प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com
पार्वतीचं रूप असलेल्या संजादेवीला पूजण्यासाठी शेणानं भिंत सारवून त्यावर शेणापासूनच बनवलेल्या आकृतींनी मांडली जाणारी ‘संजा’ कलाकृती हा मालवा प्रांतातला वेगळा कलाप्रकार. पारंपरिक कलांचं बाळकडू मिळालेल्या कृष्णा वर्मा यांनी ‘संजा’ कलेला जराही बाधा न आणता त्यात नवनवीन प्रयोग केले. आताच्या मुलींना शेणात हात घालणं आवडत नाही. पण म्हणून दुसरा पर्याय न शोधता कृष्णा त्यांना शेणाचे औषधी गुणधर्म सांगून ‘संजा’ करण्यास प्रवृत्त करतात. ही सुंदर कला लयास जाऊ नये म्हणून त्या प्रयत्नशील आहेत.
एका पाटावर हत्तीचं चित्र काढून त्याच्याभोवती गोल फेर धरून मुली गाणी गातात. घटस्थापनेच्या दिवसापासून या खेळाची सुरुवात होते. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याचा दिवस महाराष्ट्रातला हा स्त्रियांचा आवडता खेळ खेळला जातो. त्याला भोंडला, भुलाबाई, हादगा या नावांनी ओळखलं जातं. भुलाबाई म्हणजे पार्वती, आणि भोंडल्याच्या वेळी जी गाणी म्हणतात ती ‘भुलाबाईची गाणी’ म्हणून ओळखली जातात. हत्ती हा समृद्धीचं प्रतीक असून हा उत्सव पृथ्वीच्या सुफलीकरणाचा उत्सव मानला जातो. ‘संजा’ हे मध्य प्रदेशातल्या एका देवीचे नाव आहे. तिच्यासाठी केला जाणारा सजावटीचा प्रकार म्हणजे ‘संजा’. हे एक व्रत आहे.
मध्य प्रदेशात ‘संजा’, राजस्थानमध्ये ‘संझया’, हरियाणामध्ये ‘सांझु धुंधा’, ‘सांझी’ असे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने मुलींचे उत्सव साजरे होतात. पार्वती, भवानी, गौरी, दुर्गा यांच्या आराधनेच्या निमित्तानं हे साजरे केले जातात. मध्य प्रदेशातील ग्रामीण भागातला अतिशय सर्जनात्मक असा लोककलेचा प्रकार म्हणजे ‘संजा’ सण. साधारण तीनशे वर्षांंपूर्वीची ही परंपरा असावी, असं उज्जन- मध्य प्रदेशातल्या या विषयातल्या ज्येष्ठ चित्रकर्ती कृष्णा वर्मा यांचं मत आहे. ‘संजा’ ही देवी म्हणजे पार्वतीचं रूप असून पार्वतीनं तपश्चर्या करून शंकर हा पती मिळविला, म्हणून तरुण मुली चांगला पती मिळावा, वैवाहिक जीवन सुखी असावं, म्हणून ‘संजादेवी’चा हा उत्सव साजरा करतात. ही ‘संजा’ देवी त्यांची एक मैत्रीण, शुभचिंतक आणि स्नेहमयी देवीमाता आहे. संध्याकाळी पूजन करतात म्हणून तिला ‘सांझी’ असंही म्हणतात. विशेष म्हणजे देवीचं चित्रण कुठेही स्त्री रूपात करत नाहीत. वेगवेगळी चिन्हं आणि प्रतीकं मिळून तिचं रूप ‘संजा’मध्ये दिसतं. ‘संजापर्व’ या उत्सवाचा काळ म्हणजे श्राद्ध पक्ष. याच काळात अविवाहित मुली आपल्या घराच्या मुख्य दाराजवळच्या भिंतीवर ‘संजा’ मांडतात. ही भिंत केवळ ‘संजा’करता राखून ठेवलेली असते.
कॅनव्हास आणि कागदावरील चित्रं, रांगोळी, मुद्रणकला, शिल्पकला यांपेक्षा ‘संजा’ हा कलाप्रकार भिन्न आहे. गाईच्या शेणानं बनवली जाणारी ही एकमेव कला असावी. या कलेत पूर्णपणे मुलींचा सहभाग असतो. गाईचं शेण गोळा करून आणण्याचं कामही त्याच करतात. गाईचं शेण मिळालं नाही तर म्हशीचं शेण चालवून घेतात. ‘संजा’साठी राखून ठेवलेल्या भिंतीवर शेण पातळ करून चौकोनात सारवलं जातं. भारतीय संस्कृतीत शेणानं सारवलेली जमीन पवित्र समजतात. घट्ट शेणाचा लगद्यासारखा उपयोग करून उठावाच्या आकृती तयार करतात. शेणानं बनवलेल्या या उठावाच्या आकृती लवकर सुकत नाहीत. त्यावर लाल फुलं, झेंडू, तगर, हिरवी पानं लगेच चिकटवली जातात. या कलाकृतीत चौकोनात डाव्या बाजूला चंद्र आणि उजव्या बाजूला सूर्य हे वरच्या अंगास असतात. त्यांच्यामध्ये ध्रुव तारा असतो. चंद्र आणि सूर्य हे‘संजा’ देवीचे भाऊ आहेत, असं मानतात. बारा दिवस रोज नवीन ‘संजा’ मांडला जातो. त्यात सूर्य, चंद्र, ध्रुव तारा या तीन आकृती असतातच. फक्त पहाटे पाच वाजण्यापूर्वी ध्रुव ताऱ्याची आकृती काढून टाकायची असते. कारण नाहीतर मुलीचं लग्न ठरण्यात अडचणी येतात अशी त्यांची समजूत आहे. रोज ‘संजा’मध्ये फुलं, पानं, मिठाई, खेळणी, हत्ती, घोडे, पालखी, झाडे, मोर, मोरनी, मनुष्याकृती, निसर्ग आणि मानवसंसार अशी विषयांची विविधता असते. हे मुली लहानपणापासून पाहात येतात आणि निरीक्षणानं शिकतात. प्रत्येक दिवशीच्या ‘संजा’चा विषय पारंपरिक असतो. प्रतिपदेला पंखा, द्वितीयेला चंद्रकोर, तृतीयेला घेवर (मिठाई), चतुर्थीला चौपड (सारीपाट), पंचमीला पाच छोटी मुलं-मुली, षष्ठीला वृद्ध स्त्री-पुरुष, सप्तमीला स्वस्तिक, अष्टमीला आठ पाकळ्या असलेली फुलं, नवमीला बांबूची टोपली, दशमीला जिलेबी, एकादशीला केळीच्या पानावर बसलेली चिमणी आणि द्वादशीला दारावरचं तोरण दाखवलं जातं. तेराव्या दिवसापासून ‘किलाकोट’ हे प्रतीकात्मक उठावशिल्प बनवलं जातं आणि ‘किलाकोट’मध्ये पहिल्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत मांडलेल्या ‘संजा’तली प्रत्येक आकृती काढतात. भिंतीवर अलंकरण करण्याची ही अनोखी कला आहे. मध्य प्रदेशातल्या उज्जन येथील बेगमपुरा, मालीपुरा, नयापुरा, अबदालपुरा, या जुन्या वस्त्यांमधून फेरफटका मारला तर मालवी लोकचित्रांचे नमुने भिंतींवर आढळतात. विवाहप्रसंगी ‘घुलजी’ नावाचे लोकचित्रकार मोहल्ल्यातील भिंतींवर शेकडो भित्तीचित्रं काढतात, की जणू काही एखादं कलादालन वाटावं!
‘संजा’ पर्वामध्ये रोज संध्याकाळी पूजन आणि आरती होते. त्यावेळी ‘संजा’ची गाणी म्हटली जातात. प्रसाद काय आहे हे मैत्रिणींना ओळखावं लागतं, त्याला ‘ताडन’ म्हणतात- जसं आपल्याकडे भोंडल्याची खिरापत ओळखावी लागते. पितृ अमावास्येला वाळलेल्या सर्व ‘संजा’ एकत्र करून नदीत विसर्जन करतात. संध्याकाळच्या गाण्यांमध्येही प्रत्येक दिवशीची वेगवेगळी गाणी असतात. या गाण्यांमध्ये लहानपणीची निरागसता आहे. त्यात कधी ‘संजादेवी’ बालविवाहितेच्या रूपात असते, कधी भावा-बहिणीची माया असते. गाण्यांची चाल एकच असते. त्यात उपस्थित मैत्रिणींची नावंही आयत्या वेळी गुंफली जातात.
उदाहरणादाखल एक गीत पाह ूया-
नानी-सी गाडी, रडम्कती जाय, रडम्कती जाय
जी में बैठय़ा संजाबई, संजावई,
घाघरो धमकाता जाय
चूडम्लो चमकाता जाय
बिछिया बजाता जाय
नथनी भलकाता जाय।
‘संजा’ या लोककलेत चित्रकला, मूर्तीकला, स्थापत्यकला, कविता, गीत, संगीत, अशा साऱ्या ललित कलांचा संगम दिसतो. त्यामुळेच ‘संजा’ला बहुआयामी महत्त्व आहे. आधुनिक चित्रकलेतल्या ‘चिकटचित्रां’चं (कोलाज) हे अप्रतिम उदाहरण आहे. यात अलीकडे निरनिराळ्या रंगांचे कागद, चकचकीत चांद्या वापरून नावीन्य आणलं जातं. विवाहित मुली पहिल्या वर्षी माहेरी येऊन ‘संजा’ मांडतात. उद्यापन करून, विसर्जन एखाद्या शुभ दिवशी करतात. हे विसर्जन केल्यानंतर त्यांचा ‘संजा’शी असलेला संबंध कायमचा तुटतो. हा समारंभ होताना उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणास बोलावतात आणि ढोलताशांच्या गजरात विसर्जन होतं. ‘संजा’मधील ‘किलाकोट’ ही मुलींच्या कलात्मक ऊर्जा आणि क्षमतेची कसोटी आहे. त्यासाठी जवळजवळ तीन दिवस लागतात आणि ते तयार करताना हात, खांदे, अक्षरश: दुखू लागतात. मग घरातल्या स्त्रिया मदत करतात. ‘किलाकोट’ची बाहेरची सीमारेषा दुहेरी किंवा एकेरी असते, अर्थात शेणानं ती उठावदार रेषा करताना चौकोनाची खालची बाजू पूर्ण बंद न करता ठेवल्यामुळे एक दार तयार होतं. या सीमारेषेवर ओल्या चुन्यात बोटं बुडवून ठिपके काढले जातात. ते खूप आकर्षक दिसतात. रोजच्या रिवाजाप्रमाणे चंद्र, सूर्य, मधोमध ‘संजादेवी’चा पलंग, वाहन बनवतात. निरोप देण्याची तयारी सुरू होते. हत्ती, घोडा, पालखी, त्याचप्रमाणे विविध प्रकारची माणसं दाखवताना जाडी यशोदा, पतली पेमा (सडसडीत स्त्री) यांच्या रेखाकृती दाखवतात. या काळात येणारी विशिष्ट फुलं सजावटीसाठी वापरतात.
मालवा संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिद्धेश्वर सेन (२०२० हे त्यांचं शताब्दी वर्ष आहे) यांनी ‘मालव लोककला केंद्रा’ची स्थापना केली. या संस्थेचे कलाकार लोकसाहित्य, लोकगीत, ‘लोकनाटय़ माच’ याचं प्रदर्शन, प्रशिक्षण आणि संरक्षणाचं काम करतात. आतापर्यंत १० हजारहून अधिक कलाकार या संस्थेतून प्रशिक्षित होऊन बाहेर पडले आहेत. ‘लोकनाटय़ माच’ हा मालवाचा नाटय़प्रकार म्हणजे आपल्या ‘दशावतारी’ नाटकाचं दुसरं रूप म्हणता येईल. सिद्धेश्वर सेन या ‘लोकनाटय़ माच’ कलेत गुरूस्थानी मानले जातात. ते अनेक पुरस्कारांचे मानकरी होते. त्यांची कन्या कृष्णा वर्मा हिला घरातल्या वातावरणामुळे पारंपरिक आणि लोककलेचं बाळकडूच मिळालं. आपल्या आजीकडून लोककलेचं ज्ञान त्यांना मिळालं. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांनी शेणात हात घालून ‘संजा’ मांडण्यास सुरुवात केली. कृष्णा या लोकगीत गायन आणि नृत्यात निपुण आहेतच, शिवाय त्यांनी पारंपरिक कलेला जराही बाधा न आणता त्यात नवनवीन प्रयोग केले. ‘मालवा आकाशवाणी’वरून ‘ग्रामलक्ष्मी’ हे कलाविषयक कार्यक्रम सादर केले. लोककलेच्या विविध कार्यक्रमांसाठी त्यांनी देशभर भ्रमण तर केलंच, तसंच अमेरिका, इस्त्रायलमध्ये त्यांची चित्रं प्रदर्शित झाली. तिथल्या सांस्कृतिक मंडळात त्यांनी ‘संजा’ आणि इतर भित्तीचित्रं चित्रांकित केली. ‘नॅशनल क्राफ्ट म्युझियम- दिल्ली’, ‘भारत भवन- भोपाळ’, ‘मध्यप्रदेश आदिवासी लोककला परिषद’ येथील कलाशिबिरांमधून ‘संजा’ मांडण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली आहे. ‘संजा’ कलापरंपरा जतन करण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल २०२० मध्ये त्यांना मध्य प्रदेश शासनाचा शिखर सन्मान, ‘सारस्वत सन्मान’, ‘मथुरा देवी सन्मान’, ‘देवी अहिल्याराणी सन्मान’(२०१९), आणि याच कलेसाठी २०१८-१९ ची वरिष्ठ ‘फेलोशिप’ मिळाली. त्यांना सूरजकुंड मेला, चेन्नई, मुंबई, पुणे येथील राष्ट्रीय उत्सवांत मालवाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. लोकनाटय़ आणि ‘माच’ मध्येही त्यांना गती आहे. जनजागृतीसाठी केल्या जाणाऱ्या सरकारी कार्यक्रमांत त्यांचा मौलिक सल्ला घेतला जातो. हल्ली मुलींना ‘संजा’ बनवण्यासाठी शेणात हात घालणं आवडत नाही. पण म्हणून दुसरा पर्याय न शोधता त्या शेणाचे औषधी गुणधर्म सांगून मुलींना ‘संजा’ करण्यास त्या प्रवृत्त करतात. व्यस्त जीवन, बदलता काळ यामुळे मुली या कलेत रस घेत नाहीत. कृष्णा वर्मा म्हणतात, ‘‘शासन आम्हा कलाकारांना सन्मान देतं, पण कलेच्या पोषणासाठी प्रयत्न होणंही गरजेचं आहे. मुलींसाठी कार्यशाळा आयोजित के ल्या पाहिजेत, ज्यात लोककलाकार प्रशिक्षण देतील.’’ या दृष्टीनं त्या प्रयत्नही करत आहेत. आयुष्यभर नोकरी करून त्यांनी ‘संजा’ आणि इतर कला जतन केल्या. आता त्या निवृत्त झाल्या आहेत. आपल्या सुनेला त्यांनी सर्व कला शिकवून पुढील पिढीला शिकवण्याची प्रेरणा दिली आहे. आपल्या वडिलांची परंपरा त्या आणि त्यांचे बंधू सांभाळत आहेत. ‘संजा’विषयक लिखाण करत आहेत. आपली सून पुढील पिढीपर्यंत ही परंपरा नेईल असा विश्वास त्या व्यक्त करतात. त्यांचं हे ‘संजा’ जतन करण्याचं स्वप्न पुढे अनेक पिढय़ा अमर ठेवतील अशी आशा करू या.
विशेष आभार : सिद्धेश शिरसेकर