मुलांनी लहान लहान ध्येयं ठरवणं, ती गाठणं यातूनच मोठं काही करायचं बळ मिळतं. लहानपणापासून हे केलं की मोठेपणी व्यक्तिमत्त्व विकासाचे महागडे कोर्स करावे लागत नाही. एकच लक्षात ठेवले पाहिजे. निर्णय घेतला की त्याप्रमाणे वागण्याची जबाबदारी तुमचीच..अर्थात मुलांचीच !
जून उजाडतो. शेतकरी उत्सुकतेनं पावसाची वाट पाहतात. अगदी तशीच वाट पाहत असतात मुलं शाळा उघडण्याची. साऱ्या नव्या गोष्टी. सोबत नवे मित्र. नव्या शिक्षकांना भेटण्याची ओढ. हीच वेळ असते त्यांच्या स्वागतोत्सुक मनात नवी बीजे पेरण्याची. यातून उगवणाऱ्या नव्या रोपटय़ाची वर्षभर निगराणी केली तर वर्षांच्या शेवटी खूप काही हाती लागतं हे समजावून सांगण्याची.
सध्या शाळा बंद. मग मोर्चा वळवला घराजवळच्या मैदानाकडे. मुलं तिथे मुक्तपणे खेळत होती. ‘लवकरच आता शाळा सुरू होईल. नव्या वर्षांत नवं काय करणार?’ या माझ्या प्रश्नावरचं त्यांचं मौन खूप बोलकं होतं. ‘‘खूप अभ्यास करणार आणि भरपूर मार्क मिळवणार,’’ असं एक-दोघांनी दिलेलं उत्तर मला रुचत नव्हतं. पूर्वी आम्ही शाळेत नववर्ष समारंभ करायचो. कार्यक्रमाचा शेवट मौनानं होई. मुलं छोटामोठा संकल्प करीत व तो वहीत उतरवून काढत. इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी यात सहभागी होत. या संकल्पाचं काय झालं ते मुलं वर्षांच्या शेवटी सांगत. वर्षभर ही सारी काही ना काही निमित्ताने संपर्कात असत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याची सत्यता पडताळून पाहता येई.
याचाच उल्लेख करत मी मुलांना सांगितलं, ‘बघा विचार करा. परस्परांत चर्चा करा. तुम्हाला काय येतं, काय येत नाही किंवा काय आवडतं, काय नाही, कोणती गोष्ट करावीशी वाटते पण जमत नाही इत्यादी इत्यादी. उद्या आपण भेटू या. याचवेळी याच ठिकाणी ओके बाय.’
दुसऱ्या दिवशी सारी जमली. आम्ही एका झाडाखाली बैठक जमवली. गप्पांची सुरुवात विजयनं केली. ‘‘बाई मी पुढील वर्षी अक्षर सुधारणार, या वर्षी माझ्या अक्षरावरून मी खूप बोलणी खाल्ली. बाईंनी माझ्या ओपन बुक टेस्टला बिग झीरो दिला. वही तपासायला नकार दिला. म्हणाल्या, ‘तू काय लिहितोय ते वाचता तर आलं पाहिजे ना.’ इतर शिक्षकांचं असंच झालं असणार. म्हणूनच मला कमी मार्क मिळाले. मला सेमी इंग्लिशची तुकडी मिळाली नाही.’’ हे सांगताना त्याचे डोळे भरून आले होते. संजय आणि निरुपमा एकाच वयाचे, एकाच इमारतीत राहणारे, पण वेगळ्या माध्यमात शिकणारे. संजयला इंग्रजी बोलायला जमत नाही तर निरुपमाला मराठी वाचता येत नाही. त्यांनी परस्परांना मदत करण्याचं आश्वासन दिलंय. ‘‘मी माझा रिपोर्ट इंग्रजीमध्येच देईन,’’ संजयनं सांगताच सर्वानीच टाळ्या वाजवल्या.
लहानशा गावात, लहानशा शाळेत शिकणारी आशा यंदा प्रथमच मुंबईच्या शाळेत दाखल झाली होती. ध्वनिक्षेपकावरून मिळणाऱ्या सूचना, होणारी प्रार्थना, विविध कार्यक्रम ही सारीच तिला नवलाई होती. तिच्या मनात येई, ‘‘मला ही संधी मिळेल का? माझा आवाज शाळेतील सर्वजण ऐकतील का?’’ एक दिवस तिनं धीर करून बाईंना विचारलंच. आता बाईंच्या सूचनेनुसार ती गाणं शिकतेय. तिला खात्री आहे वर्षभराच्या सरावानंतर तिला ही संधी मिळेल.
