पावसाळा खूप लांबत गेल्यामुळे ‘मातीमाय’चं चित्रीकरण ऑक्टोबरऐवजी फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलावं लागलं खरं, पण नंदिता दास, अतुल कुलकर्णीपासून गावकऱ्यांपर्यंत सर्वाच्या सहकार्यामुळे, ते नव्या वेळापत्रकानुसार व्यवस्थित सुरू झालं. छायाचित्रकार देबू देवधर, कार्यकारी निर्माता विजय शिर्के, सह-दिग्दर्शिका अरुंधती चट्टोपाध्याय, ध्वनिमुद्रक नील चट्टोपाध्याय, निर्मितीप्रमुख मंदार पटवर्धन व सल्लागार शशांक शंकर हे माझे सहकारी निर्धास्त होऊन चित्रीकरणात दंग झाले. स्वतंत्र दिग्दर्शनाची पहिलीच वेळ असल्याची धाकधूक माझ्या मनातून सुरुवातीच्या एकदोन दिवसांतच नाहीशी झाली होती. काम पंधरा दिवस आखणीप्रमाणे पार पडल्यावर तर मी स्वत:च्या नेतृत्वावर (मनातल्या मनात) फारच खूश झाले आणि तेवढय़ात, निसर्गाने (बहुधा माझा स्व-संतुष्टपणा कमी करण्याच्या उद्देशाने) आमच्या समोर आव्हानं उभी करायला सुरुवात केली.
चित्रपटाच्या अखेरीस, ‘लुटारूंनी रेलगाडी अडवण्यासाठी रुळांवर टाकलेले ओंडके हटवण्याचा चंडी प्रयत्न करते’, असा प्रसंग आहे. अमरावतीपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या जुन्या, नॅरो गेज रुळांवर तो चित्रित करण्यासाठी आम्ही खूप मोठे शुल्क भरून मुंबईच्या रेल्वे कार्यालयातून परवानगी मिळवली होती. दृश्य रात्रीचं होतं. अंधार पडताच काम सुरू झालं. परवानगी केवळ मध्यरात्रीपर्यंतच असल्याने तोवर चित्रीकरण न आटोपल्यास पुन्हा पूर्ण दिवसाचे पैसे भरावे लागले असते, जे परवडणं अशक्य होतं. अर्ध दृश्य उरकतंय तोच, फेब्रुवारीत तिथल्या भागात कधी न फिरकणाऱ्या पावसाने अचानक आगमन करून आम्हाला जबरदस्त धक्का दिला. आजूबाजूला केवळ गर्द जंगल होतं. आश्रय घेण्यासारखी जागा कुठेच नव्हती. तेवढय़ात दीपक अंजारिया व रमेश शेळके या चित्रांकन-साहाय्यकांनी कॅमेरा, दिवे इत्यादी सामग्री झाकण्यासाठी जवळ ठेवलेलं भलंमोठं प्लास्टिक पटापट झाडांना बांधून छप्पर बनवलं. कमीतकमी पाऊण तास पाऊस पडत राहिला, पण चमूतल्या सर्वाबरोबर प्लास्टिकखाली आसरा घेऊन हास्यविनोद करत गाण्यांच्या भेंडय़ा खेळताना, चित्रीकरण वेळेवर न संपण्याची माझी भीती नाहीशीच झाली! आणि त्यामुळे कदाचित, चित्रीकरण वेळेवर संपलं!
काही दिवसांनी, ‘नरसूसकट सर्व गावकरी चंडीला हडळ ठरवतात’, या दृश्याचं ओहळा-जटेश्वर गावात रात्री चित्रीकरण होतं. त्या भागात पाच-सहा दिवसांपासून काम चालू असल्याने गावकरी आम्हाला चांगलं ओळखत होते. संध्याकाळी पोचून आम्ही तयारी सुरू करताक्षणी सर्व जमा झाले.. मुलं आमच्या नकला करत, ‘‘टेऽऽऽकिंग.. कऽऽट.’’ असं ओरडत अवतीभवती धावायला लागली. मी थोडं लांब झाडाखाली बसून माझ्या टिपणांवरून नजर टाकत होते. तेवढय़ात वारा सुरू झाला.. हां हां म्हणता वाऱ्याचा वेग प्रचंड वाढून संपूर्ण आसमंत धुळीने व्यापून गेला. कुणीतरी मला तिथून कसंबसं जवळच्या देवळात नेलं. गावकऱ्यांनी व आमच्यातल्या बहुतेकांनी तिथे आसरा घेतला होता. अचानक आलेल्या धुळीच्या वादळामुळे सारे चक्रावून गेले होते. मी व माझी बहीण अरुंधती एकमेकींचे हात घट्ट पकडून वादळ शमण्याची वाट पाहत देवळाच्या पायरीवर बसून राहिलो. तितक्यात पलीकडून अतिशय मोठा आवाज आला. चित्रीकरण-सामग्री ठेवलेल्या जागेवर एक मोठं झाड कोसळलं होतं! सामग्री सांभाळणारा माणूस अत्यंत चलाखीने कॅमेरा उचलून बाजूला पळाला नसता तर कॅमेऱ्याचा चक्काचूर झाला असता, या विचाराने मी अक्षरश: बधिर झाले. आमच्यावरल्या संकटाचं निवारण व्हावं यासाठी गावकऱ्यांनी भजन सुरू केल्यावर मात्र त्यांची आत्मीयता पाहून माझे डोळे पाणावले.
वादळ ओसरल्यावर चित्रीकरण स्थळावर तुटलेल्या फांद्यांचा प्रचंड खच पडलेला दिसला. तो हलवून पहिल्या ‘शॉट’ची प्रकाशयोजना सुरू केल्या केल्या पाऊस यायला लागला व थोडय़ाच वेळात सर्वत्र पाणी साचलं. अखेर, त्या रात्रीचं चित्रीकरण रद्द करून दोन दिवस पुढे ढकलावं लागलं. आमचा निर्णय होईस्तोवर सर्व कलाकार व साहाय्यक देवळापाशी थांबले होते. तिथे पोचून पाहतो तर, समोरच्या मैदानात सर्व गाडय़ा गोलाकार उभ्या असून, त्यामधली मोकळी जागा ‘हेडलाइट्स’नी उजळली होती. एका गाडीतून लावणीची कॅसेट ऐकू येत होती आणि मधोमध नंदिता चंडीच्या वेशात लावणीनृत्य करत होती! एका क्षणात निराशा विसरून मी, अरुंधती नृत्यात सामील झालो.. देबू गायला लागला.. काहींनी गाडय़ांवर ताल धरला.. इतर लोक सभोवार उभं राहून टाळ्या वाजवायला लागले. आमच्याकडे पाहून, थोडय़ा वेळापूर्वी आम्ही अतिशय तणावपूर्ण प्रसंगांचा सामना करत होतो, हे खरं वाटलं नसतं!
निसर्गाने दोनदा घेतलेल्या परीक्षेत आम्ही धमाल करत उत्तीर्ण झाल्यामुळे तो बहुधा आमच्यावर खूश झाला असावा. चित्रपटाचं अखेरचं चित्रीकरण संपवून चिखलदऱ्याहून निघताना, निरोपादाखल एक अनपेक्षित भेट आम्हाला निसर्गाकडून मिळाली.. गारांच्या पावसाची! संपूर्ण परिसर शुभ्र गारांनी आच्छादला गेला.. आमची गाडी चिखलदऱ्यातल्या घाटाऐवजी लडाखच्या बर्फाळ डोंगरांमधून जात असल्याचा भास व्हायला लागला.
मुंबईला परतल्यावर संकलक हेमंती सरकार, तसंच ध्वनिमुद्रक विजय भोपे व नील चट्टोपाध्यायसह ‘मातीमाय’चे पुढले टप्पे बिनघोर पार पडत गेले. भास्कर चंदावरकरांनी संगीत देतादेताच चित्रपट संगीताविषयी अतिमोलाची शिकवणही मला दिली. शिर्के, शशांक, अरुंधती पाठीशी भक्कमपणे उभे राहून, डोळ्यांत तेल घालून प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवत असल्याने ना माझ्यावर कधी ताण आला, ना कधी माझी ऊर्जा ओसरली!
संकलन संपून ध्वनीचं काम सुरू असताना अचानक उमा डिकुन्हा या घनिष्ठ मैत्रिणीचा फोन आला. ‘‘कॅमेरॉन बेली ‘टोरॉण्टो फिल्म फेस्टिव्हल’साठी चित्रपटांची निवड करण्याच्या उद्देशाने मुंबईत आले असून त्यांना ‘मातीमाय’ पाहायचा आहे’’, असं तिने सांगितल्यावर मी चकित! चित्रपट पूर्ण करण्यावरच सर्व लक्ष केंद्रित असल्यामुळे महोत्सवांचा विचारही मी तोवर केला नव्हता. चित्रपट कुठल्या टप्प्यावर आहे, हे मी समजावल्यावरही उमाचा आग्रह कायम राहिला. ‘‘कॅमेरॉनला संस्कार पूर्ण होण्याआधी चित्रपट पाहायची सवय आहे.’’ असं म्हणून, माझ्या का-कूं करण्याकडे दुर्लक्ष करत ती त्यांना घरी घेऊन आली. माझ्या अभ्यासिकेतल्या अडगळीत दोघांना बसवून संगणकावर ‘मातीमाय’ दाखवताना पहिल्यापासून शेवटपर्यंत कॅमेऱ्याची खरखर ऐकू येत होती. ‘सब-टायटल्स’ नसल्यामुळे, मी व अरुंधती आळीपाळीने मराठी संवादांचं तिथल्या तिथं, जमेल तसं इंग्रजीत भाषांतर करत होतो. संगीत कुठल्या जागी असेल ते मी दर्शवत होते. चित्रपट संपल्यावर काम कधी पूर्ण होईल याची त्यांनी चौकशी केली. त्यानंतर आम्ही दोघी अभ्यासिकेबाहेर गेलो व विचित्र पद्धतीत दाखवलेला, अपूर्णावस्थेतला चित्रपट निवडला जाण्याची शक्यता नाही याची खात्री असूनही, दिवाणखान्यात नखं चावत बसलो. थोडय़ा वेळाने बाहेर येऊन, चित्रपटाविषयी काहीही न बोलता आमचा निरोप घेऊन बेली निघून गेले. आणि दरवाजा बंद झाल्याक्षणी, मला निराशेचा उसासा टाकण्याची संधी न देता उमा किंचाळली, ‘‘वाइन काढ! कॅमेरॉनला ‘मातीमाय’ अतिशय आवडला. त्याने तो ‘डिस्कव्हरी’ (प्रथम दिग्दर्शन) या महत्त्वाच्या विभागासाठी निवडलाय.’’ (अर्थात अधिकृत निवड पूर्णावस्थेतली डीव्हीडी पाठवल्यानंतरच झाली!)
टोरॉण्टोतला ‘मातीमाय’चा जागतिक ‘प्रीमिअर’ उरकून मी परतल्यावर, एका बाजूला (मुक्ता राजाध्यक्षने बनवलेल्या) ‘सब-टायटल्स’सकट तो चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याची तयारी सुरू झाली, तर दुसऱ्या बाजूला देश-विदेशातल्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून आमंत्रणं आल्यामुळे माझ्या सतत परदेशवाऱ्या व्हायला लागल्या. वास्तविक यापूर्वीदेखील मी कित्येकदा चित्रपट महोत्सवांसाठी परदेशी गेले होते. मात्र, दिग्दर्शिका या नात्याने चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी पेलत स्वतंत्रपणे जाण्याची, जगभरातल्या पत्रकारांना मुलाखती देण्याची, मोठमोठय़ा आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांबरोबर संवाद साधण्याची, वेगवेगळ्या संस्कृतींतल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची, (आणि साठीत पाऊल टाकल्याचं विसरत रात्री पाटर्य़ाना एकटीने जाऊन तरुण-तरुणींबरोबर त्यांच्याइतक्याच उत्साहाने नाचत मजा करण्याची) माझी पहिलीच वेळ होती.
देशातल्या तसंच परदेशातल्या प्रेक्षकांकडून व टीकाकारांकडून ‘मातीमाय’वर कल्पनेपलीकडे कौतुकाचा वर्षांव झाला. चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. असा आनंदोत्सव सुरू असला तरी महाश्वेतादेवींनी मात्र ‘मातीमाय’विषयी काहीच कळवलं नव्हतं. चित्रपट पूर्ण झाल्याचं फोनवर सांगितल्यावर, ‘‘मला दाखवण्यासाठी कोलकात्याला ये-जा करून पैसे व वेळ वाया घालवण्याऐवजी तू डीव्हीडी पाठव. मी माझ्या सोयीनुसार पाहीन.’’ असं त्यांनी बजावल्यामुळे मी लगेच एक डीव्हीडी त्यांच्याकडे पाठवली होती. पण चारपाच महिने उलटले तरी त्यांची प्रतिक्रिया न मिळाल्याने मी अस्वस्थ झाले. माझ्यासाठी त्यांचा अभिप्राय अत्यंत (जगभरच्या कौतुक व पुरस्कारांहूनही अधिक) महत्त्वाचा होता. पत्र पाठवून चौकशी करावी की फोन करावा या विचारात मी असताना एका रात्री ११ वाजता अचानक त्यांचाच फोन आला, ‘‘मी दीदी.. आत्ताच माझ्या काही सहकाऱ्यांबरोबर मी ‘मातीमाय’ पाहिला आणि तो संपल्या संपल्या तुला फोन केला. माझ्या साहित्यावर बरेच चित्रपट बनलेत, पण तुझा मला सर्वात जास्त आवडला.’’ मी अवाक् होऊन ऐकत होते. तितक्यात त्या पुढे म्हणाल्या, ‘‘बेटा, तुझे पैसे परत आले का? तुला माझ्याकडून काही मदत हवी का?’’
मला सांगायचं होतं, ‘‘दीदी, तुमच्या ‘बायेन’ने, या ‘मातीमाय’ने, माझं हरवलेलं ‘मी’पण मला पुन्हा मिळवून दिलं. ते आता आयुष्यभर कामी येईल. याहून अधिक काय हवं..?’’ पण त्यांचे शब्द ऐकून गहिवरलेल्या माझ्या तोंडून शब्द फुटेना!
चित्रा पालेकर
chaturang@expressindia.com