‘फिल्म फोरम’ व ‘प्रभात चित्र मंडळा’त जरी मला जागतिक चित्रपटांचं बाळकडू मिळालं तरी चित्रपट कसा ‘पहावा’, याची खऱ्या अर्थाने मला दीक्षा मिळाली ती ‘इफ्फी’त! खालिद, रशिद, रफिक बगदादी, सुरेश छाब्रिया यांच्या सोबतीने मी अनवट चित्रपट पहात होते.. ब्राझिलचे हिंसात्मक चित्रपट पाहण्याचं धाडस केलं; गोदार्दच्या (मला अनेकदा अनाकलनीय वाटणाऱ्या) चित्रपटांना सामोरी गेले; इराणी, चिनी चित्रपटांचा शोध लागून थक्क झाले! बंगळूरुत जुन्या फ्रेंच चित्रपटांच्या नव्या-कोऱ्या पिंट्र्स पाहिल्यावर तर माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं!  आणि, हळूहळू का होईना, माझी चित्रपटांविषयीची समज वाढत गेली.. त्यांकडे पाहण्याची, स्वत:ची नजर मला गवसली.

‘इफ्फी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी माझं फार जुनं व (माझ्या बाजूने) आपुलकीचं नातं आहे.. १९७६ मध्ये तो मुंबईत होता, त्या वेळी ‘इफ्फी’शी माझी पहिली ओझरती ओळख झाली; पण त्याच्याशी घट्ट नातं जुळलं ते १९८२ मध्ये कोलकात्यात, जेव्हा ‘आक्रीत’ ‘पॅनोरामा’त होता, तेव्हा!

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Tejashri Pradhan has kept the Mangalsutra from Honar Soon Me Hya Gharchi serial
तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र ठेवलंय जपून, कारण सांगत म्हणाली, “माझ्या आयुष्यातली…”
A father's last advice before giving his heart to his son; A VIDEO that every father should show his coming-of-age child
“आयुष्यात पैसा, व्यसन…” मुलाला स्वत:चं हृदय देण्याआधी वडिलांचा शेवटचा सल्ला; वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावा असा VIDEO
viral video Dog tore 500 rupees notes
कुत्र्याने ५०० च्या नोटांचे केले तुकडे, VIDEO होतोय व्हायरल
Friends fun on road caused accident of one of them brutal accident video viral on social media
असा मित्र नसलेलाच बरा! भररस्त्यात मित्राचा पाठलाग केला, वेगात गाडी आली अन्…, पुढच्या क्षणी जे झालं ते धक्कादायक, पाहा VIDEO

मुंबईतल्या महोत्सवाच्या वेळी नोकरी व तालमीही दोन्ही जोरात सुरू असल्याने मी फक्त उद्घाटनाला हजर राहिले होते आणि (माझ्या आठवणीप्रमाणे) त्रुफॉ या फ्रेंच दिग्दर्शकाचा, चित्रीकरणातल्या गोंधळांवर आधारलेला ‘डे फॉर नाइट’ हा अतिशय मनोरंजक चित्रपट पाहिला होता. साहजिक, अशा महोत्सवांची व्याप्ती तेव्हा माझ्या लक्षात आली नव्हती. त्यामुळे कोलकात्यात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची प्रचंड मोठी यादी पाहिल्यावर माझं डोकं अक्षरश: गरगरलं! ‘आक्रीत’चे खेळ, मुलाखती, अनेक समारंभ-पाटर्य़ा या सर्वातून वेळ काढून मी तिथे गोदार्दच्या चित्रपटांचं सिंहावलोकन, सत्यजीत रेंचे ‘सद्गती’ व ‘पिकू’ हे अवर्णनीय लघुपट, मार्टनि स्कोस्रेझीचा ‘रेजिंग बुल’, असे तऱ्हेतऱ्हेचे चित्रपट अधाशासारखे पाहिले. त्या वर्षी ‘आक्रीत’बरोबरच अपर्णा सेन, केतन मेहता, मुझफ्फर अली, व्हिक्टर बॅनर्जी अशा अनेक दिग्दर्शकांच्या प्रथम चित्रपटांचा ‘पॅनोरामा’त समावेश असल्याने वातावरण अतिशय उत्साही होतं. त्या वेळी पाहिलेले सर्व चित्रपट आज आठवत नाहीत; पण इस्तवान झाबो या हंगेरियन दिग्दर्शकाचा, राजकारण्यांच्या लेखी कलाकारांची काय किंमत असते ते उघड करणारा ‘मेफिस्टो’ हा चित्रपट आजही लख्ख आठवतो (व त्या वेळेप्रमाणेच अस्वस्थ करतो.)

वास्तविक १९६६ पासूनच मी अनोख्या जागतिक चित्रपटांच्या प्रेमात पडले होते. ‘मरिन लाइन्स स्थानकापलीकडच्या ‘ताराबाई सभागृह’मधल्या कोंदट जागेत सुरू झालेलं ते प्रेम, पुढे (भरपावसात गावदेवीवरून दादरच्या ‘चित्रा थिएटर’ला जाऊन) व्हिट्टोरिओ ड सिकाचा ‘बायसिकल थीव्ह्ज’ पाहताना; मिक्लोस यांचो या हंगेरियन दिग्दर्शकाचा अमूर्त, सर-रिअल ‘इलेक्ट्रा, माय लव’ पाहून अवाक्  होताना, वाढत गेलं होतं; पण दिवसभर इतर कामं करून संध्याकाळी चित्रपट-मंडळातला शो (महिन्यातून दोन-तीनदा) पाहणं वेगळं आणि दिवसचे दिवस दुसरं काही न करता, सकाळपासून रात्रीपर्यंत मनसोक्त चित्रपट पाहण्याचा आनंद लुटणं वेगळं! एकदा तो अनुभव घेतल्यावर त्याचं व्यसन जडणं अटळ होतं. मात्र ‘इफ्फी’च्या त्या वेळच्या स्वरूपामुळे, हे व्यसन जोपासणं सोपं नव्हतं.

‘इफ्फी’ त्या वेळी भटक्या होता. दर वर्षी जरी तो जानेवारीच्या पहिल्या पंधरवडय़ात भरत असला तरी त्याचं ठिकाण बदलत असे. दोन वर्षांतून एकदा तो दिल्लीत येई आणि मधल्या वर्षी आळीपाळीने इतर मोठय़ा शहरांना भेट देई. दिल्लीत आंतरराष्ट्रीय चित्रपट-स्पर्धा असे, तर इतर ठिकाणी नुसताच फिल्मोत्सव असे. कुठल्याही स्वरूपाचा असला तरी माझ्या दृष्टीने ‘इफ्फी’ जगभरातल्या जुन्या-नव्या, उत्तमोत्तम चित्रपटांचा खजिना होता. यातले बहुतेक चित्रपट भारतात त्या वेळी (खरं तर आजही) प्रदर्शित होत नसल्याने (आणि इंटरनेट, डिजिटल तंत्रज्ञान इत्यादी आपल्याकडे यायला खूप अवकाश असल्याने) भारतातल्या चित्रपटप्रेमींसाठी आंतरराष्ट्रीय महोत्सव ही एकमेव संधी होती. तिचा लाभ घ्यायचा तर ‘इफ्फी’बरोबर दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, थिरुवनंतपूरम अशी भटकंती करण्याला पर्याय नव्हता. ८२च्या ‘इफ्फी’नंतर माझी वार्षिक वारी सुरू झाली.

महोत्सवासाठी चित्रपटाची निवड झाल्यास, त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दोघा-तिघांना सात दिवसांसाठी पंचतारांकित आदरातिथ्याचा लाभ मिळे. बहुतेक प्रतिनिधी कामापुरतं आठवडाभर राहून परतत; पण मला पंधराही दिवस राहून जास्तीत जास्त चित्रपट पाहणं महत्त्वाचं वाटे. त्यामुळे, आमचा चित्रपट ‘पॅनोरामा’त असला की एक आठवडा मी चनीत राहात असे आणि त्यानंतर एखाद्या स्वस्त हॉटेलमध्ये स्थलांतर करत असे. तेही न परवडल्यास, सरळ अशोक वंजारी, सुरेश जिंदल अशा दिल्लीवाल्यांच्या घरी घुसून आसरा घेतल्याचंही मला आठवतं. पुढे पूनम सक्सेना व अरुणकुमार या दाम्पत्याशी गाढ मत्री झाल्यावर मात्र माझ्या ‘दिल्ली-इफ्फी’च्या वाऱ्या अतिशय सुखाच्या झाल्या.

