सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
मुलांचं दप्तर म्हणजे अनेकदा गोडाऊन असतं. या ओझ्यामुळे पाठ दुखतेच शिवाय त्याचे इतरही त्रास असतातच. या दप्तरात अनेक गोष्टी असतात ज्या गरज म्हणून मुलांना सांभाळाव्या लागतात. शालेय मुलाचं हे दप्तराचं ओझं कमी व्हावं यासाठी मुलांनीच सुचवलेले हे काही उपाय.
मे महिन्याची सुटी संपत येते आणि खरेदीची लगबग सुरू होते. स्टेशनरी आणि पावसाळी सामान विकणारी दुकानं ओसंडून वाहू लागतात. कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. हे सारं बघताना वाटतं, ‘खर्च करणारे आम्हीच. वाढत्या महागाईवर तावातावानं बोलणारे आम्हीच! मुलांच्या पाठीवरच्या ओझ्याबद्दल तक्रार करणारे पण आम्हीच! खरंच ही खरेदी आवश्यक असते का? आपल्या लहानपणी असं नव्हतं, तरी मुलं शिकत होती. मोठी होत होती. हा सारा खर्च टाळला तर..?
जरतरच्या गुंत्यात न अडकता शाळेत जाऊनच मुलांशी गप्पा मारायच्या असं ठरवलं. शाळेत पोहोचले तेव्हा शाळेत विसरून गेलेल्या कंपास बॉक्स, गाइड्स यांचा ढीग कोपऱ्यात पडला होता. त्याच्याकडे बोट दाखवत मी प्रश्न केला, ‘कशाला रे ही गाइड आणि वर्कबुक्स खरेदी करता? पुस्तकांपेक्षा काय वेगळं असतं त्यात?’ राज, मनोज, अक्षय अशा आठ-दहा जणांचा गट ‘काय प्रश्न विचारताय?’ असा चेहरा करत म्हणाले, ‘मग अभ्यास कसा करायचा? परीक्षेच्या वेळी यातलीच तर उत्तरं आम्ही पाठ करतो.’ अर्थ सरळ होता. पाठय़पुस्तक वाचायचं असतं. त्यातली उत्तरं शोधायची असतात हे त्यांना घरी वा शाळेत कोणी सांगितलेलं नव्हतं. अगदी लहान वयापासून काहीबाही सबब पुढे करून पालकांनी त्यांना ही सवय लावली होती. त्यांच्याच वर्गातली सायली आणि वर्षां पुढे सरकल्या. ‘बाई, यांची पुस्तकं नेहमी फाटलेली असतात. किती तरी वेळा ती हरवतात, विसरतात. कुठेही टाकलेली असतात आणि वर्गातला गृहपाठ ही सगळी फक्त गाइडमध्ये पाहून वहीत छापतात. म्हणून तर परीक्षेत आणि ओबीटी म्हणजेच ओपन बुक टेस्टमध्येपण यांची तारांबळ उडते.’
त्यांच्यापेक्षा थोडय़ा मोठय़ा सई, सोनाली, अजय यांनी आता आघाडी सांभाळली. ‘बाई, असं काही खरेदी करायचा ट्रेंडच झालाय. पुस्तकं फुकट मिळतात. वहय़ांचं पण फुकट वाटप किती तरी जण करतात. मग पालक इथे पैसे खर्च करतात. मुलं लिहायचा कंटाळा करतात. म्हणून मग वर्कबुक खरेदी केली जातात. अगदी लहान वयात पालक जवळ बसवून ती सोडवून घेतात. मग मात्र ती कोरीच राहतात. शाळेचा आणि क्लासचा गृहपाठ करतानाच वेळ संपतो.’
त्यांच्यापेक्षा थोडय़ा मोठय़ा प्रज्ञा आणि किशोरनं प्रामाणिकपणे सांगितलं, की वर्कबुकमुळे मर्यादित शब्दांत, जागेत उत्तरं लिहायची सवय लागते, पण हेच काम तर वर्कशिट्स करतात. शाळेनं दिलेली पुस्तक महामंडळाची वर्कबुकपण खूप छान आहेत, पण..’
आता सारी परस्परांकडे पाहू लागली. सांगू की नकोच्या संभ्रमात पडली. त्यांनी शेवटी सांगितलंच जे धक्कादायक होतं. १. बाईच वर्गात गाइड, वर्कबुक आणतात. २. शाळाच खरेदी करायची सक्ती करतात. ३. क्लासवाले पैसे आकारून केवळ आपल्या नावाचं कव्हर वापरून थोडेफार बदल करून पालकांच्या ते माथी मारतात. ४. किती तरी शिक्षक परीक्षेच्या पूर्वी त्यातल्या प्रश्नावर इम्पर्ॉटट म्हणून खुणा करायला सांगतात. ५. काही जण तर गाइडमध्ये असल्यापेक्षा जरा वेगळं उत्तर लिहिलं तर मार्क कापतात.’ त्यांचीच री ओढत इशा, पीयूष या हुशार मुलांनी पुस्ती जोडली. ‘बाई, मराठीचं गाइड तर एकदम बंडल आहे. आम्हीपण त्यातल्या उत्तरापेक्षा अधिक चांगली उत्तरं लिहू शकतो. आमच्या बाई किती छान सांगतात. एखाद्या ओळीची उकल छानपणे करतात. एकाच गोष्टीला किती संदर्भ, आयाम असतात हे सांगतात. आम्हालाच स्वत:च्या शब्दांत बाई बोलत असतानाच लिहून घ्यायला सांगतात, पण बजावायला विसरत नाहीत. परीक्षेत आणि बोर्डाच्या परीक्षेतदेखील.. गाइडमध्ये आहे तसंच उत्तर लिहा. त्या उदाहरणही देतात. नरेंद्र तुळपुळे या हुशार मुलाचं. त्याची इंग्रजी भाषेवर कमांड. तो बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये येणार याची सर्वाना खात्री, पण प्रत्यक्षात इंग्रजीत त्याला खूपच कमी मार्क मिळाले. सगळय़ांची खात्री पटली, त्याची उत्तरपत्रिका ही तपासणाऱ्याला समजली नसावी. त्यांच्यामते इयत्ता आठवीपर्यंत गाइड वा वर्कबुकची गरज नसते. इयत्ता नववी-दहावीलाही केवळ गणिताची गाइड घ्यावीत. तीपण गरज लागेल तेव्हाच वापरावी ही ‘डी’ टाइप प्रश्न सोडवण्यासाठी. कारण शाळेत व क्लासमध्येही. गणितं सोडवली जात नाहीत. मग त्यांना चांगले मार्क मिळवायचे असतात त्यांना गणित अडलं तर त्यांची मदत घेता येते. बस्स! मात्र सरसकट त्यावर बंदीच घालावी असं त्यांना वाटतं.’
थोडक्यात, या साच्यानं आम्ही एका छापाचे गणपती बनवत आहोत. स्वतंत्र वेगळी प्रज्ञा दडपून, मारून टाकत आहोत याचं भानच सुटलं आहे तर, असा विचार करत मी पुढच्या प्रश्नाकडे वळले. ‘अरे, गावी जावं अशा मोठय़ा मोठय़ा स्कूल बॅगसोबत वेगळी कॅरीबॅग कशाला लागते रे तुम्हाला? आणि पाठ नाही दुखत?’ यावर उत्तर द्यायला सर्वाच्यात चढाओढ लागली. मात्र वास्तव सांगतानाच गौरी, प्रसाद, अनिरुद्ध यांच्याकडे या समस्येवर खूप छान उत्तरंपण होती. त्यांनी सांगायला सुरुवात केली. ‘बाई, हे तर लागतंच ना? सगळी वहय़ा-पुस्तकं, गाइड, वर्कबुक, पाण्याच्या दोन मोठय़ा बाटल्या, तीन डबे, शिवाय क्राफ्टचं सामान.’
‘अरे, पण हे सारं कशाला? हेच विचारते आहे.’ मी त्यांना थांबवत म्हटलं. ‘शाळेचे आठ तास, त्यांचं सामान, क्लासचं सामान. इतका वेळ बाहेर राहायचं म्हणजे पाणी, मोठा डबा, छोटा डबा, चटकमटक हवंच ना? बघा ना, आम्ही सकाळी दूध पिऊन बाहेर पडतो. ८ ते ८.३० पासून सारं संपवून घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळचे ७ ते ७.३० वाजतात.’ कारण पालकांचा आग्रह- चांगला क्लास, चांगली शाळा! दोन्ही वेळा जुळणाऱ्या हव्यात. शिवाय पाणी.. निशानं स्पष्टच सांगितलं. बाई शाळेत ना अ‍ॅक्वा असतो ना काही, मग ते पाणी प्यायचं कसं? शिवाय अनेक शाळेत टॉयलेटजवळच पाणी पिण्याची जागा असते. चार-पाच नळ. दोन्ही ठिकाणची पाइपलाइन एकच. सुटीतल्या २०-२५ मिनिटांत तिथं पाण्यासाठी झुंबड उडते. ढकलाढकली. पाण्याचा चिखल आणि घाणेरडा वास यानं उलटी येईल असं वाटतं. तास सुरू असताना तर वर्गाबाहेर पाठवलं जात नाही म्हणून मग घरूनच पाणी न्यावं लागतं.’ मुलांचं म्हणणं पटणारं होतं. जिथे संस्कार व्हावे, चांगल्या सवयी मुलांना लागाव्यात अशी अपेक्षा, त्या शाळांना या अगदी प्राथमिक समस्येवर उपाय का नाही करता येत हे समजण्यासारखंनसतं. अगदी नामवंत शाळाही याला अपवाद नसतात. पैशाची अडचण पटण्यासारखी नसते. सर्वात महत्त्वाचं, मुलांच्या या संदर्भातल्या तक्रारींची दखल ना पालक घेत ना शिक्षक.
त्यांच्या मते दप्तराचं ओझं कमी करणं खूप सोपं आहे. किरणनं पुस्ती जोडली. ‘बाई, किमान स्कूलबॅगला प्रवासी बॅगेप्रमाणे व्हील का नाही लावत? किती सोपं होईल. चौथीपर्यंत पालक किंवा इतर कोणी तरी दप्तर उचलतात तोवर काही वाटत नाही. पण खरंच एवढं वजन उचलून पाठ दुखते. काही मुलं तर घरातलं पुस्तकाचं कपाट वा कप्पाच जणू पाठीवर घेऊनच वावरत असतात. प्रत्येक तासाला वहीपुस्तक काढताना अडगळीतून वस्तू शोधाव्या तसं हय़ांचं होतं.’ सारे जण सारिका, देवेश यांच्याकडे पाहू लागले. थोडक्यात हे सत्य होतं तर.
शिवाय, ती बाकात मावत नाही. मग आपल्या बाकावरच ठेवावी लागतात. यात नीट ताठ बसता येत नाही. खाली दोन बाकांमध्ये ठेवावी तर जाण्यायेण्याला, बाईंना राऊंड मारायला त्रास होतो तो वेगळाच. मग अर्धवट पाय पुढे ठेवून पाय अवघडतात. दुखतात ते वेगळेच.’ मुलांनी यावर विचार मात्र नक्कीच केला होता. त्यांची पहिली सूचना होती- १. बाई, सर्वाकडे कॉम्प्युटर असतात. मग पुस्तकांऐवजी सीडी का नाही देत? २. गाइड, वर्कबुकवर बंदी का नाही घालत? ३. शाळेनं शाळा संपताना मुलांची जुनी क्रमिक पुस्तकं गोळा करावीत. प्रत्येक वर्गात कपाट असावं. त्यात ती ठेवावीत. शाळेची पुस्तकं शाळेत, घराची घरी वापरावीत. हवंतर कधी तरी एखाद्या दिवस घेऊन यायला सांगावीत. ४. निबंधाच्या, प्रयोगाच्या वहय़ा, कार्यानुभव, सामान्यज्ञान अशा साऱ्या वहय़ा शाळेतच ठेवाव्यात. पूर्ण करून घ्याव्यात. त्यासाठी मुलांना शाळा भरण्यापूर्वी बोलवावं वा शाळा सुटल्यावर थांबवून घेऊन वहय़ा पूर्ण करून घ्याव्यात.  ५. वहय़ांऐवजी फुलस्केप वापरण्याची सवय लावावी. प्रत्येक विषयाची स्वतंत्र फाइलच करायला सांगावी. यानं किती तरी प्रश्न सुटतील. वही विसरली. संपली. लिहून घ्यायचं राहिलं अशा किती तरी सबबी मुलं सांगण्याचं बंद करतील. किती मुलं वहय़ा बेजबाबदारपणे वापरतात. पानं फाडतात. कित्येकांच्या वहय़ांतील पानं वर्ष संपलं तरी कोरीच असतात, हा अपव्यय थांबेल. त्यांची पुढची सूचना तर आणखी चांगली होती. मी मुख्याध्यापिका असताना असंच टाइम टेबल बनवलं होतं. सुरुवातीला काही कुरबुर झाली, पण वर्षांच्या शेवटी सर्व समाधानी होती. अभ्यास तर जास्त परिणामकारक झालाच, पण एखादा शिक्षक गैरहजर असेल तर एखादी अ‍ॅक्टिव्हिटी राबवणं सोपं गेलं. समीर, हर्षल यांच्यासारखी गप्प मुलं मला समजावून सांगू लागली. ‘बाई, ३० मिनिटांची तासिका. त्यात काही वेळा वर्गावर शिक्षक पाच-दहा मिनिटे उशिरा येतात. मग मुलांना गप्प बसवणं, गृहपाठ न करणाऱ्यांना ओरडणं यात वेळ जातो. तास सुरू होता होता तास संपल्याची बेल होते. त्याऐवजी दोन तासिका एकत्र करून त्यांचा एक तास का नाही करीत? त्यानं वेळही जास्त मिळेल. विषयांची संख्या कमी होईल आणि पर्यायानं दप्तराचं ओझं कमी होईल,’ त्यांची सूचना रास्त होती.
मुलांचं दोन गोष्टींवर एकमत होतं, ‘कंपास बॉक्स, पेन्स, रंगपेटय़ा अशा वस्तू जाहिराती बघून, मित्रांच्या बघून आम्ही विकत घेतो. त्यासाठी पालकांकडे हट्ट करतो. पण वर्कबुक वा गाइड खरेदी करणं हे काम पालकांचं. त्यावर नियंत्रण घालणं हे काम शाळांचं. त्यांना कोण कसं समजावून सांगणार?’ मुलांचं म्हणणं रास्त होतं. मुलांच्या विश्वात त्यांना जाणवणारे प्रश्न, त्यांची उत्तरं यांना स्थान होतं. पण आर्थिक गणितं त्यांना कशी कळणार? मुलांना शिकवणाऱ्या-घडवणाऱ्यांची मानसिकता कशी बदलणार? हा खरा प्रश्न होता. भारतात लोकांकडे पैसा गरजेपेक्षा जास्त झालाय म्हणूनच तो अनाठायी खर्च होतो आहे. या निष्कर्षांप्रत मी आले आणि सर्वात महत्त्वाचं, या साऱ्या खर्चात मुलांचा खरा सर्वागीण विकास होईल का? या प्रश्नाचं उत्तर तर नकारार्थीच मिळालं. असो! मुलांचं हे म्हणणं जाणून मोठय़ांनीच आता विचार करावा असं मात्र नक्कीच मनात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा