रश्मी करंदीकर

ख्रिसमस आणि केक हे समीकरण आपल्याला माहीत असतं. पण वेगवेगळ्या देशांमध्ये ख्रिसमससाठी वेगवेगळ्या प्रकारच्या केकबरोबरच  इतरही अनेक पदार्थ केले जातात. ख्रिसमस चविष्ट करणाऱ्या या दुनियेचा फेरफटका-

Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
Gulabrao Deokar, Gulabrao Deokar latest news,
गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचा विरोध, पक्ष प्रवेशाच्या विरोधात फलक झळकला
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

ख्रिसमस आणि केक हे समीकरण कित्येक वर्षांपासून अस्तित्वात आहे. भारतात अनेकविध जाती, धर्म गुण्यागोविंदाने नांदतात. त्यांचे सणवार होतेच शिवाय इंग्रजांनी इथे ख्रिसमस साजरा करायला सरुवात केली. सुरुवातीला पाव, बिस्किट आणि केकशी फटकून वागणारी भारतीय जनता हळूहळू या पदार्थाच्या प्रेमात पडली आणि आता शहरातच नव्हे तर खेडय़ापाडय़ातही  केकशिवाय वाढदिवस साजरा होत नाही.

मुंबईसारख्या शहरात लहानाचे मोठे होण्याची एक मजा आहे. हे शहर तुम्हाला सर्वसमावेशक बनवते. माझ्या कॉलनीत सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहायचे त्यामुळेच माझी खाद्यसंस्कृती अतिशय समृद्ध झाली. तसेही आपण भारतीय उत्सवप्रिय असतो. वर्षांचा शेवटच्या महिन्यातील मोठ्ठा उत्सव म्हणजे ‘नाताळ’. ख्रिश्चनबहुल भागात नाताळ पाहण्याची मजा काही औरच आहे. वसईमध्ये नाताळचं एक वेगळं, मराठमोळं रूप पाहायला मिळतं. वसईतील नाताळ गोठय़ांची स्पर्धा खूप मस्त असते. माझ्या वसईतील कार्यकाळात मला या नाताळ गोठे स्पर्धेचे परीक्षण करण्याचीही संधी मिळाली. मस्त गुलाबी थंडीत घराबाहेर तयार केलेले नाताळ गोठे पाहणं आणि प्रत्येक घरचा पाहुणचार! दिवाळी फराळासारखा तिथे घराघरात नाताळचा फराळ केला जातो. २४ डिसेंबरच्या रात्री वसई गावात फेरफटका मारण्याची मजाच काही औरच आहे. नेवऱ्या, पानगीपासून वेगवेगळ्या प्रकारचे केक, कुकीज, ख्रिसमस पुडिंग, टर्की असं बरंच काय काय ख्रिसमस डिनरला असतं.

वसईकरदेखील प्रेमळ आणि आपुलकीने वागणारे. नाताळसणाला, पोलीस स्टेशनला नाताळ फराळ, ख्रिसमस केक आणून देणारे अनेक चेहरे आजही डोळ्यांसमोर तरळतात. यात सर्वात खास आकर्षण म्हणजे वसईच्या बिशप हाऊसमधील ख्रिसमस चहा पार्टीचे आमंत्रण! अनेकविध प्रकारचे केक, कुकीज, पुडिंग्जने सजलेले ट्रे, ख्रिसमस ट्री आणि शुद्ध मराठीतून ख्रिसमसच्या गोष्टी ऐकणे हा सोहळा निराळाच असतो.

वसईची खास आठवण येण्याचे कारण अर्थात ख्रिसमस. मागच्या वर्षी ख्रिसमसनंतर लगेचच सुरू झालेल्या या खाद्यभ्रमंतीच्या यात्रेत वर्ष कधी संपलं ते कळलंच नाही. वर्षांचा हा शेवटचा लेख ख्रिसमस स्पेशल पदार्थाच्या यात्रेशिवाय कसा पूर्ण होणार?

मुंबईतही ख्रिसमसचे अनेक स्पेशल पदार्थ मिळतात. माझा ख्रिसमस साजरा होतो ते अमेरिकन बेकरीमधील ख्रिसमस पुडिंग, भायखळा बेकरीतील प्लम एन रम केक, चॉकलेट बॉल्स आणि ग्रांट रोडच्या मेरवान बेकरीतील मावा केकने. या तीनपैकी दोन बेकरींना तर १०० वर्षांचा इतिहास तर आहेच, पण चव आणि अस्सलतेबाबत आजही त्या अव्वल आहेत.

ख्रिसमस कॅरोलनंतर वाफाळती कॉफी पिता पिता खास ख्रिसमस केक खाण्याची मजा वेगळीच आहे. रम केक, ख्रिसमस पुडिंग हे प्रत्येकालाच आवडतं असं नाही. खरं तर त्याची चव आवडावी लागते. मुरलेल्या रमचा किंचित कडू स्वाद प्रत्येकालाच भावेल असं नाही. पण एकदा अस्सल प्लम/ रम केकच्या आणि ख्रिसमस पुडिंगच्या प्रेमात पडलात की तुम्ही कम अस्सल, दुय्यम प्रतीचे डुप्लिकेट केक खाऊच शकत नाही. मावा केकचेही अनेक प्रकार आहेत. थिओब्रोमाचा बटर मावा केक, अंधेरी मेरवानचा मावा केक, वन एटी डिग्रीचा मावा केक.. प्रत्येकाची चव आणि खासियत वेगळी आहे. पण ग्रॅण्ट रोडच्या बी मेरवानचा मावा केक या सर्वामध्ये टॉप आहे. तर ख्रिसमसच्या दिवशी हा केक मला माझ्या बालपणीच्या खाद्य यात्रेत घेऊन जातो. सजवलेलं ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजच्या कथा आणि लाल मोजा. त्या मोज्यामध्ये सांताक्लॉजसाठी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि त्यात मागितलेल्या गिफ्ट्स.. सकाळी उठून मोज्यामध्ये चॉकलेट आणि गिफ्ट बघितले की आनंदाने उडय़ा मारत किचनमध्ये आईजवळ धाव घ्यायची. खरंच आपलं लहानपणीचं जग किती निरागस निष्पाप आणि छान असतं. त्या निरागस जगातून उगाच बाहेर पडून आपण मोठे होतो आणि लहानपणीची निरागसता कुठेतरी हरवून बसतो, असं वाटतं.

पूर्ण युरोपमध्ये ख्रिसमसकरिता खूप छान छान खाद्यपदार्थाची रेलचेल असते. ख्रिसमसची रोषणाई, शॉपिंग हे सगळं इंग्लंडमध्ये खूप छान पाहायला मिळतं.

झिमस्टेरन

ख्रिसमससाठी ताऱ्याच्या आकाराची ही खास बिस्किटं जर्मनीमध्ये बनवली जातात. बदाम, दालचिनीचा वापर करून चांदणीच्या आकारांत बनवलेल्या या बिस्किटांवर साखरेचं पांढरेशुभ्र कोटिंग असतं.

तुरॉन (स्पेन)

कोणत्याही स्पॅनिश माणसाला तुरॉन या पारंपरिक गोड पदार्थाबद्दल विचारा. तो अतिशय आत्मियतेने त्याबद्दल सांगेल. तुरॉन हार्ड आणि तुरॉन सॉफ्ट असे दोन प्रकारचे तुरॉन स्पॅनिश लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. गोल किंवा षटकोनी आकारात तुरॉन बनवताना साखर, मध, अंडं आणि बदामांचा वापर करतात. १६ व्या शतकातील स्पॅनिश कुकरी बुकमध्येही तुरॉनचा उल्लेख आहे. काही तज्ज्ञांच्या मते मुस्लीम रेसिपींमधून तुरॉन हा पदार्थ जन्माला आला.

 रोस्का द रेज

हा स्पेनमध्ये किंग्स् डे या ख्रिसमसच्या शेवटी असणाऱ्या उत्सवात केला जाणारा विशेष केक आहे. या केकमध्ये क्रीम आणि सुकवलेल्या फळांचं मिश्रण भरलं जातं. याखेरीज एक छोटी राजा राणीची प्रतिकृती बनवून या केकमध्ये लपवली जाते. केक कापल्यावर ज्याच्या वाटय़ाला ही प्रतिकृती लपलेला तुकडा येतो त्याला त्या दिवशी विशेष मान दिला जातो. त्या व्यक्तीला पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या केकची ट्रीट द्यावी लागते.

बोलो रे (पोर्तुगाल)

पोर्तुगलमधील विशेष डिश असलेला हा केक मूळच फ्रान्सचा. फ्रान्सचा हा केक १८व्या शतकात पोर्तुगलमध्ये आला. या केक मुकुटाच्या आकाराचा बनवतात. त्यामध्ये सुकवलेली फळं आणि ड्रायफ्रुट्स भरली जातात.

ल बॉश द नोएल 

फ्रान्समध्ये ख्रिस्मसच्या स्पेशल डिनरनंतर हा केक डेझर्टमध्ये दिला जातो. लाइट स्पॉन्ज केक रोल चॉकलेट किंवा कॉफी क्रीमच्या आइसिंगने सजवला जातो.  हा केक झाडाच्या खोडाच्या आकारात तयार केला जातो. या केकचं डेकोरेशन करताना पानं, फुलं, फ्रेश बेरीजचा वापर केला जातो. १९ व्या शतकापासून फ्रान्समध्ये हा केक केला जातो. २०७.८० मीटरचा लांब ल बॉश द नोएल केक बनवून या केकचे नाव गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

१८७५ पासून आइसलॅण्डमध्ये खास ख्रिसमसकरिता विनरतेर्ता हा केक बनवला जातो. सात व्हॅनिला केकच्या नाजूक थरांमध्ये व्हॅनिला बटर क्रीम, बदामाच्या क्रीमचे थर लावून हा केक केला जातो.

 आयरीश ख्रिसमस केक

आयर्लण्डमध्ये ख्रिसमसच्या सहासात आठवडे आधी व्हिस्कीमध्ये ड्रायफ्रूटस आणि सुकवलेली फळे मुरवली जातात. आणि त्यापासून खास आयरिश ख्रिसमस केक बनवला जातो. त्यावर खास सफेद मार्झीपॅन किंवा साखरेचे आइसिंग केले जाते. कोणताही आयरिश ख्रिसमस या खास केकशिवाय साजरा होत  नाही.

ख्रिसमस पुडिंग : ब्रिटनमधला ख्रिसमस खास पुडिंग करून साजरा केला जातो. दालचिनी, जायफळ, सुंठ आणि वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ वापरून हे पुडिंग तयार करतात. ते तयार करताना मसाले, ड्रायफ्रुटस आणि सुकवलेल्या फळांचे मिश्रण एकत्र करणं हा सोहळा असतो. त्यासाठी मित्र आणि आप्तस्वकीय एकत्र येतात. या पुडिंगसाठी फ्रुट केक बेक केला जातो. तेच मिश्रण वाफवले की हे पुडिंग तयार होते.

 नॉर्वे

नॉर्वेमध्ये क्रान्स केक नावाचा पिरॅमिडच्या आकाराचा केक केला जातो. याला टॉवर केक असंही म्हणतात. क्रान्स केकमध्ये कुकीज आणि केक दोघांचाही समावेश असतो. बदाम, आइसिंग शुगर आणि अंडय़ातील पांढरा भाग याच्या एकत्रित मिश्रणातून हा क्रान्स केक करतात. या केकचे डेकोरेशन फार मस्त असतं. बॉन बॉन, लॉलीज, स्पार्कल्स आणि नॉर्वेच्या छोटय़ा छोटय़ा  झेंडय़ाच्या साहाय्याने हा केक सजवला जातो.

स्वीडन

स्वीडनमध्ये सेंट ल्युसियाच्या जन्मोत्सवाबरोबर ख्रिसमसची सुरुवात होते. सेंट ल्युसियाच्या वेशात एक नवतरुणी येते, तिच्या डोक्यावर हिरव्या भाज्यांनी बनवलेला मुकुट असतो. तिच्या हातात सॅफ्रॉनब्युलर नावाचा फ्रेश केक असतो. त्यात ती मेणबत्ती पेटवते आणि ख्रिसमस साजरा केला जातो.

निरनिराळे मसाल्याचे पदार्थ, केशर, मनुके यांची रेलचेल असलेला हा केक अतिशय स्वादिष्ट असतो. प्रत्येक स्वीडिश गृहिणी तिचे पाकतंत्र पणाला लावून सॉफ्ट आणि स्पाँजी सॅफ्रॉनब्युलर करते. ख्रिसमसच्या वेळी माझा केशराचा केक तुझ्या केशराच्या केकपेक्षा कसा भारी आहे हे सांगण्याची एकही संधी पाककलानिपुण स्वीडिश स्त्री सोडत नाही. आपल्याकडे दिवाळीत जसे लहान मुले किल्ले बनवून दिवाळी साजरी करतात तसेच स्वीडनमध्ये लहान मुले छोटय़ा छोटय़ा सॅफ्रानब्युलरच्या साहाय्याने सांतासाठी घर बनवतात आणि ख्रिसमसचा आनंद लुटतात.

फिनलॅण्ड

फिनिश घरांमध्ये सगळे मिळून घरच्या ओव्हनमध्ये जोलुटोरट्ट बेक करतात आणि ख्रिसमस साजरा करतात. याला काही ठिकाणी ताही टोरट्ट असेही म्हणतात; म्हणजे चांदण्याच्या आकाराचा. इंग्रजीमधल्या ‘टॉर्ट’वरून हे नाव तयार झालं असावं. यामध्ये प्रुन जॅम किंवा सफरचंदापासून तयार केलेला जॅम फिलिंग म्हणून वापरला जातो. हा केक चांदणीच्या अथवा पवनचक्कीच्या पात्याच्या आकाराचा करतात. तुमचा फिनिश मित्र / मैत्रिण असेल तर त्यांना या केक/ टार्टबद्दल नक्की विचारा. माझी फिनिश पेन फ्रे ण्ड मला ही सगळी  माहिती पाठवायची. आपल्याकडे दिवाळी सुरू झाली की घराघरातून चकली, लाडू करंज्यांचे वास दरवळतात आणि दिवाळीची चाहूल लागते अगदी तसेच फिनलॅण्डमध्ये या काळात ताज्या प्रुन जॅम किंवा सफरचंदाच्या वासाने या फेस्टिव्ह सीझनची चाहूल लागते.

डेन्मार्क

डेन्मार्कमध्ये ख्रिसमससाठी ड्रोमोकेज हा खास डॅनिश पदार्थ बनवला जातो. ड्रोमोकेजचा अर्थ ‘गोड स्वप्न’.. खरोखर एखाद्या स्वीट ड्रीमसारखा हा पांढरा शुभ्र केक तोंडात लगेच विरघळतो. अतिशय सॉफ्ट, स्पॉन्जी केकवर व्हॅनिलाचे मृदू आवरण असते. त्यावर कॅरमल आणि कोकोनटच्या क्रिस्पी लेयरने सजावट केली जाते. या अप्रतिम केकशिवाय डेन्मार्कमधला ख्रिसमस अपूर्ण असतो. २० व्या शतकात ब्रोव्हस्त प्रांतात प्रथम हा केक बनवला गेला. तेव्हापासून तो डेन्मार्कच्या ख्रिसमसचा अविभाज्य भाग आहे.

नेदरलॅण्ड

नेदरलॅण्डमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने नातेवाईकांच्या भेटीगाठी, गिफ्ट्स आणि अर्थात छान छान पदार्थाची रेलचेल असते. नेदरलॅण्डचे लोक या वेळी त्यांची पारंपरिकता खूप जपतात. त्युलंबंड नावाचा पाउंड केक ख्रिसमसच्या वेळी जरा अधिक क्रिमी बनवला जातो. ‘क्रेस्त्युलबंड’ या नावाने हा केक ओळखला जातो. भरपूर लोणी, ड्रायफ्रुट्स यामुळे हा केक अतिशय चविष्ट होतो. खास लाल रंगाची रिबिन लावून हा केक ख्रिसमसमध्ये गिफ्ट केला जातो.

बेल्जियम

बेल्जियममध्ये ख्रिसमसच्या सुट्टय़ांमध्ये खास कॉगनॉक्स नावाचा केक बेक केला जातो. यालाच तिथे ‘ब्रेड ऑफ जिझस’ असेही म्हणतात. या केकच्या छोटय़ा आकाराला ‘बेबी जिझस’ म्हणतात. हा केक हॉट चॉकलेटबरोबर सव्‍‌र्ह करतात. ऑस्ट्रिया, जर्मनीमध्ये ड्रेस्डेन सोलेन नावाचा खास ब्रेड, फळं घालून ख्रिसमसकरिता तयार करतात. हा विशेष केक बनवायची परंपरा १४७४ मध्ये सुरू झाली. ड्रेस्डेन शहरामध्ये बनवण्यात येणाऱ्या या केकवर किंग ऑगस्टस दुसरा याचे खास सील असायचे. त्या काळात ड्रेस्डेन शहरात हा विशेष केक बनवणारे १५० बेकर्स होते. १४ व्या शतकापासून ड्रेस्डेन स्टोलेन बनवण्याची परंपरा आजतागायत चालू आहे.

स्वित्र्झलॅण्ड

स्वित्झर्लॅण्डमध्ये ख्रिसमसकरिता खास चारबेल कुकीज बनवण्याची परंपरा आहे. या कुकीज स्पेशल गिफ्ट बॉक्समध्ये भरून मित्र-मैत्रिणींना दिल्या जातात. या कुकीज बनवताना खास बडीशेपचा वापर केला जातो. बडीशेपच्या स्वादामुळे या कुकीज वेगळ्या लागतात. याखेरीज बुनस्ली (स्वीस ब्राऊनी), झिमस्टेन (दालचिनीच्या स्वादाचा केक), कोकोनट मॅक्रोन आणि बस्लर लकेर्ली अशा खास केक्स आणि कुकीजमुळे स्विस ख्रिसमस साजरा होतो.

 इटली

इटलीमध्ये ख्रिसमसकरिता बऱ्याच प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात. परंतु आजही इटलीमधील पारंपरिक ख्रिसमस केक ‘पांटोने’ हा आहे. हा केक बनवण्याची सुरुवात मिलानमध्ये झाली. रोमन साम्राज्यात हा केक मधाबरोबर खाल्ला जायचा. हा केक बनवणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे.

चेक रिपब्लिक

या छोटय़ाशा देशातही ख्रिसमसची एक खास परंपरा आहे. तिथे व्हॅनोका नावाचा खास केक ख्रिसमसकरिता बनवला जातो. हा केक बनवणे हे खूप कौशल्याचे आणि कलाकुसरीचे काम आहे. या केकचे पीठ मळणे, ते फुगवणे आणि नंतर बेक करणे या सर्व प्रकाराला बराच वेळ लागतो. गंमत म्हणजे आपल्याकडे जसे सणासमारंभाच्या जेवणाला पूर्वी सोवळे असायचे तसेच हा केक बनवायला चेकमधल्या बायकांना खूप सोवळे पाळावे लागते. एका विशिष्ट प्रकारचा पांढरा अ‍ॅप्रन हा केक बनवताना घालावा लागतो. या काळात तिने कोणाशी बोलायचे नसते.

या केकमध्ये बेक करताना एक नाणे टाकले जाते. हा नाणे टाकलेला केकचा पीस ज्याला मिळेल त्याला नवीन येणारे वर्ष चांगले भाग्याचे जाते असा समज प्रचलित आहे. हा केक करताना करपला किंवा बिघडला तर तो अपशकून मानतात.

स्लोवाकिया

स्लोवाकियामध्ये ख्रिसमससाठी खास स्टेड्राक नावाचा लेयर्ड केक तयार केला जातो. प्लम जॅम, खसखस, भरडलेले अक्रोड आणि खास फार्मर चीज याच्या वेगवेगळ्या लेयर्सने हा केक तयार केला जातो. ख्रिसमसच्या आदल्या संध्याकाळी असणाऱ्या खास ख्रिसमस इव्ह डिनरला हा केक बनवला जातो. या थरांवर थर ठेवून केलेल्या केकच्या थराचेपण वेगळे महत्त्व आहे. हे सर्व लेयर्स समृद्धी, आनंद, चांगली प्रजननक्षमता याचे प्रतीक समजले जातात.

पोलंड

मॅकोविक हा खास रोल केक पोलिश आज्या आपल्या नातवंडांसाठी ख्रिसमसला बनवतात. खसखस रात्रभर दुधात भिजवून अगदी बारीक वाटून त्याची बारीक पेस्ट या केकमध्ये फिलिंगकरिता वापरली जाते. यामध्ये संत्र्याची आणि लिंबाची सालं वापरण्यात येतात. ज्यामुळे या केकची चव अधिक खुलून येते. पोलंडमध्ये हा केक कॉफीबरोबर सव्‍‌र्ह केला जातो.

लिथुनिया

या युरोपियन देशात ख्रिसमस ट्रीच्या आकाराचा खास केक बनवतात. त्याला ‘साकोती’ म्हणतात. हा केक करायला खूप कठीण असल्यामुळे बेकरीमध्येच बनवला जातो. हा केक एवढा प्रसिद्ध आहे की बेकरीचे शेफदेखील याची रेसिपी अतिशय सिक्रेट ठेवतात. १५ व्या शतकापासून ‘साकोती’ केला जातो.  लॅटिव्हियामध्ये ख्रिसमसकरिता जिंजर ब्रेड आणि जिंजर कुकीज बनवल्या जातात. या काळात मॉल आणि सुपरमार्केटमध्ये जिंजर ब्रेडचे तयार पीठ विकत मिळते. लॅटिव्हियन गृहिणी ते विकत आणून आपल्या घरातल्यांच्या आवडीनुसार सॉफ्ट केक किंवा क्रिस्पी बिस्किट तयार करते.

इस्टोनिया या युरोपियन देशात काळ्या मिरीचा वापर करून ‘पिपरकोगिड’ नावाचा खास केक ख्रिसमसकरिता बेक केला जातो. बेलारूसमध्ये वेगवेगळ्या धान्यांचा वापर करून स्वीट पुडिंग तयार केले जाते. कोसोवोमध्ये ‘बकलावा’ बनवला जातो.

रोमानियामध्ये ख्रिसमससाठी खास कोसोनॅक नावाचा केक तयार केला जातो. यातील लेयर्समध्ये संत्र्याच्या साली, लिंबाच्या साली, अक्रोड, रम आणि व्हॅनिला यांचे एकत्रित मिश्रण करून भरले जाते. क्रोएशियामध्ये ख्रिसमसला आपल्यासारखेच लाडू केले जातात. अर्थात हे लाडू चॉकलेट, बॅ्रण्डी आणि आइसिंग शुगरचा वापर करून केलेले असतात.

देशोदेशीच्या ख्रिसमस रेसिपी बघितल्या तर ख्रिसमसच्या काळात तमाम गृहिणींची / शेफ्सची पाककौशल्ये पणास लागतात. अगदी युरोपातदेखील घराघरांत  वेगवेगळ्या रेसिपी आहेत. परंपरागत पदार्थ आहेत. सणांचा आनंद एकत्र जेवण करून साजरा केला जातो. २४ डिसेंबरपासून सुरू झालेले हे सणाचे वातावरण जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत असते. चला मग आपणही खास प्लम केकने या नववर्षांचे स्वागत करू या. (समाप्त)

Story img Loader