खरे स्वातंत्र्य निसर्गनियम झुगारण्यात नसून सुज्ञपणे त्यांचे पालन करण्यातच आहे. निसर्गाने माणसाला विचार करण्याची क्षमता दिली त्याचबरोबर ती क्षमता कशाही प्रकारे वापरण्याचे पूर्ण स्वातंत्र्यदेखील दिले.
एकदा एक दु:खी मनुष्य एका साधूकडे दु:खनिवारणार्थ गेला. तेव्हा त्या साधूने त्याला अशा एका माणसाचा सदरा आणायला सांगितला, की ज्याने जीवनात कोणत्याही प्रकारचे दु:ख भोगलेले नाही. खूप तपास करूनही त्याला असा माणूस सापडला नाही व तो त्या साधूकडे हात हलवत परत आला. मग त्या साधूने त्याला जीवनाच्या स्वरूपाविषयी उपदेश केला. त्या उपदेशाने त्या मनुष्याचे प्रत्यक्षात दु:खनिवारण झाले की नाही, हा प्रश्न वेगळा परंतु त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, या जगात पूर्णत: सुखी असा कोणीच नाही. याचा अर्थ असा होतो का, की निसर्गाने मानवाला एका दु:खी प्राण्याच्या रूपातच घडवले आहे व म्हणून दु:ख हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, माणसाची त्यापासून सुटका होणे कधीच शक्य नाही? माणसाला दु:खातून बाहेर पडायचे असेल तर त्याला दु:खाची प्रक्रिया समजावून घेतली पाहिजे.
आजकाल जगात चाललेल्या घडामोडींकडे पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात येते की, मानवाने विज्ञानाच्या क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केली असली तरी त्याची मानसिकता मात्र अजूनही हजारो वर्षांपूर्वी होती तशीच आहे. बाह्यत: मनुष्याचे जीवन खूप बदललेले असले तरी त्याच्या अंतरंगात, मानसशास्त्रीय पातळीवर तो अजिबात बदललेला नाही. त्याच्यात भय, क्रोध, िहसा, इच्छा, आकांक्षा, असुरक्षिततेची भावना, सुखदु:खे व अनेक प्रकारचे स्वकेंद्रित क्रियाकलाप अजूनही तसेच आहेत जसे ते पूर्वी होते. किंबहुना बहुतांश माणसे या सगळ्या गोष्टी म्हणजेच आपले जीवन आहे असे समजतात व त्यापासून मुक्त होणे शक्य आहे का असा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. मनुष्य मानसशास्त्रीय पातळीवर असाच राहणार आहे का? आणि तो तसाच राहणार असेल तर अशा मानवाचे भवितव्य काय असेल? अत्यंत अविकसित मानसिकता असलेल्या माणसाच्या हाती अत्यंत विकसित विज्ञान असणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखेच आहे. असा माणूस संपूर्ण मानव जातीच्या विनाशास कारणीभूत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच ‘मनुष्याची मानसिकता बदलता येऊ शकते का?’ असा प्रश्न विचारणे अगत्याचे ठरते. या प्रश्नाचे उत्तर केवळ होय किंवा नाही या स्वरूपात देऊन उपयोग नसतो तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने शोध घेऊन प्रत्यक्ष मानसिकता बदलण्यात असतो.
आपण जगतो म्हणजे नेमके काय करतो? आपल्या भोवती आणि आपल्या आत विविध घटना सातत्याने घडत असतात. या घटना आपण अनुभवत असतो. त्या अनुभवातून आपण खूप सगळे ज्ञान व माहिती गोळा करतो व आपल्या मेंदूमध्ये स्मृतीच्या रूपाने साठवून ठेवतो. या स्मृतीतूनच मग पुढच्या घटनेला आपले प्रत्युत्तर येत असते. त्या प्रत्युत्तरातून मग पुढचा अनुभव व पुन्हा ज्ञान व माहिती गोळा करून मेंदूत साठवण्याची प्रक्रिया. अशी या चक्राची सातत्याने पुनरावृत्ती चाललेली असते व प्रत्येक पुनरावृत्तीतून ज्ञान व माहितीचा संचय स्मृतीच्या रूपाने आपल्या मेंदूत घडत राहतो. अशा प्रकारे आपले जीवन म्हणजे बऱ्या-वाईट स्मृतींचे एक गाठोडेच बनलेले असते. त्यातच आपली सुखदु:खे असतात, आवडीनिवडी असतात, आपल्या क्रिया-प्रतिक्रिया, भावनिक गुंतवणुकी, विचार, कल्पना, ज्ञान, समजुती, इच्छा-आकांक्षा, वासना, जे जे आपण जगतो ते सर्व काही या स्मृतिरूपी गाठोडय़ातच असते. ती आपली पाश्र्वभूमी असते व त्या पाश्र्वभूमीतून आपण एका आज्ञांकित (प्रोग्रॅम्ड) यंत्रमानवाप्रमाणे जगत असतो. अशा प्रकारे विविध प्रकारच्या आठवणी, ज्ञान साठवत एका यंत्रमानवाप्रमाणे जगत राहणे हाच जीवनाचा उद्देश आहे का? कारण अशा जगण्यात सर्जनशीलता नसते, कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नसते. म्हणूनच प्रश्न उद्भवतो की जगण्याचा यापेक्षा एक पूर्णत: भिन्न मार्ग आहे का?
दु:ख म्हणजे आपल्याला नको असलेले प्रसंग आपल्या वाटय़ाला येणे किंवा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्याला न मिळणे. या दोन टोकांमध्ये दु:खाच्या विविध छटा पसरलेल्या असतात. दु:ख म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली देणगी नसून मानवानेच आपल्या जगण्यातून निर्माण केलेली परिस्थिती होय. त्यामुळेच कोणती तरी बाह्य शक्ती आपले दु:खनिवारण करेल अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे. मानवाने निर्माण केलेल्या दु:खातून मानवालाच बाहेर पडले पाहिजे. त्यासाठी त्याला आत्मशोधन केले पाहिजे. आत्मशोधन म्हणजे आत्म्याचा शोध नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनाचे आकलन करून घेणे होय. कारण दु:खातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्या रोजच्या जीवनातूनच आहे, त्याच्या बाहेर नाही.
त्याचप्रमाणे माणसाची मानसिकता हीदेखील निसर्गाची देणगी नसून सभोवतालच्या परिस्थितींना तोंड देताना निर्माण झालेली आंतरिक परिस्थिती होय. त्याच त्या प्रकारची आंतरिक परिस्थिती वारंवार निर्माण होत राहिली की तो आपला स्वभाव बनतो. हा स्वभावच आपल्या मनोवृत्तीतून प्रक्षेपित होत असतो. एकदा हा स्वभाव तयार झाला की तो बदलणे फार कठीण असते. बाह्य परिस्थिती कितीही बदलली तरी स्वभाव थोडा फेरबदल करून तिच्याशी जुळवून घेत असतो व म्हणूनच त्यात मूलभूत बदल घडून येत नाही. त्यामुळे मानसिकता बदलायची असेल तर दिलेल्या बाह्य परिस्थितीत विशिष्ट आंतरिक परिस्थितीच का निर्माण होते याचा शोध घेणे जरुरी आहे.
माणसाचे ठरावीक चाकोरीतील जगणे हा त्याच्या संस्कारबद्धतेचा परिणाम असतो. संस्कारांनी बांधलेला मनुष्य कधीच स्वतंत्र नसतो. हे संस्कार म्हणजे त्याने गोळा करून स्मृतीरूपाने साठवलेल्या ज्ञानाचा परिणाम असतो. हे संचयित ज्ञानच त्याच्या सर्व क्रिया-प्रतिक्रियांचा, त्याच्या विचारांचा स्रोत असते. व्यवहारात जेथे आवश्यक आहे तेथेच फक्त विचाराचा वापर करणे अन्यथा विचार शांत असणे शक्य आहे का? विचार हा जाणूनबुजून शांत करता येत नसतो तर तो कोणत्याही कारणाशिवाय आपोआप शांत असणे आवश्यक असते. कोणत्याही संस्कारबद्धतेशिवाय केवळ निसर्गनियमांना अनुसरून जेव्हा जगण्यात येते तेव्हा विचार नसíगकरीत्या त्याच्या स्वाभाविक जागी स्थिरावतो व शांत होतो. पूर्ण स्वातंत्र्य हा वैश्विक व्यवस्थेचाच एक भाग असतो. विश्वातील प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी असण्यास मोकळी असते. निसर्गनियमदेखील या वैश्विक सुव्यवस्थेचाच परिणाम असतो. मनुष्य जेव्हा हे निसर्गनियम झुगारून जगण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा ते नियम बंधनकारक बनून त्याला नको असलेली परिस्थिती निर्माण करतात. खरे स्वातंत्र्य निसर्गनियम झुगारण्यात नसून सुज्ञपणे त्यांचे पालन करण्यातच आहे. निसर्गनियमांच्या बंधनातून बाहेर पडण्याचा मार्ग हा त्यांच्या आकलनातून आहे, त्यांना झुगारण्यातून नव्हे. निसर्गाने माणसाला विचार करण्याची क्षमता दिली त्याचबरोबर ती क्षमता कशाही प्रकारे वापरण्याचे पूर्ण स्वातंत्र्यदेखील दिले. मानवाने त्याच्या अज्ञानातून या विचारशक्तीचा वाटेल तसा वापर केला व नको असलेल्या परिस्थिती स्वत:वर ओढवून घेतल्या. या परिस्थितींमधून बाहेर पडायचे असेल तर माणसाला विचार कोठे वापरायचा व कोठे नाही हे शिकणे आवश्यक आहे.
आपण आपले दैनंदिन जीवन समग्रतेने कधीच जगत नाही. आपला प्रत्येक अनुभव हा अपूर्ण असतो व म्हणूनच तो पुन्हा पुन्हा येत राहतो. आपली स्मृती अशा अपुऱ्या अनुभवांनी भरलेली असते. प्रत्येक अपूर्ण गोष्ट पूर्ण होण्याचा सतत प्रयत्न करत असते व त्यामुळेच मन अशांत होत राहते. आपल्या जीवनातील प्रत्येक प्रसंग इतक्या समग्रतेने जगणे शक्य आहे का की, प्रसंगाबरोबरच त्याचा अनुभवही संपून जाईल व त्याचा कोणताही नि:शेष स्मृतिरूपाने आपल्या आत उरणार नाही? हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण जीवनातील प्रसंगांना अवधानपूर्वक सामोरे जाऊ. अवधानाच्या प्रखर प्रकाशात जेव्हा प्रत्येक अनुभवाचे अवलोकन केले जाते तेव्हा ते अनुभव पूर्णत्वास जाऊन नसíगकरीत्या लोप पावतात. अपूर्ण अनुभव पूर्णत्वास जाऊन जेव्हा अंत पावतात तेव्हा त्यांच्यातील ऊर्जा मुक्क होऊन एकवटली जाते. ही ऊर्जा अवधानाला अधिक तीक्ष्ण बनवते. अशा प्रकारे ऊर्जेचे एकवटीकरण करणारे जीवनच खऱ्या अर्थाने धार्मिक जीवन म्हणता येईल. मनुष्य जेव्हा असे धार्मिक जीवन जगू लागतो तेव्हा त्याच्या भोवतालचे संस्कारबद्धतेचे पाश सल होऊन त्याला उन्मुक्ततेचे भान येऊ लागते. असे उन्मुक्त जीवनच खऱ्या अर्थाने सर्जनशील असते. त्यात कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसूनही पूर्ण सुव्यवस्था असते. ही सुव्यवस्था कोणत्याही अनुशासनाच्या परिणामस्वरूप नसते तर तीक्ष्ण अवधानाद्वारे र्दुव्‍यवस्था निर्माण करणाऱ्या घटकांचा निचरा झाल्यामुळे स्वाभाविकपणे असते. अशा सुव्यवस्थेतच जीवनाचे एक वेगळेच दालन उद्घाटित होते जी एका पूर्णत: भिन्न जीवनाची सुरुवात असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा