‘लगोरी’ या सदरासाठी ‘मातीमाय’ चित्रपटावरचा लेख ई-मेलने पाठवून दिल्यानंतर, अवघडलेली मान मोकळी करत असताना माझं लक्ष सहज टेबलावरच्या भिंतीवर लटकणाऱ्या कॅलेंडरकडे गेलं. त्यावरची, चटकन दिसावी म्हणून खूण करून ठेवलेली, २३ डिसेंबर ही तारीख दृष्टीस पडताच ‘लगोरी’च्या खेळाची वेळ संपत आली हे प्रकर्षांने जाणवून मनात निरनिराळ्या भावनांचा कल्लोळ माजला. ‘आपल्याला बहुधा शब्दांऐवजी दृश्य-स्वरूपात कल्पना स्फुरतात. त्यामुळे आपण (हातवारे करत) बोलून किंवा पटकथेतून त्या व्यक्त करू शकतो, पण केवळ शब्दांवर निर्भर असलेल्या लिखाणातून त्या मांडणं आपल्याला जमत नाही,’ असं वर्षांनुवर्ष स्वत:ला ठामपणे पटवणारी मी, चक्क वर्षभर सातत्याने लिहीत होते, हे पाहून आधी माझी मीच थक्क झाले! या आश्चर्यचकित अवस्थेतून बाहेर पडल्यावर मग १२ महिन्यांचा हा लेखनकाळ हळूहळू नजरेसमोर उलगडायला लागला..
गेल्या वर्षी याच सुमारास सदर लिहिण्यासाठी मी अति-उत्साहाच्या भरात होकार दिला होता. त्यानंतर बरेच दिवस, नेमका विषय व आकर्षक शीर्षक हे दोन्हीही न गवसल्यामुळे चिंतातुर होऊन माघार घेण्याचा विचार करत होते; पण त्यासाठी नेमकं काय कारण द्यावं, हे सुचण्यापूर्वी ज्यावर हक्काने लिहू शकेन, असा विषय मला सुचला.. समर्पक शीर्षकही गवसलं आणि माझ्या सदर-लेखनाची सुरुवात झाली. ही ‘शीर्षकाची गोष्ट’ आठवताना वाटलं, वर्षभरापूर्वी स्वत:च्या गुणावगुणांचा, क्षमतेचा सारासार विचार करून सदर लिहायला मी नकार दिला असता, तर किती मोठय़ा आनंदाला मुकले असते!
गेल्या ५० वर्षांत नाटय़ व चित्रपट क्षेत्रात जे थोडंफार नाव कमावलं, त्याचा आपल्या लिखाणाने आपण बट्टय़ाबोळ करू, असं वाटून मी सुरुवातीला फार बेचैन होते, पण ज्याप्रमाणे विंगेत उभी असताना वाटणारी भीती, रंगमंचावर पाऊल टाकून प्रेक्षकांना सामोरं जाताच पळून जायची किंवा चित्रपट दिग्दर्शन करतेवेळी, ‘आपण चांगला शॉट घेऊ शकू ना?’ अशी वाटणारी काळजी, ‘स्टार्ट साऊंड-कॅमेरा-अॅक्शन’ हे शब्द उच्चारताच विरून जायची, त्याचप्रमाणे डोक्यातले शब्द कागदावर/लॅपटॉपवर उतरवायला लागताच मनातल्या शंका-कुशंका, काळज्या, भीती साऱ्या नाहीशा झाल्या.. उरला निखळ उत्साह!
लेख स्वत:च्या अनुभवांवर लिहायचे म्हटल्यावर त्यातल्या नुसत्या घटनाच नाही, तर सूर, शब्द, शैली हे सर्व माझ्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणं आवश्यक होतं. माझ्या (आणि इतरांच्या) मते माझा सर्वात मोठा स्वभावविशेष ‘बडबड’ हा असल्यामुळे, सदराचा सूर व शैली गप्पिष्ट ठेवली की, बोलण्याप्रमाणेच लिहितानाही शब्दगंगा जोमात वाहील, असा माझा अंदाज होता; पण प्रत्यक्षात तो पार फसला. नव्या सहस्रकात माझं विश्व खूप बदललं होतं. घरी, शेजारीपाजारी मराठी माणसं नव्हती. मुलीशी, बहिणींशी बोलणं फक्त कोकणीतून आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच माझे बहुतेक स्नेही निरनिराळ्या प्रांतांतले, वेगवेगळ्या धर्म-संस्कृतींतले असल्याने त्यांच्याशी इंग्रजीतून! मराठी नाटक-चित्रपटातल्या मित्रमैत्रिणींच्या जबाबदाऱ्या व मुंबईची रहदारी या दोन्हीत प्रचंड वाढ झाल्याने, त्यांना पूर्वीसारखं वारंवार भेटणंही कमी झालं होतं. अशा अनेक कारणांमुळे (माझा बोलघेवडेपणा कायम असला तरी) मराठी बोलण्याचा सराव जवळजवळ नाहीसाच झाला होता. परिणामी, लिहायला बसल्यावर शब्दगंगेला पूर येणं सोडाच, दोन वाक्यं लिहायचीदेखील मारामार झाली. विचार पक्के होते, पण योग्य शब्दच आठवेनात! कपाटात होते नव्हते ते सगळे मराठी शब्दकोश काढून हाताशी ठेवले. काही मराठी आत्मकथांवरून नजर फिरवली. शिवाय मराठीचा अॅप गुगलवरून ‘डाऊनलोड’ केला. असा शब्दसंचय करून लिहायला लागले खरी, पण लिहिलेलं वाचल्यावर मला धक्काच बसला! ना त्यातले सूर माझे होते, ना शब्द!
सुदैवाने, पूर्ण निराश होण्याआधी पूर्वीची एक सवय आठवली. ज्या काळी इंटरनेटमधून २४ तास जवळीक साधण्याची सोय नव्हती, त्या काळी दूर असलेल्या जवळच्या माणसांची फार आठवण आली की, मी मनातल्या मनात त्यांच्याशी बोलत बसे. निदान हा मार्ग उपयोगी पडतो का, ते पाहायचं ठरवलं.. वाचकाची अमूर्त प्रतिमा मनात तयार करून तिच्याशी मराठीत गप्पा मारायला लागले. सुरुवातीला कठीण गेलं, मग हळूहळू स्वत:चे वाटणारे शब्द ओघळायला लागले. लिहितालिहिता ओघ वाढत गेला; पण त्याचबरोबर हेही जाणवलं की, माझ्या वाक्यांत फार इंग्रजी शब्द असतात.. ‘मी मराठी स्टोरीज रीड करणं लाइक करते’, इतकी भेसळ जरी त्यात नसली, तरी ‘ते पुस्तक फार इम्प्रेसिव्ह होतं’ किंवा ‘त्या डिरेक्टरने अनेकांना इन्स्पायर केलं,’ असं मी बोलते आणि म्हणून तसंच लिहिते! मी इतरांच्या मानाने कितपत इंग्रजी-मिश्रित बोलते ते जोखण्यासाठी मुंबईतल्या (प्राध्यापक अथवा साहित्यिक नसलेल्या) मराठी स्नेह्य़ांना फोन लावले आणि काय सांगू, त्यातले बहुतेक जण जवळजवळ माझ्यासारखंच बोलत होते! माझी अपराधीपणाची जाणीव किंचित कमी झाली खरी, पण ‘लगोरी’चा वाचक केवळ मुंबईकर नसून तो जगात सर्वत्र (व खास करून पुणेकर) असण्याची शक्यता लक्षात आल्यावर म्हटलं, ‘अशुद्ध मराठीत लिहिणं नक्की आत्मघातकी ठरेल!’
भेसळ जमेल तितकी कमी करण्याच्या उद्देशाने, गेल्या काही वर्षांपासून माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेणाऱ्या (व रोज दुपारी मराठी वर्तमानपत्र चाळणाऱ्या) शोभाकडे मी शुद्ध मराठीत बोलण्याची तालीम सुरू केली. काही दिवस माझ्या तोंडचे ‘दूरचित्रवाणी संच, चित्रपटगृह, दूरध्वनी’ इत्यादी शब्द ऐकून घेतल्यावर ती म्हणाली, ‘‘ताई, तुम्ही टीव्ही, थेटर, फोन, असं आपल्या साध्या मराठीतून बोला. पुस्तकातल्यासारखं नका बोलू. फार विचित्र वाटतं.’’ (खरं सांगायचं तर मलाही तसंच वाटत होतं!)
स्वत:ची शैली शोधण्याची धडपड करता करता मी एक गोष्ट मनाशी पक्की केली – ‘आपण फक्त इंग्रजी शब्दच नाही, तर संस्कृतप्रचुर किंवा (मला) बोजड वाटणारे मराठी शब्ददेखील शक्यतो टाळायचे.. आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचतील अशा रीतीने, सोप्या-सरळ शब्दांत मांडायचे.’ अर्थात नाटक किंवा चित्रपटांविषयी तांत्रिक गोष्टी लिहिताना कधी कधी ते जमलं नाही, पण शक्यतो त्या निश्चयाला धरून राहिले. त्याचबरोबर, उगाच इंग्रजी शब्द न घुसडवता मराठी बोलण्याचा प्रयत्नदेखील सुरू ठेवला आणि गंमत म्हणजे, जे साधे, सुंदर शब्द पूर्वी ओळखीचे असूनही गेल्या काही वर्षांत अनोळखी झाले होते, ते पुन्हा माझ्या जाणिवांचा भाग बनले. मराठी पुन्हा आपलीशी झाली, याचं श्रेय ‘लगोरी’ला!
बालपण, रंगमंचावरचा व चित्रपटनिर्मितीचा काळ आणि समलैंगिकांच्या समस्या हे माझ्या सात दशकांतल्या आयुष्याचे काही महत्त्वाचे टप्पे. प्रत्येक टप्प्याच्या असंख्य आठवणी. त्यातून निवड करणं कठीण असलं तरी सदराच्या मर्यादा लक्षात घेता आवश्यक होतं. अखेर लहानपणीच्या वर्षांत हरवून जाण्याचा प्रचंड मोह टाळून नंतरच्या काळावरच लक्ष केंद्रित करायचं आणि जडणघडणीच्या संदर्भात आवश्यक तिथेच बालपणीचा उल्लेख करायचा ठरवलं. गेल्या सहस्राकातल्या आठवणींचं, त्यातूनही नाटकांतल्या अनुभवांचं बोचकं बांधून माळ्यावरल्या अडगळीत टाकलं होतं. ते खाली काढून त्यावरली धूळ झटकल्याबरोबर आज या दुनियेत नसलेल्या अनेक जवळच्यांचे चेहरे नजरेसमोर येऊन डोळ्यांत पाणी तरळलं, पण ‘लगोरी’साठी बनवलेल्या नियमांच्या यादीत ‘हळवेपणा टाळणे’ हे ठळक अक्षरांत असल्यामुळे ते लगेच पुसलं. तालमीत एखाद्या नाटकातला काळ उभा करावा, त्याप्रमाणे माझ्या नाटय़ाभिनयाचा काळ, त्यातले साथीदार, त्या वेळचं वातावरण हे सारं मनात जिवंत केलं.. त्यातल्या तरुण, उत्साही ‘चित्रा’नामक भूमिकेत शिरून तिचे त्या वेळचे अनुभव जगायला लागले.. ते लिहितेवेळी एखादा तपशील धूसर असल्यास कधी संहिता वाचून, कधी त्या अनुभवात सहभागी असलेल्या मित्रांना फोन करून त्रास देत, त्याची खातरजमा करून घ्यायला लागले..
चित्रपटांविषयी त्या त्या वेळी खूप छापलं गेलं होतं, बोललं गेलं होतं. तीच रेकॉर्ड पुन्हा लावण्यात मला रस नव्हता; पण प्रत्येक चित्रपटनिर्मितीच्या वेळी कॅमेऱ्यामागे घडलेल्या अनेक गमतीजमती (त्या काळी प्रत्येक गोष्टीचा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वापर करण्याची पद्धत नसल्यामुळे) आपसात राहिल्या होत्या. वाटलं, ते मजेशीर अनुभव सांगण्यासाठी ही उत्तम संधी आहे.
समलैंगिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचा आईबापांनी प्रेमाने स्वीकार करावा; सर्व घटनात्मक हक्क मिळून त्यांना मानाने जगता यावं, यासाठी मी जमेल तितकं काम करत असते. ‘लगोरी’तून या विषयावर लेख लिहिता आले व ते वाचून अनेक ओळखीच्या, तसंच अनोळखी वाचकांनी सकारात्मक प्रतिक्रिया कळवल्या याचं मला फार बरं वाटलं. प्रतिक्रिया कळवणाऱ्यांत जसे समलैंगिक मुलांचा स्वीकार केलेले नातलग होते तसेच या विषयाबद्दल कमी किंवा अजिबात माहिती नसलेले वाचकदेखील होते. विशेष करून, जेव्हा लेस्बिअन, गे इत्यादी शब्ददेखील ठाऊक नसलेल्या ८२ वर्षांच्या बाईंनी फोन करून ही माहिती मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला किंवा एका समलैंगिक मुलाने, ‘तुमच्या लेखांमुळे मला वेगळी दृष्टी मिळाली..’ असं कळवलं, तेव्हा ‘लगोरी’ लिहिल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. नाटक-चित्रपटांसाठी झालेल्या कौतुकापेक्षा, मिळालेल्या पुरस्कारांपेक्षा याचं सुख अधिक होतं.
आज २३ डिसेंबर. ही आपली या सदराची शेवटची लेखनभेट. ‘लगोरी’च्या निमित्ताने गेलं वर्षभर दर पंधरवडय़ाला आपल्याला भेटत राहिले. कित्येक वाचकांनी पहिल्या सदरापासून, वेळोवेळी प्रोत्साहन देत माझा आत्मविश्वास वाढवला, म्हणूनच हे शक्य झालं! यातून खूप काही ओंजळीत पडलं. मी लिहिण्याचा आळस झटकून टाकला; भूतकाळात शिरण्याचं, बऱ्या-वाईट जुन्या आठवणींना भिडण्याचं धाडस केलं; त्यात आपल्याला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. हे सर्व करताना मला खूप आनंद मिळाला. ‘लगोरी’ने आपल्यालाही तो दिला असेल, अशी आशा करून आपला निरोप घेते. पुन्हा कुठे ना कुठे, कधी ना कधी भेटूच..
चित्रा पालेकर
chaturang@expressindia.com
(सदर समाप्त)