नवा पदार्थ जन्माला घालायचा, म्हणजे सुगरणीची कसोटी लागते. अर्थात सृजनासाठी जन्मकळा महत्त्वाच्याच! मात्र, एकदा का त्यात तरबेज झालो की कल्पनांना अंत नसतो. शिवाय मायक्रोवेव्ह, फ्रिज आणि मिक्सर ही महत्त्वाची साधने हाताशी असल्यावर कोणतेही प्रयोग यशस्वी होतातच!
दहावी-बारावीत ‘क्लास’ न लावता इंग्रजी-गणितात धो-धो मार्क मिळविणे हा जसा कौतुकाचा विषय (माझ्या लहानपणी) नव्हता, तस्संच हॉटेलात न जाता चारी ठाव घरीच जिभेचे चोचले पुरविण्याची ‘पद्धत’ होती!
चायनीज काँटिनेंटल काय पण पंजाबी भाज्यांमध्ये राजमा-छोले आणि ‘दम-आलू’ यापलीकडे स्वयंपाकघरांची मजल पुढे जात नसे. पण जे काही कुठे खायला-पाहायला मिळेल ते घरी करून बघण्याची मुभा आम्हा दोघा बहिणींना आमच्या आईने अगदी लहानपणीच दिली होती. खरं म्हणजे दोन मुली म्हणजे पै-पै साठवून हुंडा जमा करायचा सोडून मुलांच्या मनात आलेल्या जास्तीत जास्त गोष्टी करून बघण्याची संधी आम्हाला असल्याने आमचे स्वयंपाकघर आम्हा दोघींसकट सर्व मैत्रिणींची ‘प्रयोगशाळा’ कधी झाली ते कळलेच नाही. त्यात अनेक प्रयोग झाले. त्यातून काही पदार्थ घडले, कधी बिघडले आणि अनेक जन्मलेसुद्धा!
आमच्या लहानपणी वर्षभराचे पापड घरी करण्याची पद्धत होती. हौस म्हणून आम्ही मैत्रिणींसकट पापड लाटायला बसत असू. गोल आकार बिघडायला लागला की, पापड वर्तमानपत्रावर टाकायचा. मग आई-मावशी तो पूर्ण लाटून वाळायला ठेवत. हा संस्कार असलेल्या माझ्या एक मैत्रिणीचे खूप लवकर लग्न झाले आणि त्यानंतरच्या पहिल्याच उन्हाळ्यात तिने असे जाड जाड पापड लाटून वाळायला ठेवले. आई-सासूपासून दूर नवऱ्याबरोबर एकटय़ाच राहाणाऱ्या या मैत्रिणीला आपली चूक कळेना. मग फार खटाटोपीनंतर मला तिचा फोन, त्यातून जन्म झाला पापडाच्या पिठाच्या पुऱ्यांचा! यातल्या थोडय़ाशा हडकलेल्या पुऱ्या फुगल्या नाहीत. पण शेवटी शेवटी केलेल्या पुऱ्या चांगल्या फुगल्या. मग काकडीचा कायरस आणि फुगलेल्या पुऱ्यांनी संध्याकाळचे खाणे सजविले तर कडक पुऱ्यांनी दुसऱ्या दिवशीचा नवरोजींचा डबा! शिवाय पुण्यातल्या मुलींना इतके नवनवे पदार्थ येतात हे सर्टिफिकेट मिळाले ते वेगळेच. पण या (मऊ आणि कडकसुद्धा) पुऱ्या अजूनही आमच्या दोघींकडचे स्टार्टरचे प्रश्न सोडवतात ते वेगळेच!
असाच एक चुकलेला पदार्थ (खास कोकणस्थी!) म्हणजे सांदण. आंब्या-फणसाच्या त्या दिवसांनी कोणीही न यापूर्वी खाल्लेला पदार्थ चांगल्या २०-२५ जणांच्या पानात ‘स्वीट डिश’ म्हणून नावाजला खरा! बिघडलेल्या या फणसाच्या सांदणाची झाली पोळी आणि त्यावर थर पडले ते रबडी आणि हापूस आंब्याच्या फोडीचे. या पोळ्या डब्यात भरून थेट गेल्या डीप फ्रीझरमध्ये. टूटीफ्रुटी आणि दूध-मसाल्याने सजलेल्या त्या निनावी डेझर्टची चव अजूनही सर्वाच्या जिभेवर रेंगाळतेय!
नासलेलं दूध हा असाच एक प्रश्न असे. एकत्र कुटुंब असेल तर सरळ पोळ्याची कणीक त्यात भिजली जाई (कारण वाया काही जाऊ द्यायचं नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म.)
पण घरात थोडी माणसं असतील तर? शिवाय रसगुल्ले, मलई, सँडवीच ही नावेसुद्धा अजून कानावर आली नव्हती आमच्या. मग त्या नासलेल्या दुधाच्या पाण्यापासून वेगळा काढून त्याचे स्टफ पराठे बनवत असे (बटाटा पराठय़ापासून स्फूर्ती घेऊन!) पण याची चवसुद्धा आजच्या रेडिमेड मिळणाऱ्या पनीरच्या पराठय़ांपेक्षा कितीतरी आवडीची होती. आता दूध नासलं तर बागेत जातं. कारण त्याच्यात कुठले मायक्रो ऑर्गनायझम्स असतील तयार झालेले कोणास ठाऊक, हाच विचार पहिल्यांदा मनात येतो.
पण मनापासून प्रयोग केले तर स्वयंपाकशाळेतून मिळणारा आनंद अगदी अवर्णनीय. चॉकलेट मोदकांसारखी डेझर्टस् असतील नाहीतर अनेक प्रकारची स्टार्टर्स असतील. आमच्या या शाळेत सतत जन्म घेत असतात. आता मैत्रिणींची जागा माझ्या मुलाने घेतलीय. आता त्याने असं माझ्यातून बिघडलेल्या पदार्थाना घडवायचे कॉन्ट्रॅक घेतले आहे. शिवाय प्रत्येक वेळी काहीतरी ‘नवीन’ देण्याचे समाधान काही औरच! त्यामुळे आमचे जेवण वेगळेच असते प्रत्येक वेळी. मग कधी येताय जेवायला?
सुगरण मी : सृजनाच्या जन्मकळा
नवा पदार्थ जन्माला घालायचा, म्हणजे सुगरणीची कसोटी लागते. अर्थात सृजनासाठी जन्मकळा महत्त्वाच्याच! मात्र, एकदा का त्यात तरबेज झालो की कल्पनांना अंत नसतो. शिवाय मायक्रोवेव्ह, फ्रिज आणि मिक्सर ही महत्त्वाची साधने हाताशी असल्यावर कोणतेही प्रयोग यशस्वी होतातच!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-12-2012 at 03:41 IST
मराठीतील सर्व खाणे, पिणे नि खूप काही बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khane pine ani khup kahi