या सदरलेखनानं मला कार्यकर्त्यां स्त्रियांकडे आणि एकूणच चळवळीच्या इतिहासाकडे बघण्याची एक दृष्टी दिली. यातल्या कार्यकर्तीशी बोलताना जाणवलं की, कसलंही श्रेय मिळण्याची, कुठल्याही पुरस्काराची किंवा भौतिक असं काहीच मिळण्याची अपेक्षा न करता या कार्यकर्त्यां पंचवीस-पंचवीस, तीस-तीस र्वष चळवळीत लढतायत. एकेका प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सरकार, न्यायसंस्था, भ्रष्ट व्यवस्था आणि समाजमनाचा अपरिवर्तनीय पीळ यांच्याशी झुंज घेत पाषाणातून झरे खोदतायत. खरोखर, कशानं घडल्या आहेत या साऱ्या जणी? त्यातूनच स्वातंत्र्यानंतरच्या चळवळी, लढे, आंदोलनं यावर, त्यातल्या स्त्रियांच्या योगदानाविषयी लिहिता आलं.

गेले वर्षभर मी लिहीत असलेलं ‘लढा,चळवळी, आंदोलनं’ हे सदर लिहून पूर्ण झालं, यावर माझा या क्षणी विश्वास बसत नाहीये. पण ते पूर्ण झालंय आणि अनेक जाणकारांच्या अभिप्रायावरून ते चांगल्या रीतीनं पूर्ण झालंय, असं दिसतंय खरं. अर्थात, हे सगळं मीच एकटीनं लिहिलं असा माझा बिलकूल दावा नाही. कित्येक मदतीचे हात वर्षभर पुढे येत होते नि माझ्या  लेखणीला बळ पुरवत होते.

सदर लिहायचं सांगण्यात आलं तेव्हा क्षणभर मनात चलबिचल झाली. या अगोदर एकदा सदर लेखन केलं होतं, पण ‘लोकसत्ता’च्या जाणकार वाचकांसमोर जायचं-वर्षभर सातत्यानं लिहायचं! झेपेल मला हे? पण शाळेत वाचलेला वि. स. खांडेकरांचा ‘थोडे अविचारी व्हा’ हा लघुनिबंध आठवला (अशा क्षणी तो मला हमखास आठवतो) आणि मी ‘हो’ म्हटलं. असा थोडा अविचारीपणा, अभ्यास करण्याची मनापासून आवड आणि मुख्य म्हणजे महाविद्यालयीन काळापासून डाव्या पुरोगामी चळवळींविषयी असलेली विलक्षण ओढ, सतत त्याविषयी वाचणं, फिरणं आणि नोकरी करता करता बाजूबाजूनं त्यात हातपाय मारणं- एवढय़ा शिदोरीवर मी लिहिण्यास सिद्ध झाले.

स्वातंत्र्यानंतरच्या चळवळी, लढे, आंदोलनं यावर लिहायचं होतं. त्यातही त्यातल्या स्त्रियांच्या योगदानाविषयी. कोणकोणत्या आंदोलनांवर लिहिता येईल? आधी एक यादी तयार केली. सुरुवात संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ापासून करण्याचं ठरवलं. जवळ काही पुस्तकं होती. डॉ. सुलभा ब्रrो यांच्या सर्व पुस्तिका होत्या. ‘वाटसरू’, ‘अनुभव’, ‘मिळून साऱ्याजणी’चे अंक होते. ‘लोकसत्ता’च्याच गेल्या अनेक वर्षांच्या जमवलेल्या ‘चतुरंग’, ‘लोकरंग’ पुरवण्या होत्या. काही स्मरणिका होत्या. मिलिंद चंपानेरकरांनी संपादित केलेलं ‘असा घडला भारत’सारखी पुस्तकं विकत घेतली. हे सगळं चाळून बघितलं. त्यात चळवळीच्या अनुषंगानं काही ना काही पैलू, काही संदर्भ निश्चित सापडत होते, पण स्त्रियांच्या योगदानाविषयी शोधावंच लागणार होतं.

हे काम बिलकूल सोपं नाही, शिवधनुष्य पेलण्याइतकंच ते अवघड आहे याची जाणीव होतीच; परंतु पहिलाच धीराचा शब्द पुरवला तो भाई वैद्यांनी. ‘माझं घर तुला नेहमीच उघडं आहे, कधीही ये’ या शब्दांनीच हुरूप वाढवला आणि खरंच, सुरुवातीच्या ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा’, ‘गोवा मुक्तिसंग्राम’, ‘आणीबाणी’, ‘नवनिर्माण’ आणि ‘समग्र क्रांती’ आंदोलन यावर लिहिताना माझे पाय आपोआप भाईंच्या घराकडे वळले. त्यांच्या तरुण वयापासून आजही ते विविध आंदोलनांमध्ये हिरिरीनं उतरतायत. प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ते सगळं ऐकणं हाच मोठा अद्भुत अनुभव होता.

मग हीच रीत तयार झाली. दलित, आदिवासी, भटके विमुक्त, मुस्लीम, संघटित-असंघटित कामगार, छोटे शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर, एकेका चळवळीचा अभ्यास करायचा, प्रश्न काढायचे आणि त्या त्या चळवळीत प्रत्यक्ष २५-३० र्वष कार्यरत असलेल्या स्त्रीपुरुष कार्यकर्त्यांना जाऊन भेटायचं. पुण्याबाहेरच्या मंडळींना फोनवर गाठायचं. वेळ घेऊन एकेक तास फोनवरच मुलाखत. जणू समोरच बसलेय असा सुंदर अनुभव देणाऱ्या एकेक मुलाखती. डॉ. अ. पां. देशपांडे यांनी फोनवरच्या उण्यापुऱ्या पंधरा मिनिटांत मराठी विज्ञान परिषदेचा नेटका पट मांडून दिला. आमदार नीलम गोऱ्हे यांनी तर एअरपोर्टवर सिक्युरिटी चेक करून मस्त मुलाखत दिली. ‘लोकविज्ञान’च्या गुत्तीकरांनी भराभर संदर्भ काढून दिले. भालचंद्र केरकरांच्या घरातील शिऱ्याची चव अजून जिभेवर तरळतेय. असे कितीतरी विलोभनीय अनुभव. आज डॉ. सुलभा ब्र यांची प्रकर्षांनं आठवण येतेय. प्रत्येक लेखाबद्दल त्या उत्सुकतेनं चौकशी करत, माहिती सांगत.

शांताबाई रानडे म्हणजे डाव्या चळवळींचा पन्नास वर्षांचा चालताबोलता कोशच. महागाईविरोधी आंदोलनापासून कितीतरी चळवळींविषयी शांताबाईंच्या शांत, संयत सुरात ऐकायला मिळालं. खरंतर या बुजुर्गाकडून या सगळ्या लढय़ांचं दस्तऐवजीकरण करण्याची गरज आहे. प्रा. शमशुद्दीन तांबोळींना कधीही फोन केला तरी ते आनंदानं मदत करत. मनीषा गुप्ते, किरण मोघे, ऊर्मिला सप्तर्षी, मेधा थत्ते, मेधा सामंत, पल्लवी रेणके, असुंता पारधे, आमदार मेधा कुलकर्णी, अंजली देशपांडे, गीता गुंडे, जयश्री कुलकर्णी, मिलिंद चव्हाण, विजय दर्प, सुभाष थोरात.. किती नावं घ्यावी. मृणालिनी कानिटकर आणि अनुराधा काळे या मैत्रिणींनी आत्मीयतेनं मदत केली. राजीव पाटसकर आणि श्रीपाद पेंडसे या सुहृदांनी आणि वाचकांपैकी स्मिता पटवर्धन, उपेंद्र कुलकर्णी यांनी मोलाच्या सूचना केल्या. गोवा मुक्तिसंग्रामात लढाऊपणे उतरलेल्या कमला उपासनी यांचे बंधू श्री शुक्ल आणि दुसरी भगिनी कुलकर्णी या वयातही नागपूरहून भेटायला आले. कमलाताईंच्या अनेक स्मृती त्यांनी सांगितल्या. तो हृदयस्पर्शी प्रसंग होता.

पण, विशेष उल्लेख करायला हवा तो अल्पावधीत मैत्रीण झालेल्या सुहास कोल्हेकरचा. सुहासताई चळवळीतली जुनी कार्यकर्ती. उत्तरार्धातल्या अनेक लेखांमध्ये तिची मदत अशासाठी महत्त्वाची होती की, तिनं चळवळींकडे पाहण्याचा अचूक दृष्टिकोन आणि दिशा दिली. विशेष म्हणजे, तिनं रोमांचकारक म्हणता येईल अशी मेधा पाटकर यांची भेट घडवून आणली. मध्यप्रदेशात जुलवानिया इथे नर्मदेच्या काठावर आंदोलन करणाऱ्या या ‘नर्मदामय्या’शी बोलणं, भेटणं हा केवळ अपूर्व अनुभव होता. खरं सांगायचं तर, या लेखनानं मला या कार्यकर्त्यां स्त्रियांकडे आणि एकूणच चळवळीच्या इतिहासाकडे बघण्याची एक दृष्टी दिली. यातल्या एकेक कार्यकर्तीशी बोलताना जाणवलं की, कसलंही श्रेय मिळण्याची, कुठल्याही पुरस्काराची किंवा भौतिक असं काहीच मिळण्याची अपेक्षा न करता या कार्यकर्त्यां पंचवीस-पंचवीस, तीस-तीस र्वष चळवळीत लढतायत. एकेका प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सरकार, न्यायसंस्था, भ्रष्ट व्यवस्था आणि समाजमनाचा अपरिवर्तनीय पीळ यांच्याशी झुंज घेत पाषाणातून झरे खोदतायत. खरोखर, कशानं घडल्या आहेत या साऱ्याजणी? कुठून आलं यांच्यात एवढं भूमिकेचं कणखरपण, जिद्द, घेतला वसा न टाकण्याचा निर्धार, दुर्दम्य आशावाद आणि टिकून राहण्यातली तग?

या चळवळीतल्या स्त्रियांची काही वेगळीच घडण असते. चळवळींत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक अनोखी धार चढते. त्यांचे विचार, त्यांची राहणी, त्यांचं वागणंबोलणं यात कमालीची स्पष्टता असते. आपल्या प्रत्येक शब्दाच्या, कृतीच्या परिणामांचं त्यांना नीट भान असतं. असं सतत सावध, सतत जागरूक, सतत लढाऊ राहणं सोपं असेल? भोवतीच्या  चैनबाजी, विचारहीन मौजमजा यांच्या झगमगाटातून स्वत:ला शाबूत ठेवणं यांना कसं साधत असेल?

या कार्यकर्त्यां स्त्रियांच्या माध्यमातून जणू महाराष्ट्रातल्या चळवळींचा गेल्या चारपाच दशकांचा इतिहास अगदी जवळून निरखता आला. १९५० ते २०१५ या इतिहासाकडे एक दृष्टिक्षेप टाकला तरी तो एकाच वेळी किती संघर्षांचा, उलथापालथींचा, आव्हानांचा आणि तरीही किती रोमांचक, प्रेरक, गतिशील आणि प्रगतिशील आहे हे लक्षात येतं. खरंतर, भारतीय समाज हा विविध जाती, धर्म, पंथ, वर्ग, प्रदेश, भाषा अशा विविध घटकांमध्ये विभागलाय. भारतात सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विषमतेची मुळं फार खोलवर गेलेली आहेत. लग्न, नातेसंबंध, धार्मिक, सांस्कृतिक बाबतीतली ताठरता आजही शाबूत आहे; नव्हे वाढलीच आहे. प्रतिगामी शक्ती आक्रमकपणे कार्यरत आहेत. परंतु, या रूढीबाज सनातनत्वाला समांतर असा भारताचा सामाजिक चळवळींचाही इतिहास आहे. या चळवळींनी माणसामाणसांमधल्या विविध प्रकारच्या विषमतेच्या भिंती फोडण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे. या चळवळींनी इथल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्थांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. इथल्या स्थितिशील व्यवस्थेला नव्या बदलांना सामोरं जायला भाग पाडलं आणि नव्या समाजरचनेचा पाया घातला. समाजातल्या उपेक्षित, वंचित, शोषित, कष्टकरी घटकांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या तळमळीतून या चळवळी उभ्या राहिल्या. शेवटी माणसाला काय हवं असतं? सुखी शांततामय जगणं. ते सन्मानानं जगता यावं हाच या चळवळींचा उद्देश होता.

या सगळ्या प्रवासात स्त्रियांचं योगदान लक्षणीय राहिलं. अगदी १९ व्या शतकापासून शिक्षणाची पहिली संधी मिळाल्यापासून, बाहेरच्या जगाशी संबंध आल्यापासून स्त्रियांनी देश उभारणीच्या, संघर्षांच्या, परिवर्तनाच्या लढाईत जो सहभाग दिला आहे, त्याला तोड नाही. त्यांची बांधिलकी, उत्स्फूर्तता आणि मनस्वीपणा वादातीत आहे. मुख्य म्हणजे स्त्रियांनी फक्त स्त्रीप्रश्नांशी निगडित चळवळींशी जोडून घेतलं असं नाही, तर विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक लढय़ांतही त्या अग्रेसर राहिल्या. इतिहासात स्त्रियांच्या या योगदानाचं योग्य मूल्यमापन होण्याची गरज

आहे. खरंतर, याच हेतूनं हे सदरलेखन सुरू झालं होतं. सगळंच ओंजळीत घेता आलं असं नाही; बोटातल्या फटींतून काही निसटूनही गेलं. पण या समुद्रातले चार थेंब तरी वेचता आले, हेच या क्षणाचं समाधान आहे. ते करण्याची संधी मिळाली-हे श्रेय ‘लोकसत्ता-चतुरंग’चं!

सदर समाप्त

 

अंजली कुलकर्णी

anjalikulkarni1810@gmail.com