तिचा भाऊ सुरज. त्यानंही ठरवलंय तबला शिकायचा. वार्षिकोत्सवात इतरांना तबल्याची साथ द्यायची आणि जमलंच तर स्वतंत्रपणे कार्यक्रमही सादर करायचा. कारण गेल्या वर्षी ‘ए तबला, तबला डग्गा धीन तन् क धिन..’ असं चिडवून त्याच्या मित्रांनी त्याला हैराण केलं होतं. त्याच्या वर्गातली सारी मुले मस्तीखोर. एके दिवशी त्यांना बरेच ऑफ तास मिळाले. ती कंटाळली. काहीतरी गंमत म्हणून त्यांनी गाणी म्हणायला आणि बाकावर ताल धरायला सुरुवात केली. सुरज तर प्लॅटफॉर्मवरच गेला. टेबलावर ताल धरण्यात गुंग असतानाच त्यांचा आवाज ऐकून मुख्याध्यापक आले. त्यांनी साऱ्या वर्गाला शिक्षा दिलीच, सुरजला पकडलं, ‘‘ये तुझ्या पाठीवरच तबल्याचा ताल धरू या,’’ असं म्हणत त्यांनी २-४ ‘आवाज’ काढलेच. सुरज वरमला. पण त्याच्या बाबांनी ही गोष्ट सकारात्मक घेतली. त्याला तबल्याच्या क्लासला घातलं. आता तो त्यात रमला आहे.
शिल्पा आणि तिच्या मैत्रिणींचा ग्रुप खूप उत्साही आहे. साऱ्या जणी बसनं शाळेला येतात. बस वेळेवर आली नाही की त्यांना शाळेत पोचायला उशीर होतो म्हणून त्यांनी सायकलनं शाळेत यायचं ठरवलं आहे. त्यांना भरपूर वाचनही करायचं आहे. सुट्टीत त्या साऱ्या एका शिबिराला जात होत्या. एकूण ४० जणांचा गट होता. इथे त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास व्हावा म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले जात होते. त्यांना मजा येत होती, पण जाणवत होतं की त्या कमी पडत आहेत. रोजच्या प्रश्नमंजूषेच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता येत नव्हती. त्यांची चित्र ठरावीक साच्याचीच येत होती. जर-तर, खोटय़ा गोष्टी, गोष्टीचा शेवट, शब्दांची कसरत या खेळात तर त्या खूपच मागे पडत होत्या. काही वेळा अशा खेळात त्यांना त्यांच्यापेक्षा वयानं लहान मुलांनी हरवलं हे जरा जास्तच होतंय असं त्यांना वाटलं. शेवटच्या दिवशी बाईंनी पालकांनाही बोलावलं होतं. त्यांनी त्यांचं निरीक्षण नोंदवलं होतं. ‘‘तुमची मुलं अवांतर वाचनात कमी पडत आहेत.’’ मुलांना त्यांनी समजावलं. ‘‘तुम्हाला वेगळं काही बनायचं तर वेगळं काही करावंही लागतं. भरपूर अनुभव घ्यावे लागतात, पण ते शक्य नसतं. म्हणून मग भरपूर वाचन करायला हवं. एवढय़ा लहान वयात मार्क आणि क्लासच्या जंजाळात गुंतू नका इ. इ..’’ त्यांना ते पटलंय. ‘पुढच्या वर्षी किमान ४०-५० पुस्तकं वाचायचीच.’ त्यांनी निश्चय केलाय.
इतका वेळ साऱ्यांचं ऐकत गप्प असणारी ऊर्मी सांगू लागली, ‘बाई मला बक्षीस मिळो वा ना मिळो, मी पुढच्या वर्षी कथाकथन, काव्यगायन, वक्तृत्व साऱ्या संधीत भाग घेणार आहे.’’
‘‘वा! खूप छान’’ मी म्हटलं. तिला हा सारा खटाटोप तिच्या भीतीवर मात करण्यासाठी करायचा आहे. तिला अनोळखी माणसात बोलायची, वर्गात उभं राहून मोठय़ानं उत्तर द्यायची पण भीती वाटते. मग अशा स्पर्धेत ना तिनं भाग घेतला, ना तिच्या शिक्षकांनी कधी प्रोत्साहन दिलं. नुकतीच त्यांच्या सोसायटीत स्पर्धा झाली. ‘निसर्ग माझा सखा’ यावर बोलायचं होतं. आईनं आग्रह धरला. ‘ऊर्मी तू भाग घे. आपल्या झाडांची किती छान काळजी घेतोस. गावी गेलं की परसदारी रमतेस. या विषयावरची केवढी माहिती जमवली आहेस..’ ऊर्मीला पटलं. तिनं तयारी केली. पण समोर माणसं बघताच सारं विसरली. दोन-चार वाक्यं बोलल्यावर तिची गाडी थांबली. नंतरही १-२ दिवस घरात गप्पच होती. तिच्या आईनं कोंडी फोडली. ‘‘अगं एवढं मनाला लावून घेऊ नकोस. प्रयत्न कर, तुझा मामा आता मार्केटिंग मॅनेजर आहे. लहानपणी तोही तुझ्यासारखाच मुखदुर्बल होता..’’ ऊर्मीला तिच्या या कमजोरीवर मात करायची आहे.
निशांत, रमण यंदा नववीत आहेत. त्यांना खेळाची आवड आहे. पुढच्या वर्षी दहावी. मग ना त्यांना घरून परवानगी मिळेल ना शाळेतून, म्हणून येत्या शैक्षणिक वर्षांत त्यांना भरपूर खेळायचं आहे. जमलंच तर शाळेच्या टीममधून खेळायचं आहे.
दीपेश छोटा आहे. त्याला काही तरी सांगायचं आहे. असं त्याचा चेहरा सांगत होता. ‘‘बोल दीपेश, तू काय करणार?’’ असं विचारताच त्यानं सांगितलं. ‘‘बाई मला पाढे पाठ करायचे आहेत. उलटे, सुलटे मधूनच विचारले तरी उत्तर द्यायला यायला हवं आणि तोंडी बेरीज-वजाबाकीही यावी असं वाटतंय. कारण अगदी सोपं आहे.’’ या गोष्टीचा त्याला मनापासून कंटाळा. त्यानं आतापर्यंत पाढे पाठ करायचा, गृहपाठ करायचा कंटाळाच केला. ‘साऱ्यांना पास करणार आहेत’ त्याला खात्री होती. पण परीक्षा संपली आणि घरी पत्र आलं गणितात नापास झाल्याचं. त्याच्या आसपासची मुलं सुटीत खेळत असताना त्याला शाळेत तासाला जावं लागलं. परत परीक्षा द्यावी लागली. आई-बाबांचा ओरडा बसला तो वेगळाच.
प्रसादला लवकर उठण्याचा निश्चय करायचा आहे. गेली चार वर्षे शाळा सकाळची होती आणि त्याला नेहमी उशीर व्हायचा. त्याला गृहपाठ पूर्ण व्हायला वेळ लागायचा. टीव्ही बघण्याचा मोह आवरता यायचा नाही. मग रात्री झोपायला उशीर व्हायचा. सकाळी लवकर उठायचा कंटाळा यायचा. काहीवेळा दात न घासताच, अंघोळीला बुट्टी देत शाळा गाठली जायची. मित्रांनी चेष्टा केली, उशीर झाला की सरही ग्राऊंडला फेरी मारायला सांगायचे. त्याचे आई-बाबा त्याला सांगून कंटाळले, पण त्याची सवय बदलली नाही. सुटीत त्यांनी त्याला धडा शिकवायचा ठरवलं. त्याला हाका मारून प्रसाद उठत नाही असं लक्षात येताच त्यांनी टीव्हीची केबल काढली. घराला बाहेरून कुलूप लावलं आणि ऑफिस गाठलं. प्रसादला घरातच तुरुंगाचा अनुभव घ्यावा लागला. संध्याकाळी घरी आल्यावरही आईबाबांनी त्याच्या त्राग्याकडे लक्ष दिलं नाही.
एकमेकांचं मत ऐकून इतरांनाही प्रेरणा मिळाली. त्यांच्यात काही सांगायची स्पर्धाच लागली. मी कविता जमवणार, रोप लावणार, ट्रेकला जाणार, वैदिक गणित शिकणार, वारली पेंटिंग शिकणार, आईला मदत करणार. चढाओढीनं सारे सांगत होते.
निरोप घेताना मी त्यांचं अभिनंदन केलं, म्हटलं ‘‘अशी लहान लहान ध्येयं ठरवणं, ती गाठणं यातूनच मोठं काही करायचं बळ मिळतं. लहानपणापासून हे केलंत की मोठेपणी व्यक्तिमत्त्व विकासाचे महागडे कोर्स करावे लागत नाही. एकच लक्षात ठेवा हा निर्णय तुम्ही घेतला आहेत. तेव्हा त्याप्रमाणे वागण्याची जबाबदारी तुमचीच. हवं तर तुमच्यातच गट बनवा. निरीक्षण करा आणि आपण आपल्यालाच दिलेलं वचन पाळतो किंवा नाही हे पाहात असतो आपणच आणि देवबाप्पाशी, स्वत:शी प्रामाणिक राहा.’’
‘‘थँक्यू बाई, कळलं आम्हाला.’’ म्हणत त्यांनी निरोप घेतला. त्याचे चेहरे आज वेगळेच वाटत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा