तो तास म्हणजे ग्रंथालयाचा फेरफटका होता. मुलं चित्र बघत होती. पुस्तक हाताळत होती. पुस्तक पाहून एकमेकांशी गप्पा मारत होती. मुलांना मजा वाटली. मुलांना ही कल्पनाच नवी होती. ‘सफर ग्रंथालयाची..’ वाचायचं असतं. वाचताना मजा येते हा अनुभव मुलं घेऊ लागली. वाचायचं हे माहीतच नसलेल्या मुलांच्यात एवढा बदल झाला की ती वाचनात मग्न होऊ लागली.
तो तास होता वाचनाचा, पहिलाच तास होता तो! आतापर्यंत शाळेत भाषेचे तास व्हायचे, गणिताचा, विज्ञानाचा, समाजशास्त्राचा असे ठरलेल्या विषयाचे तास व्हायचे, पण वाचनाचा असा वेगळा तास कधी झाला नव्हता. त्यामुळे मुलांना उत्सुकता होती की काय असेल हा तास! आणि ज्यांना वाचायलाच आवडत नाही त्यांनी काय करायचं असंही काहींच्या मनात होतं. मुलांनी ही गोष्ट धाडकन सरांना विचारली, तेव्हा सर म्हणाले, ‘‘आपण वाचलं पाहिजे असं मला वाटतं, पण ज्यांना आवडणार नाही वाचायला त्यांनी काय करायचं त्यावर आपण नंतर बोलू.’’
‘‘सर! वाचनाचा असा वेगळा तास आपल्या टाइम-टेबलमध्ये बसत नाही. कोणता वेळ द्यायचा या तासाला?.. का जादा थांबायचं शाळेत?.. शिवाय सर, तेवढी पुस्तकं हवीत ना!’’
सरांना हसू आलं. शंकाही बरोबर होत्या, कारण विचार करायची तशी सवयच लागली होती. सर म्हणाले, ‘‘अगदी बरोबर आहेत तुमचे प्रश्न. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरे आत्तापुरती तरी मी देणार आहे. भाषांना जे तास आहेत त्यातला एक तास आपण वाचनासाठी वापरूया. यात उरलेल्या प्रश्नांची उत्तरे आली. हो ना! प्रश्न राहिला पुस्तकांचा. त्यावरच आपण आधी काम करणार आहोत..’’
सगळ्या शाळेचा वाचनाचा तास आज एकाच वेळी होता, पण त्याआधी सरांनी सगळ्या शिक्षकांशी यावर चर्चा केली. कारण मुळात वाचनाची सवय लागण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. वाचनाचा उपयोग आणि परिणाम लक्षात घ्यावे लागतात. वाचनाचे तंत्र मुलांपर्यंत पोचावे लागते. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. हे कसे करायचे यासाठी सर सर्व शिक्षकांशी बोलले होते. त्याचीच खरी गरज होती. कारण यावर काम न करताच आपण ‘मुलं वाचत नाहीत’ अशी खंत व्यक्त करतो, तक्रार करतो. वाचनाबद्दल मुलं काय बोलली, हे खरं तर शाळेला सगळ्यांना सांगायचंय. मुलांनी काय चर्चा केली? वाचनाच्या संदर्भात मुलांच्या मनात काय आहे? मुलांची सभा शिक्षकांनी घेतली होती. मुलं जेव्हा बोलत होती तेव्हा शाळा अगदी भारावून गेली होती. अनेक गोष्टींबाबत मुलांना जाणून न घेताच आपण कामाला सुरुवात करतो, शिवाय काय घडलं याविषयीही काम होत नाही, काय करायला हवं होतं याचा शोध घेतला जात नाही. वाचनालय बिचारं वेगळं पडतं. कुणाची पावलं तिकडे वळत नाहीत. आणखी एक गंमत घडते ती मुलांच्या बोलण्यातून लक्षात आली..
मुलं म्हणाली होती, ‘‘सर आम्ही वाचनालयात जातो तेव्हा तिथे पुस्तक द्यायला कोणीच नसतं. सर आपली सुट्टी नि वाचनालयाची सुट्टी सारखी नसते. आवडीचं पुस्तक मिळत नाही. आम्हाला जे पुस्तक हवं असतं ते मिळत नाही. नवी पुस्तकं आवडतात. जुनं-बाइंडिंग केलेलं पुस्तक आवडत नाही. वाचून नंतर काय करायचं? काय वाचावं समजत नाही. डोळे दुखतात. एका जागी बसून वाचायचा कंटाळा येतो. मज्जा वाटत नाही. वाचत बसायला जागा नसते.’’
या सगळ्या मतांचा विचार सर आणि सर्व शिक्षकांनी केला होता, कारण त्या विचारांना गृहीत धरून शाळेतल्या ग्रंथालयाबद्दल विचार करायचा असं शाळेनं ठरवलं. खालील गोष्टी ठरल्या- मुलं कधीही वाचनालयात जाऊन पुस्तक घेतील. मुलांना जेव्हा-जेव्हा सुट्टी असेल तेव्हा-तेव्हा पुस्तकं मिळतील असं बघितलं जाईल. प्रत्यक्ष पुस्तकांच्या कपाटाशी जाऊन पुस्तक कोणतं वाचायचं हे मुलं ठरवतील.
आजच्या तासाला सगळी मुलं टप्प्याटप्प्यानं ग्रंथालयात गेली. गं्रथालयात सगळीकडे लहान मुलांची पुस्तके ठेवली होती. भरपूर चित्रं मांडून ठेवली होती. हा तास म्हणजे ग्रंथालयाचा फेरफटका होता. मुलं चित्र बघत होती. पुस्तक हाताळत होती. पुस्तक पाहून एकमेकांशी गप्पा मारत होती. मुलांना मजा वाटली. अर्थात सगळी पुस्तकं याच ग्रंथालयातली नव्हती. वेगवेगळ्या ठिकाणाहून पुस्तकं जमवली होती. मुलांनी ही कल्पनाच नवी होती. ‘सफर ग्रंथालयाची..’
इथपासून पुढे वाचनावर काम सुरू झालं. मुलं कपाटापाशी जाऊन पुस्तकं पाहू लागली. पुस्तकांना होणारा स्पर्श मुलांना पुस्तकाकडे खेचत होता. हे एकदम सही झालं. लहान वर्गासाठी शिक्षकांनी एक गंमत केली. मुलांना गोष्ट सांगायचं ठरवलं आणि गोष्ट पूर्ण न करता अध्र्या गोष्टीवरच शिक्षक थांबले. मुलांनी ओरडा केला, ‘‘सर पुढं काय घडलं? सांगा ना?..’’ सर शांतपणे म्हणाले, ‘‘अरे गोष्ट पूर्ण करून द्यायची असेल तर एक छान पुस्तक तिकडे आहे बघा वाचून. ज्याला वाचायचं असेल त्यांनी..’’
‘‘सर, मुलं इतकी नि पुस्तक एकच. कसं करायचं?’’
शिक्षक म्हणाले, ‘‘तुम्हीच सांगा काय करायचं ते!..’’
मुलं विचार करू लागली, एक मुलगा पटकन म्हणाला, ‘‘सर एकेकाला सांगा. तो वाचून दाखवेल.’’ सरांनी त्याचा पर्याय मान्य केला. पण मुलंच ती! एक मुलगा म्हणाला, ‘‘सर, त्यापेक्षा आम्हीच आमच्या मनाने गोष्ट पूर्ण करू..’’ ही कल्पना तर आणखी भन्नाट होती. अशा कल्पनेचा विचार सरांच्याही मनात आला नव्हता. सर म्हणाले ‘चालेल’. आपापली गोष्ट मुलांनी वाचून दाखवली.
लिहिणं नि वाचणं, वाचणं नि लिहिणं घडायला लागलं. वाचनाचा परिणाम काय? वाचन कसं नोंदवायचं? हेही ठरले. भाषेच्या वहीत मुलांनी रकाने आखले. पुस्तकाचं नाव, लेखक, आवडलेला प्रसंग अशा नोंदी करायला मुलांनी सुरुवात केली. शाळेने जाहीर केलं. आपण सुट्टीत गावाला जातो. तुमच्या भोवती खूप घरं असतात. अनेक घरात पुस्तकं असतात. पुस्तक वाचून झालं की ती कुठे तरी पडतात. आपण ती शाळेसाठी भेट मागू. प्रत्येक जण एक पुस्तक तरी आणेल. आपल्या वाचनालयात पुस्तकं साठतील. मग कशी वाटतीय कल्पना..?’’
थोडा वेळ शांतता पसरली. काहींनी होकार दिला. काही जण गप्प होते. सुट्टीहून आल्यावर जवळ-जवळ १०३ पुस्तकं झाली. त्यातही मजा झाली. एका कार्यक्रमात शाळेतल्या सोनलला पुस्तक संच भेट मिळाला. सरांना तिनं संच दाखवला नि म्हणाली, ‘‘सर ही सगळी पुस्तकं मी शाळेला भेट देणार आहे..’’ शाळेने पुस्तकांची निवड केली नि पुस्तकं कपाटात गेली. ती शाळा ज्या गावात होती त्या गावातही गंमत घडली. त्या गावात एक वृद्ध गृहस्थ होते. त्यांना ८० वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्यांनी पुस्तकांनी त्यांची तुला केली अन् ही सगळी पुस्तकं त्यांनी शाळेला भेट दिली. रिकाम्या वेळेत आता मुलांना वाचनाचे वेध लागू लागले. मुलं पुस्तकं वाचू लागली. आणि एखाद्या शनिवारी ‘अनुभवमंडपा’त वाचलेल्या पुस्तकाबद्दल बोलू लागली. वाचलेल्या पुस्तकावर आपले मत लेखी-तोंडी मांडू लागली.
वाचायचं असतं. वाचताना मजा येते हा अनुभव मुलं घेऊ लागली. वाचायचं हे माहीतच नसलेल्या मुलांच्यात एवढा बदल झाला की वाचनात मग्न होऊ लागली.
काही पालकांनी शाळेकडे तक्रार केली. ‘‘अहो, मुलं अशी वाचायला लागली तर अभ्यास कधी करणार? शाळेची पुस्तकं कधी वाचणार? त्यांना चांगले मार्क कसे पडणार?-’’ पारंपरिक विचार करणाऱ्या पालकांनी हे प्रश्न विचारणे स्वाभाविकच होते, यावर त्यांना पटतील अशीच उत्तरे विचारपूर्वक द्यावी लागणार होती. शाळेने पालकांना विचारले, ‘‘पुस्तकं म्हणजे काय असतं?’’
‘‘कागद, गोष्टी, शब्द.’’ ‘‘त्यातही अनुभवच असतात. मुलांनाही असे अनुभव येतात. ते व्यक्त करायला मुलांकडे शब्दच नसतात. सांगायचं असते खूप. सांगता येत नाही. याला अनेक कारणं असतात. पैकी एक कारण असतं शब्दांचा तुटवडा. ही उणीव पुस्तकं वाचून दूर होते आणि मुलं एका कोशात शिरतात. त्यांचं विश्व तयार होतं. हे पुस्तकी होणं, वेगळं बरं का! यातून नव्याचा जन्म होतो कारण पुस्तकांचेही अनेक प्रकार, अनेक विषय असतात. वाचनाने त्यांच्या बुद्धीला व्यायाम होतो..’’ पालकांनी फक्त ऐकून घेतले.
वाचनाच्याच संदर्भात नवा उपक्रम या शाळेत सुरू झाला. रोज सर्व विषयाच्या तासाची रचनाच वेगळी झाली. ३० मिनिटांच्या तासाची रचनाच शाळेने वेगळी केली. पहिल्या २५ मिनिटाला एक बेल व्हायची. ज्या विषयाचा तास त्या विषयाचे वाचन सुरू. मग त्याचेही नंतर गटात वाचन, एकेक वाक्य एकेका मुलाने वाचायचं, कविता म्हणायच्या, एकाने सांगायचे इतरांनी पुन्हा म्हणायचे, ओळीवर-शब्दावर बोट ठेवून वाचन असे अनेक प्रकार त्यात आल्याने विविधता वाढली. यातून पुस्तक नि डोळे यातले तंत्रही मुलांना समजू लागले. इथे शिक्षकांनाही मुलांचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली. गरज असेल तिथे बदल करता आला. सक्तीचा ताण संपला. गंमत वाटू लागली. शाळा आता असं दृश्य पाहू लागली की मुलं ग्रंथालयाकडे धाव घेतायत. कुणी झाडाखाली बसून, कुणी नदीच्या काठावर बसून वाचतंय. वर्गातल्या ठोकळ्यासारख्या वाचन पेढय़ा गेल्या. एकदा का एखाद्या गोष्टीची ओढ लागली की मग ही ओढ स्वस्थ नाही बसू देत.
अपेक्षित नाही की प्रत्येक मूल अमुक इतकी पुस्तकं वाचेल, पण प्रत्येक मूल मात्र वाचू लागलं. काय वाचलं हे सांगू लागलं. एक दिवस ग्रंथपाल सांगायला आला, ‘‘अहो, सातवीतल्या सावंतने १०७ पुस्तकं वाचलीत.’’ शिक्षक त्याला म्हणाले, ‘‘लहान लहान पुस्तकं ना!’’ खरी गोष्ट होती तरी काय झालं! छोटय़ा-छोटय़ा आकाराच्या पुस्तकांपासून ते मोठय़ा आकाराच्या पुस्तकांपर्यंत त्याचा प्रवास झाला होता. मला वाचताना कसं वाटतं यावर बोलताना तो म्हणाला, ‘‘सर पुस्तकं मला मित्रासारखी हाक मारतात..’’ काय वाचलं याच्या सुंदर नोंदीही त्यानं केल्या होत्या. त्याचाही परिणाम इतर मुलांवर झाला होता. मुलं मुलांचं पटकन ऐकतात, त्यांना पटतं हा अनुभव तर अनेक वेळेला आला होता. एका सरांनी अमेरिकेतल्या ग्रंथालयाचे फोटो वर्गात लावले. मुलं कार्टून्सच्या आकाराच्या गाद्यांवर झोपून वाचतायत, कुणी कापसाच्या प्राण्यावर बसून वाचतायत. सर म्हणाले, ‘‘बघा, कसं मस्त ग्रंथालय आहे!’’ तेव्हा एक मुलगा म्हणाला, ‘‘सर, आम्ही तर खऱ्या झाडाखाली, नदीकाठी, अंगणात बसून वाचतो आणि खरे प्राणी-पक्षी आमच्याभोवती फिरत असतात..’’
सर फक्त हसले.
शाळाही मुलं वाचू लागली या आनंदात होती.
मी शाळा बोलतेय! : ॥ वाचूया वाचूया॥
तो तास म्हणजे ग्रंथालयाचा फेरफटका होता. मुलं चित्र बघत होती. पुस्तक हाताळत होती. पुस्तक पाहून एकमेकांशी गप्पा मारत होती. मुलांना मजा वाटली. मुलांना ही कल्पनाच नवी होती. ‘
आणखी वाचा
First published on: 20-09-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kids have fun reading with interactive book