आग्रा. ताजमहाल.. जागतिक सौंदर्याचं परिमाण लाभलेली वास्तू.. याच शहरात जाळून कुस्करलेल्या चेहऱ्याच्या वादळखुणा घेऊन ‘त्या’ साऱ्या जणी लढताहेत. अ‍ॅसिड हल्ल्यात मिळालेल्या वेदनेला त्यांनी निर्मितीचे पंख दिले आणि सौंदर्याची परिभाषाच बदलून टाकली. आता त्यांना हवंय स्वत:च्या हक्काचं आभाळभर जगणं..

आग्रा कॅन्ट रेल्वे स्थानक. सकाळी साधारण साडेदहा-अकराची वेळ. बाहेर सारं धुकं. धुळीनं माखलेले रस्ते. स्टेशनच्या परिसरात टॅक्सी, ऑटो रिक्षावाले बेशिस्तीने उभे आहेत. लहानसहान पोरंसोरं हातात चहाची किटली घेऊन ‘चाय चाय’ ओरडत असतात. आग्रा शहरात येणारा प्रत्येक जण ताजमहालला भेट देणारच. या निश्चिततेतून ताजमहालाच्या ‘दारात’ सोडणारे टॅक्सी, ऑटोवाले ‘ताज एक्स्प्रेस’ने आत्ताच आलेल्या प्रवाशांना विचारत असतात. कुणा रिक्षावाल्याला ‘शिरोज कॅफे’चा पत्ता विचारावा, तर त्याला हे नावच नवं असतं. मग थोडंसं वर्णन, त्या कॅफेचं महत्त्व, पत्ता सांगावा तर रिक्षावाला म्हणतो, ‘‘ते तर ताजमहालाच्या रस्त्यावरच आहे.’’ आग्रा सफर सुरू होते. ‘‘ताजमहाल पाहणार नाही का?’’ रिक्षावाला विचारतो. जगातील सर्वात सुंदर वास्तू असल्याचं सांगून ताजमहाल न पाहता जाऊ नका म्हणून विनवतो.. रिक्षा थांबते, ताज व्ह्य़ू चौराहा, ताजगंजचा वर्दळीचा परिसर. समोर गेटवे हॉटेल. त्याच्या विरुद्ध दिशेला ‘शिरोज कॅफे!’

धुकं काहीसं हटलेलं. मोकळं वाटण्याइतपत. सकाळची कोवळी सूर्यकिरणं कॅफेच्या रंगीबेरंगी फलकावर पडतात. चकाकणारे रंग. कॅफे नुकतंच उघडलेलं. स्वच्छता सुरू असते. सुटाबुटात एक मुलगी ‘हॅलो’ म्हणून नववर्षांच्या शुभेच्छा देते. कॅफे काहीसा शांतच असतो. दोघीजणी स्वच्छतेच्या कामात असतात. कुणी काच पुसत असते तर कुणी टेबल स्वच्छ करीत असते. मघाशी हॅलो म्हटलेल्या रूपाच्या चेहऱ्यावर बारा शस्त्रक्रियांच्या वादळखुणा असतात. त्यातूनही तिचं निर्लेप दिलखुलास हास्य मोहवून टाकणारं. जुजबी ओळख-परिचय होतो. मग चेहरा व शरीरभर असलेल्या असंख्य जखमांची तमा न बाळगता रूपा बोलू लागते. स्वत:विषयी सांगू लागते. स्वत:चा संघर्ष उलगडते..
रूपा. वय-वीस वर्षे. मूळ उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरची. साधारण चारेक वर्षांपूर्वी झोपेत असताना पहाटे अडीच-तीनच्या सुमारास सावत्र आईने चेहऱ्यावर अ‍ॅसिडची बाटली रिकामी केली. अर्धा तास तळमळत होती. तिथून लोकांनी रुग्णालयात नेलं. तीन-चार तास शस्त्रक्रिया चालली. चेहऱ्यावर नैसर्गिक त्वचेची कोणतीही निशाणी नाही. जखमा बऱ्या होत आहेत. रूपा सांगते, ‘‘अ‍ॅसिड हल्ला झालेल्या महिलांना कुणीही मदत करत नाही. कानपूरमध्ये एका मुलीवर हल्ला झाला. तिच्या मदतीला कुणीही आलं नाही. पण आलोक भैय्या (दीक्षित) त्या मुलीसाठी उभे राहिले. ती मुलगी चेहरा झाकून जगत होती. शिक्षण संपलं होतं. आलोक भैय्या व त्यांच्या मित्रांनी या घटनेची माहिती घेतली. ‘स्टॉप अ‍ॅसिड अ‍ॅटॅक’ चळवळ सुरू केली. अ‍ॅसिड हल्ला झालेल्या प्रत्येकीला भेटले. प्रत्येकीला ऐकमेकींना भेटवलं. मुझफ्फरनगरमध्ये अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या माझ्या मैत्रिणीने अर्चनाने, मला या चळवळीत आणलं.’’

‘‘ही चळवळ ८ मार्च २०१३ रोजी सुरू झाली. २१ मार्च २०१३ रोजी बैठक झाली. आम्ही काही जणी जमलो होतो. प्रत्येकीला स्वत:मध्ये बदल जाणवत होता. जगणं खिन्न वाटत नव्हतं. त्या दरम्यान लक्ष्मीदीदींची कहाणी कळाली. त्यांनी अ‍ॅसिड हल्ले रोखण्यासाठी न्यायालयीन लढा दिला. पण त्या जगासमोर येत नव्हत्या. खोलीबाहेर पडत नव्हत्या. त्यांना आलोकभैय्यांनी शोधलं. जगासमोर आणलं. त्या आमच्या नेत्या आहेत. आग्रामध्ये ‘बेटी बचाव’ अभियानात आमचा सन्मान केला गेला. जो समाज आम्हाला वेगळा समजत होता, हळहळ व्यक्त करत होता, तो आता आम्हाला ओळखतो आहे. आमचा सन्मान करतो आहे. आता आम्हाला हे हल्ले रोखायचे आहेत. त्यासाठी आम्ही ‘जंतर-मंतर’वर आंदोलन केलं. तेव्हा संसद अधिवेशन सुरू होतं. दिल्ली पोलीस मुख्यालयासमोर आम्ही खूप घोषणाबाजी केली. लपूनछपून पोहोचलो होतो. विसेक रिकाम्या बॉटल्स खरेदी केल्या. पिण्याच्या पाण्यात हळद मिसळून त्यात भरलं. त्यावर अ‍ॅसिड लिहिलं. मग पोलीस घाबरले. आम्हाला रोखण्यासाठी ते पुढे येत नव्हते. आमचं आंदोलन यशस्वी झालं. अकरा दिवस आम्ही आंदोलन करत होतो. तेव्हा कुठे आमचं म्हणणं पोलिसांनी ऐकलं. आमची मागणी होती-अ‍ॅसिड विक्रीवरच बंदी आणली पाहिजे.’’

पण कायदा तर झालाय ना-असा प्रतिप्रश्न केल्यावर फराहदीदी चर्चेत सहभागी होत प्रत्युत्तर देतात. ‘‘केवळ बंदी आणल्यानं कुठे अ‍ॅसिड हल्ला रोखला जाईल? नववर्षांच्या पहिल्याच दिवशी आग्रा शहरात अ‍ॅसिड हल्ला झालाय.’’ फराहदीदी. वय ३३ वर्षे. फरूखाबादच्या. विवाहित. नवऱ्यानेच चेहऱ्यावर अ‍ॅसिड ओतलं. वर्ष झालं असेल. शरीरभर जखमा पसरलेल्या. डावीकडची नाकपूडी गळालेली. दृष्टी केवळ वीस टक्के शिल्लक. सहा शस्त्रक्रिया झाल्या. अजून सहा होतील. मांडीची त्वचा काढायची नि चेहऱ्याची शस्त्रक्रिया करायची. एक जखम भरण्यासाठी दुसरी जखम. जखमा सदैव भळभळणाऱ्या. प्रकृतीनुसार भरून येणाऱ्या पण खुणा मागे ठेवणाऱ्या.

रितू मूळची रोहतकची. शाळकरी मुलगी. आई-वडिलांची लाडकी. हरयाणातील रांगडेपणा शब्दाशब्दांतून व्यक्त होणारा. व्हॉलीबॉल या खेळावर नितांत प्रेम. उत्तम खेळाडू. तीन वर्षांपूर्वी व्हॉलीबॉलचा सराव करून घरी येत असताना मोटरसायकलवरून आलेल्या मुलाने चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकलं. स्वप्नं करपली. तेव्हापासून दोन र्वष चेहरा झाकून फिरायची. जगासमोर हा चेहरा आणण्याची भीती वाटत होती. आरसादेखील विद्रूप वाटायला लागला. पण तीही ‘स्टॉप अ‍ॅसिड अ‍ॅटॅक’ आंदोलनात सहभागी झाली. एक डोळा पूर्ण निकामी. एका डोळ्याचा आधार. ‘शिरोज’ची अकाऊंटंट. सर्व आर्थिक व्यवहार एकहाती सांभाळते. रोजची रोकड घेऊन बँकेत जमा करणं, खर्च पाहणं, किचनमध्ये काय हवं नको ते बघणं..ही सारी कामं हिरिरीने करते. तिच्या भाषेचं वर्णन म्हणजे लठमार भाषा! माझ्यावर हल्ला करणारा म्हणे माझ्यावर प्रेम करीत होता.

हे कसलं प्रेम? कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं. ज्याच्यावर प्रेम करतो त्याला जिवापाड जपावं की त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करावं, असा संतप्त प्रश्न विचारणाऱ्या रितूला एकदा तरी शिक्षा भोगणाऱ्या त्या गुन्हेगाराला भेटायचं आहे. त्याला विचारायचं आहे की, ‘‘तू असं का केलंस? प्यार हैं तो बात करों. एैसे थोडी ना कोई किसीकी जिंदगी बरबाद करता हैं!’’

डॉली. डॉली कुमारी. (‘माय नेम इज बॉण्ड. जेम्स बॉण्ड’च्या चालीवर नाव सांगते.) आग्रा शहरात राहणारी. अत्यंत बोलकी. बारा वर्षांची असताना घराशेजारी राहणारा एक पस्तीसवर्षीय माणूस छेड काढायचा. त्याची तक्रार डॉलीने आईकडे केली. त्याला आईनं जाब विचारला. त्याचा वचपा काढण्यासाठी या माणसाने डॉलीचं आयुष्य अ‍ॅसिडने उद्ध्वस्त केलं. काही महिने डॉलीवर उपचार करण्यात आले. त्यानंतर वर्षभरापूर्वी ती ‘शिरोज कॅफे’चा भाग झाली. डॉलीचा अल्लडपणा तिच्या कामाआड येत नाही. पण तिला वारंवार सूचना करीत रूपा काम समजावून सांगत असते. हिला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत असा काहीसा लाडिक तक्रारीचा सूर रूपाकडून उमटतो. डॉलीला नृत्य करायला आवडतं. कॅफेमध्येच तिचं नाचकाम सुरू असतं. कंटाळा आला की पाय थिरकायला लागतात. मनमुक्त नाचावं; त्याच्या आनंदात कॅफेत आलेल्या अमेरिकन, चिनी, जापनीज लोकांना सहभागी करून घेण्यात तिचा कमालीचा हातखंडा आहे. ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमात तिची निवड झाली आहे. कोवळेपणातच डॉलीचं बालपण कुस्करलं. ज्यानं अ‍ॅसिड फेकलं त्याच्यावर तिचा प्रचंड संताप. ‘‘काहीही करून त्याला शिक्षा झालीच पाहिजे. माझं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्याला मी सोडणार नाही. लहानगी डॉली अन्यायाविरोधात एल्गार करते.’’

डॉलीच्या जोडीला आहे अंशू (तिच्या भाषेत अंसू.) बारा जानेवारीला अठरा वर्षांची होईल. नितळ चेहऱ्यावर शस्त्रक्रियेच्या खुणा. एक डोळा पूर्ण बंद. नाकपुडीसदृश दोन भोकं उरलेली. सर्वात उत्साही. बिजनौरहून आली तेव्हा चेहरा झाकलेला होता. सकाळी कॅफे उघडण्यापूर्वी आली होती. तिथे राहणाऱ्या अतुलदादांनी रूपा, रितूला निरोप पाठवला. तातडीने या. रूपा-रितू लगबगीने आल्या. चेहऱ्यावरचं कापड दूर करण्याची हिंमत अंशूमध्ये नव्हती. रूपा व रितूदीदीदेखील आपल्यासारख्याच आहेत, पण चेहरा झाकत नाहीत हे कळलं आणि तिला बळ आलं. अंशूच्या चेहऱ्यावरच्या जखमा ताज्या आहेत. कौटुंबिक वादातून शेजारी राहणाऱ्यांनी तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. अंशू आई-वडिलांची लाडकी. त्यामुळे तिच्यामार्फत कुटुंबावरच आघात झाला. चळवळीतून अंशूला नवं आयुष्य सापडलं. त्यात ती रमली. अंशू यंदा बारावीची परीक्षा देणार आहे. अभ्यासासाठी म्हणूनदेखील सुट्टी घेतली नाही. सकाळी नऊ ते रात्री उशिरापर्यंत कॅफेचं काम. उरलेल्या वेळेत अभ्यास. हिचंही नाचकाम सुरू असतं. स्वत:ला अंशू ‘लेडी कपिल शर्मा’ म्हणवून घेते.

अ‍ॅसिड हल्ला झालेल्या या काही जणी एकत्र येऊन या कॅफेच्या माध्यमातून स्वत:ला सावरत आहेत. आर्थिकदृष्टय़ा स्वातंत्र्य भोगताहेत. ‘शिरोज कॅफे’ म्हणजे ताजगंजच्या तिठय़ावरील छोटेखानी दुमजली नेमस्त वास्तू. मॉडर्न वास्तुरचना. व्यावसायिक प्रशिक्षणाचा अभाव रूपा, रितू, अंशू, डॉली, अंसू व फराहदीदीमध्ये जाणवतो. कुणी कोणतं काम करायचं हे त्याच ठरवतात. ऑर्डर घेणं, ऑर्डर आणणं, रिकाम्या प्लेट्स उचलणं, त्यानंतर टेबल स्वच्छ करणं. ज्याच्यासमोर जे काम येईल त्याने ते करायचं. अगदी घरच्यासारखं.

कॅफेच्या िभतीवर चित्रं रेखाटलेली. भिंतभर हसू पसरलेल्या एका उन्मुक्त युवतीचं चित्र. स्वातंत्र्याचं. तिच्या गाण्याचं. िभतीदेखील या हास्याशी एकरूप झालेल्या. समोरच्या भिंतीवरील रॅकवर इंग्रजी पुस्तकं ओळीने मांडलेली. ‘आय एम मलाला’पासून ते नेल्सन मंडेला यांच्या जीवनचरित्रापर्यंत. संघर्षगाथेचं एखादं पुस्तक घ्यावं नि सुबक ठेंगण्या टेबलाभोवती खुर्चीत बसून निवांत वाचावं. चहा-कॉफीचा मग भरून या मानवी संघर्षगाथेशी एकरूप व्हावं ही ‘कॅफे’ची संकल्पना.
एका भिंतीवर स्त्रियांसाठीचे रंगीबेरंगी कुडते टांगून ठेवलेले आहेत. वेदनांना निर्मितीचे पंख देणाऱ्या रूपाच्या हातून तयार झालेले कपडे. रूपा लहानपणी घरातील सर्व कामे करीत असे. अगदी झाडलोट ते स्वंयपाकापर्यंत. तिला नवनवे कपडे घालण्याची भारी हौस! पण दारिद्रय़ामुळे शक्य झालं नाही. अ‍ॅसिड हल्ल्यानंतर तर सामाजिक अवहेलनेमुळे अशी हौस करणं स्वप्नातही शक्य नव्हतं. पण आता तिला बळ मिळालं आहे. नवनवी डिझाइन्स रूपा तयार करते. परदेशी पर्यटक स्त्रिया एखाद्दुसरा टॉप ‘ट्राय’ करतात. या कपडय़ांच्या शेजारी आहे दगडांपासून साकारलेली छोटेखानी शिल्पं. दगड धुंडाळावेत. त्यातील आकार-उकार शोधावे. एक दगड दुसऱ्याला जोडावा. त्यातून माय व तिला बिलगलेलं लहानगं लेकरू साकारावं. ‘शब्दाविण संवादू’ साधण्याची ही भावनात्मक उत्कटता कॅफेत अहोरात्र मुक्कामाला आहे. अशा असंख्य अमूर्त कल्पना येथे पाहायला मिळतात.

दुसऱ्या मजल्यावर किचन. बारा पायऱ्या चढून प्रत्येक ग्राहकाने दिलेल्या ऑर्डरची सूचना तेथे द्यायची. मग खाली यायचे. पाचेक मिनिटांनी पुन्हा दुसऱ्या मजल्यावर ऑर्डर घ्यायला जायचे. चहा, कॉफी, सूूप-अशी कप-बाऊलमधून हिंदकळणारी तरलता सांभाळण्याची कसरत नित्याची झाली आहे. त्याबरोबरच जगण्याची कसरतदेखील. येणारा प्रत्येक जण ‘कॅफे’तील प्रत्येकीची आत्मीयतेने चौकशी करतो. कुणी भीत भीत विचारतो, ‘‘हे कसं झालं?’’ भावनातिरेक न दाखवता ‘ती’ आपलं दु:ख सांगते. बोलणं संपल्यावर विचारते, ‘‘क्या लेंगे?’’ पर्यटक मसाला चाय-सॅण्डविच-पनीर-रोटी, दाल-राइस आवडीची ऑर्डर देतात. न्यूझीलंडचे शल्यविशारद डॉक्टर सहकुटुंब आलेले असतात. त्यांच्या मुलासोबत शिकणाऱ्या भारतीय मुलाने त्यांना ‘शिरोज’ची माहिती दिलेली असते. आवर्जून ते ‘शिरोज’ला जाणून घेण्यासाठी येतात.
शिरोजची संकल्पना साकारण्यात ‘छाँव फाऊंडेशन’चं योगदान आहे. आलोक दीक्षित व त्यांच्या मित्रांनी मिळून ‘छाँव’ची स्थापना केली. उद्देश-अ‍ॅसिड हल्ल्यातील महिलांचं पुनर्वसन व अ‍ॅसिड हल्ला रोखण्यासाठी लढा. पुनर्वसनात अनंत अडचणी येतात. वैयक्तिक पुनर्वसन शक्य असलं तरी प्रत्येकाला यश येईलच असं नाही. अ‍ॅसिड हल्ला झालेल्यांची कौटुंबिक  पाश्र्वभूमी व लौकिक शिक्षण जेमतेमच. शिवाय समाजाच्या दृष्टीने आलेलं कुरुपपण. त्या न्यूनगंडावर मात करून सर्वाना संघटितपणे पायावर उभं करताना जनजागृतीला लोकचळवळीचं स्वरूप देण्यासाठी ‘छाँव फाऊंडेशन’ने ‘शिरोज कॅफे’चा निर्णय घेतला. स्थानाचा शोध सुरू झाला. अ‍ॅसिड हल्ल्यात आघाडीवर असलेल्या उत्तर प्रदेशखेरीज दुसरा पर्याय नव्हताच! सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक येणाऱ्या आग्रा शहरात हा कॅफे सुरू झाला. दोन महिने तयारी केल्यानंतर १० डिसेंबर २०१४ रोजी प्रत्यक्ष कॅफे सुरू झाला.
प्रारंभी उत्साह होता. दोन-चार महिन्यांनंतर व्यावसायिक गणित जमेना. कारण कॅफे सुरू करताना व्यवसायाचा विचारच नव्हता. फक्त या स्त्रियांचं मनोबल वाढवणं हा प्रमुख उद्देश होता. बरं कुणी कितीही खावं. पैसे देताना-‘पे अ‍ॅज् यू विश्’ असं मेन्यूकार्डावर छापण्यात आलं होतं. भारतीय मानसिकता हिशेबी! जगात दु:ख असावं, म्हणजे समाजकार्य करता येतं-ही भावना प्रबळ. मग लोक कमी पैसे द्यायला लागले. परदेशी पर्यटक त्यातल्या त्यात जास्त पैसे देऊन जात. फक्त किचनचा खर्च निघत होता. शिरोजच्या कर्मचाऱ्यांचे पगार तर सोडाच अगदी वीज व पाणी बिलासाठीदेखील मारामार व्हायला लागली. आठ  महिन्यांमध्ये शिरोज कॅफे बंद पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. स्वप्न फुलण्याआधीच उत्साहाचा बहर ओसरू लागला. पण कुणीही हार मानली नाही. नवनव्या क्लृप्त्या लढवण्यात आल्या. फेसबुक पेज, संकेतस्थळ व प्रसारमाध्यमांशी संवाद साधणं सुरू झालं.

‘ट्रीप अ‍ॅडव्हाइजर’च्या एका मूल्यांकनाने (रिव्ह्य़ू) शिरोज कॅफेला आठ महिन्यांच्या नैराश्यातून बाहेर काढलं. पर्यटकांचा ओघ सुरू झाला. भारतीयांपेक्षा परदेशी पर्यटकांचा राबता वाढला. दहा महिन्यांनी ‘शिरोज कॅफे’ खऱ्या अर्थाने नफ्यात सुरू झाला. दोन शिप्टमध्ये काम करणारे पुरुष खानसामे (शेफ) ‘शिरोज’शी जुळले. अलीकडच्या काळात दोन मायलेकी ‘शिरोज’शी जुळल्या. गीता व नीतू. नीतू तीन वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांनी या मायलेकींवर अ‍ॅसिड ओतलं. कारण काय तर नीतू घरातील चौथी मुलगी. अ‍ॅसिड हल्ल्यात मायलेकी मेल्यावर दुसरं लग्न करण्याचा त्यांचा डाव होता. पण दोन्ही वाचल्या. नीतूच्या तेरा वर्षांपूर्वीच्या झालेल्या जखमा भरल्या आहेत. व्रण कायम राहिले. डोळा अधू, हाताच्या बोटांनी आकार गमावलेला. अशा परिस्थितीत मायलेकींनी ‘उंबरठा’ ओलांडला. नराधम बापाला आजही सांभाळणाऱ्या नीतूला कुणावरही सूड उगवायचा नाही. तिच्या जगण्यातल्या सुंदर सृष्टीत सारे चांगले आहेत. कुणीही वाईट नाही.

वर्षभरात कॅफे स्थिरावलाय. लोक यायला लागलेत. कॅफे चालविणाऱ्यांना दहा ते बारा हजार रुपये पगार निश्चित झाला. निवासाची व्यवस्था होतीच. कॅफे आर्थिक स्वप्नांचं अवकाश झालं. या अवकाशात या सगळ्याजणी मुक्तपणे पिंगा घालतात. त्यांच्या श्रांत व विकल अवस्थेत त्यांना ‘शिरोज’चं जग सापडलं. त्यात त्या रमल्या. त्यांना आता इतरांची तमा नाही. चेहराच नव्हे तर शरीरभर पसरलेल्या जखमा व कुरुपतेचा साज त्या समाजापासून लपवत नाहीत. सामान्यांसारखं धीटाईनं जगू लागल्या आहेत. नव्या आयुष्याचं, घर वसवण्याचं स्वप्न त्या पाहू लागल्या आहेत. आता त्यांनी दारिद्रय़ आणि सामाजिक अवहेलनेची लक्तरं ताजमहालाच्या वेशीवर टांगली आहेत.

‘शिरोज हँगआऊट’ हे कॅफेचं अधिकृत नाव. त्याचा अर्थ असा – ‘रँी+ ऌी१ी२+ऌंल्लॠ४३ = रँी१ी२ ऌंल्लॠ४३.’ शिरोजच्या या ‘हिरोईन्स’ना कुणाकडूनही मदत नको. स्वत:च्या हक्काचं आभाळभर जगणं त्यांना हवं आहे. त्यासाठी त्या संघर्षरत आहेत. जागतिक सौंदर्याचं परिमाण ठरवणारी वास्तू असलेल्या या शहरात त्यांनी सौंदर्याची नवी परिभाषा रचली आहे. आर्थिक स्वायत्ततेसाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. त्यांच्यासाठी
ज्यांची दृष्टी कधी न कष्टी; निर्भयतेची करिते वृष्टी
मनात ज्यांच्या नित्य तरंगे भवितव्याची सुंदर सृष्टी..!

संपर्क –
०११-६४६५८००१

वेबसाईट-
http://www.chhanv.org

इमेल-
chhanvfoundation@gmail.com

Story img Loader