गावातून मुंबई-पुण्याला पळून आलेली अनेक मुलं आश्रय घेतात ती रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर. त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचं जगणं समजवून घेणारी अमीता. त्यातल्या कित्येक मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यात जशी यशस्वी झाली तशी अनेक जणांना परत घरी पाठवण्यातही. त्यांच्याबरोबरच्या अनुभवातून आपलेही अनुभवविश्व विस्तारणाऱ्या अमीताचे हे अनुभव..
वा तावरण दुपारचं असलं तरी पावसाळलेलं होतं. पावसाचे छोटे-छोटे थेंब यायला लागले होते. मी स्टेशनच्या आवारात शिरायच्या बेतात असतानाच पाठीमागून ‘दीदी.. दीदी.. ओ दीदी .. जरा रुको ना..’ असा आवाज आला. वळून बघितलं तर रणजित आणि मनजित सिंग हे जुळे भाऊ मला हाक मारून त्यांच्याकडे बोलावत होते.
‘‘क्या हुआ, क्यू बुला रहे थे?’’ त्यांच्याजवळ जात मी विचारलं.
‘‘दीदी.. खाना खिलाओ ना.. बहुत भूख लगी है..’’ रणजित कसानुसा चेहरा करत म्हणाला.
‘‘हां.. दीदी.. आज धंदा ही नहीं हुआ..’’ मनजित खालच्या आवाजात म्हणाला.
साधारणपणे दहा-अकरा वर्षांचे असलेले रणजित सिंग आणि मनजित सिंग दोघेही मूळचे दिल्लीचे. सावत्र आईच्या त्रासामुळे घरातून पळून मुंबईतल्या प्लॅटफॉर्मवर थोडा काळ राहून मग इथल्या, पुण्यातल्या प्लॅटफॉर्मवर आले होते. इथे तसे ते नवीनच होते. त्यांना खाऊ-पिऊ घातल्यावर मला बाय करून उडय़ा मारत ते निघून गेल्यावर मी परत स्टेशनच्या आवारात शिरले. एक नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने जात असतानाच कल्लूने मला थांबवलं आणि ती दिल्लीची नवी मुलं माझ्याशी काय बोलत होती म्हणून विचारलं. मी त्याला काय घडलं ते सांगितल्यावर जरासा रागावून तो मला म्हणाला, ‘‘दीदी, तुमकू शेंडी लगाये वो दोनो.. कुच धंदा वंदा नई करते वो लोग.. पंध्रा दिन से येहीपे है, सबसे मांगके खातेए..’’
कल्लूला आला तसा राग मला येणं शक्यच नव्हतं. पण ते कल्लूला दाखवून चालणार नव्हतं. घरातून पळून येऊन स्टेशनवर आश्रय घेणाऱ्या मुलांच्या जगाचे पण काही कायदेकानून असतात हे मला त्यांच्याबरोबर काम करताना समजलं होतं. त्यांच्यात पण वर्गवारी झालेली असते. त्यात चोरी करणारे, भीक मागणारे, स्वत: काही कामधंदा न करता धंतिंगगिरी करून छोटय़ा मुलांकडून पैसे उकळणारे आणि काही ना काही छोटा मोठा धंदा करून आपलं पोट भरणारे असे वर्ग असतात. कामधंदा करणाऱ्या मुलांना इतर वर्गवारीतल्या मुलांबद्दल अत्यंत राग असतो. कल्लू काम करणारा असल्याने त्याची प्रतिक्रिया त्याप्रमाणे असणं साहजिकच होती. पण त्यांच्यासाठी काम करणाऱ्या आमच्यासारख्या माणसाला या प्रकारच्या वर्गवारीप्रमाणे भेदभाव करणं शक्य नव्हतं. अर्थात हे कल्लूला समजलं नसतं म्हणून मग मी त्याची त्याला पटेल अशा शब्दात समजूत घातली. कल्लू गेला पण मला झालेला आनंद वेगळ्याच कारणासाठी होता.
या प्रसंगामुळे स्टेशनवर राहणारी सगळी मुलं मला आपलं मानायला लागली आहेत, याची जाणीव मला झाली होती आणि हा अनुभव मला उत्साहित करणारा होता. याचं कारण इथपर्यंतची मजल मारायला मला बराच वेळ लागला होता.
प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या या सगळ्या मुलांशी माझी भेट झाली २००४ च्या सुमाराला, ‘स्पॅरो’ नावाच्या एका संस्थेच्या माध्यमातून! ही संस्था माझी मैत्रीण सुदेष्णा घारे हिची. तिने या आधी खूप वर्ष या मुलांसाठी काम केलं होतं. मधल्या काळात लग्न आणि त्यामुळे आलेल्या जबाबदारीने काही काळ ती स्टेशनपासून आणि या मुलांपासून लांब होती. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा काम करायचं ठरलं. तसं तिने मलापण विचारलं. पत्रकारितेला ‘बाय, बाय’ करून २००२ पासून सामाजिक क्षेत्रात काम करायचं मी ठरवलं होतं ते ‘प्रश्नांना आपणच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा’ या प्रामाणिक तळमळीतून. या तळमळीचा केंद्रबिंदू होती, विकासापासून दूर असलेली, मुख्य प्रवाहात अनेक कारणांनी येऊ न शकणारी मुलं! अशा मुलांसाठी काम करण्याची माझी ओढ माहीत असल्यानेच सुदेष्णाने मला विचारलं आणि या संधीचा मी लगेच फायदा घेतला. ही संधी अक्षरश: सुवर्णसंधी होती हे पुढच्या काही वर्षांनी सिद्धच केलं.
त्या वेळेस अजूनही काही संस्था या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं करत होत्या. महानगरपालिकेनेही काही स्थानिक उद्योजकांच्या सहकार्याने या मुलांसाठी काम करायचे ठरवले होते; तेव्हा मग जे काम त्या करतात तेच न करता आम्ही वेगळं काही करायचं ठरवलं. मी रोज स्टेशनवर जाऊन मुलांशी गप्पा मारायच्या (म्हणजे खरं तर त्यांना बोलतं करायचं आणि मी फक्त ऐकायचं) असं ठरलं आणि मग त्याप्रमाणे माझी रोजची स्टेशनवारी सुरू झाली.
हे काम वाटलं तसं सोपं नव्हतं, कारण मुलांना त्यांच्या त्यांच्या आवडी- निवडी, त्यांच्या इच्छा होत्या. जी मुलं कामधंदा करून पैसे कमवत होती, त्यांना कोणता वेळ मोकळा मिळेल हे बघायला लागणार होतं. जी मुलं काम करत नव्हती त्यांच्यापाशी पण त्यांचा वेळ घालवण्याचं प्लॅनिंग तयार असायचं. मला वाटलं म्हणून मी माझ्या सोयीच्या वेळेला जाऊन त्यांना बोलतं करायचं काम करू शकत नव्हते. त्यांनाही माझ्याशी बोलावं असं वाटायला हवं होतं. मुलं एकदम माझ्याशी बोलली नसती हे मला माहीत होतं आणि त्याबाबत कोणत्याही फिल्मी, अवास्तव, भ्रामक कल्पना माझ्या डोक्यात अजिबात नव्हत्या. सुरुवातीला रोज जाऊन सगळ्या प्लॅटफॉर्मवर हिंडायचं, भेटतील त्या मुलांचे हालहवाल विचारायचे, त्यांचा दिनक्रम माहीत करून घ्यायचा असं मी ठरवलं.
हे रुटीन चांगलं बसलं. रोज गेल्याने मुलांना माझ्या असण्याची सवय व्हायला लागली. हळूहळू त्यांच्याकडूनही ‘केसे हो दीदी?’ यासारखा किंवा एखाद्या दिवशी गेले नसेल तर ‘दीदी, कल दिखे नई..’ यासारखा प्रतिसाद मिळायला लागला. गप्पा मात्र होत नव्हत्या. एवढे दिवस येतेय म्हटल्यानंतर मुलं नेहमीपेक्षा जास्त वेळ जवळ बसायची. वरवरच्या चेष्टा मस्करी व्हायच्या, पण थोडं बोलतं करण्याच्या हेतूने जरा जास्त खोलात जायचा प्रयत्न केला की मुलं, ‘अच्छा दीदी, थोडा कामए’ म्हणून सटकायची. बऱ्याचदा मी एखादं गोष्टीचं पुस्तक, स्केच बुक किंवा चित्रं काढायचं साहित्य घेऊन जायची. मुलं दुपारच्या वेळेत ज्या कोपऱ्यात जेवायला, खेळायला किंवा झोपायला जमायची, तिथे जाऊन त्यांची परवानगी घेऊन मी तिथे बसायची आणि मग त्यांच्या गप्पांना किंवा झोपेला डिस्टर्ब न करता, कधी आपलं आपलं पुस्तक उघडून वाचत बस, कुठे स्केचच काढ असं करायची. कधी कोणत्या मुलाने मी करत असलेल्या गोष्टीत रस दाखवला तर त्याला त्यात सहभागी करून घ्यायची. मुलांना बहुधा विश्वास वाटायला सुरुवात झाली असावी, कारण नंतर मुलं माझी वाट बघायला लागली आणि एका प्रसंगानंतर आमच्यातलं जे काही थोडंफार अंतर होतं तेही संपलं आणि माझं व मुलांचं एक घट्ट नातं तयार झालं.
झालं असं, की कशावरून तरी दोन मुलांमध्ये मारामाऱ्या झाल्या आणि त्यातल्या एकाने दुसऱ्याला जोरात ढकलून दिल्याने त्याला चांगलंच खरचटलं आणि रक्त यायला लागलं. बाकीची मुलं घाबरली, कारण रेल्वेची पोलीस चौकी जवळच होती. तिथल्या पोलिसांचं प्लॅटफॉर्मवर सतत येणंजाणं असायचं आणि या मुलांवर त्यांचं बारीक लक्ष असायचं. मुलांना पोलिसांकडून अनेक प्रकारचे त्रास व्हायचेच, पण त्यातलाच एक म्हणजे अशा काही मारामाऱ्या झाल्या की पोलीस सगळ्याच मुलांना ठोकून काढायचे. हे माहीत असल्याने मुलं आधीच घाबरलेली होती. बरं, पोलिसांना समजू न देता कोणत्या डॉक्टरकडे जाणंही शक्य नव्हतं. प्रश्न पैशांचा पण होता आणि परिसरातल्या डॉक्टरने चांगलं न वागण्याचाही होता. त्यात एका संस्थेने या मुलांसाठी दिलेली प्रथमोपचाराची पेटी पण पोलिसांनी चौकीतच ठेवून दिली होती; म्हणजे तर काय, मुलांच्या दृष्टीने उपचारांचा प्रश्न संपल्याचाच होता.
मुलांच्या सुदैवाने मी नेमकी त्याच वेळेला तिथे गेले होते. झाली गोष्ट समजल्यावर चौकीत जाऊन मी ती पेटी आणली आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून त्या जखमी मुलावर उपचार केले. पोलिसांचा मार न बसता पेटी मिळाली आणि त्या लागलेल्या मुलाला पट्टीही बांधली गेली. मुलांना ही गोष्ट ‘भारीच’ वाटली आणि ती मी केल्यामुळे मला एकदमच त्यांच्या आतल्या गोटात प्रवेश मिळाला. यानंतर मात्र माझं काम खऱ्या अर्थाने सुरू झालं. मुलं मोकळेपणाने माझ्याशी बोलू लागली आणि मग त्यांचं जग माझ्यापुढे खुलं व्हायला लागलं.
ते खुलं होताना बरोबर अनेक प्रकारची शहाणपणं घेऊन आलं. त्यातलं समजलेलं एक शहाणपण म्हणजे ही मुलं आपली आपणच एवढी खंबीर बनलेली असतात, आपली काळजी घेऊ शकतात आणि त्यांच्या मित्रांच्या बरोबरीने त्यांनी बनवलेल्या एका मोठय़ा कुटुंबाचा हिस्सा बनलेली असतात, की रोजच्या जगण्यासाठी त्यांना खरंतर तशी कोणाचीच गरज नसते. तरीही जगण्याच्या संघर्षांत त्यांच्या वाटय़ाला येणाऱ्या आणि त्यांच्या वयापेक्षा पुढच्या असणाऱ्या अनुभवांतली धार कमी करण्यासाठी कोणातरी संवेदनशील अशा मोठय़ा मित्र-मैत्रिणीचा खांदा त्यांना त्यांच्या जगण्याचं बळ वाढवण्यासाठी हवा असतोच, हे समजलेलं दुसरं शहाणपण. माझ्या या छोटय़ा दोस्तांनी हे सगळं शहाणपण इतक्या सहजसुंदरपणे माझ्यापर्यंत पोचवलं की मी कधी मोठी, समजदार झाले मलाही कळलं नाही. या मुलांच्या आयुष्यावर लिहिलेलं ‘प्लॅटफॉर्म नं झीरो’ हे पुस्तक ‘समकालीन प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालं आहे.
या मुलांबरोबर जास्तीत जास्त क्वालिटी टाईम घालवणं हेच मी माझं काम ठरवलं. त्यांच्याबरोबरच्या गप्पांमधून ते पळून का आले, इथे ते नेमकं काय काम करताहेत, त्यांना आयुष्यात पुढे काय करायचंय. कुणाला घरी परत जायचंय, कुणाला शिकायचंय, कुणाला काही उद्योग करायचा आहे, हे स्पष्ट व्हायला लागलं. ‘एनएफइ’, चाईल्ड लाईनची गंमतशाळा आदींच्या मदतीने या मुलांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. तो अनुभव खूप काही शिकवणारा होता.
या मुलांकडून मला आणखीही खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. एकतर माझ्या सगळ्या पांढरपेशा समजुतींना, चौकटींना नुसताच जोरदार धक्का नाही, तर त्यांची पार मोडतोड करण्याचं काम या कामातल्या अनुभवांनी केलं. नको असलेली, वर्षांनुवर्षे उगीचच कोणत्या ना कोणत्या कारणांनी सांभाळून ठेवली गेलेली जुनी अडगळ जसजशी साफ होत गेली तसतशी स्वच्छ प्रकाश म्हणजे काय चीज आहे हे समजायला लागलं. उदाहरणादाखल काही अडगळींची नावं घ्यायची झाली तर वय, शिक्षण, दिसणं, तुमची सामाजिक स्थिती इ. इ. तुमचं कायदेशीर, जैविक वय काय आहे, किती आहे आणि मग त्याप्रमाणे तुमचं वागणं असायला हवं की नको, या असल्या घोळात ही मुलं तुम्हाला कधी अडकवत नाहीत. दोस्तीसाठी, प्रेमासाठी वर उल्लेख केल्यापैकी कोणत्याही गोष्टींची आवश्यकता नसते. फक्त दोघांनी एकमेकांची मनापासून निवड करणं गरजेचं असतं. हे मला आमच्या मुलांच्या आयुष्याने प्रत्यक्ष दाखवून शिकवलं.
या कामानंतर माझ्यामध्ये एक विलक्षण मोकळेपणा, निर्भयपणा जो आला तो मला माझ्या या दोस्तांनीच दिला आहे. या मुलांना, जसं आहे तसं स्वीकारणं आणि एकदा स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवणं, त्यांना जे वाटेल ते बेधडक आणि मोकळेपणाने बोलणं, स्वच्छपणे आपल्या भावनांची अभिव्यक्ती करणं या गोष्टींनी मला एवढी भुरळ घातली की कळत नकळत माझ्यामध्येही त्या गोष्टी आल्या आहेत. माझे हे छोटे दोस्त त्यांच्या आयुष्यात ज्या प्रकारे संघर्ष करतात ते बघितल्यामुळेच मला माझ्या स्वत:च्या आयुष्यात कधीही रिकामं, हताश, उदास वाटलं नाही.
स्टेशनवर राहणाऱ्या या मुलांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना स्थिर व दर्जात्मक जगण्याची संधी देणं हे काम अतिशय अवघड, वेळखाऊ आणि चिवट सहनशीलतेने करण्याचं आहे. पण यात अडथळे निर्माण होतात, जेव्हा त्यांच्याकडे ते ‘भावी गुन्हेगार’ आहेत या धारणेने बघितलं जातं तेव्हा आणि म्हणूनच त्यांना पुन्हा समाजात सामावून घेण्याची प्रक्रिया अवघड बनली आहे. दुर्दैवाने या मुलांकडे बघण्याची सर्वसामान्यांची आणि सरकारी अधिकाऱ्यांची वृत्ती हीच आहे. काहीही छोटी-मोठी यंत्रणेला धक्का देणारी गोष्ट घडली की पहिल्यांदा या मुलांवर संशय घेऊन त्यांना मारहाण करण्यात कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंतचा सगळ्यांचा समावेश असतो. दुसरीकडे या मुलांकडून आपल्या घरकामांपासून, बागकाम ते सामान शिफ्टिंग करण्यापर्यंतची कामं एकवेळच्या जेवणाच्या मोबदल्यात वा अत्यंत कमी पैशात आसपासचे अनेक लोक, अधिकारी करून घेतात, तेव्हा याला काय म्हणायचं ?
या मुलांभोवतालचे धोके कमी करून त्यांना सक्षम करून त्यांचा सहभाग घेणं हाच एक सकारात्मक भाग वाढवण्याची गरज आहे. त्यांचा विधायक रीतीने कसा उपयोग करून घेता येईल, हे संवेदनशीलतेने आणि सर्जनशीलतेने बघायला हवं. त्यांच्या क्षमता तपासायला हव्यात. त्यांच्यात असलेल्या ऊर्जेचा योग्य तो उपयोग करून घेता यायला हवा. पण हे सगळं करायचं असेल तर आधी या मुलांचं जगणं, त्यांचा भवताल संवेदनशीलतेने, कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता समजून घेण्याची गरज आहे.
घरातून पळून प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या या मुलांनी आपापल्या भागात सर्व प्रकारच्या अस्थिरतेला तोंड दिलेलं असतं. चांगल्या भविष्याच्या आशेने किंवा कधी-कधी आहे त्या परिस्थितीतून सुटका म्हणून त्यांना सहजशक्य असणारा हा मार्ग त्यांनी निवडलेला असतो. ही मुलं जेव्हा पळून स्टँडवर, स्टेशनवर आसरा घेतात तेव्हा त्यांना इथे आणायला कोण जबाबदार आहे याचा विचार आपण करणार आहोत की नाही, हा खरं म्हणजे यातला विचार करण्याचा भाग आहे.
अर्थात इथे आल्यानंतर आपलं पळून येणं चुकलं आहे, असं वाटणारी पश्चात्तापदग्ध मुलंही भेटतातच मग त्यांना घरी सुखरुप पोहोचवायची जबाबदारीही आम्ही घेतली. एका संस्थेबरोबर मी हे काम करायचे. आत्तापर्यंत तीस ते चाळीस टक्के मुलांना आम्ही त्यांच्या गावी पाठवून दिलं आहे.. पण
सध्या माझं काम थोडं थांबवलंय कारण पैशांचा तुटवडा आणि कार्य करणाऱ्या माणसांचाही तुटवडा आहे. दुर्दैवाने आजही अनेक मुलं पळून येत आहेतच. त्याचं भवितव्य अंधारातच रहातंय.. अजून खूप काही गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करायचीय.. मी त्या दिवसांची वाट पाहतेय…
प्लॅटफॉर्मवरच्या मुलांचं जगणं
गावातून मुंबई-पुण्याला पळून आलेली अनेक मुलं आश्रय घेतात ती रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर. त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचं जगणं समजवून घेणारी अमीता. त्यातल्या कित्येक मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यात जशी यशस्वी झाली तशी अनेक जणांना परत घरी पाठवण्यातही.
आणखी वाचा
First published on: 26-01-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kids life on railway platform in mumbai and pune amita naidu helping poor kids living on railway platform