डॉ. नंदू मुलमुले

संसारासाठी आयुष्यभर राबणाऱ्या गृहिणीनं साथ सोडल्यानंतर तिने आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव होते. आयुष्य निघून गेलं तरी तिचं साधं कौतुकही केलं नाही, हा सल मनात राहतो. विश्वासरावांच्या बाबतीतही असंच घडलं आणि यातूनच त्यांना सापडला चुकांचा स्वीकार करण्याचा मार्ग. नेमका काय आहे तो?

माणूस एकदाच जन्म घेतो खरा, पण आयुष्यभरात विविध अनुभवांतून टप्प्याटप्प्यानं नवा नवा जन्म घेतच राहतो. तसाच तो एका क्षणी मृत्यू पावत नाही, पायरीपायरीनं विझत जातो. आयुष्यात आपण कुणाला दुखावलं का? कुटुंबाला, आपल्याच माणसांना प्रेम, वैभव देण्यात कमी पडलो का? असे प्रश्न आयुष्याच्या शेवटी पश्चात्तापाचे कढ येऊन त्रास देत राहतात.

पत्नीच्या वियोगानं विश्वासरावांची तशीच अवस्था झाली. खरं तर चौसष्ट हे काही जाण्याचं वय नाही, पण मंगलाताई गेल्या. तब्बल बारा वर्षांपूर्वी त्यांना छातीत दुखण्याचा त्रास झाला तेव्हाच डॉक्टरांनी मंगलाताईंचं हृदय कमकुवत झाल्याचा इशारा दिला होता. मंगलाताई विदर्भातल्या एका लहान गावातल्या. जेमतेम बीएची पदवी हाती पडली आणि त्यांचं लग्न झालं ते गावातल्याच विश्वाससोबत, मात्र त्याच्या नोकरीनिमित्त जाऊन पोचल्या थेट अंबरनाथला. ४४ वर्षांचा संसार, नेटका आणि उत्साहानं साजरा केला. ज्या दिवशी गेल्या त्या दिवशीही त्यांनी संध्याकाळी देवापुढं दिवा लावला, स्तोत्र म्हटलं, जरा पडते म्हणाल्या आणि झोपेतच गेल्या. रोहिणी आणि सुशांत ही दोन्ही मुलं त्यांच्या त्यांच्या घरी होती. रोहिणी गावातच सासरी आणि सुशांत बायकोसह बंगळुरुला. घरी एकटेच विश्वासराव. त्यांनी तातडीनं डॉक्टरांना फोन केला. दरम्यान रोहिणी आणि तिचा नवरा धावत आले, पण तोवर सारं संपलं होतं.

हेही वाचा – बुद्धिबळाची ‘राणी’

पुढले पंधरा दिवस घरात अनेक आप्तेष्टांचा वावर. सारे विधी यथासांग पार पडले. चंदनफुलांचा हार घातलेली मंगलाताईंची छायाचौकट बैठकीतल्या काचेच्या कपाटावर विराजमान झाली. सगळे पूर्ववत व्हायला २०-२५ दिवस लागले. तोवर येणाऱ्या प्रत्येकासमोर मंगलाताईंच्या प्रकृतीचा, अंतिम दिवसाच्या दिनचर्येचा, अंतिम क्षणांचा तपशील विश्वासरावांनी इतक्या वेळा सांगितला की, शेवटी रोहिणी म्हणाली, ‘‘बाबा तुम्ही रेकॉर्ड करून घ्या सारं आणि ऐकवत जा, नाही तर तुमचा घसा दुखेल आणि तब्येत बिघडवून घ्याल.’’ सूनबाईला हेच सुचवायचे होते. ती आठ दिवसांतच कंटाळली होती. बरं झालं नणंदेचे कान किटले आणि तिने बोलून टाकलं.

जयंतराव विश्वासरावांचे जिवलग स्नेही. एका नावाजलेल्या कंपनीतून निवृत्त झालेले जनसंपर्क अधिकारी. बोलण्यानं मन मोकळं होतं हे त्यांना समजत होतं, पण आपल्या मित्राचा शोक हा अति होतोय याची त्यांनाही जाणीव झाली. सुदैवाने येणारे कमी होत गेले आणि विश्वासरावांचं शोकप्रस्तावाला उत्तर देणं कमी होत गेलं, पण तात्पुरतंच. आता ते दर चार दिवसांनी रोहिणीला फोन करून बोलावू लागले. मंगलाताईंचे जुने फोटो, पत्रं, फुटकळ काहीतरी लिहिलेलं शोधून दाखवू लागले. ‘‘बघ तुझी आई किती छान लिहायची, तिचं हस्ताक्षर बघ किती दाणेदार होतं. तिने सारी पत्रे किती जपून ठेवली होती. एक ना दोन. रोहिणीला आपल्या वडिलांची मन:स्थिती समजत होती, पण हे जरा अति होतंय याची तिला जाणीव होऊ लागली होती.

‘‘आपण तिच्या लेखांचं एखादं पुस्तक काढू या का? खूप छान लिहीत होती तुझी आई. तिची पत्रेही पुस्तकात टाकू’’, वडिलांच्या सूचनेवर काय बोलावं हे तिला कळेना. ‘‘बाबा या त्रोटक दोन-चार लेखांचं पुस्तक कसं होणार? आणि पत्रं खासगी आहेत, ती कशाला छापायची? काका, तुम्ही सांगा ना बाबांना काही’’, तिने जयंतरावांना गळ घातली.

जनसंपर्क विभाग सांभाळलेल्या जयंतरावांना माणसाच्या मानसिकतेचं थोडंबहुत ज्ञान होतं. ‘‘विश्वास, या वयात पत्नी वियोगाचं दु:ख मी समजू शकतो. पण आपापल्या संसारात रमलेल्या मुलांना कशाला खेचतो तू यात? त्यांनाही आई गमावल्याचं दु:ख आहे, पण माणूस चोवीस तास दु:ख करीत बसला तर ते योग्य होईल का?’’

‘‘त्यांच्यापुढं भविष्य आहे जयंता, माझ्यापुढं काय? पदोपदी तिची आठवण येते. सकाळी चहा घेताना, पूजेसाठी बागेतली फुले तोडताना, कपडे वाळत घालताना,’’ म्हणत विश्वासराव हतबल झाल्यासारखे पायरीवर बसले. आता त्यांनी नवा उद्याोग सुरू केला. अधूनमधून सोशल मीडियावर बायकोचे फोटो टाकून जाहीर उसासे सोडू लागले. रोहिणीचं काय, बंगळुरुहून सुशांतनेही फोन करून विनंती केली, ‘‘बाबा, पुरे करा. आमच्याकडे या किंवा मी घरून काम घेतो आणि तिथे येतो, पण आपल्या दु:खाला किमान आपल्यापुरते ठेवा.’’

दुसऱ्या दिवशी सकाळीच जयंताने विश्वासरावांना गाठलं. ‘‘विश्वास, असं वाटतं तुझ्या मनात फक्त शोक नाही, काहीतरी शल्य आहे. ते तू मनातून बाहेर काढल्याशिवाय तुझं दु:ख कमी होणार नाही.’’

‘‘जयंता मी हे सारं ओढूनताणून करीत नाहीय, मला विसर पडत नाहीय तिचा.’’ विश्वासराव खरंच अगतिक झाले होते.

‘‘विश्वास तुला विसरायला कोण सांगत आहे? आता स्मृती असेल, पण भावना कृतज्ञतेची हवी. जो सहवास मिळाला त्याबद्दलची. आता दु:खाचे कढ येणं म्हणजे त्यात तुझा क्रोध आहे, अशी कशी निघून गेली तू आयुष्यातून? हे तुला विचारायचं आहे का? तू रागावला आहेस का बायकोवर?’’

‘‘नाही रे, रागवेन कसा? अजिबात राग नाही मनात,’’ विश्वासराव काहीसे खिन्न झाले.

‘‘पण तू शांत नाही. आत्मस्वीकृतीचा स्वर नाही तुझा.’’ जयंताने विश्वासरावांच्या खांद्यावर हात ठेवला. ‘‘मित्र म्हणून सांग. हा पराकोटीचा अपराधभाव का? तू रागावला आहेस निश्चित, पण स्वत:वर, खरं ना?’’

विश्वासरावांनी चमकून मित्राकडे पाहिलं. जयंता स्थिर नजरेनं त्यांच्याकडे पाहत राहिला. मग काही क्षणांमध्ये एका मोहनिद्रेत गेल्यासारखे ते बोलू लागले, ‘‘माझी मंगला एका संपन्न, समृद्ध घरातली समंजस मुलगी. चौसोपी वाडा, मोठं अंगण. चोवीस तास पाण्याचा पाट, हिरवीगार शेती, दूधदुभते भरपूर. चार बहिणी, दोन भावांचं नांदतं खेळतं गोकुळ सोडून आली ती माझ्याबरोबर. अन् काय दिलं मी तिला? अंबरनाथच्या चाळीतल्या दोन खोल्यांचा खुराडा. माझी ऐपत तेवढी होती हे खरंच, पण अधिक कष्ट करून मी घेऊ शकलो असतो थोडं चांगलं घर. तिचे कष्ट कमी करू शकलो असतो. कष्टाचं जाऊ दे, पण…’’ विश्वासरावांना अश्रू अनावर झाले. जयंताने त्यांना जवळ घेऊन थोपटलं. ‘‘बोल विश्वास, मोकळा हो, तूही सत्याचा सामना करून स्वत:ला ऐक.’’

हेही वाचा – अवकाशातील उंच भरारी…

‘‘जयंता’’, विश्वासरावांचा घसा अवरुद्ध झाला, ‘‘कधीही तिला प्रेमाचा एक शब्द बोललो नाही मी. कधी जवळ घेतलं नाही. गृहीत धरीत राहिलो. जिचे कष्ट आम्ही सहज गृहीत धरतो ती गृहिणी. प्रेम नव्हतं असं नाही, पण कधी व्यक्त केलं नाही. मग विचार येतो, प्रेम केलं म्हणजे काय केलं? कौतुकाचा एक उद्गार तिच्या कष्टाला पिसासारखं हलकं करून गेला असता, पण आयुष्य असंच निघून गेलं. संध्याकाळी घरी येऊन टीव्हीसमोर बसायचं, पोरांची वरवर खबरबात घ्यायची, रात्री तिने निगुतीनं घातलेल्या अंथरुणावर ताणून द्यायची. उशीला नेटकी खोळ, वर एक स्वच्छ नॅपकिन, पायाशी स्वच्छ धुतलेली चादर, खिडकीवर टांगलेला गजरा, कशाची शब्दात दखल घेतली नाही. प्रवास केला, सहली केल्या, त्यातही ती माझ्या, मुलांच्या तैनातीत. जणू जन्मभरासाठी एक मोलकरीण ठेवलेली. तू जनसंपर्क विभागातला ना? कर्मचाऱ्यांचे कौतुक करा, त्यांचे वाढदिवस साजरे करा, म्हणजे ते आनंदी राहून त्यांची कार्यक्षमता वाढते असे म्हणता ना तुम्ही? मी तिला कर्मचारी म्हणूनही वागवले नाही कधी. तिचा वाढदिवस मुलगी लक्षात आणून द्यायची, मी हुंहुं करायचो. मुलं मोठी झाल्यावर ती वाढदिवस साजरा करायला लागली, तोवर उमेद निघून गेली होती. तिच्या तारुण्याचे पार पोतेरे करून टाकलं मी. त्याच्या बदल्यात एक साधं थँक्यूही म्हणालो नाही. गेली त्या दिवशी अस्वस्थ होती ती. मी मॅच पाहण्यात दंग होतो. संध्याकाळी थोडं पडते म्हणाली, तेव्हा मॅच ऐन भरात आली होती. कदाचित तिने काही सांगितलं असतं, काही करता आलं असतं, काही बोलणं झालं असतं. तिच्या डायऱ्या नंतर सापडल्या. वाचल्या मी. त्यात एक वाक्य होतं, ‘काय असतं प्रेम? आपल्या माणसासाठी राबणं? पण राबराब राबूनही ते पोचत का नाही आपल्या माणसापर्यंत? की पोचतं, पण पोचपावती मिळत नाही?’ जयंता, माझा हा सगळा शोक त्या एका वाक्यासाठी आहे रे, पण आता खूप उशीर झालाय, हा विचार मला बेचैन करतो आहे.’’

विश्वासराव काही काळ स्वस्थ पडून राहिले. मन मोकळं केल्यानं त्यांना शांत ग्लानी आली. त्यांना बरं वाटू लागलं. ‘‘याचं काही प्रायश्चित्त आहे का रे?’’ त्यांनी मान उचलून थकल्या आवाजात जयंताला विचारलं.

‘‘हो विश्वास, प्रायश्चित्त आहे, आणि काही प्रमाणात ते तू आज भोगलं आहेस. तुझ्या चुकांच्या स्वीकारातून. तुझ्या उपरतीतून. तुझ्या कबुलीतून. तुझा शोक काही प्रमाणात पुरेसा आहे. तुझं मन हलकं करण्यासाठी. आपण सारे फार कद्रू असतो रे कृतज्ञता व्यक्त करण्यात. कष्टाची जाण आणि तिचे ऋण मान्य करण्यात. कलावंत आयुष्याची होळी करून कला सादर करीत असतो, आपण टाळ्यादेखील वाजवत नाही भरभरून. वहिनींचे कष्ट आठवून तू गेले सहा महिने जे मानसिक क्लेश भोगले आहेस, तेच तुझं प्रायश्चित्त. यापुढे आपण कृतज्ञता व्यक्त करायला शिकू. उपचार नाही, मनापासून थॅन्क्स म्हणायला शिकू.’’

‘‘पहिला थॅन्क्स तुला जयंता’’, विश्वासराव आता स्थिरावले होते. ‘‘त्याही आधी मंगला, थॅन्क्स तुला’’, त्यांनी वर आभाळात पाहिले. मात्र आता त्यांच्या स्मरणात उरस्फोड नव्हती, फक्त एक सर्वंकष स्वीकार होता.

nmmulmule@gmail.com