मोटारस्पोर्ट्सचे विश्व फारच अनोखे आहे आणि बरेचसे अनोळखीही. या विश्वात कमालीचा थरार आहे, साहस आहे, पण या साहसाला कोणत्याही अपघाताने, दुर्घटनेने काजळून टाकू नये म्हणून नियम, संकेतांची ठोस, निश्चित चौकटही आहे. या चौकटीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या मैत्रिणींचा छोटासा गट म्हणजे मार्शलिंग करणाऱ्या स्त्रिया. कार रॅलींच्या वेळी आपापले काम चोखपणे पार पाडणाऱ्या मार्शल्सविषयी.
स्त्रियांना विनोदबुद्धी नाही हा जसा एक सार्वत्रिक लोकप्रिय समज आहे, त्याचा उत्तरार्ध म्हणजे स्त्रियांना वाहन चालवता येत नाही, विशेषत: चारचाकी नाहीच! एखाद्या वर्दळीच्या चौकात ऐन गर्दीच्या मुहूर्तावर वाहतूककोंडीचा फास गळ्याभोवती आवळला जाऊ लागला की त्या कोंडीच्या मुळाशी नक्की एखादी ‘ताई’ ड्रायव्हर असणार अशी समजूत करून घेणारे दोन-चार पुरुष त्या कोंडीत नक्कीच असतात. या सगळ्या समजुती फुंकर मारून उडवून लावाव्यात, असे दृश्य परवा नाशिकमध्ये बघायला मिळाले. निमित्त होते ‘विसा’तर्फे आयोजित फक्त स्त्रियांच्या कार रॅलीचे!
विसा- वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशन (हकरअ) ही अश्विन आणि स्वाती पंडित या जोडप्याने सुरू केलेली आणि मोटारस्पोर्ट्स या प्रकारात सातत्याने काम करणारी संस्था. ‘विसा’तर्फे आयोजित या रॅलीत तब्बल ८० स्त्रियांनी (आणि तेवढय़ाच स्त्रिया शेजारी बसून दिशादर्शन करणाऱ्या) भाग घेतला. वेळ, अंतर आणि वेग या तिन्ही बाबतीत परीक्षा घेणारी ही रॅली एखाद्या ‘ट्रेझर हंट’सारखी असते. अशा अवघड परीक्षेला एवढय़ा मोठय़ा संख्येने तोंड देणाऱ्या स्त्रिया बघितल्या आणि एक वेगळीच खिडकी किलकिली झालीय असे वाटू लागले. गंमत म्हणजे कार रॅलीत भाग घेणाऱ्या स्त्रियांचा शोध घेऊ लागले आणि भेटल्या त्या वेगळ्याच मैत्रिणी. रॅलीसाठी काम करणाऱ्या ‘मार्शल्स’!
खडतर, अवघड वाटांवरून सुसाट वेगाने धावणारे हे मोटारस्पोर्ट्सचे विश्व फारच अनोखे आहे आणि बरेचसे अनोळखीही. या विश्वात कमालीचा थरार आहे, साहस आहे, पण या साहसाला कोणत्याही अपघाताने, दुर्घटनेने काजळून टाकू नये म्हणून नियम, संकेतांची ठोस, निश्चित चौकटही त्याला आहे. या चौकटीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या मैत्रिणींचा हा छोटासा गट स्वाती पंडितच्या पुढाकाराने उभा राहिला आहे.
स्वाती स्वत: उत्तम ड्रायव्हर आणि २००५ साली भारतात ‘एअरटेल’तर्फे आयोजित सर्वाधिक अंतराच्या (२८०० कि.मी.) वेळ, अंतर, वेग रॅलीत तिसऱ्या क्रमांकाने विजयी झालेली स्पर्धक. २२-२३ वर्षांपूर्वी अश्विनशी विवाह झाल्यावर, त्याच्याबरोबर रॅलीत सहभागी होणे इतपतच तिची भूमिका होती, पण मोटारस्पोर्ट्सबद्दल अश्विनचे पॅशन बघता तिला जाणवू लागले की, सहभागापुरतीच आपली भूमिका पुरेशी नाहीय. त्यातूनच सम आवडीच्या मैत्रिणी भेटत गेल्या आणि मार्शलिंगचे काम करणारी एक टीम उभी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. वर्षां हिंगमिरे, नीलिमा खत्री अशा दोन-तीन मैत्रिणी त्या वेळी बरोबर होत्या.
मार्शलिंग करणाऱ्या या स्त्रिया रॅलीच्या संपूर्ण वाटेवर, ठरावीक अंतराने उभ्या असतात. रॅलीत भाग घेणाऱ्या प्रत्येक गाडीची त्या त्या टप्प्यावर अतिशय बिनचूक वेळ घेणे हे त्यांचे काम, पण हे या जबाबदारीचे अगदी ढोबळ वर्णन झाले. मार्शलिंग करणारी ही स्त्री रॅली सुरू होऊन संपेपर्यंत म्हणजे सर्वसामान्यत: गुरुवार ते रविवार घराबाहेर असते. किमान दहा तास ती एका जागेवर उभी असते, बहुतेक वेळा ती रस्त्यावरच उभी असते आणि या काळात तिचा दिवस साधारणपणे पहाटे साडेतीन ते चार यादरम्यान सुरू होतो! स्त्रिया हे काम उत्तम करू शकतील असे स्वातीला वाटले. कारण स्त्रियांची एकाग्रता उत्तम असते. त्यामुळे स्पर्धकाची अचूक वेळ नोंदवण्याचे काम त्या बिनचूकपणे करतात. अर्थात या मार्शलिंगमध्येही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. स्वाती आघारकरसारखी मार्शल सव्र्हिस पार्कमध्ये उभी असते. या सव्र्हिस पार्कमध्ये तिच्यासह सगळी सव्र्हिस टीम हजर असते. अशा प्रत्येक गाडीसाठी इंधन भरण्याची सोयही इथे असते. प्रत्येक गाडीला ठरलेल्या जागेवरच यावे लागते. रुपाली चंद्रात्रे स्टार्ट मार्शल म्हणून काम करते. रॅली सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यावर गाडय़ा ज्या ‘पार्क करणे’ भागात उभ्या केल्या जातात त्या ठिकाणी रुपाली काम करते. कोणत्या स्पर्धकाने कधी येऊन गाडी लावायची / काढायची याचे एक टाइमटेबल असते. स्पर्धकाने त्या भागात किती वेळ थांबायचे याचेही नियम आहेत. या सगळ्या वेळा नोंदवणे ही जबाबदारी स्टार्ट मार्शलची. स्वातीच्या या टीममध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. किरण जैन ही आणखी एक मैत्रीण काम करते. रॅलीमध्ये येणारी कोणतीही तातडीची वैद्यकीय परिस्थिती हाताळण्यासाठी एक ‘ट्रॉमा अॅम्ब्युलन्स’ या डॉक्टरच्या ताब्यात असते. संपूर्ण रॅलीच्या मार्गावर आणि प्रवासात स्पर्धकांच्या सुरक्षिततेचा विचार सतत आणि प्राधान्याने केलेला असतो. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाचा सगळा वैद्यकीय इतिहास या वैद्यकीय पथकाकडे असतो. रॅलीच्या मार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर वैद्यकीय मदतीसाठी ‘फर्स्ट इन्टरव्हेन्शन्स व्हेईकल’ हजर असते. या स्वयंसेवकांकडेही स्पर्धकांचा वैद्यकीय इतिहास असतो.
रॅलीसाठी काम करणाऱ्या या सगळ्या मैत्रिणींना रॅलीपूर्वी एक प्रशिक्षण तर दिले जातेच, पण त्यानंतर होणाऱ्या लुटुपुटुच्या, मॉक रॅलीलाही तोंड द्यावे लागते. या लुटुपुटुच्या रॅलीत रॅलीचे आयोजक, अधिकारी भाग घेतात आणि मुद्दाम चुका करतात. त्या चुका या मार्शल्सना लक्षात येतात की नाही ही त्यांची खरी परीक्षा असते! रॅलीत भाग घेणाऱ्या स्पर्धकांकडून कोणत्या चुका होऊ शकतात आणि त्याची नोंद कशी करणे महत्त्वाचे आहे, हेही या स्पर्धकांना मुद्दाम सांगितले जाते.
आपापली नोकरी-व्यवसाय सांभाळून केवळ छंद, वेगळ्या कामाची ओढ म्हणून या स्त्रिया हे काम करतात. एका वर्ल्ड रॅलीमध्ये एक मलेशियन स्पर्धक स्वातीला भेटला आणि म्हणाला, ‘आठ-आठ तास तळपत्या उन्हात उभे राहून असे काम करणारी एकही स्त्री मलेशियात नाही. मी मायदेशी गेल्यावर आमच्या मासिकात तुमच्यावर लेख लिहिणार आहे.’
पहाटे चारपासून दिवस मावळेपर्यंत शिक्षा झाल्यासारखे हे उभे राहण्याचे काम कशाला करायचे? त्यावर या मैत्रिणी म्हणतात, ‘विसा’ची काम करण्याची पद्धत खूप काही शिकवणारी आहे. रॅलीतील थरार, वेळेशी होणारी लढाई आणि नियमांच्या चौकटीत राहून काम करायची, जिंकण्याची धडपड हा सगळा अनुभव खूप वेगळा, रसरशीत असतो. ताजेतवाने करून टाकतो. कदाचित याच ओढीने असेल आता ऋचा देवस्थळी, वेदिका हिंगमिरेसारख्या अगदी तरुण, जेमतेम शाळा ओलांडलेल्या मुलीही या मार्शल्सच्या टीममध्ये दाखल झाल्या आहेत.
अशा प्रकारे काम करणारी स्त्रियांची टीम आज देशात कोठेही नाही, असे अभिमानाने सांगणारी स्वाती ही या रॅलीमध्ये जनसंपर्क, माध्यमांशी संपर्क यासह कित्येक जबाबदाऱ्या पार पाडते. ‘‘आणि रॅलीतील स्त्रियांचा सहभाग केवळ एवढय़ापुरताच नाही. आम्हाला जेवण पुरवणारी कॅटररही स्त्री आहे. आणि आजकाल वार्ताकनासाठी ‘ओव्हरड्राइव्ह’सारख्या मासिकांकडून स्त्री पत्रकारच येतात..’’ ती सांगते.
साहस आणि वेगळ्या वाटेने जाण्याची ओढ प्रत्येक माणसात स्वभावत:च असते आणि संधी मिळताच आपली म्हणून एखादी छोटीशी वाट माणूस शोधतोच. मार्शलिंग करणाऱ्या स्त्रिया याच वाटेवर तर आहेत. vratre@gmail.com
कार रॅलीचा थरार आणि मार्शल्सचे साहस
मोटारस्पोर्ट्सचे विश्व फारच अनोखे आहे आणि बरेचसे अनोळखीही. या विश्वात कमालीचा थरार आहे, साहस आहे
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
आणखी वाचा
First published on: 20-07-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व आम्ही सा-या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladies car rally