एक दिवस बोलता-बोलता अमोलनं स्वत:चं छुपं स्वप्न माझ्यापाशी उघड केलं.. चित्रपट दिग्दर्शित करण्याचं! मुख्य धारेचा नाही, वेगळा.. अर्थपूर्ण! तोपर्यंत अशा चित्रपटांचं मला वेड लागल्यामुळे, त्यासाठी काय वाट्टेल ती मदत करण्याचा मी तत्क्षणी निर्धार केला! अमोलचं स्वप्न पूर्ण होणं, हे नकळत माझं स्वप्न बनलं.. स्वप्न आणि वास्तव या लेखाचा हा भाग पहिला.

मी व अमोल प्रथम भेटलो तेव्हा तारुण्याच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या बहुतेकांप्रमाणे आम्हा दोघांचीही आपापली स्वतंत्र स्वप्नं होती. पुढे मैत्री घनिष्ठ होत गेल्यावर, झेवियर्स कॉलेज कँटीनच्या पाठी (मुलामुलींनी गुलुगुलु बोलत बसण्यासाठी) असलेल्या बाकावर टेकून एक कोकाकोला दोघांत मिळून पिताना; धो धो पावसात मरिन ड्राइव्हवरच्या भिंतीवर आदळणाऱ्या उंच लाटांच्या फवाऱ्यात भिजत फिरताना, गिरगाव चौपाटीवरच्या वाळूशी खेळत सूर्यास्त पाहताना ती स्वप्नं आम्ही एकमेकांना सांगायला लागलो. आणि एकमेकांची स्वप्नं पुरी करण्यासाठी ‘मावळत्या सूर्याच्या साक्षीने’ वचनबद्ध होऊ  लागलो.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Loksatta chaturang bhaybhyti Fear Fear Sound Bhutan Sikkim Tourism
‘भय’भूती : भीतिध्वनी
Tejashri Pradhan has kept the Mangalsutra from Honar Soon Me Hya Gharchi serial
तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र ठेवलंय जपून, कारण सांगत म्हणाली, “माझ्या आयुष्यातली…”
Success Story Of Junaid Ahmad In Marathi
Success Story Of Junaid Ahmad : अनेक वेळा अपयश येऊनही पूर्ण केलं आयएएस होण्याचं स्वप्न; वाचा, जुनैद अहमद यांची गोष्ट
Loksatta career Father daughter pet lovers
चौकट मोडताना: मुलीचे प्राणिप्रेम आणि वडिलांचे कौतुक

प्रायोगिक रंगभूमीवर चमचमण्याची आकांक्षा माझ्यात उगवायला तेव्हा वर्षभराचा अवकाश होता आणि मला (आताप्रमाणेच!) अति गोष्टीत रस असल्यामुळे नेमक्या कुठल्या स्वप्नाची कास धरावी याविषयी मनात गोंधळ होता. उच्चशिक्षण पूर्ण करून प्राध्यापक व्हायचं, एवढंच काय ते निश्चित होतं. याउलट अमोलच्या मनात आपल्याला कोण व्हायचंय, कुठे पोहोचायचंय याविषयी मुळीच संदेह नव्हता. जे.जे. कला महाविद्यालयात शिक्षण घेऊन, अर्थार्जनाची शक्यता कमी असतानाही चित्रकार होण्याचा निर्णय त्याने घेतला होता. स्वत:च्या चित्रांचं स्वतंत्र प्रदर्शन भरवणं हे त्याचं मोठं स्वप्न होतं (जे पुढे माझ्या आईवडिलांचे स्नेही प्रख्यात चित्रकार ‘आरां’मुळे पूर्णही झालं!) हळूहळू स्वत:च्या आकांक्षा-अपेक्षा दुसऱ्याला सांगता सांगता, लग्नसंसाराची स्वप्नं आम्ही जोडीने पाहायला लागलो.. जुन्या-नव्या साऱ्या मनीषा पूर्ण करण्यासाठी कधी एकेकटय़ाने तर कधी एकत्र धडपडायला लागलो.

आमची ओळख होण्याआधीपासूनच अमोल ‘फिल्म-फोरम’ या चित्रपट-मंडळाचा सभासद होता. याउलट माझ्या तोवरच्या आयुष्यात चित्रपटांना फारसं स्थान नव्हतं. ‘ताराबाई सभागृहा’मध्ये ‘फिल्म-फोरम’ने आयोजित केलेले जागतिक चित्रपट पाहणं आमच्या ‘डेटिंग’चा भाग बनला आणि हळूहळू हे अभिजात चित्रपट माझा मानस व्यापत गेले. अर्थात त्यावेळी माझी स्वत:ची चित्रपटविषयक महत्त्वाकांक्षा सुजाण प्रेक्षक असण्यापुरतीच होती व अमोलचीही तितपतच असेल, असं मी गृहीत धरलं होतं. पण एक दिवस बोलता-बोलता त्याने स्वत:चं छुपं स्वप्न माझ्यापाशी उघड केलं.. चित्रपट दिग्दर्शित करण्याचं! मुख्य धारेचा नाही, वेगळा.. अर्थपूर्ण! तोपर्यंत अशा चित्रपटांचं मलाही वेड लागल्यामुळे, ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय वाट्टेल ती मदत करण्याचा मी तत्क्षणी निर्धार केला! अमोलचं स्वप्न पूर्ण होणं, हे नकळत माझं स्वप्न बनलं!

गमतीची गोष्ट म्हणजे चित्रपट बनवण्याची मनीषा बाळगणारे आम्ही ज्या काळात प्रायोगिक रंगभूमीकडे वळलो, त्याच काळात गिरीश कर्नाड, सत्यदेव दुबे, विजय तेंडुलकर, जब्बार पटेल यांच्यासारख्या भारतीय रंगभूमीवर नावाजलेल्या अनेक व्यक्ती चित्रपटांकडे वळत होत्या. खूप ओळखीची माणसं चित्रपट बनवताहेत, शिवाय दिग्दर्शक म्हणून अमोल रंगभूमीवर नाव कमवत आहे, तेव्हा तोही चित्रपट-दिग्दर्शक लवकरच होईल, असं मला खात्रीपूर्वक वाटत असताना अचानक आमच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली! अमोलने गंमत म्हणून काम केलेला ‘रजनीगंधा’ चित्रपट ‘हिट’ झाला आणि अ‍ॅलिसच्या वंडरलँडसारख्या उलटय़ापालटय़ा अशा हिंदी चित्रपटांच्या दुनियेत वावरताना, समांतर चित्रपट बनवण्याची माझी आशा खचायला लागली आणि पुन्हा एक अघटित घडलं! बंगळुरूमधलं कुठलंसं चित्रीकरण संपल्यावर अमोल परतला तो अतिशय आनंदाची बातमी घेऊन! तिथल्या तंत्रज्ञांनी त्याला चक्क ‘आगंतुक’ नावाचा कानडी-हिंदी असा द्विभाषीय चित्रपट दिग्दर्शित करण्याविषयी विचारलं होतं. कथा, पटकथा, चित्रीकरण इत्यादी तांत्रिक बाबी ते सांभाळणार होते, शिवाय त्यांनी निर्माताही मिळवला होता.

‘आगंतुक’ची कथा नावीन्यपूर्ण, तसंच कलेसंबंधीच्या नैतिक प्रश्नांना स्पर्श करणारी होती- कर्नाटकच्या अरण्यात वन्य श्वापदांचे फोटो काढण्यासाठी परदेशी छायाचित्रकार येतो. जंगलात हत्तीची देखभाल करणारा एक मुकाबहिरा आदिवासी तरुण व त्याची जोडीदारीण हे त्याचे वाटाडे म्हणून काम करतात. जनावरांचा मागोवा घेत तिघं फिरत असताना नरभक्षक वाघ तरुणावर झडप घालतो, त्यावेळी बंदूक उचलून तरुणाला वाचवण्याऐवजी तो छायाचित्रकार कॅमेरा उचलून त्या व्याघ्रहल्ल्याचे ‘दुर्मीळ’ फोटो काढतो आणि प्रसिद्धी मिळवतो! आदिवासी तरुणाची भूमिका अमोल स्वत: करणार होता. छायाचित्रकारासाठी टॉम ऑल्टर व वन-अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी ज्येष्ठ मराठी अभिनेते दत्ता भट यांनी होकार दिला. राहता राहिली आदिवासी मुलीची भूमिका! ‘‘ती तू करायचीस’’, असं अमोलनं म्हटल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला! दहा वर्षांपासून मी प्रायोगिक नाटकांत बरा अभिनय करते, अशी माझी समजूत असली तरी आरशात स्वत:कडे पाहिल्यावर आपण शबाना आझमी अथवा स्मिता पाटील नाही, हे न कळण्याइतकी मूर्ख नसल्यानं मी चित्रपटात भूमिका करण्याची महत्त्वाकांक्षा कधी बाळगली नव्हती. पण खरं सांगते, पडद्यावर चमकण्याच्या विचाराने मनाला थोडय़ाशा गुदगुल्या झाल्याच!

हिंदी भाषांतरासाठी मंगेश कुलकर्णी, दिग्दर्शन साहाय्यासाठी दिलीप कुलकर्णी, प्रमोद फडके, नीरा आडारकर या आमच्या नाटकवाल्या मित्रमंडळींना सोबत घेऊन पहिलावहिला चित्रपट बनवण्यासाठी आम्ही निघालो. अमोल सोडल्यास आमच्यापैकी कुणालाही चित्रपट कसा बनतो, याची प्रत्यक्षात माहिती नव्हती. वास्तविक, अमोल काम करत असलेल्या चित्रपटांच्या सेट्सवर मी अनेकदा जात असे, पण निव्वळ पाहुणी म्हणून! त्यावेळी कुणाला अडथळा होणार नाही याची काळजी घेत, लांबवर भल्यामोठय़ा पंख्याखाली आरामखुर्चीत बसून शीतपेय पिताना, चित्रीकरण म्हणजे प्रचंड धावपळ व आरडाओरडा सोडून आणखी काय असतं, हे कळणं अशक्यच! – चित्रीकरणाच्या तंत्राविषयी आम्ही अनभिज्ञ होतो खरे, पण तारुण्यातला बिनधास्तपणा, नवनवीन आव्हानं स्वीकारण्याची धमक व प्रचंड आत्मविश्वास असल्यावर आणखी काय हवं?

एखाद्या साहसी सफरीवर जाण्याच्या उत्साहात आमचा चमू म्हैसूरपासून पाच-सहा तासांच्या अंतरावर असलेल्या काबिनी नदीच्या परिसरातील दाट जंगलात पोचला. आमची सोय वनखात्याच्या छोटय़ा जागेत होती. पोहोचताक्षणी, ‘‘रात्री घराजवळ हिंस्त्र श्वापदे फिरकतात. अंधारात बाहेर गेल्यास धोका आहे’’, अशा ‘प्रेमळ’ शब्दांनी आमचं स्वागत झालं. आणि साधं खुट्टं झालं की मला वाघ आलाय असं वाटायला लागलं. पहिल्या दिवशी सर्वजण पाय मोकळे करायला निघालो असता, समोरून पानांची जोरदार सळसळ ऐकू आली. हत्तींचा कळप आला असं वाटून उलटय़ा दिशेने पळणार इतक्यात आवाज वाऱ्याचा असल्याचं लक्षात येऊन आम्ही हसत सुटलो! पहाटे घराभोवती खऱ्याखुऱ्या वाघाच्या खुणा आढळल्यावर मात्र मस्करीचा मूड किंचित ओसरला. दुसऱ्या दिवशी जुनाट अम्बॅसिडरमधून चित्रीकरणासाठी स्थळं शोधत फिरताना एक नाला ओलांडताच नवजात पिल्लाला राखत असलेली हत्तीण नजरेस पडली. आमची चाहूल लागल्याबरोबर त्या महाकाय मातेने मोठा चीत्कार करून पुढे जाण्यास मनाई केली. चालकाने चटकन गाडी मागे घेऊन नाल्यात उतरवली, पण तळाशी पोचल्यावर ती पलीकडे चढेना. हत्तिणीने दुसऱ्यांदा चीत्कार करताच आमच्या तोंडचं पाणी पळालं. (स्त्री-शक्तीवर विश्वास नसलेल्या) चालकाने लगेच सगळ्या पुरुषांना उतरवलं आणि मला-नीराला घेऊन गाडी कशीबशी उतारावरून चढवली. सुदैवाने पुरुषही धावत धडपडत वर येऊन पोचले.. चित्रपट सुरू होण्यापूर्वीच त्याचा ‘दी एण्ड’ व्हायची वेळ आली नाही! चित्रीकरण सुरू झाल्यावर अभिनयाचा पूर्वानुभव बाजूला सारून, ‘‘चेहरा साडेतीन इंच डावीकडे वळव’’, ‘‘अडीच पावलं चालून थांब.’’ अशा गणिती सूचना पाळत कॅमेऱ्याशी नातं जोडण्याचा मी प्रयत्न करत राहिले. आम्हा नवशिक्यांचा उत्साह, अमोलचा आत्मविश्वास, भटसाहेब व टॉमचं सहकार्य यांच्या बळावर चित्रीकरणाचा पहिला टप्पा व्यवस्थित पार पडला.

पावसाळ्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी आम्ही अधिक जोशात परतलो. ‘‘रंगमंचावर वावरताना येणारी मजा कॅमेऱ्यासमोर तुकडय़ातुकडय़ांनी शॉट्स देताना येत नाही बुवा!’’ इत्यादी स्वत:च्या तक्रारी सोयीस्करपणे विसरून पुढील चित्रीकरणासाठी मी अधिर होते. यावेळी राहायची सोय काबिनी नदीकाठच्या, ब्रिटिश जमान्यातल्या प्रशस्त बंगल्यावर असून खाण्यापिण्याची चंगळ होती. मात्र, काही दिवस मजेत काम झाल्यावर जेवणातले पदार्थ हळूहळू कमी व्हायला लागले. सर्वानी त्यावर विनोद केले, पण माझ्या मनात पाल चुकचुकली. नंतर दोनचार दिवस चित्रीकरण झालंच नाही. अखेर अमोलनं सांगितलं की निर्मात्याने पैसे न पाठवल्यामुळे तंत्रज्ञांनी चित्रीकरण रद्द करून परतण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळेल त्या गाडीत कोंबून लगेच निघाल्यामुळे जंगलात अडकून न पडता आम्ही कसेबसे बंगळुरूला पोचलो. पण तिथे, ‘‘आपला मोबदला व परतीची तिकिटे आत्ता आणून देतो’’ असं सांगून गेलेला निर्मात्याचा माणूस अदृश्यच झाला! सर्वात मिळून हॉटेलच्या काय, जेवणाच्या बिलासाठीदेखील पैसे नसल्यामुळे भांडी घासायची वेळ आली असं वाटलं! अखेर अमोलच्या ओळखीतल्या व्यक्तीच्या साहाय्याने एकदाचे मुंबईला परतलो.

‘आगंतुक’चं चित्रीकरण कायमचं बंद पडलं. चित्रपट-निर्मितीच्या अद्भूतरम्य स्वप्नात तरंगणाऱ्या माझे डोळे उघडले जाऊन मला प्रथमच त्यामागच्या रखरखीत वास्तवाची जाणीव झाली, पण चित्रपट बनवण्याची उत्कट इच्छा ओसरली नाही. उलट या अनुभवानंतर, आता पुन्हा संधी मिळून अमोल चित्रपट-दिग्दर्शक होईलच, हा माझा विश्वास अधिक ठाम झाला.

चित्रा पालेकर

chaturang@expressindia.com

 

Story img Loader