‘युक्रांद’च्या कार्यकर्त्यां म्हणून काम केलेल्या डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह सर्वच स्त्रियांनी संघटनेमुळे बळ मिळाले हीच भावना व्यक्त केली. एकटी स्त्री काही करू शकत नाही; परंतु संघटितपणे स्वत:चे आणि समाजाचेही सामथ्र्य वर्धित करता येते हा वस्तुपाठ या स्त्रियांनी निश्चितच घालून दिला आहे.

संपूर्ण जगभरात १९६०चं दशक हे अस्वस्थतेनं भरलेलं दशक होतं. भारतातही त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली होती. भ्रष्टाचार, बेरोजगारी, दारिद्रय़ यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या १५-२० वर्षांत देशात भ्रमनिरासाचं वातावरण निर्माण झालं. तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. तरुणांमधील अस्वस्थतेचे विविध आविष्कार महाराष्ट्रात उमटू लागले. दलित, समाजवादी, कम्युनिस्ट अशा विविध विचारसरणीचे युवक संघर्षांसाठी सिद्ध होऊ लागले. विशेष म्हणजे, त्यात स्त्रियांचा सहभाग मोठा होता.

युवक क्रांती दल (‘युक्रांद’) ही या काळातील प्रभावी चळवळ होती. तिने तो संपूर्ण काळ आणि महाराष्ट्र व्यापून टाकला. धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, मानवी हक्क, स्वातंत्र्य, समता आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेसाठी ‘युक्रांद’ने दिलेल्या लढय़ामुळे महाराष्ट्रात पुरोगामी विचारसरणीचा प्रभाव निर्माण झाला. विशेष म्हणजे त्याकाळी स्त्री-मुक्ती चळवळ सुरू झालेली नव्हती, तरीही ‘युक्रांद’च्या मूलभूत भूमिकेमध्ये स्त्री-पुरुष समतेचा स्पष्ट उल्लेख होता कदाचित म्हणूनच ‘युक्रांद’च्या आंदोलनांमध्ये अनेक स्त्रिया कायम असत.
पुण्याला चौसष्ट सालापासून कुमार सप्तर्षी, अरुण लिमये, अनिल अवचट, रत्नाकर महाजन, ऊर्मिला सराफ (नंतर सप्तर्षी) या सर्वानी मिळून ‘युथ ऑर्गनायझेशन’ सुरू केली होती. त्या दोनशे जणांमध्ये साठ-सत्तर मुली होत्या. नंतर बिहारला जाऊन आल्यावर नोव्हेंबर १९६७ मध्ये सिंहगडावर ‘युक्रांद’ची स्थापना झाली. तेव्हा ‘युक्रांद’चे तब्बल सहाशे जण कार्यकर्ते झाले होते. त्यात ऊर्मिला सप्तर्षी, अंजली सोमण, अंजली सुलाखे, पुरंदरे अशा अनेक जणी होत्या.

या सर्व तरुणांचा चातुर्वण्र्य व्यवस्थेला, जातीसंस्थेला ठाम विरोध होता. नवा भारत निर्माण करायचा असेल तर ही सगळी बुरसटलेली व्यवस्था, बुरसटलेली सामाजिक धारणा मुळापासून बदलायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. भाषणं, शिबिरं, लेखन, संघर्ष याद्वारे समाजात विवेक जागृतीचं काम ‘युक्रांद’ची मुलं करत होती. सवर्ण तरुणांनी दलितांच्या मुक्तीलढय़ात अग्रभागी राहणं, हा सामाजिक पुरुषार्थ आहे, ती इतिहासानं त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी आहे असं ते सांगत.

‘युक्रांद’ची मुख्य ओळख म्हणजे ती युवकांची एक विद्रोही चळवळ होती. त्यांनी ‘हर जोर जुर्मकी टक्कर में संघर्ष हमारा नारा है’ ही घोषणा सार्थ ठरवली. परंतु त्यांनी कधी राडेबाजी केली नाही. १९६९चं पुण्यातल्या महाविद्यालयांनी केलेल्या अन्याय्य फी वाढीविरोधातील आंदोलन असो वा राहुरी विद्यपीठातील कुलगुरू हटाव मोहीम असो; सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कॅपिटेशन फीविरुद्धचे आंदोलन असो वा, मालेगाव किंवा लातूरमध्ये अचानक करावे लागलेले आंदोलन असो; पुणे जिल्ह्य़ात बावडा या गावातील दलितांवरचा सामाजिक बहिष्काराचा प्रश्न असो वा औरंगाबादमधील दलितांच्या शिष्यवृत्तीतील वाढीच्या मागणीसाठीचे आंदोलन असो या सर्व आंदोलनांमध्ये स्त्रियांचा अत्यंत जिंदादिल आणि डोळस सहभाग असे. त्या कधीच नाममात्र नव्हत्या. अनेक शिबिरांमध्ये त्या विविध प्रश्नांवर हिरिरीने वाद घालत; अभ्यासातून आपली राजकीय सामाजिक जाण वाढवत.

राहुरी आंदोलनात गेल ओम्व्हेट ही अमेरिकन युवती (नंतर इथली कार्यकर्तीच झाली) व्हिएतनाम युद्धाविरुद्ध अमेरिकेत सुरू असलेल्या विद्यार्थी चळवळीविषयी बोलत असे. ऐकताना विद्यार्थी थरारून जात. आपणही त्याच वैश्विक चळवळीचा एक भाग आहोत अशी त्यांची भावना होई. सोलापूरच्या लढय़ात एका महिलेनं उत्स्फूर्तपणे सांगितलं, ‘‘आम्ही सर्व महिला या आंदोलनातील लढाऊ पोरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू. आम्ही कुणाही पोराला उपाशी ठेवणार नाही.’’ सुजाता कुलकर्णी त्यानंतर खांडेकर ही नववीतली मुलगी खणखणीत आवाजात भाषणे करी. तर मालेगावात गुलाब झोडगे, उषा मंजिरे या स्थानिक कार्यकर्त्यांमुळे ‘युक्रांद’ला तेथील नेमका प्रश्न समजून घेता आला. तसेच धुळ्यामधील प्रश्न सोडविण्यासाठी अजित सरदारांबरोबर शैला गिरमे ह्य़ांचा पुढाकार होता.

‘युक्रांद’नं विशेष राबविलेला कार्यक्रम म्हणजे, राशीनचा ‘कम्युन’ प्रयोग. राशीन कम्युनमध्ये पुरुषांच्या बरोबरीने शैला सातपुते, संध्या नाईक, रेखा ठाकूर, झेलम व नीलम गोऱ्हे, भाग्यवती बजाज या महिला कार्यकर्त्यां उत्साहाने सामील झाल्या. कम्युनमध्ये सर्वानी एकत्र राहून आसपासच्या भागातले सामाजिक प्रश्न सोडविण्यास सुरुवात केली. हा प्रयोग महाराष्ट्रात खूप गाजला. परंतु त्याच दरम्यान, इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. आणीबाणीविरोधातही ‘युक्रांद’ने मोठी कामगिरी केली. पहिल्याच दिवशी सत्याग्रह करून अन्वर राजन, प्रवीण सप्तर्षी यांच्याबरोबर अश्विनी मरकडेय तुरुंगात गेली. कुमार सप्तर्षी भूमिगत राहून काम करत होते. त्यावेळचा एक किस्सा फार मजेशीर आहे. कुमार सप्तर्षीना तेव्हा मुंबईहून गुजरातेत जायचं होतं. त्यासाठी पत्नीसह लग्नाला चाललोय असं पोलिसांना भासवायचं होतं. त्यासाठी एका नवविवाहित वाटावी अशा तरुण स्त्रीची गरज होती. विशेष म्हणजे, ठाण्यातील धाडसी विजया देव यासाठी एका पायावर तयार झाल्या.

‘युक्रांद’च्या अनेक यशस्वी अहिंसात्मक आंदोलनांमुळे महाराष्ट्रात सर्वत्र ‘युक्रांद’ची केंद्रे सुरू झाली. सर्वत्र स्त्रियांचा लढाऊ आणि हिरिरीचा कृतिशील सहभाग असे. मुंबईत शमा पंडित, संध्या नाईक, रेखा ठाकूर होत्या. औरंगाबादला मंगल खिंवसरा, बीडला सुशीला मोराळे ही अत्यंत लढवय्यी कार्यकर्ती होती. मालेगावला उषा मंजिरे आणि पुण्यात ऊर्मिला सप्तर्षी, वसुधा सरदार, नीलम गोऱ्हे अश्विनी मरकडेय, वीणा पटवर्धन, उषा चोकसे, तिलोत्तमा देशपांडे त्याचप्रमाणे उषा मेहता, विद्या बाळ, सरोजिनी शंकर वैद्य हे देखील काहीकाळ होते. सुनीता अरळीकर ही तान्ह्य़ा मुलाला घेऊन तुरुंगात गेली होती सोलापूरमध्ये कमल खोत आदी अनेक कार्यकर्ते होते.
‘युक्रांद’चं वैशिष्टय़ हे होतं की त्यात तरुणांच्या बरोबरीने तरुणींची संख्या आणि कृतिशीलता मोठी होती. सुरुवातीला ‘युक्रांद’मध्ये काम केलेल्या अनेक कार्यकर्त्यां नंतरही कार्यशील राहिल्या. त्यातील काही आजही विविध ठिकाणी कार्यशील आहेत. यापैकी काही जणींशी संवाद साधता आला. आपल्या सामाजिक राजकीय कारकिर्दीची सुरुवात ‘युक्रांद’मधून झाली आणि त्यातूनच आपली पुढे वाढ झाल्याची भावना या सर्वजणींनी व्यक्त केली.

स्थापनेपासून आजतागायत ‘युक्रांद’शी जोडलेल्या डॉ. ऊर्मिला सप्तर्षी या संदर्भात म्हणाल्या, ‘‘युक्रांदमध्ये वैयक्तिक माझे आणि इतर स्त्री कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सामाजीकीकरण आणि राजकीयीकरण झाले. रक्तदान हीच ‘युक्रांद’ची वर्गणी होती. त्यावेळी विविध विचारसरणीच्या लोकांना आम्ही बोलावत असू. मे. पुं. रेगे, गं.बा. सरदार, बाबा आमटे, दादा धर्माधिकारी इत्यादींशी जवळच्या संवादातून क्रांती करायची म्हणजे काय? समाजवादच का? ‘नाही रे’ वर्गाचीच का कास धरायची? आदी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळायची. यातून जात, वर्ग, संस्कृती हे भेद गळून पडले. मुख्य म्हणजे स्त्री म्हणून असणारा न्यूनगंड गेला. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे निर्णयाचे स्वातंत्र्य हे समजले.’’
कोणताही राजकीय, शैक्षणिक वारसा नसलेल्या, शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुशीला मोराळे या ‘युक्रांद’च्या एक लढाऊ कार्यकर्त्यां होत्या. बीड भागामध्ये त्यांनी अनेक लढय़ांचे नेतृत्व केले. सुशीलाताई बोलायला उभ्या राहिल्या की, संपूर्ण वातावरण आंदोलनमय होत असे. व्यापक चळवळीतून अन्याय-अत्याचार रोखता येतो हा अनुभव त्यांनी व्यक्त केला. आज शिवसेनेच्या उपनेत्या असलेल्या आमदार नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘मी मुंबईला शिकत असतानाच ‘युक्रांद’मध्ये काम सुरू केलं. ते करताना राजकारण आणि समाजकारण वेगळं नाही हे समजलं आणि त्यामुळे राजकीय कामाचं महत्त्व लक्षात आलं. कुठल्याही प्रश्नात सामाजिक हस्तक्षेप किती महत्त्वाचा असतो हे ‘युक्रांद’मध्ये काम करतानाच जाणवलं. महिला हा स्वतंत्र विषय तेव्हा नव्हता. योगायोगाने १९७५ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि माझ्या कामाची सुरुवात हे एकदमच झालं आणि तेही ८ मार्च या दिवशीच. त्याचप्रमाणे, सामाजिक आर्थिक विषमता आणि जातवास्तव, जातीय विसंवादाचं भीषण रूप पाहायला मिळालं.’’ ‘‘आणीबाणीत त्यांनी आणीबाणीविरोधी प्रचार केला. ग्रुपबरोबर असल्याने एक सुरक्षितता होती, त्यामुळे संघर्षांची भीती कधी वाटली नाही’’, असंही त्यांनी सांगितलं. नीलमताई राशीन कम्युनमध्येही सामील झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘तिथेच माझं पहिलं भाषण मी केलं, ग्रामीण भागातील लोकांशी कसा संवाद साधू शकेन असं वाटलं होतं, परंतु लोकांनी अत्यंत हृद्य स्वागत केलं.’’ नंतर मराठवाडय़ात राहून त्या काम करू लागल्या, तेव्हा स्त्रीचं जीवन हे किती विषमतेने भरलेलं आहे हे त्यांनी पहिलं. संघटनेत स्त्री-पुरुष किती निखळतेने काम करू शकतात याचा प्रत्यय आल्याचं आणि १९७४ ते १९८४ या ‘युक्रांद’बरोबरच्या प्रवासात एकूण व्यक्तित्व उजळून निघाल्याचंही त्यांनी नमूद केलं.

या सर्व स्त्रियांनी संघटनेमुळे बळ मिळालं हीच भावना व्यक्त केली. एकटी स्त्री नेहमीच काही वेगळं करू शकत नाही; परंतु संघटितपणे स्वत:चं आणि समाजाचंही सामथ्र्य वर्धित करता येतं हा वस्तुपाठ या स्त्रियांनी निश्चितच घालून दिला आहे. येत्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा संदेश आपण धारण केला पाहिजे.

– अंजली कुलकर्णी

Story img Loader