आज आबालवृद्धांची अवस्था ‘मला वेड लागले.. गॅझेट्सचे’ अशी झाली आहे. मात्र लहान, युवावर्गातील हे वेड त्याच्या व्यसनापर्यंत जाऊ लागले आहे. घरातल्या घरात एकमेकांमध्ये वितुष्ट आणणाऱ्या या गॅझेटमधल्या अतिगुंतवणुकीच्या मुळाशी नेमके काय आहे? संवादाचा अभाव की समजून घेण्याचा अभाव? हे जाणून घेण्यासाठी ‘गॅझेट्सचे आरोग्यशास्त्र’ समजून घेणे गरजेचे आहे.
लहानसहान कामांसाठी उपयोगी पडणारे साधन यंत्र म्हणजे गॅझेट. मग त्यात मोबाइल फोन्स, आयपॉड, आयपॅड, टॅब, लॅपटॉप, संगणक इत्यादी अनेक वस्तू आल्या. याचे कसले आलेय आरोग्यशास्त्र? असे तुम्ही म्हणाल; पण आजकाल या गॅझेट्सचा तुमच्या शारीरिक-मानसिक आरोग्याशी, तुमच्या पैशांशी आणि तुमच्या प्रतिष्ठेशी जवळचा संबंध असल्यामुळे या ‘गॅझेट्सचे आरोग्यशास्त्र’ समजून घेणे ही निकड बनली आहे. पूर्वी लोकांना जसा प्रेमरोग वगैरे व्हायचा तसा आता गॅझेट्स रोग होऊ लागला आहे. गॅझेट्सशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा लोकांना करवत नाही इतका या तंत्राने सगळ्यांच्या आयुष्यावर कब्जा केलेला आहे. तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.
मध्यंतरी, एका पंधरा वर्षांच्या मुलाने मला ई-मेल पाठवून आपली व्यथा सांगितली. त्याने लिहिले होते, ‘सर, माझे सगळे मित्र एका मित्राच्या घरी जमून संगणकावर रात्रभर व्हिडीओ गेम्स खेळत असतात. मलाही त्यांच्यात सामील व्हायचे असते; पण जेव्हा जेव्हा मी याबाबत आई-बाबांना विचारतो तेव्हा ते मला स्पष्ट नकार देतात. तुम्ही मला सांगाल का, की मी आई-बाबांची परवानगी कशी मिळवू? जेणेकरून ते मला मित्राच्या घरी राहायची परवानगी देतील..’ त्याचा हा प्रश्न वाचून मला अजिबात धक्का बसला नाही. मी त्याला बोलावून घेतले. बोलता बोलता माझ्या असे लक्षात आले की, अभ्यासात तो मागे पडला होता. त्याला गणितात अनेक अडचणी यायच्या. दर वेळी कमी गुण मिळायचे आणि त्यावरून त्याचे पालक त्याला सतत टाकून बोलायचे. गणिताचे गुण कमी होत गेल्याचे सारे खापर ते त्याच्यावर फोडत होते. परिणामी, तो मुलगा आई-बाबांना टाळू लागला होता आणि त्यांच्यापासून दूर राहण्याची तो सतत काही तरी कारणे शोधत होता. त्याला आलेले नैराश्य आणि अभ्यासाची सतावणारी चिंता विसरण्याचे साधन म्हणून तो कुठे तरी या व्हिडीओ गेम्सकडे पाहू लागला होता. या खेळात त्याचे काही मित्र त्याला येऊन मिळाले आणि मग हळूहळू या खेळाच्या वेडापायी ते रात्र रात्र जागू लागले होते. त्याच्या पालकांना ही गोष्ट कळली आणि पुन्हा एकदा त्यावरून घरात मोठा तमाशा झाला. घरातील वातावरण गढूळ झाले होते, पण या सगळ्याच्या मुळाशी जी समस्या होती ती दुर्लक्षितच राहिली होती. गणित विषय ही त्या मुलाची मूळ समस्या होती, पण ती लक्षात घेतली जात नव्हती आणि त्यामुळे गोंधळ आणखी वाढला होता. या गोंधळाला गॅझेट्स कारणीभूत ठरली होती. यालाच आम्ही ‘गॅझेट रोग’ असे म्हणतो.
बरेच वेळा वरून लाजरीबुजरी वाटणारी मुलेसुद्धा अगदी सहज या व्हिडीओ गेम्सच्या आहारी जातात. या व्यसनापायी रात्रभर जागणाऱ्या मुलांमध्ये रागीट वृत्ती, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, उदासपणा आणि नैराश्य दिसून येते. मुलांना यातून बाहेर काढायला काही वेळेस समुपदेशन पुरेसे असते, तर काही वेळेस मुले आणि त्यांचे पालक यांच्यातील संवाद वाढवून आणि नात्यातील दरी कमी करून या प्रश्नावर तोडगा निघू शकतो. काही मुलांच्या बाबतीत त्यांना काही काळ या सगळ्या गॅझेट्सपासून ठरवून दूर न्यावे लागते, तर काही प्रकरणांमध्ये थोडय़ा दिवसांकरिता रुग्णालयात किंवा पुनर्वसन केंद्रात मुलांना ठेवावे लागते. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे अनेक प्रकारची गॅझेट्स आज सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. या गॅझेट्सच्या उत्क्रांतीचा वेग तर इतका आहे की, दर आठवडय़ाला बाजारात काही तरी नवीन येत आहे आणि किशोरवयीन मुलांपर्यंत त्याची माहिती हा हा म्हणता पोहोचते आहे. ही गॅझेट्स जितकी मोठय़ांच्या हातात पडताहेत त्याहूनही अधिक ती किशोरवयीन मुलांच्या हातात अगदी सहज पडू लागली आहेत. म्हणूनच या गॅझेट्सचे आरोग्यशास्त्र जपण्याची आज गरज निर्माण झालेली आहे.
गॅझेट्सचा एक उपयुक्त साधन म्हणूनही वापर करता येतो आणि मनोरंजनाचे-मजेचे साधन म्हणूनही वापर होऊ शकतो. मुलांच्या हातात पडलेल्या चेंडूचा वापर ते फुटबॉल म्हणूनही करू शकतात किंवा व्हॉलीबाल म्हणूनही करू शकतात. तसेच या गॅझेट्सचे आहे. या गॅझेट्सच्या रूपाने मुलांना नवा खेळ मिळाला आहे, असे आपण म्हणू या; पण हा खेळ आज घराघरांत भांडणाचा विषय ठरू लागल्याने चिंता वाटते. बरेचदा या भांडणाची सुरुवात ही या गॅझेट्सच्या मागणीपासूनच होते. मुले जेव्हा अशा गॅझेट्सची पालकांकडे मागणी करतात ना, तेव्हा त्यांची मागणी शांतपणे नीट ऐकून घ्या. लगेच त्यांचा अनादर किंवा अपमान करू नका. एका शिक्षिकेच्या मुलीने आपल्या आईकडे साठ हजार रुपये किंमत असलेल्या मोबाइल फोनची मागणी केली. तिची ती मागणी ऐकून बाई आपल्या मुलीवर खूप भडकल्या आणि तिला खूप सुनावले. ‘‘आपल्या घरची आर्थिक परिस्थिती तुला माहिती आहे ना?’’ मग वडिलांनीसुद्धा मध्ये तोंड खुपसले, ‘‘तुला अभ्यासात रस आहे, की नुसतीच उनाडक्या करीत फिरत राहणार आहेस?’’ वगैरे वगैरे. याने फक्त एकमेकांत वाद होतात, पण प्रश्न सुटत नाही. तो ठरावीक फोनच तिला का हवा आहे याची कारणे तिला आधी विचारा, किंबहुना तिचे म्हणणे ऐकून घ्या, अर्थात याचा अर्थ लगेच तो फोन तिला आणून द्या असे नाही, पण समोरच्याचे म्हणणे ऐकून घेण्यास काही हरकत नाही. त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. तोच फोन निवडण्यामागे तिचा काय विचार आहे, भावना काय आहेत, त्या जाणून घेण्याचा मी प्रयत्न करून पाहिला. मुलीने मला त्या फोनची सर्व वैशिष्टय़े सांगितली, कारण मी तिचे विचार शांतपणे ऐकून घेत आहे, त्या विषयात रस घेत आहे, हे त्या मुलीला जाणवले. तिच्या मैत्रिणीकडे तो फोन आहे आणि त्यामुळे आता तोच आपल्याकडेही असावा असे या बाईसाहेबांना वाटू लागले होते. त्या मोबाइलचे सर्व गुण-विशेष सांगितल्याबद्दल मी तिचे आभार मानले. तिला गंमत वाटली. मग तिने त्या फोनमध्ये नक्की काय आवडले आहे हेही मला सांगितले आणि माझ्या आईला माझे म्हणणे तुम्हीच पटवून द्या, असेही जाता जाता मला सांगितले. ‘‘तुझ्या आई-वडिलांना हा फोन परवडेल?’’ मी तिला विचारले. त्यावर क्षणभर ती काहीच बोलली नाही, पण मग म्हणाली, ‘‘हप्त्यावर घेता येईल की त्यांना.’’ या प्रकरणात हट्ट आणि गरज यातील सीमारेषा खूप पुसट झाली होती, पण पाच ते सहा वेळा त्या मुलीशी बोलल्यानंतर आणि समुपदेशन केल्यानंतर शेवटी त्या मुलीने आपली मागणी शिथिल केली आणि कमी किमतीचा मोबाइल घ्यायला तयार झाली. समुपदेशनाच्या काळात आम्ही तिचा ठेवलेला आदर, तिला दिलेले बोलण्याचे स्वातंत्र्य, तिच्या विचारांना दिलेले स्थान आणि तिच्या भावनांचा मान राखून मारलेल्या गप्पा यामुळे तिच्यात हळूहळू बदल झाला आणि आपली मागणी कशी अवास्तव आहे ते हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागल्याने तिने ती मागणी दूर सारली.
मुलांकडून जेव्हा अशा अवास्तव मागण्या केल्या जातात तेव्हा पालक आधी किंचाळतात, ओरडतात, घालून-पाडून बोलतात, अगदी लायकी काढण्यापर्यंत भांडण जाते आणि मग तणाव अधिकच वाढतो. मुलांच्या भावनांशी तुमच्या विचारांची सांगड घातली गेली, तर त्यातून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा प्रतीत होतो आणि वाद होत नाहीत. अन्यथा किंचाळून बोलणे, टाकून बोलणे यामुळे उगाच नात्यात कडवटपणा येतो आणि तो बराच काळ कायम राहतो. ही प्रकरणे सोडविताना आमचे समुपदेशक आधी मुलांकडून व्हिडीओ गेम्स शिकून घेतात. हा गमतीचा भाग झाला, पण मुलांना बोलते करायला, त्यांच्या मनातले काढून घ्यायला आम्हाला या गोष्टींचा उपयोग होतो.
कदाचित हे प्रत्येकाच्या बाबतीत साध्य होईलच असे नाही. आपल्या पालकांकडून आपल्याला हवी असलेली वस्तू कशी काढून घ्यायची याची नस सापडलेली असते ना ती मुले कधीच वाटाघाटी करायला तयार नसतात. इथे गॅझेट हा प्रश्न नसतो, तर आपले ऐकणारे पालक हे जणू आपले गुलाम आहेत, अशी मुलांची समजूत झालेली असते. अर्थात याची सुरुवात लहानपणापासूनच झालेली असते. मूल लहान आहे, जाऊ द्या, त्याचा हट्ट पुरवू या, अशी पालकांची सौम्य भूमिका असली की, तीच पुढे कायम राहते आणि मग आपल्या आईबाबांना कसे पटवायचे हे मुलांना चांगले जमते, मग तिथे वाटाघाटीचा पर्याय मुले बंद करून टाकतात.
सातवीतल्या एका मुलाने आपल्या पालकांना, जोपर्यंत ते त्याला हवा असलेला मोबाइल फोन घेऊन देत नाहीत तोपर्यंत तो शाळेतच जाणार नाही, अशी धमकी दिली. त्याच्या या वागण्यामुळे पालक कमालीचे अस्वस्थ झाले. मी त्यांना सांगितले की, तुम्ही फार उद्वेग, राग, चिडचिड न करता शांत राहा आणि त्याला घरी बसायचे आहे ना, मग बसून राहू द्या, पण तो फोन आणून देऊ नका आणि त्याचे लाड करू नका, असेही सुचवले. हा अहिंसात्मक मार्गाने जाणारा साधा नियम होता. वडील आजूबाजूला असले की तो मुलगा शांत राहायचा, पण आईकडे हट्ट करायचा, तिच्यावर हात उगारायचा. मी त्याच्या वडिलांना सांगितलं की, जेव्हा त्याचा उद्रेक होईल तेव्हा त्याला जवळ घ्या आणि तो शांत होईपर्यंत त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घ्या. त्याच्या वडिलांचा मला फोन आला की, त्याचा उद्रेक वाढत चालला आहे आणि तो आमच्या नियंत्रणाच्या बाहेर गेला आहे. मग मला त्याला त्याच्या पालकांपासून काही काळ दूर ठेवावे लागले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. तिथे आम्ही त्याचे म्हणणे, त्याचा राग सगळे शांतपणे ऐकून घेतले आणि त्याच्याकडे विशेष लक्ष पुरवले. या प्रकरणात तो मुलगा आईबाबांच्या नियंत्रणाच्या पलीकडे गेला, कारण तो मुळात नैराश्याने ग्रासलेला होता. जेव्हा मुलांना नैराश्य येते तेव्हा ती अवाजवी, अवास्तव गोष्टींची मागणी करू लागतात आणि मग अशा वेळी त्यांना त्यांचे मनोरंजन करणारे एखादे गॅझेट्स नक्की सापडते. अशा वेळी आधी नैराश्यावर उपचार करावे लागतात. तो मुलगा मनोरुग्ण नव्हता, पण जेव्हा मुलांना असे वाटते की, आपले पालक आपल्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीयेत किंवा आपल्यावर प्रेम करायला त्यांच्याकडे वेळ नाहीये आणि आपण घरात दुर्लक्षित आहोत, तेव्हा मनातला हा राग अशा अवास्तव किंवा अवाजवी मागण्यांमधून बाहेर पडत असतो. गॅझेट्स या वस्तू मुळातच महाग या प्रकारात मोडत असल्यामुळे आणि त्याचे व्यसन सहज लागत असल्यामुळे मुले त्याच्या आहारी जातात. या गॅझेट्सच्या माध्यमातून ते कुठे तरी एक नवीन विसावा किंवा आसरा शोधत असतात. पुढील भागात आपण अजून अशीच काही उदाहरणे पाहणार आहोत.
डॉ. हरीश श़ेट्टी -harish139@yahoo.com
(क्रमश:)  शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा