आपलं दु:ख मनात कोंडून ठेवणाऱ्या स्त्रिया लेखनातून स्वत:ला मोकळं करू लागल्या. आपल्या व्यथा वेदना, अन्याय, अत्याचार, आपल्या लैंगिक प्रेरणा लेखनचावडीवर खुलेपणानं मांडू लागल्या. आजही जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत बदलत चाललेल्या समाजाचं आकलन स्त्रीसाहित्यातून काही अंशी येऊ  लागलंय. या साहित्य चळवळींनी सामाजिक चळवळींना जोम पुरवला. त्या समाजात सर्वदूर पोहोचवल्या.

महाराष्ट्रात एकूणच सामाजिक सुधारणांच्या दृष्टीनं एकोणिसावं आणि विसावं शतक फार महत्त्वाचं ठरलं. या काळात स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता या मूल्यांना अनुसरत विविध सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्नांच्या संदर्भात जाणीव, जागृती झाली आणि समाजातील विविध घटक परिवर्तनाच्या लढाईसाठी सिद्ध झाले. या सगळ्या गतिमान सामाजिक घडामोडींचं प्रतिबिंब तत्कालीन साहित्यकृतींमध्ये पडणं अपरिहार्य होतं. ‘साहित्य हा समाजाचा आरसा’ असं म्हटलं जातं, त्याला अनुसरूनच हे होतं.

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!

साधारणत: १९६० नंतरच्या काळात मराठी साहित्यात वेगानं चलनवलन सुरू झालं. परंतु, त्याआधीही स्त्रिया आणि पुरुष समाजकारण आणि साहित्यकारण यात गुंतलेले होतेच. त्यांच्या लेखनप्रेरणांचा शोध घेताना आपल्याला इतिहासात शंभर वर्षे मागे जावं लागतं आणि तेव्हा लक्षात येतं की, साहित्य चळवळी या त्या-त्या काळातील घटना/घडामोडींची परिणती आहेत. किंबहुना, सामाजिक चळवळी आणि वाङ्मयीन चळवळी या हातात हात घालूनच आलेल्या आहेत आणि परस्परपूरक आहेत. या संदर्भात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘वाङ्मयीन चळवळी आणि दृष्टिकोन’ या पुस्तकात मुद्दा मांडला आहे की, कित्येक वेळा समाजात काही घडलं आणि मग त्यावर लिहिलं गेलं; परंतु, कित्येक वेळा असंही घडलं की, एखाद्या प्रश्नावर आधी लिहिलं गेलं, चर्चा झाली आणि मग कृतीच्या पातळीवर तो विचार उतरला. उदाहरणार्थ, स्त्रियांसंदर्भात उदारमतवादी भूमिका बाळशास्त्री जांभेकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, म.गो. रानडे, आगरकर, लोकहितवादी, बाबासाहेब आंबेडकर इत्यादींनी मांडली आणि त्यानुसार स्त्री शिक्षण, सतीप्रथा विरोध, विधवाविवाह, संमतीवयाचा कायदा इत्यादी अनेक कृती घडल्या. दुसरं उदाहरण म्हणजे इंग्रजांनी अवलंबलेल्या शेतसारा पद्धतीमुळे शेतीत अनेक प्रश्न निर्माण झाले, त्यातून इंग्रजांविरुद्ध अनेक बंडंही झाली, त्यात दुष्काळाची भर पडली. याचं यथार्थ वर्णन ह.ना. आपटे यांच्या ‘काळ तर मोठा कठीण आला’ या कथेत आलं आहे.

याशिवाय तिसरा प्रकार म्हणजे कृती आणि लेखन या दोन्ही पातळ्यांवर एकाच वेळी कार्यरत असणं. महात्मा गांधी, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर,

डॉ. आंबेडकर अशा अनेक धुरिणांची नावं या संदर्भात घेता येतील ज्यांनी प्रबोधनासाठी लेखणीचा समर्थ वापर केला. स्वत: ज्योतिराव फुले यांच्या कृतीची जोड असलेल्या लेखनाने (किंवा लेखनाची जोड असलेल्या कृतीने) शेतकऱ्यांमध्ये मोठी जागृती झाली आणि त्यांच्यातील असंतोषाला वाचा फुटली. ज्योतिरावांनी दलित, ग्रामीण, स्त्रिया आणि सर्व शोषितांच्या दु:खांना आवाज देणारं आणि शोषण व्यवस्थेचा शोध घेणारं लेखन केलं. ‘तृतीय रत्न’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’, ‘शिवाजीराजांचा पोवाडा’ या साहित्यकृतींतून त्यांनी वंचितांना, शोषितांना अस्मितेचं बळ पुरवलं. त्यांनी मुलींसाठी शाळा काढून स्त्रीशिक्षणाच्या प्रश्नाकडे समाजाचं लक्ष वेधलं. सावित्रीबाई फुले यांनी तर आपल्या लेखनात स्पष्टपणे स्त्री शूद्रांना शिक्षण हाच मार्ग असल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं होतं –

स्त्री शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा

शिक्षणाने मनुष्याचे पशुत्व हाटते पाहा

त्याचप्रमाणे पहिली अस्पृश्यांची परिषद भरवणारे शिवराम जानबा कांबळे यांनी १९१० मध्ये ‘सोमवंशीय मित्र’ हे वर्तमानपत्र सुरू केलं. शाहू महाराजांनी १९०६ मध्ये अस्पृश्यांना व्यावसायशिक्षण द्यायला सुरुवात केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी भंगी समाजातील मुलांसाठी शाळा काढली. सयाजीराव गायकवाड यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या. गांधीजींनी अस्पृश्यतेचा प्रश्न महत्त्वाचा मानला. गांधीजींच्या चळवळीत स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. महात्मा कर्वे यांनीही विधवांसाठी शिक्षणसंस्था सुरू केल्या. समाजात मोठय़ा प्रमाणावर विधवा विवाह, जरठ-बाल विवाह, केशवपन, सतीप्रथा इत्यादी प्रश्नांवर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. विशेष म्हणजे, या काळात उच्चविद्याविभूषित स्त्रियांचं प्रमाण लक्षणीय पद्धतीनं वाढलं आणि सुधारक लोकनेत्यांच्या मदतीनं नवशिक्षित आणि जागृत स्त्रियांची फळीच निर्माण झाली असा उल्लेख डॉ. अरूणा ढेरे यांनी ‘विस्मृतीचित्रे’ या ग्रंथात केला आहे. बंगाल, मद्रास (चेन्नई), महाराष्ट्र या तिन्ही ठिकाणी स्त्रीशिक्षण आणि स्वातंत्र्य यासाठी आयुष्य वेचणाऱ्या अनेक स्त्रिया कार्यरत झाल्या.

या सगळ्या घडामोडींचे संस्कार ह. ना. आपटे,

वा. म. जोशी, श्री.व्यं. केतकर यांसारख्या लेखकांवर झाल्याशिवाय राहिले नाहीत. तत्कालीन सुधारकांची चरित्रं, आत्मवृत्तं, निबंध, पत्रं, स्त्रियांचे लेख, कथा-कादंबऱ्या, नियतकालिकं हे सर्व लेखन स्त्रीसुधारणेच्या विचारांनी भारलेलं होतं. ‘दर्पण’, ‘ज्ञानोदय’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘विविध ज्ञानविस्तार’ नियतकालिकांतून स्त्रियांनाही अभिव्यक्तीचं माध्यम मिळालं.

काही नियतकालिकं खास स्त्रियांसाठी आणि स्त्रियांनी चालवलेली होती. उदाहरणार्थ का. र. मित्र यांच्या पत्नी मनोरमाबाई यांनी  ‘महाराष्ट्र महिला’, तर रेबेका सिमियन यांनी ‘नित्युपदेशक’ नावाचं मासिक चालवलेलं होतं. विविध नियतकालिकांमधून सरोजिनी नायडू, लक्ष्मीबाई राजवाडे, अबला बोस लिहीत होत्या. त्याचप्रमाणे सोनाबाई केरकरीण (ही कलावंतीण होती), काशीबाई फडके, काशीबाई हेरलेकर, यशोदाबाई आगरकर, पार्वतीबाई आठवले,

पं. रमाबाईंचं चरित्र लिहिणारी मनोरमा मेधावी, गांधीचरित्र लिहिणाऱ्या अवंतिकाबाई गोखले अशा अनेक जणी त्या काळात लिहीतही होत्या आणि यापैकी बहुतेक जणी कोणत्या ना कोणत्या सामाजिक संस्थेशी जोडलेल्या होत्या. ‘विस्मृतीचित्रे’मधून आपल्याला या स्त्रियांची ओळख होते.

परंतु, खऱ्या अर्थानं चळवळ म्हणून वाङ्मयीन चळवळींना प्रारंभ झाला तो १९६० नंतरच्या काळात. अर्थात, त्यालाही सामाजिक परिस्थितीची पाश्र्वभूमी होती. या कालखंडात दलित, ग्रामीण, आदिवासी, कामगार, मुस्लीम आणि स्त्रीवादी साहित्याच्या चळवळींचे मोठे प्रवाह निर्माण झाले. या साहित्यिक चळवळी आणि त्याआधीच उदयाला आलेली मार्क्‍सवादी साहित्याची चळवळ या मानवी जीवनाशी निगडित होत्या आणि परिवर्तनाची मागणी करीत होत्या.

याचा पहिला आविष्कार ६०च्या दशकात दलित साहित्यातून झाला. बाबासाहेबांच्या समर्थ नेतृत्वानं अस्मिता जागृत झालेला, आजवर दबलेला दलित वर्ग लिहू लागला आणि मराठी साहित्यात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. आजवरच्या कोंडमाऱ्याचा तीव्र उद्रेक झाला आणि पेटत्या विस्तवातल्या निखाऱ्यागत अवघ्या मराठी साहित्यावर त्याच्या आवेगाचा प्रकाश पसरला. त्यातही, दलित म्हणून आणि स्त्री म्हणून असलेल्या दुहेरी अवहेलनेच्या दु:खाचा स्पर्श दलित स्त्रीसाहित्याला होता. समाज उतरंडीखाली दबलेली दलित स्त्री लिहू लागली तेव्हा खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या घटकाला आकाश मिळालं. त्या काळात हिरा बनसोडे, ज्योती लांजेवार, सुगंधा शेंडे, कुमुद पावडे, सुरेखा भगत लिहीत होत्या. आजही उर्मिला पवार, प्रज्ञा दया पवार, छाया कोरेगावकर, प्रतिभा अहिरे, संध्या रंगारी साहित्यातून व्यवस्थेला प्रश्न विचारत आहेत, बाईच्या समग्रतेला भिडणारं साहित्य निर्माण करत आहेत.

१९७५च्या सुमारास ग्रामीण साहित्याच्या प्रवाहानं उचल खाल्ली आणि आजवर ‘ग्रामीण साहित्य’ म्हणून जे स्वप्नरंजनपर, कृतक, काल्पनिक आणि ग्रामीण माणसाची हेटाळणी करणारं साहित्य लिहिलं जात होतं, त्याची जागा खेडय़ातील वास्तवाचं यथार्थ चित्रण करणाऱ्या, शेतीमातीतील माणसांच्या व्यथावेदनांना शब्द देणाऱ्या, ग्रामीण भागातील, शेतीतील शोषणव्यवस्थेचा शोध घेणाऱ्या साहित्यानं घेतली. खरं तर ज्योतीरावांचा ‘शेतकऱ्यांचा आसूड’ आपल्यापाशी होता. सावित्रीबाई, बहिणाबाई लिहीत होत्या. वि. रा. शिंदे यांचं शोषितांमध्ये कार्य सुरू होतं, गांधीजींनी स्वयंपूर्ण खेडय़ाचं स्वप्न पाहिलं होतं. त्याचं प्रतिबिंब तत्कालीन श्री.म. माटेंसारख्या लेखनात पडलं होतं. नंतरच्या काळात व्यंकटेश माडगूळकर, खरात, पाटील, यादव, शेळके, बोराडे, महानोर असे अनेकजण समर्थपणे लिहू लागले आणि ग्रामीण साहित्याकडे बघण्याची समाजाची दृष्टी बदलली. या काळात बहुसंख्येनं ग्रामीण स्त्रिया लिहीत नव्हत्या. परंतु १९८० पासून प्रतिमा इंगोले इत्यादीनी ही कसर भरून काढली. आज कल्पना दुधाळ, उर्मिला चाकूरकर, नीलम माणगावे अशा अनेक जणी ग्रामीण वास्तवाचे आणि त्यातल्या स्त्रीच्या वेगळ्या व्यथांचे पदर उलगडत आहेत.

त्याचप्रमाणे, आदिवासी चळवळीतून आत्मबळ मिळालेल्या कुसुम आलाम, उषा अत्रामसारख्या कवयित्री, लेखिका जल, जंगल, जमीन यांच्या आधारानं गुजराण करणाऱ्या आदिवासींचे हिरावले जाणारे नैसर्गिक हक्क, उद्ध्वस्त होत चाललेलं पर्यावरण या विरोधात साहित्यातून आवाज उठवत आहेत.

तसेच, हमीद दलवाईंच्या पुढाकारानं सुरू झालेल्या मुस्लीम सत्यशोधक मंडळ आणि मुस्लीम महिला आंदोलनातून प्रबोधनवादी विचार मिळालेल्या मराठीभाषक मुस्लीम महिला मोकळ्या होऊन लिहू लागल्या. तीन-तलाक, बुरखा, बहुपत्नीत्व या अन्यायकारक रूढींवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. त्यात मुमताज रहिमतपुरे यांनी संपूर्ण हयातीत संघर्ष केला. इतका की, त्यांच्या मृत्यूनंतर मुस्लीम कट्टरपंथीयांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्याशिवाय, नसीमा हुरजूक, आशा अपराध, मेहरुन्निसा दलवाई, तस्निम पटेल, मलिका अमरशेख, बेनझीर तांबोळी, नसीमा देशमुख, रुबिना पटेल, डॉ. जुल्फिकार बानो देसाई, प्रा. नसीमा पठाण अशा असंख्यजणी हिरिरीनं लिहीत होत्या आणि आहेत.

दलित साहित्याच्या आगेमागे ख्रिस्ती साहित्याचीही लाट आली. आधीच्या काळात लक्ष्मीबाई टिळक,

पं रमाबाई इत्यादी स्त्रियांनी अंतर्मुख करणारं लेखन केलं; तर आज सिसिलिया काव्‍‌र्हालो, अनुपमा उजगरे इत्यादी स्त्रिया लेखनातून स्त्रीवादी जाणिवा व्यक्त करीत आहेत.

स्त्रियांच्या या सगळ्या आविष्कारांमागे दलित, ग्रामीण, आदिवासी, भटक्या विमुक्त, मुस्लीम आणि कामगार चळवळींच्या प्रेरणा होत्याच, परंतु त्याच्या जोडीनं १९७५ मध्ये आलेल्या स्त्रीमुक्ती चळ्वळीचा प्रभाव स्त्रीसाहित्यावर होता. १९७५ मध्ये युनोनं आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि ७५-८५ आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून जाहीर केलं. त्यातून निर्माण झालेल्या स्त्रीमुक्ती (नंतर स्त्रीवादी) चळवळीनं सामाजिक पर्यावरण व्यापून टाकलं. महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत किमान जाणिवेच्या पातळीवर स्त्रीवादी विचार पोहोचवण्यात स्त्रीवादी चळवळ यशस्वी ठरली. परिणामी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आत्मभान जागृत झालेल्या स्त्रिया लिहित्या झाल्या. बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे

माझं सुख माझं सुख, हंडय़ा झुंबरं टांगलं

माझं दु:ख माझं दु:ख तयघरात कोंडलं

असं म्हणून आपलं दु:ख उरात कोंडून ठेवणाऱ्या स्त्रिया लेखनातून स्वत:ला मोकळं करू लागल्या. आपल्या व्यथा वेदना, अन्याय, अत्याचार, आपल्या लैंगिक प्रेरणा लेखनचावडीवर खुलेपणानं मांडू लागल्या. आजही जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत बदलत चाललेल्या समाजाचं आकलन स्त्रीसाहित्यातून काही अंशी येऊ  लागलंय.

या साहित्य चळवळींनी सामाजिक चळवळींना जोम पुरवला. त्या समाजात सर्वदूर पोहोचवल्या. सामाजिक चळवळींचा विचार, मूल्यं, तत्त्वं साहित्यातून समाजापर्यंत पोहोचली. त्यावर चर्चा, मंथन घडलं. एक प्रकारे सामाजिक चळवळींना आधार देणारं, समर्थन करणारं ते एक प्रभावी व्यासपीठच ठरलं. एवढं श्रेय साहित्य चळवळींना नक्कीच देता येईल.

अंजली कुलकर्णी anjalikulkarni1810@gmail.com