प्रतिमा कुलकर्णी

‘मस्जिद से भी ऊँची इमारते बांधने लगा आदमी, तब से पूरी दुनिया बेईमान हो गई..’ हे हमिदाबाईचे शब्द. हा तिचा विश्वास आहे, श्रद्धा आहे. कोण आहे ही हमिदाबाई? एक तवायफ. आपल्या कलेवर, संगीतावर आत्यंतिक निष्ठा असणारी, तिला प्राणपणाने जपणारी, पण चुकीच्या काळात वावरत असलेली एक तवायफ. संगीत तिच्यासाठी साधना आहे, इबादत आहे- म्हणूनच तिच्या गाण्याची रेकॉर्ड काढायची म्हटल्यावर ती नकार देते. ‘आवाज तो खुदा की देन हैं,’ त्या आवाजाची ‘बेजान तबकडी’ नाही होऊ द्यायची तिला.

zee marathi satvya mulichi satavi mulgi serial off air
‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Khesari Lal Yadav
कोट्यवधींचा मालक असूनही ‘हा’ भोजपुरी अभिनेता जगतो साधं आयुष्य; मिरची अन् भाकरी खातानाचा फोटो व्हायरल
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?
parag sonarghare paintings exhibition,
कलाकारण : माणसाने माणसाला अमूर्तासम पाहणे…
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल

तवायफ म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या ‘उमराव जान’, ‘पाकीजा’. त्यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवूनही असंच म्हणावं लागेल, की त्यांना एक ग्लॅमर होतं, एक रोमँटिक झालर होती. ‘पाकीजा’ चित्रपटाची सुरुवात आठवलीत तर तवायफचं जग हे एक अत्यंत सुंदर, भारलेलं, नाचगाण्यात म्हणजेच पर्यायानं सौंदर्यात डुंबलेलं जग असतं असंच वाटेल. इकडून गाण्याचा आवाज, तिकडून घुंगरांचा, कुठे तबला घुमतोय, कुठे तराणा.. रस्त्यावर माणसांची गजबज, हास्याच्या लकेरी.. सगळीकडे खुशीचा माहौल..

हमिदाबाईच्या कोठीच्या आसपास यातलं काहीही नाही. एक तर काळ पुढे सरकलेला, दुसरं महायुद्ध संपल्यानंतरचा पडझडीचा काळ. तवायफांचा शौक फर्मावणारे राजे-रजवाडे, नवाब जवळजवळ नामशेष झालेले. त्यातच रेडिओ, सिनेमा, रेकॉर्डसचा जमाना आलेला.. आता मुद्दाम तवायफचं गाणं ऐकण्यासाठी कोठीची पायरी चढून जाणारा विरळाच. अशा कठीण काळात हमिदाबाई निष्ठेनं, जिद्दीनं- खरं म्हणजे हट्टानं आपली कला जपत असते. आवाज रेकॉर्ड करणं ही तिला खुदाशी बेईमानी वाटते. परिस्थितीशी कडवी झुंज देत शेवटी ती मरण पत्करते, पण तो हट्टच तिच्या कोठीची शोकांतिका लिहून जातो.

आणखी वाचा-सांधा बदलताना : स्थित्यंतराचे पडसाद

हे नाटक एकट्या हमिदाबाईचं नाही- तिची मुलगी शब्बो, शिष्या सईदा, तिच्या पाहुण्यांना विडी-सिगारेट आणून देणारा ‘बाहरवाला’, तिच्या जिन्याखाली राहणारा आणि आसपासच्या देहविक्रय करणाऱ्या मुलींना गिऱ्हाईकं आणून देणारा सत्तार, मोहल्ल्याचा गुंड म्हणजेच पर्यायानं त्यांचा रखवाला लुक्का आणि त्याचा पंटर, ही एवढी पात्रं. त्याशिवाय हमिदाबाईची मुलाखत घ्यायला आलेला आकाशवाणीवरचा ‘बाबूजी.’ आणि न दिसणारे, कोठीच्या शोकांतिकेची सुरुवात करून देणारे खाँसाहेब! प्रत्येकाची एक स्वतंत्र, संपूर्ण कथा. एकेक व्यक्तिरेखा अस्सल. आपल्याबरोबर एक इतिहास, भूगोल, संस्कृती घेऊन येणारी.

अनिल बर्वे यांनी प्रत्यक्ष पाहिलेली, त्यांना भेटलेली आणि त्यांच्या लेखणीतून सुघड, उत्कट होऊन उतरलेली ही सगळी माणसं. या सगळ्यांचं हे नाटक आहे. त्याही पलीकडे जाऊन ते एका काळाचं आहे. कालचक्र फिरताना त्या चक्राखाली आलेल्या सगळय़ाला ते चक्र चिरडत जातं. मग ती माणसं असोत, संस्कृती असो वा आणखी काही. त्या चिरडल्या जाणाऱ्याचा दोष एवढाच, की तो ते चक्र फिरत असताना त्या विशिष्ट ठिकाणी होता. हमिदाबाई राहते तो मोहल्ला एकेकाळी गाणं बजावणं होणाऱ्या कोठय़ांचा असणार, पण आता हळूहळू तिथे चित्रपटातली गाणी आणि नाच, देहविक्रय हे सुरू झालेलं आहे. शेवटी जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. पण हमिदाबाई या सगळ्यापासून अस्पर्श आहे.

नाटक सुरू होताना खाँसाहेबांचं निधन झालेलं आहे. खाँसाहेब तिचे गुरू, तसंच तिच्या मुलीचे वडील. खाँसाहेब गेल्यामुळे हमिदाबाई चाळीस दिवस कोठीवर गाणं बंद ठेवते. चाळीस दिवस गाणं बंद म्हणजे उपासमार. आधीच पैशांची आवक कमी झालेली, त्यात खाँसाहेबांकडून अनेक महिने पैसे आलेले नसतात आणि आता तर येण्याची शक्यताच संपलेली असते. हमिदाबाईने आपल्या मुलीला- शब्बोला- हट्टाने पुण्याच्या मराठी शाळेत घातलेलं असतं- जेणेकरून तिच्यावर या जगाची सावली पडू नये. अनेक महिन्यांची फी न भरल्यामुळे शब्बो शाळा सोडून घरी येते. पण म्हणतात तसं, ज्याच्यापासून आपण पळ काढतो तेच आपला माग काढत येतं- शब्बोला या जगाची ओळख नाही, यात आपला बचाव कसा करायचा हे माहीत नाही. कोठी चालवायचा हुनर तिच्याकडे नाही! त्यातच कोठी बंद राहिल्यामुळे सईदा कोठी सोडून जाते आणि गर्भपात करताना मरते. आजारपणात हमिदाबाईही अल्लाला प्यारी होते, सत्तारला एका गुन्ह्यात पोलीस पकडतात आणि शब्बो एकटी पडते. आता तिचा एकमेव आधार म्हणजे मोहल्ल्याचा गुंड लुक्का. ती त्याच्याशी लग्न करते आणि लुक्का कोठीत आपलं बस्तान हलवतो. शब्बोचीच नाही, तर लुक्काचीसुद्धा पुढे इतकी वाताहत होत जाते की शब्बोवर स्वत:सकट कोठी पेटवून देण्याची वेळ येते. कोठी आणि शब्बोबरोबरच एक निष्ठा, इमान, उसूल संपून जातात. कालचक्र आपल्याच मस्तीत पुढे जात राहतं.

आणखी वाचा-‘एका’ मनात होती..! मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते..

सत्तार, कचऱ्यात सापडलेला, टाकून दिलेला पोर- रस्त्यावर वाढलेला. त्याला स्वत:ची भाषा नाही. तो म्हणतो, ‘‘जिसको अपनी जुबान नही, उसकी जुबान पे कौन यकीन करेगा हमदाबाय?’’ हे समजण्याइतकी त्याची कुवत आहे. हमिदाबाईने दिलेले संस्कार आहेत, पण परिस्थिती बदलण्याची, त्याच्यावर मात करण्याची त्याची ताकद नाही. गावात दुष्काळ पडला म्हणून मुंबईत आलेल्या मुलीला तो एका सेठला विकतो. हे पाप आहे याची त्याला जाणीव आहे. आपल्या कृत्याचा त्याला अतोनात पश्चात्ताप आहे, पण तो हताश आहे, परिस्थितीसमोर हतबल आहे. एका दुर्बलाने केलेला गुन्हा आहे तो. त्याची जबर शिक्षा त्याला भोगावी लागते. तो स्वत: कैदेत, सईदा आता या जगातच नाही आणि ज्याला जन्म देऊन घर बसवण्याची स्वप्न पाहिली, ते जन्माला येण्याआधीच वेडय़ावाकडय़ा पद्धतीनं नष्ट झालेलं!

तिसऱ्या अंकात लुक्का कोठीवर राहायला येतो, तेव्हा ‘बाहरवाला’बरोबर त्याचा एक प्रसंग आहे. बाहरवाला लुक्काच्या डोक्याला मालीश करतोय- लुक्का खुशीत त्याला म्हणतो, ‘‘बाहरवाला, हात हलका हैं रे तेरा, एक काम कर- पिकपॉकेट की लाइन पकड!’’ बाहरवाला नको-नको म्हणतो, गयावया करतो. लुक्काने फारच लावून धरल्यावर म्हणतो, ‘‘दादा मला मोठं काम करायचं आहे. वॅगन फोडायची आहे.’’ म्हटलं तर विनोदी प्रसंग, पण पहिलं हसू ओसरलं की मन विषण्ण करणारा. सत्तारला आपली जुबान नाही, पण बाहरवालाला तर नावसुद्धा नाही. वॅगन फोडली तर आपला रुबाब वाढेल, काही ओळख मिळेल, अशी त्याची समजूत. कोठीवर आलेल्या लोकांना पान-बिडी आणून देणारा एक य:कश्चित मुलगा तो. त्याला पण आयुष्यात काहीतरी करायचं आहे. पण काय ते त्याला कोण सांगणार? ही माणसं प्रत्यक्षातली. खरीखुरी.

वंचित, उपेक्षित लोकांबद्दल आपण बोलतो, ऐकतो, पण आपल्यापैकी बहुतेकांसाठी तो एक वर्ग असतो, बिनचेहऱ्याचा. या वर्गाला अनिल बर्वे यांनी एक चेहरा दिला. एखाद्याच प्रसंगातून, वाक्यातून त्यांचं संपूर्ण अंतरंग उलगडून दाखवलं, आपल्याला माणसांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. म्हणून एका ठरावीक निश्चित जागी, निश्चित काळात घडणारं हे नाटक स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून जातं. हे नाटक काही प्रश्नसुद्धा उभे करतं. हमिदाबाईंनी काळाशी जुळवून घेतलं असतं तर? शब्बोला बाहेर न पाठवता आपलीच कला वारशात दिली असती तर? तर यातलं काहीच घडलं नसतं. ती आणि तिचा परिवार जगत राहिले असते- चारचौघांसारखे.

आणखी वाचा-स्त्री ‘वि’श्व : स्त्री हक्कांचे नेपाळी पडसाद

जगली असती हमिदाबाई आणि शब्बोसुद्धा. पण कशी? गोविंद निहलानींच्या ‘अर्धसत्य’ चित्रपटात एक प्रसंग आहे. काही पोलीस अधिकारी एका ‘पार्टीतून’ परत जात असतात. टॅक्सीत बसतात. टॅक्सी निघताना एक निलंबित पोलीस अधिकारी त्यांच्यापाशी येतो, त्यांच्याकडे खायला मागतो- अगदी गयावया करत. त्याची अवस्था कठीण दिसत असते. टॅक्सी निघते. आतला एक अधिकारी म्हणतो, ‘कशाला उगाच पंगा घेतला याने व्यवस्थेशी? बसला असता गप्प तर मजेत राहिला असता!’ दुसरा त्याला विचारतो, ‘मजेत म्हणजे कसा, आपल्यासारखा?’ त्या एका साध्या प्रश्नात त्याच्या मनाची सगळी खंत, स्वत:विषयीची लाज, उद्वेग- सगळं बाहेर पडतं.

जागेअभावी या लेखात फक्त संहितेविषयी लिहितेय. प्रयोगाविषयी, कलाकारांविषयी नाही. साधारण ४५ वर्षांपूर्वीच्या या नाटकाचं दिग्दर्शन होतं विजया मेहता यांचं. संगीत भास्कर चंदावरकर, नेपथ्य द. ग. गोडसे यांचं. विजयाबाईंच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्या नाटकासाठी तवायफ संस्कृतीचा अभ्यास करायला लागल्या. त्यांच्याबरोबर द. ग. गोडसेसुद्धा. गोडसे फक्त नेपथ्यकार नव्हते, तर सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, लेखक, चित्रकारसुद्धा होते. १९७८ मध्ये तवायफ संस्कृती लोप पावलेली होती. मुंबईत तवायफ शोधायची म्हणजे कठीण काम. त्यातच लॅमिंग्टन रोडवर नीलमबाई ही एक तवायफ अजूनही आहे, अशी माहिती समजली. बाई आणि गोडसे त्यांना भेटायला गेले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी ऐकल्या. त्यांचे रितीरिवाज, तालीम, रोजचं जगणं, श्रद्धा आणि बरंच काही. बोलता-बोलता नीलमबाईंनी एक गोष्ट सांगितली, ‘‘आम्ही सकाळी चांदीच्या बांगडय़ा घालतो, दुपारी सोन्याच्या आणि रात्री हिऱ्याच्या..’’ पुढे त्यांनी जे सांगितलं ते ऐकून गोडसेंनी त्यांना चक्क खाली वाकून नमस्कार केला! त्या म्हणाल्या, ‘‘मी जेव्हा बेगम अख्तर यांचं गाणं ऐकलं, तेव्हा ठरवलं, की जोपर्यंत मी असं गाऊ शकणार नाही तोपर्यंत हिऱ्याच्या बांगडय़ा घालणार नाही आणि.. मी अजूनही हिऱ्याच्या बांगडय़ा घातलेल्या नाहीत!’’ आपल्या गाण्यानं ती उंची गाठली आहे की नाही हे ठरवणारी तीच, ती कधीही म्हणू शकत होती, ‘आज माझं गाणं अख्तरीबाईपेक्षा चांगलं झालं,’ पण ते सच्च्या कलावंताचं लक्षण नाही.

काळ बदलतो, जमाना बदलतो, पण काही उसूल, मूल्यं बदलत नाहीत. जगत असतोच प्रत्येकजण. परिस्थितीशी जुळवून घेत, मान तुकवत. पण हमिदाबाईला ते मान्य नव्हतं, आवाज खुदा की देन आहे आणि त्या खुदाशी ती कुठच्याही परिस्थितीत प्रतारणा करणार नाही. मस्जिदपेक्षा उंच तिला जायचं नाही. कालचक्राखाली चिरडली गेली हमिदाबाई, तिची कोठी, शब्बो; पण तिची कला नाही, तिचे उसूल नाहीत. केली असती तिने तडजोड, राहिली असती मजेत, तर तिचं नाटक झालं नसतं. काळावर मात करणाऱ्या या शाश्वत मूल्यांचं नाटक म्हणून हमिदाबाईच्या कोठीनं आपल्या मनात कायमचं घर केलं नसतं.

pamakulkarni@gmail.

Story img Loader