांना आश्रय देणं, त्यांचं पोषण आणि विकास करणं ही देवालय स्वत:ची जबाबदारी मानतं. सुरभी उन्नीकृष्णन् या तरुण चित्रकर्तीच्या कलेला देवळांकडून खूप उत्तेजन मिळालं. सुरभी यांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून पारंपरिक पद्धतीनं देवळात भित्तिचित्रं रंगवली आहेत. लाकडी परात बांधून त्यावर उभं राहून भिंतीवर चित्र रंगवणं ही सोपी गोष्ट नाही. पण सुरभी ते लीलया करतात. सुरभींच्या आई तंत्रशिक्षण विषयाच्या शिक्षिका आणि वडील इंटिरिअर डेकोरेटर असल्यामुळे कलेचं बाळकडू सुरभींना मिळालं होतंच. आई आणि वडील दोघांनी मिळून कला या विषयावरील एक पुस्तकही प्रकाशित केलं आहे. ते पुस्तक ही माझ्या चित्रकलेची प्रेरणा ठरली, असं सुरभी सांगतात.
‘दाराशिल्प’ म्हणजे देवळातील लाकूड या माध्यमात कोरलेलं अलंकारिक शिल्प होय. हाच विषय सुरभी यांना अभ्यासाकरिता निवडण्याची तीव्र इच्छा होती. पण त्यांच्या शिक्षकांनी सुरभींना कडाडून विरोध केला. ते म्हणाले, की स्त्रिया दाराशिल्पाला स्पर्श करू शकत नाहीत ही आपल्याकडील परंपरा आहे. त्यामुळे त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. पण पुढे मात्र वेगळंच घडलं. त्या ‘मास्टर ऑफ फाइन आर्ट्स’ (पेंटिंग) ही पदवी उत्तीर्ण झाल्यावर एक घटना त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरली. सुरभी यांना केरळमधील दत्तात्रय मंदिरातील शिल्पं रंगवण्याचं काम मिळालं आणि त्यानंतर अशा प्रकारच्या कामाची मागणी वाढतच गेली. आता देवळातील भित्तिचित्रं, शिल्पं रंगवण्याचं काम सतत सुरू असतं. एका मंदिरातील कर्नाटक शैलीतील सिमेंटमधील शिल्पं केरळ भित्तिचित्र शैलीत रंगवण्याचं आव्हानसुद्धा सुरभी यांनी यशस्वीपणे पेललं आहे.
चित्रकलेशी संबंधित इतरही कलांचं ज्ञान घ्यायला हवं, याकरिता त्यांनी ‘अॅनिमेशन’ची पदवी घेतली. ऐतिहासिक कलावस्तूंचं संरक्षण, जीर्णोद्धार, संवर्धन या विषयाची पदविकाही (डिप्लोमा इन हिस्टॉरिकल ऑब्जेक्ट्स कॉन्झव्र्हेशन) घेतली. त्याचा उपयोग त्यांना पारंपरिक चित्रांचं संवर्धन करण्यासाठी होतो. केरळमधील परंपरेप्रमाणे नृत्य आणि संगीताचं ज्ञानही त्यांना आहे, तसंच योग विषयाचा अभ्यास आणि सराव आहे. मंदिरातील लाकडी परातीवर उभं राहून मुक्तरेषा रेखांकित करणाऱ्या, नैसर्गिक रंगात चित्रं रंगवणाऱ्या या तिशीच्या घरातील तरुण चित्रकर्तीला पाहिलं तर तिच्या ऊर्जेचं, चिकाटीचं, प्रयोगशीलतेचं कौतुक वाटतं.
सुरभी यांचा सहा वर्षांचा मुलगा रुद्रन, त्या काम करताना एकीकडे आपल्या स्केचबुकमध्ये चित्र काढण्यात दंग असतो. पती साईराज उत्तम शिल्पकार आणि ग्राफिक डिझाइनर आहेत. सुरभी यांनी स्वत:चं यूटय़ूब चॅनल सुरू केलं आहे. ठरवलेल्या दहापैकी तीन व्हिडीओ त्यांनी त्यावर प्रसारित के ले आहेत. चित्रण, रंगलेपन, शिल्पकला, तंत्रचित्रकला, मांडणी शिल्प (इन्स्टॉलेशन), स्केचबुकमधील रेखाटन, संगीताच्या आणि नृत्याच्या तालावर चित्रांकन, व्यवसायाच्या दृष्टीनं मार्गदर्शन, चित्रांचं काम स्वीकारताना लक्षात ठेवण्याच्या बाबी, ध्यान करून त्यानंतर चित्रनिर्मिती, अशा अनेक विषयांचा परामर्श घेण्याचा आणि त्यानंतर केरळमधील निवडक चित्रकारांच्या मुलाखती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.
सुरभी स्वत: चित्रनिर्मिती करण्यापूर्वी पूजा-अर्चा, ध्यान करून कामास प्रारंभ करतात, तर अर्पिता ध्यान श्लोकाचा आधार घेऊन चित्रिनिर्मिती करतात. केरळ भित्तिचित्र हा एकच विषय दोन भिन्न पिढय़ांतील चित्रकर्ती फुलवत आहेत. अर्पिता यांनी वयाच्या चाळिशीत आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला, तर पुढल्या पिढीतील सुरभी यांची कारकीर्द वयाच्या तिशीमध्ये प्रगतिपथावर पोहोचली आहे.
बदलत्या काळाबरोबर राहात आजच्या चित्रकर्ती प्रगतिपथावर वाटचाल करत आहेत आणि राहतील.
चित्रकर्ती सुरभी उन्नीकृष्णन् यांच्या यूटय़ूब चॅनलची लिंक : https://www.youtube.com/channel/UCxGe6GufrSq5IW3hQKpdCow