विनोद मेहराकडे इलेक्ट्रॉनिक संगीताचा खजिनाच होता. मी लिहिलेला सीन ऐकल्यावर त्याने उत्साहात ट्रॅक बनवून दिला. कानठळ्या बसवणारं संगीत आणि ते ऐकून हिस्टेरिक झाल्याचा दीप्ती नवलचा अभिनय, यामुळे ‘अनकही’चं ते दृश्य अतिशय प्रभावी ठरलं. त्या वेळी एक गोष्ट लक्षात आली ती ही की, पटकथा लिहिण्यासाठी ‘चित्रपटाची भाषा’ अवगत असणं, दृश्यात्मक विचार करता येणं, हे अत्यंत महत्त्वाचं आणि म्हणून आवश्यकही असतं. मग क्षणभर वाटलं की मी कदाचित पटकथा लिहू शकेन..

मी आजवर लिहिलेल्या पटकथांची संख्या एका हाताच्या बोटांहून नक्कीच जास्त आहे. शिवाय, ड्रॉवरमध्ये धूळ खात पडलेल्या स्क्रिप्ट्सची व अधूनमधून लिहिलेल्या इतर लिखाणांची भर घातल्यास ती चक्क दखल घेण्याजोगी ठरू शकेल. पण खरं सांगायचं, तर पहिली पटकथा लिहिस्तोवर मी भविष्यात कुठल्याही तऱ्हेचं लेखन गंभीरपणे करीनसं मला कधीही वाटलं नाही. वाचनाचं वेड असूनही लहानपणी मी लेखिका बनण्याचं स्वप्न पाहिलं नाही. किशोरवयात हळवेपणा गोंजारतानासुद्धा मला कविता स्फुरली नाही. मोठी होता होता डोक्यात अनेक कल्पना व विचारांची गर्दी व्हायला लागली. त्यांना वाट करून देण्याची आवश्यकता भासू लागल्यावर (बहुधा माझ्या जन्मजात बोलघेवडय़ा स्वभावामुळे) कुठलीही गोष्ट बोलून व्यक्त करणं मला सहज जमलं तरी, लिहायला बसलं की नेमके शब्द न सुचल्याने अनेकदा गोची होई. त्यातून मी निष्कर्ष काढला की, चांगलं लेखन करण्यासाठी आवश्यक असलेलं भाषाप्रभुत्व मुळात आपल्या रक्तात नाही, तेव्हा आपण त्या वाटेला न जाणंच बरं. त्यामुळे, आणीबाणीच्या वेळी बादल सरकारांच्या ‘जुलूस’ या नाटकाचा मी मराठीत अनुवाद केला तो एक अपवाद वगळल्यास, पस्तिशी ओलांडेपर्यंत मी जे काही लिहिलं ते केवळ गंमत म्हणून, एखादी गरज भागवण्यापुरतंच. मुलीनं शाळेत वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला की तिला काही लिहून द्यायचं आणि कार्यक्रम संपल्यावर ते कागद फाडून टाकायचे, बस्स.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
Nath Purandare New York Film Academy Film Hollywood Entertainment News
नाथची हॉलीवूडमध्ये धडपड
Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी
Director and artist Pravin Tarde gifted novel Fakira to Gautami Patil
दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट
Women World, Feminist Thought ,
स्त्री ‘वि’श्व : लोकल भी, ग्लोबल भी!

ऐंशीचं दशक उगवता उगवता नवरा आणि इतर सहकाऱ्यांच्या सोबतीने माझी चित्रपट क्षेत्रातली धडपड सुरू झाली. चित्रपटनिर्मितीतल्या सर्जनशील व व्यावहारिक अशा दोन्ही बाजूंच्या असंख्य प्रक्रिया आत्मसात करताना जितकी दमछाक होत होती तितकंच थ्रिलदेखील मिळत होतं. ‘आक्रित’ व ‘अनकही’ या पहिल्या दोन चित्रपटांच्या पटकथा अनुक्रमे विजय तेंडुलकर व जयंत धर्माधिकारी या अनुभवी पटकथाकारांच्या असल्याने, मी त्या काळात चित्रपटांच्या इतर सर्व विभागांतून उमेदवारी केली तरी लेखन विभागाकडे मात्र फिरकले नाही. पण ‘अनकही’ची स्क्रिप्ट वाचताना एक दृश्य मला जरा खटकलं. ही पटकथा चिं. त्र्यं. खानोलकरांच्या ‘कालाय तस्मै नम:’ या नाटकावर आधारलेली होती. नाटकात, मेंदूवर परिणाम झालेली नायिका छोटय़ा गावाहून मुंबईला आल्यावर, आढय़ाला लटकलेला विजेचा पंखा फिरताना पहिल्यांदा पाहते आणि त्याला चेटूक समजून प्रचंड घाबरते, असा एक प्रवेश आहे. पटकथेत तो प्रवेश जसाच्या तसा घेतला होता. मला वाटलं, नुसता फिरता पंखा पाहून मुलगी हिस्टेरिक होते, हे कदाचित चित्रपटाच्या प्रेक्षकाला पटणार नाही. हा प्रसंग प्रभावी होण्याऐवजी हास्यास्पद होण्याचा संभव आहे. अमोलला शंका बोलून दाखवल्यावर त्यालाही ती पटली. ‘‘तुला दुसरं काही सुचतंय का बघ.’’ म्हणाला. आता आली का बला!

पंख्याऐवजी घरातली दुसरी कुठली गोष्ट दाखवावी, याविषयी डोकं खाजवताना मला अचानक आठवलं की, कानठळ्या बसवणारं इलेक्ट्रॉनिक संगीत कानावर पडलं की माझ्या छातीत धडधडतं. तेव्हा, स्टिरीओ सिस्टीम, भलेमोठे स्पीकर्स आयुष्यात कधी न पाहिलेल्या व्यक्तीवर अति जोरात वाजणाऱ्या संगीताचा विपरीत परिणाम होणं सहज शक्य आहे. मग याच कल्पनेतून मी नवा प्रसंग लिहिला जो अमोलला पसंत पडला. विनोद मेहरा हा नट आमच्या चांगल्या ओळखीचा होता. त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक संगीताचा खजिनाच होता. सीन ऐकल्यावर विनोदने अतिशय उत्साहात ट्रॅक बनवून दिला. कानठळ्या बसवणारं संगीत आणि ते ऐकून हिस्टेरिक झाल्याचा दीप्ती नवलचा अभिनय, यामुळे ‘अनकही’चं ते दृश्य अतिशय प्रभावी ठरलं. या अनुभवातून जाताना एक महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती ही की, पटकथा लिहिण्यासाठी ‘चित्रपटाची भाषा’ अवगत असणं, दृश्यात्मक विचार करता येणं, हे अत्यंत महत्त्वाचं आणि म्हणून आवश्यकही असतं. या प्रक्रियेत साहित्यिक भाषेवर प्रभुत्व नसल्यास काही बिघडत नाही. आणि मग क्षणभर वाटलं की मी कदाचित पटकथा लिहू शकेन. अर्थात तो विचार लगेच बाजूला टाकून मी पुन्हा दिग्दर्शन, संकलन इत्यादी, मला अधिक रस असलेल्या विभागांकडे वळले.

याच सुमारास ‘दूरदर्शन’वर प्रायोजित मालिका दाखवायला सुरुवात झाली होती. आपणही एखादी मालिका बनवावी का, याविषयी घरी चर्चा चालू असताना आमच्या १२-१३ वर्षांच्या मुलीने तक्रार केली, ‘‘तुम्ही नेहमी फक्त मोठय़ांसाठी नाटकं आणि चित्रपट बनवता. टीव्हीवरचे मुलांचे कार्यक्रम अगदी बालिश असतात आणि आम्हा टीनेजर्ससाठी तर मुळीच काही बरं नसतं. तुम्ही आमच्यासाठी सीरिअल का नाही बनवत?’’ तिचं म्हणणं बरोबर होतं. त्या काळी ११ ते १६ वर्षांच्या, ना लहान ना मोठय़ा अशा मुलांसाठी चांगलं मनोरंजन फार कमी होतं. तेव्हा या वयोगटासाठी मालिका बनवायचं ठरलं. मुलीच्याच पुस्तकांच्या साठय़ात विषय शोधताना ‘लिटिल वूमन’ ही कादंबरी माझ्या नजरेस पडली. माझी आई, मी आणि माझी मुलगी अशा तिन्ही पिढय़ांना आवडणारी ही क्लासिक कादंबरी. बाल्यावस्थेतून तारुण्याकडे वाटचाल करताना, एका कुटुंबातल्या बहिणींना आलेल्या बऱ्यावाईट अनुभवांची, त्यांच्या परस्पर प्रेमाची ही कथा वैश्विक होती. वाढत्या वयातल्या मुलींची मानसिकता ही जगात सर्वत्र थोडय़ाफार फरकाने सारखीच असते. त्यामुळे एकोणिसाव्या शतकातल्या इंग्लंडमधल्या कादंबरीचं बीज १९८०तल्या मुंबईत रोवता येईल, अशी मला खात्री वाटली. शिवाय मी धरून आम्हीदेखील तीन बहिणी. आमच्या त्या वयातल्या गमतीजमतींच्या आठवणींचा मालिकेसाठी मस्त आधार होता. मला आणखी एक कल्पना सुचली की ही मालिका सांगीतिकेच्या रूपात असावी. मुलींचे रुसवेफुगवे, भांडणं, मोठय़ांना गमतीशीर वाटणाऱ्या त्यांच्या गंभीर तक्रारी, अतिशयोक्ती करत व्यक्त होणाऱ्या त्यांच्या छोटय़ा छोटय़ा व्यथा, हे सर्व गद्य संवादांऐवजी मुलींनी स्वत: गायलेल्या गाण्यांतून दाखवलं तर मालिका अनोखी आणि खूप मजेदार होईल.

जवळच्या सर्वाना ही कल्पना खूप आवडली. हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी लेखक शोधायला लागले. पटकथा लिहिणाऱ्या बऱ्याच मित्रांना गोष्ट सांगून मालिका लिहिण्याविषयी विचारलं. पण एक तर ही मुलींची गोष्ट. त्यात ना सस्पेन्स, ना अ‍ॅक्शन! वयोगट ११ ते १६, म्हणजे रोमान्स नाही आणि हृदयाला हात घालणारे सीन्स तर अजिबातच नाहीत! कोणालाच माझ्या कल्पनेत रस वाटेना. एकाने सुचवलं की निदान आईचं प्रेमप्रकरण आणि त्याचा मुलींवर होणारा परिणाम दाखवावा. ‘मालिकेचा तोल जाईल, पोत बदलेल’, असं मी म्हटल्यावर तो म्हणाला, ‘‘तुझ्या कल्पना फारच सपक आहेत. मालिका चालणार नाही.’’

शेवटी, आमचे सिनेमॅटोग्राफर देबू देवधर व त्यांची पत्नी श्रावणी एकदा घरी आले. त्या वेळी मी बोलता बोलता स्क्रिप्ट-रायटर मिळत नसल्याचा उल्लेख केला. तेव्हा देवधर दाम्पत्य आणि अमोल यांनी एका सुरात म्हटलं, ‘‘दुसरा रायटर कशाला? तूच लिही.’’ मी लगेच त्यांना वेडय़ात काढलं. पटकथा लिहायचा कणभरही अनुभव नसताना पूर्ण मालिका लिहायची? मी गाणी लिहिणं तर अशक्यच! तिघांनी चिक्कार समजावलं. निदान प्रयत्न कर म्हणाले. पण मी लेखिका नाही, या माझ्या भूमिकेवर मी ठाम राहिले आणि मीच लिहावं, या भूमिकेवर ती तिघं! माझ्या मुलीनेही त्यांची बाजू घेऊन माझं डोकं खायला सुरुवात केली.

मी लिहायला जोरदार नकार दिला खरा, पण कथेचं रूप नकळत माझ्या डोक्यात आकार घ्यायला लागलं होतं. मुंबईच्या कनिष्ठ  मध्यमवर्गातल्या तीन हुशार व चुणचुणीत बहिणी आणि त्यांच्या वाढत्या वयाच्या छोटय़ामोठय़ा समस्या समजून घेत त्यांना वाढवणारी त्यांची विधवा आई, ही मुख्य पात्रं मनात हळूहळू जिवंत व्हायला लागली; त्यांच्या आयुष्यातले प्रसंग नजरेसमोर यायला लागले आणि माझी प्रतिकारशक्ती खचत गेली. एक दिवस मालिकेचा नेमका आरंभ सुचला, तेव्हा मात्र मला राहवेना. कागद ओढून लिहायलाच बसले.

दिवाळीत दुकानांच्या शोकेसमध्ये मांडलेल्या आकर्षक वस्तू आशाळभूतपणे न्याहाळत, रंगबिरंगी कंदील आणि रोषणाईने सजलेल्या रस्त्यावरून मुली हिंडतात; स्वत:ला हवीहवीशी वाटणारी वस्तू दिवाळीभेट म्हणून मिळण्याचं स्वप्न पाहतात, असा हा सीन. बारीकसारीक तपशिलांसकट सीन डोळ्यांसमोर आणून मी तो इंग्रजीत लिहीत गेले आणि लिहिण्याच्या भरात, मुलींच्या आशाआकांक्षा संवादांतून व्यक्त करण्याऐवजी गाणी लिहून टाकली. मला लिहिण्यात रस नाही, लिहिणं जमत नाही, इत्यादी गोष्टींचा मला चक्क विसर पडला होता!

तर जी मुलांची मालिका केवळ इतर कोणी लिहायला तयार नाही म्हणून आणि जवळचे अक्षरश: डोक्यावर बसले म्हणून लिहायला घेतली, ती ‘कच्ची धूप’ या नावाने ‘दूरदर्शन’वर अतिशय लोकप्रिय झाली. तिच्यापासून माझ्या पटकथा लेखनाची, तसंच नवनव्या आव्हानांना सामोरं जाण्याची सुरुवात झाली. ‘ध्यासपर्व’ चित्रपटातले संवाद मराठीत स्वत: लिहिण्याइतकी मजल मी मारली म्हणजे बघा!

अर्थात, अजूनही वाचन आणि बडबड हेच माझे सर्वात आवडते छंद आहेत. अजूनही काही लिहायचं म्हटलं की जुन्या सवयीनुसार ‘नको, जमणार नाही’ हेच प्रथम मनात येतं. तरीही मी लिहिते. शब्द शोधत, शब्दांशी खेळत.. आणि लिहिताना प्रत्येक वेळी एक अनोखा, आंतरिक आनंद अनुभवते.

चित्रा पालेकर chaturang@expressindia.com

Story img Loader