ज्या वर्षी आमचा स्वत:चा चित्रपट नव्हता तेव्हाही मी ‘इफ्फी’ शक्यतो चुकवला नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन या वार्षिक यात्रेत (माझ्याप्रमाणेच) नेमाने सामील होणाऱ्या चित्रपटप्रेमींशी ओळखी वाढत गेल्या. सुधीर नांदगावकर, अशोक राणे, रेखा देशपांडे, रघुवीर कुल इत्यादी मुंबईच्या माणसांना मी आधीपासून ओळखत होते; पण इतर अनेकांशी वर्षांतून एकदा, फक्त ‘इफ्फी’त भेटल्याने स्नेह जडला. यांत समांतर चळवळीशी व निरनिराळ्या देशी भाषांतल्या चित्रपटांशी संलग्न असलेले लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ; ज्येष्ठ समीक्षक तसंच नवशिके तरुण पत्रकार; निव्वळ प्रेक्षक या नात्याने चित्रपटांवर नितांत प्रेम करणारे, असे सर्व असायचे. मी गमतीत या माणसांचा ‘माय फेस्टिव्हल फ्रेंड्स’ असा उल्लेख करत असे. दिल्लीतल्या जानेवारीच्या थंडीत कुडकुडत, ‘सिरी फोर्ट’च्या हिरवळीवर उन्हात बसून गरमागरम चहाचे घोट घेत, नव्या-जुन्या स्नेहांबरोबर नुकत्या पाहिलेल्या चित्रपटावर वाद घालताना, जी मजा येई, ती औरच होती!

‘फिल्म फोरम’ व ‘प्रभात चित्र मंडळा’त जरी मला जागतिक चित्रपटांचं बाळकडू मिळालं तरी चित्रपट कसा ‘पहावा’, याची खऱ्या अर्थाने मला दीक्षा मिळाली ती ‘इफ्फी’त! महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या अगणित चित्रपटांमधून नेमके कुठले निवडावेत हे सुरुवातीला मला कळेचना. त्यावर मी एक उपाय शोधून काढला. इंग्रजी चित्रपट-समीक्षक रशिद इराणी व हिंदी चित्रपट-समीक्षक खालिद मोहम्मद यांना मी बऱ्यापैकी ओळखत होते. रशिदला जागतिक चित्रपटांचं प्रचंड वेड आहे, हे मला ठाऊक होतं. शिवाय, तो माझ्याच वयाचा आणि गोड स्वभावाचा असल्याने त्याच्याशी संवाद साधताना माझ्यावर कुठलंही दडपण येत नसे. मी रशिदला पकडलं आणि त्याने खूण करून दिलेले सिनेमे पाहण्यापासून सुरुवात केली. खालिद, रशिद, रफिक बगदादी, सुरेश छाब्रिया यांच्या सोबतीने मी अनवट चित्रपट पहात होते.. कधी त्या मंडळींना प्रश्न विचारत, तर कधी त्यांच्या आपसातल्या चर्चा ऐकत, एखादा दिग्दर्शक महत्त्वाचा का ठरतो; एखाद्या चित्रपटाला ‘पाथ-ब्रेकिंग’ का म्हटलं जातं; प्रत्येक दिग्दर्शकाची स्वत:ची वैशिष्टय़ं कुठली हे ग्रहण करत होते.. या फिल्मवेडय़ा टोळीबरोबर मी ‘सिरी फोर्ट’च्या भव्य जागेत मूठभर लोकांच्यात बसून ‘इटालिअन ऑपेरां’वरून बनवलेले चित्रपट पाहिले; ब्राझिलचे हिंसात्मक चित्रपट पाहण्याचं धाडस केलं; गोदार्दच्या (मला अनेकदा अनाकलनीय वाटणाऱ्या) चित्रपटांना सामोरी गेले; इराणी, चिनी चित्रपटांचा शोध लागून थक्क झाले! बंगळूरुत जुन्या फ्रेंच चित्रपटांच्या नव्या-कोऱ्या पिंट्र्स पाहिल्यावर तर माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं! आणि हळूहळू का होईना, माझी चित्रपटांविषयीची समज वाढत गेली.. त्यांकडे पाहण्याची स्वत:ची नजर मला गवसली.

वर्ष जाता जाता मित्रमंडळींत भर पडली. मथिली राव, दीपा गेहलोतसारख्या इंग्रजी पत्रकार घनिष्ठ मत्रिणी झाल्या. या सर्व मित्रमत्रिणींसोबत निव्वळ चित्रपट पाहाण्याचाच नाही, तर त्या त्या शहरातल्या खास खाद्यपदार्थावर ताव मारण्याचा आनंदही मला लाभला!

‘इफ्फी’ कितीही महत्त्वाचा असला तरी त्यात अनेक त्रुटीदेखील होत्या. माझ्यापुरतं बोलायचं तर, राजकारण्यांना अथवा शासकीय अधिकाऱ्यांना  दिग्दर्शकांपेक्षा हमखास अधिक मान देणाऱ्या, दिल्लीच्या ‘व्हीव्हीआयपी’ संस्कृतीचा मला अतिशय तिटकारा होता. (एकदा, ज्येष्ठ बंगाली दिग्दर्शक तपन सिन्हांच्या चित्रपटांचं सिंहावलोकन असताना, त्यांना ‘व्हीआयपी’ रांगेत बसायला न दिल्यामुळे चिडलेल्या मी व दिग्दर्शक केतन मेहताने, ‘सिक्युरिटी’वाल्यांशी भांडून त्यांना तपनदांची क्षमा मागायला लावली होती.) पण ‘इफ्फी’ची सर्वात मोठी समस्या होती, त्याचं भटकं  स्वरूप! वास्तविक, जगातला प्रत्येक चित्रपट महोत्सव (बर्लिन, कान्, व्हेनिस अशा) एकेका शहराशी निगडित असून त्या शहराच्याच नावाने ओळखला जातो.. एका ठिकाणी स्थिर असल्यास महोत्सव स्वत:चं वैशिष्टय़ निर्माण करू शकतो, ज्यामुळे त्याचं महत्त्वही वाढतं, हे सिद्ध झालं आहे. या मुद्दय़ांवर अनेक वर्ष चर्चा/वादविवाद होऊन अखेर ‘इफ्फी’त मोठा बदल करण्यात आला. २००४ पासून तो भटक्या न राहता गोव्यात स्थायिक झाला.

फ्रान्समधल्या ‘कान् महोत्सवा’चं अनुकरण करण्याच्या उद्देशाने समुद्राकाठच्या देखण्या पणजी शहरात नोव्हेंबरअखेरीस भरवल्या जाणाऱ्या ‘इफ्फी’ला ‘कान्’चा दर्जा लाभेल तेव्हा लाभो, पण चित्रपटांच्या जोडीने समुद्रकिनारा, माशाचं जेवण आणि स्वस्त बीअर यांची मजा लुटता आल्याने (माझ्याप्रमाणेच) देशी/विदेशी प्रतिनिधी इथे खुशीत असतात यात शंका नाही! पूर्वी अशा महोत्सवांना लोकप्रिय हिंदी/मराठी चित्रपटांतले स्टार्स नाकं मुरडत असले तरी ‘गोवा-इफ्फी’त त्यांना आवर्जून आणलं जात असल्याने बहुतेक गोवेकरही भारी खूश असतात! महोत्सवाच्या स्थानिक व्यवस्थापनासाठी खास निर्मिलेली ‘ईएसजी’ ही संस्था, गोव्यात (पूर्वी नसलेली) चित्रपट-संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करते, तर ‘फिल्म-बझार’, ‘लेखकांसाठी कार्यशाळा’ इत्यादी प्रकल्पांमधून ‘एनएफडीसी’, चित्रपट-निर्मिती व महोत्सव या दोन्हींचा दर्जा वाढवण्याचा! ‘इफ्फी’चं स्वरूप अजूनही बदलतंच आहे. त्याच्या यशापयशाविषयीचे वादही सुरूच आहेत. मी मात्र पूर्वीच्याच आपुलकीने, उत्साहाने इफ्फी-वारी करते.

चित्रपट पाहताना डोळे पूर्वीप्रमाणेच तृप्त होतात.. भावना उचंबळून येतात.. विचारमंथन सुरू होतं.. शिवाय, देश, धर्म, भाषा, संस्कृती अशा सर्व बाबतीत आपल्याहून भिन्न असलेली माणसं आतून कशी आपल्यासारखीच असतात, हेही पुन:पुन्हा जाणवतं..

चित्रा पालेकर chaturang@expressindia.com

Story img Loader