तिला मी प्रथम पाहिलं ते ताडदेवच्या तालमकीवाडीत.. माझी लांबची आतेबहीण (व दीपा श्रीरामची सख्खी मोठी बहीण) कांचनच्या लग्नानिमित्त झालेल्या कार्यक्रमात. मी तेव्हा तेरा-चौदा वर्षांची होते. जरीकाठाचं रेशमी परकर पोलकं, त्यावर ओढणी, केसांच्या दोन घट्ट वेण्या अशा अवतारात ‘करवली’पणा करत मांडवात फिरत असताना कांचनआक्काच्या मैत्रिणींच्या घोळक्यात ती अचानक माझ्या दृष्टीस पडली. काळी चंद्रकला नेसून, अंगावर पारंपरिक, सुंदर दागिने लेवून थाटात उभी असलेली ती युवती इतकी आकर्षक होती की माझी नजर तिच्यावरून हटेना. माझ्या शाळकरी मनावर तिच्या प्रतिमेचा जो ठसा उमटला तो कायमचा! प्रत्यक्ष ओळख करून घेण्याचा धीर न झाल्याने मी आडूनआडून चौकशी केल्यावर कुणीतरी म्हणालं, ‘‘ती कांचनची ‘क्वीन मेरी’ शाळेतली वर्गमैत्रीण.. रेखा सबनीस.’’
काही वर्षांनी महाविद्यालयात गेल्यावर, ‘झेवियर्स’च्या कँटीनमध्ये सदैव तळ ठोकणाऱ्या ‘एलफिन्स्टन’च्या आजी-माजी मराठी विद्यार्थ्यांच्या तोंडून रेखाचं नाव वारंवार माझ्या कानावर आलं. ‘एलफिन्स्टन’च्या मराठी नाटकांतून ती कामं करते, आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धामध्ये तिची एकांकिका असल्यावर चर्चगेटच्या ‘युनिव्हर्सिटी क्लब हाउस’मध्ये प्रचंड गर्दी उसळून दंगल होण्यापर्यंतची वेळ येते, इत्यादी गोष्टी ते मोठय़ा चवीने सांगत. मला त्या काळात नाटकांपेक्षा टेबलटेनिसमध्ये अधिक रस असल्यामुळे या कथा मी केवळ गंमत म्हणून ऐकत असे. पण पुढे जेव्हा मी ऐकलं की रेखा चक्क संस्कृतसारख्या विषयात एमए करून ‘एलफिन्स्टन’मध्ये शिकवते, शिवाय दाजी भाटवडेकरांबरोबर संस्कृत नाटकात कामं करते, तेव्हा तिच्याकडे केवळ रूपच नाही तर बुद्धी व कलागुणसुद्धा आहेत, याची जाणीव होऊन मी अवाक् झाले!
मी ‘थिएटर युनिट’मध्ये प्रवेश केल्यावर, ‘वालचंद टेरेस’मध्ये आम्ही दोघी एकदाच्या प्रत्यक्ष भेटलो. सत्यदेव दुबेला रेखा आधीपासूनच ओळखत होती. माझ्याप्रमाणेच तीही नाटकात नसतानादेखील ‘वालचंद’मध्ये फिरकायची. अंगावर झुळझुळीत जॉर्जेटची साडी, अचूक रंगसंगतीचा ब्लाऊज व दागिने, अशा उच्चभ्रू, ‘सोफिस्टिकेटेड’ स्त्रीच्या वेशात ती प्रवेश करायची, पण तालमीनंतरची मैफील सुरू होताच, धुळीने माखलेल्या जमिनीवर फतकल मारून, हातामधल्या ग्लासातलं मद्य न सांडता हातवारे करत तावातावाने वाद घालताना, ती वेगळीच असायची.. पक्की ‘बोहेमियन’! तिचं हे परिवर्तन पहिल्यांदा पाहिल्यावर (माझ्या तोवरच्या अनुभवविश्वात ते न बसल्यामुळे) मी गांगरले, पण त्याहून कितीतरी जास्त पटींनी मोहित झाले. वास्तविक, तोवर गृहीत धरलेल्या माझ्या विचारधारणांना एव्हाना खूप हादरे बसले होते. पितृसत्ताक समाजातल्या रूढी, परंपरा, प्रथांनी घुसमट झाल्यामुळे त्या झुगारण्याची माझी इच्छा प्रबळ होत होती, पण बालपणापासून स्वत:ची ‘शहाणी, आज्ञाधारक मुलगी’ अशी प्रतिमा स्वत:च कळत-नकळत जोपासल्याने प्रत्यक्ष कृती कठीण जात होती. मला न जमणाऱ्या गोष्टी रेखा किती सहजपणे करते ते पाहून मी थक्क व्हायचे! समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील अशा गोष्टींची तिने कधी पर्वा केली नाही. आयुष्य जगली ती स्वत:च्याच नियमांनुसार व मर्जीनुसार.. कुठल्याही बंधनात न अडकता! आणि, स्वतंत्र, स्वच्छंद आयुष्य जगतानाही रक्ताच्या, मैत्रीच्या नात्यांना घट्ट धरून राहिली.. नवनवी नाती जोडत राहिली.
अमोलने दिग्दर्शित केलेल्या ‘वल्लभपूरची दंतकथा’ या नाटकात रेखाची भूमिका होती. मी त्या नाटकात नसले तरी तालमींना गेल्यास माझी तिची भेट होई. रेखाच्या ‘अभिव्यक्ती’ या नाटय़संस्थेने निर्मिलेल्या ‘असंच एक गाव’ या नाटकाच्या वेळी आम्ही खऱ्या अर्थाने जवळ आलो. ते नाटक ‘अवर टाउन’नामक अमेरिकन नाटकाचं मराठी रूपांतर होतं. त्यातली प्रमुख भूमिका रेखाने मला देऊ करताच मी एका पायावर तयार झाले. ती स्वत: आईच्या, लक्ष्मीकांत बेर्डे धाकटय़ा भावाच्या, तर दिलीप कोल्हटकर सूत्रधाराच्या भूमिकेत होते. या वेळी रेखाचं एक वेगळंच रूप मला पाहायला मिळालं. नाटकात बरीच छोटी-मोठी पात्रं होती. गिरगावात चालणाऱ्या तालमींना लोक उशिरा आले, कुणी दांडी मारली की दिग्दर्शक अशोक साठे खूप वैतागायचे; रेखाने त्यांना समज द्यावी, अशी अपेक्षा करायचे. पण आमची निर्मातीबाई आपली शांऽऽत.. आजच्या भाषेत ‘चिल्ड’! एकदा तर ती स्वत:च तालमीची वेळ विसरली आणि दिग्दर्शक चिडून तालीम न घेताच निघून गेले. पडद्यामागे अशा मजेशीर गोष्टी घडूनही नाटक छान बसलं व त्या वर्षीचे सर्व पुरस्कारही आम्हाला मिळाले. गंमत म्हणजे, त्यानंतर वीस वर्षांनी जेव्हा दिलीप कुलकर्णीने दिग्दर्शित केलेल्या गिरीश कर्नाडलिखित ‘नागमंडल’ नाटकात नीना कुलकर्णी व दिलीपबरोबर मी आणि रेखाने काम केलं, तेव्हाही रेखा पूर्वीसारखीच ‘चिल्ड’ होती (त्यामुळे बिचाऱ्या दिलीपचा आणि आम्हा सर्वाचा रक्तदाब मात्र अनेकदा वर जायचा!) तरी, रेखाने अनुवाद, निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय अशा सर्वच बाबतींत मराठी प्रायोगिक नाटय़सृष्टीला खूप योगदान दिलं यात शंका नाही. अडचणींचा सामना करत तिने ‘अभिव्यक्ती’ संस्था अनेक र्वष चालवली; कर्नाडांचं ‘ययाति’ नाटक डॉ. लागूंना घेऊन मराठीत केलं; किरण नगरकरचं ‘बेडटाइम स्टोरीज’सारखं नाटक केलं; शिवाय नेहमी तरुण दिग्दर्शकांना, नव्या हौशी कलाकारांना उत्तेजन दिलं. ‘असंच एक गाव’नंतर ‘अभिव्यक्ती’त पुन्हा काम करण्याचा योग मला आला नाही, पण एकमेकींच्या नाटय़प्रयोगांना आम्ही आवर्जून जात राहिलो. नवीन प्रायोगिक नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी, नंतरच्या पार्टीत भेटत राहिलो.
दुबेचं दिग्दर्शन व निर्मिती असलेल्या ‘धाडसी धोंडूच्या धांदली’त आम्हा दोघींची कामं होती. मूळ नाव ‘सोफा कम बेड’ असलेल्या या अच्युत वझे लिखित नाटकाच्या निमित्ताने ‘सेन्सॉरशी तडजोड’, ‘समांतर निर्मिती’ इत्यादी नैतिक मुद्दय़ांवरून बरेच वाद झाले.. मुंबईच्या प्रायोगिक नाटकांतल्या समविचारी मित्रवर्तुळात काही काळ दुफळी निर्माण झाली. रेखाची याबाबतीत नेमकी काय भूमिका होती – तिने दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून त्यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न केला की दोन्ही बाजूंच्या लोकांशी तितक्याच जोरजोरात वाद घातला – ते आठवत नाही. अर्थात, रेखाच्या बाबतीत यापैकी काहीही शक्य होतं! तिची अख्ख्या जगाशीच मैत्री होती.. मनमोकळी, स्वच्छ! त्या मैत्रीत ना कुठली अपेक्षा, ना एखादा ‘अजेंडा’! एखाद्याचं म्हणणं पटलं नाही तर लपवालपवी न करता तिथल्या तिथं फाडकन बोलायची, पण कुणाबद्दल मनात आकस ठेवायची नाही किंवा कुणावर (न्यायाधीशाच्या आविर्भावात) ताशेरे मारायची नाही. सर्व तऱ्हेच्या माणसांचा ती अतिशय सहजपणे स्वीकार करत असे आणि कुणी तिच्या वागण्यावर टीका केली तर त्याची तिला अजिबात पर्वा नसे. कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊन हळवंबिळवं व्हायचं तिच्या मुळी स्वभावातच नव्हतं! बहुधा त्यामुळेच मराठी नाटय़सृष्टीतल्या बहुतेकांपेक्षा तिची विचारसरणी व जीवनपद्धती अत्यंत निराळी असूनही तिच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या – ‘‘ती अनेकदा विक्षिप्त वागते; हट्टीपणा करते’’ असं म्हणणाऱ्यांच्याही मनात तिच्याविषयी उबदार स्नेहच दाटून राहिला.
माझ्या स्वत:वर तिच्या नाटय़ाभिनयाची फारशी छाप पडली नाही, पण मणी कौलच्या ‘आषाढ का एक दिन’ व अवतार कौलच्या ‘२७ डाउन’ या प्रख्यात चित्रपटांमध्ये तिला पाहताना वाटलं, ही तर चित्रपट माध्यमासाठीच जन्माला आली आहे! या कृष्णधवल चित्रपटांतल्या तिच्या प्रतिमा मनात अजूनही वास करून आहेत. आमच्या ‘आक्रीत’ चित्रपटात रेखाने बाहेरख्याली मुगुटरावच्या पत्नीची भूमिका केली. संपूर्ण चित्रपटात तिला एकही संवाद नव्हता, तरीही नवऱ्याने झिडकारलेल्या स्त्रीची मूक वेदना केवळ तिच्या डोळ्यांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोचली. नाटक-चित्रपटांपलीकडेही तिचे अनेक उद्योग व छंद होते. ती ‘युक्रांद’ या सांस्कृतिक संस्थेसाठी तसंच ‘डब्ल्यूएसडी’ या भटक्या कुत्र्यांसाठी असलेल्या संस्थेत काम करायची; (आणि, आपण पाळलेल्या कुत्र्यांना ‘वाटाणा’, ‘फुटाणा’, ‘चावट’ अशी स्वत:च्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाला साजेशी नावं द्यायची!) ती गाणं शिकायची; विजू चौहान, नीरा अडारकरसारख्या मैत्रिणींबरोबर परदेशवाऱ्या करायची, पण यातल्या कशाचाही स्वत:हून उल्लेख करायची नाही. ऑपेरा हाउसनजीकच्या तिच्या प्रशस्त, पारंपरिक फर्निचरने सजलेल्या घरात अनेक नामवंत चित्रकार, नाटककार, साहित्यिक, दिग्दर्शकांनी तिचा पाहुणचार घेतला.. पण तिने चुकूनसुद्धा त्या नावांचा वापर केला नाही. मला वाटतं, ‘नेटवर्किंग’ करणं, प्रसिद्धीसाठी तडफडणं इत्यादी तिच्या खिजगणतीतच नसावं. आयुष्य असं ‘कॅज्युअली’ घेत जगत असतानाच रेखाने किरण नगरकरच्या ‘ककोल्ड’सारख्या विलक्षण (व माझ्या अत्यंत आवडत्या) इंग्रजी कादंबरीचा ‘प्रतिस्पर्धी’ नावाने मराठी अनुवाद केला, ज्यासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कारदेखील तिला मिळाला. पण त्याचीही तिने अजिबात शेखी मिरवली नाही.
ही माझी मैत्रीण जरी लहान मुलांसारखी मनमोकळी, निव्र्याज असली तरी तिच्या व्यक्तिमत्त्वाला इतके स्तर होते की पाच दशकांपासून आमची मैत्री असूनही रेखा नेमकी कशी आहे याचं उत्तर मला कधी सापडलं नाही. तिच्या व्यक्तिमत्त्वाची चिकित्सा करण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी तिच्या सहवासाचा निर्भेळ आनंद मी लुटत राहिले.
रेखा गेली त्याला वर्ष झालं. पण वाटतं, ती जवळच कुठेतरी आहे.. कुठल्याही क्षणी हसतहसत येईल आणि म्हणेल, ‘‘ए, चला चला, ‘हॅपी अवर्स’ सुरू झाला.. उचला आपापले ग्लास! चीअर्स..!!’’
चित्रा पालेकर
chaturang@expressindia.com