वैद्यभूषण गणेशशास्त्री जोशी आणि त्यांच्यापासून आजच्या त्यांच्या चौथ्या पिढीत एकूण २३ वैद्य आहेत. १९१४ मध्ये गणेशशास्त्रींनी पुण्यात आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक पिढीने आयुर्वेदाचा वारसा जपला. वैद्यक परंपरा जपणाऱ्या या गणेशशास्त्री जोशींच्या कुटुंबांविषयी..
यो गायोग ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. मानावी.. न मानावी.. गोंधळ उडतो. माणसाच्याच नव्हे, तर देशाच्याही इतिहासात योगायोग असतातच. फक्त इतिहास कधी ‘जर-तर’ची नोंद घेत नाही. त्यामुळे ते अंधारात राहतात. मात्र अचानक कधी तरी आपल्याला एखादी घटना सापडते आणि समजते. मग त्या योगायोगानं चकित व्हायला होतं किंवा हळहळ वाटते. असाच योगायोग, एक महात्मा गांधींच्या निधनाशी आणि लोकमान्य टिळकांच्या निधनाशी निगडित. या दोन्ही घटनांमध्ये कित्येक वर्षांचं अंतर, पण संबंधित दुवा एकच, तो म्हणजे वैद्यभूषण गणेशशास्त्री जोशी.
डॉ. केतकरांच्या ज्ञानकोशासाठी ‘आर्य वैद्यक’ विभागाचं संपादन करण्याची संधी तरुण वैद्य गणेशशास्त्री जोशी यांना मिळाली. या कामात सर्वश्री य.रा. दाते, चिं.ग. कर्वे, वि.ल. भावे, ग.श्री. टिळक अशा मातब्बर मंडळींशी गणेशशास्त्रींचा परिचय झाला. समाजहित हा साऱ्यांचा कळकळीचा विषय. तशात दातेंनी एक इंग्रजी रात्रशाळा काढण्याचा प्रस्ताव मांडला. सारी जुळवाजुळव झाली. शाळास्थापनेची घोषण करण्याचा मुहूर्त ठरला. १ ऑगस्ट १९२० संध्याकाळ आणि त्याच दिवशी टिळकयुगाचा अस्त झाला, मात्र पुढे संस्थेची स्थापना होऊन तिनं उत्तम कामगिरी बजावली.
दुसरी घटना आरोग्य क्षेत्रातली.
कस्तुरबा स्मारक आरोग्य विभागीय बैठकीत खेडेगावांसाठी स्वस्त, सुलभ, र्सवकष औषधयोजनेचा विचार मांडणाऱ्या गणेशशास्त्री जोशींना, महात्मा गांधींनी एक आराखडा बनवायला सांगितला. मोठय़ा मेहनतीनं शास्त्रीबुवांनी स्थानिक लोकांना प्रशिक्षित करण्याचा एक सुटसुटीत अभ्यासक्रम आखला; परंतु अल्पावधीतच महात्मा गांधींची हत्या झाली आणि योजना कागदावरच राहिली, नाही तर स्वयंपूर्ण आणि आरोग्यपूर्ण खेडय़ांचं महात्माजींचं स्वप्न नक्की प्रत्यक्षात आलं असतं; पण इतिहासात जर-तरला स्थान नसतं हेच खरं.
महात्मा गांधींच्या पोटाच्या विकारांवर यशस्वी उपाययोजना करून त्यांची मर्जी संपादन करणारे गणेशशास्त्री जोशी म्हणजे आयुर्वेदालाच वाहून घेतलेलं व्यक्तिमत्त्व!
संगमेश्वरजवळच्या कासे गावचा एक मुलगा शिक्षणासाठी आपल्या आत्याकडे गणपतीपुळे येथे जातो. आतोबा, वेदशास्त्रसंपन्न वासुदेवशास्त्री शेंडे यांच्याकडे संस्कृत आणि मिळेल ती विद्या पदरात पाडून घेतो. पुढे साताऱ्याला खुपरेकर शास्त्रींकडे ज्योतिष आणि व्याकरणाचं अध्ययन करतो. प्रसंगी कासे-सातारा अंतर पायपीट करत तुडवतो. पुण्यात येऊन काशिनाथपंत केळकरांच्या आधारानं शिकू लागतो. वैद्य लावगनकर शास्त्रींची मर्जी संपादन करतो आणि बडोद्याला जाऊन मोठय़ा मानानं वैद्यभूषण पदवी मिळवतो, हे सारं आपल्याला आज विस्मयचकित करतं.
१९१४ मध्ये गणेशशास्त्रींनी पुण्यात आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केली. ती केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर उपचार-संशोधन प्रसार आणि उत्पादन या चारही क्षेत्रांमध्ये त्यांनी धडाडीनं काम केलं. (सध्याचे) टिळक आयुर्वेद महाविद्यालयात अध्यापन, ताराचंद रुग्णालयात मानद सल्लागार, आठवडय़ातून दोन दिवस मुंबईला दवाखाना सांभाळून त्यांनी रुग्णांना शुद्ध आणि अचूक औषधं मिळावीत म्हणून स्वत:चं आयुर्वेदीय औषध भांडार सुरू केलं आणि ज्या आत्याकडे राहून आपण शिकलो तिचं ऋण म्हणून या कारखान्याची जबाबदारी स्वत: शिकवून ‘आयुर्वेदविशारद’ केलेल्या दत्तात्रयशास्त्री शेंडे या आतेभावावर सोपवली. मुंबईची जबाबदारी पुढे आपला पुतण्या वैद्य ना.ह. जोशी यांच्यावर सोपवली. त्यांनी आयुर्वेद संशोधन आणि पाठय़क्रम आखण्याबाबत शासनाकडे मोठा पाठपुरावा केला.
तो काळ स्वातंत्र्यापूर्वीचा! त्यामुळे कोणतीही समाजसेवी व्यक्ती स्वातंत्र्य चळवळीपासून दूर राहाणं शक्यच नव्हतं. १९२४ ते १९३४ गणेशशास्त्रींचं घर संध्याकाळी गजबजून जाई अनेक कार्यकर्त्यांमुळे. ते दहा र्वष पुणे काँग्रेसचे चिटणीस होते. अनेक कामं अंगावर पडली. दोन वेळा तुरुंगवास घडला. त्यात एकदा तर अठरा महिने सक्तमजुरी. तरीही उरलेल्या वेळात खपून, स्मरणशक्तीच्या जोरावर त्यांनी ‘सिद्धौषधिप्रकाश’ हा अनमोल ग्रंथ लिहिला, ज्याला आजही अभ्यासकांकडून मागणी असते. आयुर्वेदातला ‘त्रिदोष सिद्धांत’ आणि जलोदरावरचं संशोधन, उपचार स्वतंत्र अभ्यासक्रमाला मिळवलेली शासकीय मान्यता, हे गणेशशास्त्रींचं विशेष श्रेय होय, कारण त्यासाठी जवळजवळ अर्धशतक आयुर्वेदातली मंडळी आग्रह धरत होती. गुरुकुल पद्धतीनं प्रत्येक आयुर्वेद अध्यापकाला पाच विद्यार्थी घेण्याची परवानगी मिळाल्यावर गणेशशास्त्रींनी आपले धाकटे सुपुत्र चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी उमा हिलाही शिक्षण द्यायला प्रारंभ केला आणि चौकसबुद्धीच्या उमाताईंनी आपल्या सासऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाचं चीज केलं. त्यांनी अनेक र्वष पुढे जीव ओतून वैद्यक व्यवसाय केला. स्त्रियांच्या पोटात शिरून त्यांचं दु:ख हलकं केलं.
चंद्रशेखर एम.एस्सी झाले, पण वडिलांच्या इच्छेवरून वडिलांकडे परत आले. त्यांनी देशापरदेशात आयुर्वेदाचा प्रसार करण्याचं मोठं कामं केलं. भर्जितधान्यावरचं त्यांचं संशोधन गाजलं. चंद्रशेखर आणि उमा या पतीपत्नी दोघांनी चिकित्सक संशोधनासाठी ‘महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुरस्कार’ पटकावला.
ज्येष्ठ पुत्र माधवही आयुर्वेदाचार्य. प्रारंभी मुंबईत पोद्दार आयुर्वेद कॉलेजमध्ये अध्यापन करून पुण्यात परतले आणि उत्पादनांच्या कारखान्यात त्यांनी लक्ष घातलं. वडिलांप्रमाणे माधवशास्त्रींनी आयुर्वेद संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. सार्वजनिक सभा, सरस्वती मंदिर शिक्षणसंस्था, प्रार्थना समाज, तुळशीबाग संस्थान अशा अनेक संस्थांमधलं गणेशशास्त्रींचं काम माधवशास्त्रींनी पुढे नेलं.
माधवशास्त्रींची ज्येष्ठ कन्याही आयुर्वेद क्षेत्रातच रमली. प्रा. विजया गद्रे म्हणून त्यांनी अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात अनेक विद्यार्थी घडवले. गणेशशास्त्रींची पुतणी वैद्य नलिनी गोडबोले यांनी सायनच्या आयुर्वेद महाविद्यालयात अध्यापन केलं.
माधवशास्त्रींच्या मोठय़ा मुलानं- यशवंतानं कारखान्यात लक्ष घातलं, तर धाकटय़ा मुलानं- वैद्य गोपाळराव जोशींनी वैद्यक व्यवसायाचा विस्तार केलाच, पण पुण्याजवळ वडगाव इथं मोठा कारखाना उभारून उत्पादनाच्या कक्षा विस्तारल्या. आता चौथी पिढी नव्या युगातल्या अनेक नव्या संकल्पना घेऊन व्यवसाय सांभाळत आहेत.
चौथ्या पिढीतला केदार गोपाळराव हा आयुर्वेदाची पदवी घेऊन शिवाय फार्मसीत एम.बी.ए. करून परतला, तर आयुर्वेदातच करिअर करायचं असं लहानपणापासून ठरवलेली तेजस्विनी पदवी संपादन करून केदारची पत्नी म्हणून वैद्यकीत स्थिरावली. वैद्य अक्षय गोपाळही आपल्या आवडीनंच घरातल्या वैद्यकीची परंपरा जोपासत आहेत.
वैद्य उमा आणि वैद्य चंद्रशेखरांचे दोन्ही मुलगे वैद्य अजित, एम.डी. आणि पीएच.डी., तर डॉ. अच्युत हे नेफ्रालॉजिस्ट आहेत, पण आयुर्वेदाची सांगड घालून डोळसपणे अ‍ॅलोपथीची पॅ्रक्टिस करत आहेत. आपल्या आजोबांचा म्हणजे गणेशशास्त्रींचा जलोदरावरच्या संशोधनाचा धागा वैद्य डॉ. अजित यांनी नवीन तंत्रानं पुढे नेऊन त्यात पीएच.डी. मिळवली आहे.
नावंच घ्यायची झाली, तर गणेशशास्त्रींच्या दुसऱ्या पिढीतील सर्व वैद्य- द.वा. शेंडे, माधव जोशी, ना.ह. जोशी, चंद्रशेखर आणि उमा जोशी, प्र.ह. भाटे, श्री.द. जळुकर, अप्पा भागवत आणि नलिनी गोडबोले, तर तिसऱ्या पिढीतले वैद्य मंगळवेढय़ाचे हरिहर पटवर्धन, विजया गद्रे, मधुकर जोशी, सुभाष जोशी, प्रमोद भिडे, गोपाळ जोशी, विनय जोशी, सुधाकर जोशी, अजित जोशी आणि मंजिरी जोशी. चौथ्या पिढीत अभिचित, केदार, अक्षय आणि सौ. धनश्री सोहोनी, असे एकूण २३ वैद्य आहेत.
मुंबईतल्या प्रॅक्टिसमुळे जोशी कुटुंबात गणेशशास्त्रींसह पुढच्या दोन पिढय़ांना गुजराती उत्तम येतं. म्हणजे घरात पाणी भरणारं संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदीशिवाय गुजराती एवढय़ा भाषा, घरचे फक्त वैद्यकीवर लक्ष देऊन सचोटीनं व्यवसाय करण्याचे संस्कार आणि पुस्तकी शिक्षणासोबत परंपरागत अनुभवांचं संचित त्यामुळे जोशी कुटुंबाचं नाव नेहमी आदरानं घेतलं जातं. वैद्य लावगणकर यांची परंपरा पुढे नेणारी ही तीन घराणी..
जोशी, नानल आणि साने आणि शिष्यवर्ग तर किती तरी, साऱ्यांनी आयुर्वेदाची ध्वजा उंचावत ठेवली आहे. काळानुरूप आयुर्वेदानंही अनेक बदल झेलले आहेत. आजची प्रॅक्टिस कशी आहे? डॉ. अजित जोशी म्हणतात, ‘आज लोक खूप जागरूक आहेत. अ‍ॅलोपथी केव्हा, आयुर्वेद केव्हा याची त्यांना जाण आहे. अपेक्षा नेमक्या आहेत आणि प्रश्नही चिकित्सक आहेत. त्यामुळे आम्हालाही सतर्क राहावं लागतं, शंकासमाधान करावं लागतं, तेव्हाच परिणाम दिसतो; पण अजूनही वैद्य हा कुटुंबस्नेही असतो ही जमेची बाजू आहे.’
‘स्त्रिया आपल्या लहान मुलांना सौम्य औषधं हवीत म्हणून डोळसपणे वैद्यांकडे येतात.’ तेजस्विनीचा हा अनुभव चौथ्या पिढीची सजगता दाखवतो. ‘एकाच वेळी उमाआजींचं मार्गदर्शन, घरातल्या ज्येष्ठांशी चर्चा करून अनेक अवघड केसेस माझ्यासाठी सोप्या होतात,’ असं तेजस्विनी सांगते तेव्हा आयुर्वेदातल्या घराणेशाहीचं ऋण ती मनोमन मान्य करतेय हे जाणवतं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा