मराठी विनोदी साहित्यात दिसणाऱ्या स्त्री प्रतिष्ठेच्या संदर्भातले बदल हे आस्तेआस्ते होत गेले. जसा भवताल बदलत गेला, तशा स्त्रियाही बदलत गेल्या. तशी साहित्यकारांची त्यांच्या व्यक्तिरेखा रेखाटताना लागणारी जाणही बदलत गेली. सवंगतेकडून सकारात्मकतेकडचा प्रवास विनोदी साहित्याला साजेशा प्रसन्नतेनेच झाला. मराठी साहित्यातून मूर्ख बायकांचा आचरट वावर हळूहळू कमी होत गेला आणि सहृदय, संवेदनशील, वास्तवाच्या परिघावरची स्त्री साहित्यात गंमत आणू लागली.. १ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक हास्य दिनानिमित्त मराठी विनोदी साहित्यातील स्त्री चित्रणावरचा हा खास लेख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोदी साहित्य म्हणजे काय? या प्रश्नावरचे माझे उत्तर म्हणजे, आनंद देणारे, चित्तवृत्ती प्रसन्न करणारे आणि मानसिक चिंतेतून विरंगुळा देणारे साहित्य आणि स्त्री प्रतिष्ठा म्हणजे काय? तर, स्त्रीचा गौरव करणारी, तिला आत्मसन्मान देणारी, आणि तिचा माणूस किंवा स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करणारी संकल्पना. मात्र, या दोनही संकल्पनांचे नाते किंवा सख्य एकमेकांना छेद देणारे होते. विनोदी साहित्यातली, प्रारंभ काळातली, म्हणजे साहित्यातली विनोदाची प्रतिमा म्हणजे विदूषकाची. हा विदूषक, हजरजबाबी, चतुर असे. राजदरबारातून त्याचा सहज वावर असे. त्यामुळे तो हास्यरसाची निर्मिती करताना, ‘राणी सरकारांच्या’ तैनातीतल्या दासींची चेष्टा करीत असे. ही चेष्टा अतिशय जीवघेणी, ‘‘ती ‘हिडिंबा’ आज महालात दिसत नाही’, ‘कुब्जा’ मुदपाकखान्यात तिच्या ओबडधोबड हातांनी पाकसिद्धी करते आहे. चुकून तिचे ते काळे, फताडे दात पदार्थात पडले नसतील ना?’’ असे संवाद विदूषकाच्या मुखातून येत. स्त्रियांच्या गरिबीचा, बेढब शरीराचा, कृष्णवर्णाचा, सुमार उंचीचा, जीवघेणा उपहास, हे तेव्हाच्या हास्यरसाचे मूळ स्रोत होते. संदर्भवशात महाभारत- रामायण- पुराणातल्या शूर्पणखा, हिडिंबा अशा कुरूप स्त्रियांचा उल्लेख करून, दासींना त्यांच्या नावाचे विशेषण जोडले जाई. परंतु तो काळ असा होता, की अशा उपहासाबद्दल, ना साहित्यकारांना काही वावगे वाटे, ना नट मंडळींना, ना प्रेक्षकांना. (अगदी स्त्री प्रेक्षकांनाही)
प्रेक्षकवृत्तीला स्त्रियांवरील उपहास हा फार आनंददायी वाटतो. ही ‘मेख’ साहित्यकारांनी ओळखली. ‘संशयकल्लोळ’ (किंवा ‘तसबिरीचा घोटाळा’) मधली कजाग, भांडकुदळ आणि सतत नवऱ्यावरती आचरट संशय घेणारी कृत्तिका, ‘एकच प्याला’मधली भांडकुदळ गीता, या नायिका नसूनही, हशा मिळवणाऱ्या (ज्याला आधुनिक काळात ‘लाफ्टर कॅचर’ म्हणतात.) व्यक्तिरेखा लोकांना आवडल्या. गडकरींसारख्या प्रतिभावंत, प्रज्ञावंत साहित्यकारानेसुद्धा, कुठलेही ‘भावबंधन’ न मानता, इंदू आणि बिंदू या दोन कुरूप व्यक्तिरेखा रेखाटल्या. सुमार रूपाच्या, ओठांवर दात येणाऱ्या, चकण्या, काळ्या, ओबडधोबड स्त्रिया. या दोन कुरूप व्यक्तिरेखा कुरूपतेची प्रतीके बनल्या. कुरूपतेवर इतका क्रूर विनोद.. उत्तम विनोद म्हणून मान्यता पावला. इंदू-बिंदूच्या त्या प्रवेशाला तुफान लोकप्रियता मिळाली, अगदी स्त्रियांकडूनही.

तो काळ खरे तर काही दशकांपूर्वीचा होता. फार प्राचीन नव्हता. तरीही विनोदी साहित्यात ‘खसखशीचे मळे’ पिकलेच पाहिजेत.. जितके हशे.. तितके यश!! हे समीकरण जनमानसात इतके पक्के होते की, त्यासाठी ‘स्त्री’ ही वेठीला धरण्याजोगी उत्तम संकल्पना ठरली. तशीही प्राचीन काळच्या लोकसाहित्याने म्हणजे भारूड, भोंडल्याची गाणी, उखाणे अशा काही लिखित, काही मौखिक साहित्यातून, विनोदाच्या िरगणात बायकांची, त्यांच्या आपापसातल्या नात्याची, म्हणजे नणंद-भावजय, सासू-सून या नात्यांची खिल्ली उडवली आहे. ‘फाटकंतुटकं लुगडं’ नेसणारी, ‘काल्र्याचं बी, पेर ग सुने, मग जा आपल्या माहेरा’ म्हणत सुनेला अडवणारी आखडबाज सासू किंवा ‘सासुरवाशी सून रुसून बसली कैसी?’ं अशी दागिन्यांसाठी वेडी झालेली सून, अशा तद्दन सुमार स्त्रिया लोकसाहित्यातून हसवत राहिल्या आणि ‘स्त्री’ म्हणून आत्मसन्मानाची जाण नसलेल्या स्त्रियाही, हसत हसत अशी गाणी गाऊन हसवत राहिल्या.

साहित्यदृष्टय़ा आपण ज्याला आधुनिक कालखंड मानतो, तो काळ स्वातंत्र्योत्तर काळ. स्त्रिया शिकू लागल्या आणि कारणापरत्वे म्हणून का होईना, अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या. चार भिंतींबाहेरचे अवकाश त्यांना दिसू लागले. तरीही विनोदी साहित्य हे फक्त मनोरंजनार्थ आहे, त्याच्याकडे फारसे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, हा दृष्टिकोन समीक्षक आणि समाजाचाही होता. त्यामुळे स्त्री प्रतिष्ठा अशा साहित्यातून अवतरली नाही. मात्र त्याच काळात स्त्री चित्रणे हसतखेळत चित्रित करताना, स्त्रीची अप्रतिष्ठा होणार नाही, स्त्रिया विनोद घडवतील, तो प्रसंगनिष्ठ असेल याची दक्षता ह. ना. आपटे यांनी ‘करमणूक’ या मासिकातून सातत्याने लिहिलेल्या कथांमधून घेतली. तशीच चिं. वि. जोशी यांच्या आल्हाददायक साहित्याने चिमणराव जितक्या खुसखुशीत शैलीत उभा केला, तितक्याच ताकदीचे मनोहारी चित्रण चिमणरावांच्या ‘काऊचे’ (कावेरी) केले.

पण ही दोन उदाहरणे अपवाद म्हणूनच सांगता येतील, अन्यथा विनोदी साहित्यात वावरणाऱ्या स्त्रिया म्हणजे, विनोद बनून किंवा विनोदाचा विषय बनून राहिल्या. ‘स्त्रियांना विनोदबुद्धी नसते’, हे विधान कोणी, कुठे केले, माहीत नाही, पण ‘मूर्ख’, ‘अक्कलशून्य’, ‘बाहेरच्या जगाचे भान नसणारी’ बेतवार शिकलेली (जिचा उल्लेख ‘नॉनमॅट्रिक पास’ असा) दागिन्या-लुगडय़ांच्या सोसापायी वेडावलेली, बेढब शरीराची (‘कमर है’ या ‘कमरा’ असे उल्लेख) एक तारखेला पगार घेऊन ‘हापिसा’तून येणाऱ्या नवऱ्यासाठी पोहे, शिरा करून, सिनेमाला नेण्याचा लाडेलाडे हट्ट करणारी, भोंगळ कपडे घालणारी, अशी स्त्री लेखकांनी विनोद विषय केली. विनोदी दिवाळी अंकांतून अशा कथा लोकप्रिय झाल्या. पुढे त्यांचेच कथासंग्रह झाले.
त्याच काळात ‘कथाकथन’ हा श्राव्य साहित्य प्रकार गणेशोत्सवातून सादर होऊ लागला. (या कथा मूळ शब्दरूपात असल्याने याची दखल घ्यावी लागेल.) ग्रामीण कथा या कथेच्या उपप्रकारात स्त्री चित्रणे झाली, ती भडक, संस्कृतीबाहय़ अशी. द. मा. मिरासदार, शंकर पाटील, रा. रं. बोराडे यांनी बहुतांश नागर स्त्रिया न रंगवता, स्त्रियांच्या ग्रामीण(?) व्यक्तिरेखा रंगवल्या. र्कुेबाज, मदमस्त शरीराच्या, बेरकी, साळसूद, कुणाला तरी गटवण्याखेरीज दुसरे काम नसणाऱ्या, बहुतेक ‘तो कुणी तरी’ म्हणजे पाटील, सरपंच किंवा आमदार.. मग त्यासाठी ‘तिरपे कटाक्ष टाकणे’, ‘‘जावाऽऽ गडेऽऽ’’ किंवा ‘‘आमी नाय जाऽऽ’’ असे लाडेलाडे बोलणे, अंगावर रेलणे, खोटा भाबडेपणा दाखवून पैसे उकळणे, अशा कृती करणाऱ्या आणि मोसंबी किंवा नारंगी अशी नावे लावणाऱ्या स्त्रिया चितारल्या. हे साहित्यिक शब्दप्रभू असल्याने अशा साहित्यांतून विनोद उत्तम साधला, रंगला.. पण स्त्री प्रतिमा किंवा प्रतिष्ठा हे शब्द मात्र पुसट झाले..

आणि दुसरीकडे म्हणजे, नागर साहित्यातही पु. ल. देशपांडे यांसारख्या सहृदय आणि अस्सल विनोदाची प्रसन्न जाण असणाऱ्या लेखकालाही, स्त्रीची तिच्या रूपावरून खिल्ली उडवण्याचा मोह क्वचित का होईना पडला. ‘सिंधू कसली रे ती? साक्षात सिंधुदुर्गच तो!’ अशा ‘वल्ली’ मल्लिनाथीला व्यक्ती (त्यात स्त्रियाही आल्याच) हसत राहिल्या आणि विनोदाची अमृतवल्ली असणाऱ्या शब्दप्रभूलाही ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये अतिविशाल महिलांचा प्रवेश रेखाटण्याचा मोह आवरला नाही. साधारण दोन दशकांपूर्वी पुरुषपात्रविरहित अशा या विनोदी प्रवेशाचा प्रयोग स्त्रिया आवर्जून मंचस्थ करायच्या; हशे, टाळ्या मिळवायच्या, बक्षिसे मिळवायच्या. चुकीचे इंग्लिश लाडेलाडे बोलणाऱ्या, मठ्ठ, दागिन्यांनी लगडलेल्या आणि आचरट, श्रीमंत पतीच्या राण्या या काल्पनिक व्यक्तिरेखा हशे मिळवण्यासाठी रंगवल्या आणि रंगल्या. वास्तविक त्या काळात (पुलंच्या) समाजातली स्त्री किती तरी आत्मनिर्भर आणि समर्थपणाच्या पायऱ्या चढत होती. तशीच ‘तो मी नव्हेच’मधली लोभी, मख्ख,

मठ्ठ, चिक्कू अशी वधू-वर संशोधन मंडळाची मालकीण गंगूबाई घोटाळे अत्र्यांनी हास्यनिर्मितीसाठी उभी केली. त्या काळात एक साहित्यिक वळण असे होते की, गंभीर विषयाचा ताण हलका करण्यासाठी एक-दोन विनोदी व्यक्तिरेखा चितारायच्या आणि मुख्यत्वे स्त्रीच्याच! आणि विनोदी लेखन या ‘सुभ्यात’ तर काय! मूर्ख बायकांचा आचरट वावर ठरलेलाच असे.
वि.आ. बुवा आणि इंद्रायणी सावकार यांच्या अतिशयोक्तीने भरलेल्या स्त्री पात्रांच्या करामती म्हणजे कळस होता. विनोदी लेखन ही सहजसाध्य कला नाही. हजारातूनी एखादाच ‘सनदी’ तिथे गौरवस्थान मिळवतो. वि. आ. बुवा, इंद्रायणी सावकार, कधी तरी व. पु. काळेसुद्धा सुमार स्त्रिया, श्रीमंत बापाच्या लाडावलेल्या मुली, त्यांची ती प्रेमप्रकरणे आणि प्रेम, आईबापांपासून लपवण्याच्या बेगडी हिकमती, लिफ्टमधल्या एक मिनिटात प्रेमात पडणे, लग्न झाल्यानंतर वातड पोळ्या, कच्चा भात, अशी पाकसिद्धी करून ‘राया मला सुगरण म्हणा नाऽऽ’ असे बालिश हट्ट करणे, मॅचिंग ब्लाऊज पीस शोधण्यासाठी दोन दोन दिवस रस्तोरस्ती फिरणे, अशा स्त्रियांचा साहित्यात वावर करवीत असत. कदाचित तो काळ वर्तमानकाळाशी लगटून असला, तरी अतिशयोक्ती अलंकाराच्या प्रेमातला होता. म्हणूनही (अपवादाने दिसणाऱ्या) स्त्रियांना केंद्रस्थानी धरून, ‘अचाट लीला’ अक्षरबद्ध करून विनोद साधला जात असावा. मात्र त्याच काळात गंगाधर गाडगीळांची स्नेहलता म्हणजे बंडूची पत्नी, ही शहाणीसुरती, पण मिस्कील, बाहय़ जगाबद्दल उत्सुकता असणारी चतुर स्त्री विनोदाची पखरण करीत वाचकांना प्रसन्न करीत होती, चिमणरावांच्या काऊसारखीच. त्याच वेळी मोजक्या का होईना, लेखिकांनी विनोदी लेखन करायला सुरुवात केली होती.

‘माहेर’, ‘मानिनी’ यांच्यासारखी स्त्रियांची मासिके स्त्रियांच्या विनोदी कथा आणि लेख प्रसिद्ध करीत. शकुंतला फडणवीस, शकुंतला बोरगावकर, कुमुदिनी रांगणेकर, मोहिनी निमकर अशा लेखिका ‘स्व’ला केंद्रस्थानी ठेवून, मासे डायटिंगचे, माझे ड्रायव्हिंगचे, माझे सत्याचे, माझे परदेश पर्यटनाचे.. असे कुठले कुठले ‘फसलेले प्रयोग’ रंगवून विनोद निर्माण करीत कुटुंब जीवनातल्या गमती रंगवत. स्त्रियांनीच हे लेखन केले असल्याने, त्या कथेतल्या बायका वेंधळ्या असत, पण मूर्ख नसत. शरीरव्यंगावरचे, दारिद्रय़ावरचे ‘इंदूबिंदू’ विनोद आता साहित्यहद्दीतून बाहेर पडू लागले आणि सहृदय, संवेदनशील, वास्तवाच्या परिघावरची स्त्री साहित्यात गंमत आणू लागली.

१९८० नंतरच्या काळात विनोदी साहित्य गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने आविष्कृत होत गेले. पुलंनीही अतिविशाल महिलांच्या अंकानंतर, पुनश्च कधीही स्त्रीचा अधिक्षेप करणारे लेखन केले नाही.

सुभाष भेंडे, बाळ गाडगीळ, राजेंद्र बनहट्टी यांनी विनोदाची बहार उडवून देताना शहरी जीवन, त्यातली मध्यमवर्गीय राहणी आणि विचारसरणी यांचा खुसखुशीत वेध घेताना, स्त्री-पुरुषांना एकाच तराजूत तोलले. पुरुषांनी करायचा चेष्टा-विषय म्हणून स्त्री चित्रणे केली नाहीत किंवा ‘नटापट्टा’ या विषयाला वाहिलेल्या तकलुपी बायकाही रंगवल्या नाहीत. ‘डोळ्यांदेखत मस्टर आता गेले म्हणून वेळ गाठण्यासाठी धडपडणाऱ्या, नोकरदार, प्रश्नांची चूक उत्तरे अचूक म्हणून लिहिलेल्या उत्तरपत्रिका वाचून संभ्रमित झालेल्या प्राध्यापिका, पहिलाच परदेश प्रवास करताना भीतीने साऱ्या प्रवासभर पट्टा आवळून बसलेली गृहिणी, निवडणूक प्रचारासाठी घोषणांचे रेकॉर्डिग करणारी गायिका- (पंचवार्षिक योजना हीच आमची घोषणा हे गाणं,) अशा वास्तव जीवनाशी जवळ असणाऱ्या स्त्रिया मजेमजेत चित्रित करून निखळ करमणूक दिली. त्याच्या पुढच्या काळाच्या टप्प्यावर विनोदी लेखन करणाऱ्या, तुलनेने मोजक्या लेखिकांची लेखणी गुलाबशिंपण करू लागली. शोभा बेंद्रे, पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, मंदाकिनी गोगटे (यांच्या ‘माहेर’ दिवाळी अंकातील ‘सवत माझी लाडकी’ या कथेवर स्मिता तळवलकरांनी यशस्वी मराठी चित्रपट काढला. वरवर भोळी वाटणारी नायिका किती चातुर्याने सवतीला दूर करते, तेही तिच्यावर अन्याय न करता, हे अतिशय सहृदय, पण गमतीदार स्त्री चित्रण आहे.)

आता काळ आणखी पुढे सरकला, तो भोवंडून टाकणाऱ्या गतिशील वेगाने, समाजातल्या सर्वच घटकांत प्रचंड वेगाने परिवर्तन झाले. स्त्री शक्तीचा उद्गार आता स्त्री शक्तीमध्ये आस्ते आस्ते का होईना रूपांतरित होऊ लागला. साहित्य हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळे स्त्रीची आधुनिक, सशक्त रूपे ही मराठी साहित्यात दिसू लागली. तशी विनोदी साहित्यातही दिसू लागली. १९८० नंतरच्या काळात घराबाहेर पडलेल्या स्त्रीचे सामाजिक, कौटुंबिक ताणही बदलले. व्यावसायिक क्षेत्रेही बदलली- विस्तारली. त्याचे चित्रण विनोदी साहित्यात ‘मजेत’ होऊ लागले. पद्मजा फाटकांनी तर स्वत:चे टोपणनावच ‘मजेत’ (मजेत फाटक) धारण केले आणि बुद्धिमान, चतुर, मिस्कील स्त्रियांना अक्षरबद्ध केले. ‘घरकोंबडा’ (हाऊस हसबंड) आणि त्याची करिअरिस्ट पत्नी, (घरकोंबडय़ावर अन्याय न करताही) लोकलमधल्या प्रवासिनी, मुलाच्या एकेका मार्कासाठी झटणाऱ्या माता, अशा ‘बहुतेक करून मुंबईकर’ स्त्रिया कौशल्याने चितारल्या. त्याच सुमारास अनुराधा वैद्य, मंगला गोडबोले, मंदाकिनी गोडसे, शिरीन वळवडे, अंजली दिवेकर अशा लेखिकांनी आधुनिक स्त्रीचे जगणे- वागणे- समजुती- आनंद- यश, कधी कुचंबणा, क्वचित आपल्याकडून होणारी साहसे(?) प्रसन्न शैलीत मांडून गुलाबशिंपण केली. मंगला गोडबोलेंच्या विनोदी लेखनातल्या स्त्रियांबद्दल थोडे विस्ताराने, कारण त्यांच्या चित्रणातून स्त्रीचा झालेला सवंगतेपासून प्रतिष्ठेकडचा प्रवास ठळकपणे चित्रित होतो. स्त्रीच्या कुठल्याही वैगुण्याचा वापर त्यांनी विनोदासाठी केलेला नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेतले कच्चे दुवे त्यांना खुपतात. तेव्हा ते ‘खुपणे’, स्त्रीच्या हसतखेळतच्या पण संवेदनशीलतेने होणाऱ्या वर्तणुकीने ‘सुसहय़’ होतात. सुपरवुमन होण्याचा अट्टहास रंगवताना मजेदार शब्दांच्या पोटात एक छुपी कणव आहे. स्वतंत्रता देवीची कहाणी रंगवताना ‘आटपाट नगरातल्या’ स्त्रियांची कुचंबणा अधोरेखित होते. आजारी आजीची मजेदार गोष्ट म्हणजे, एकटेपणा असलेल्या वृद्धेची कुचंबणा आहे, तर ‘एक नवरा झेलू’ ही एकांकिका, संसारी स्त्रीच्या प्रेमापोटी जन्माला आली आहे. विपरीततेवर विनोदाने मात करून आनंद घेणाऱ्या स्त्रिया त्यांनी रंगवल्या आहेत.

दीपा गोवारीकरांच्या विनोदी लेखनात वावरणाऱ्या स्त्रिया बऱ्याचशा स्मरणरंजनातून अवतरल्या आहेत. माहेरच्या मैत्रिणी, त्यांच्या ‘कराड’च्या घरातल्या मैत्रिणी, नातेवाईक बायका, लहानपणची घटिते यांची मिस्कील चित्रणे ‘साष्टांग धप्प!’ या चिं. वि. जोशी पुरस्कार विजेत्या कथासंग्रहातून दिसते. स्त्रियांनी ज्या सहृदय विनोदाच्या माध्यमाने विनोदी साहित्य निर्मिले तीच सहृदयता लेखकांनीही दाखवली, तीही कुठला ‘आव’ न आणता, सहजपणे. उत्तम विनोद ‘कानोकानी’ पोहोचवणारे अशोक जैन, फोन इन कार्यक्रमाच्या संचालिकेच्या गमती (हॅलोऽ दुखी) खुमासदारपणे मांडताना संचालिकेच्या ‘इमेजला’ कमी लेखत नाहीत. प्रसंगनिष्ठ विनोदाच्या माध्यमातून वावरणाऱ्या स्त्रियांना व्यक्ती म्हणून कुठे उणेपणा आणत नाहीत. ‘कागदी बाण’ मारणारे ‘श्रीयुत गंगाधर टिपरे.’ टिपऱ्यांची सून शामल टिपरे, ही वरकरणी थोडी धांदरट असली तरी नव्या पिढीच्या मानसिकतेचे अचूक भान असणारी आहे. म्हणूनच ती तीन पिढय़ांना प्रेमाने एकत्र ठेवते. दिलीप प्रभावळकरांचे ‘कागदी बाण’ कुठेच खुपत नाहीत ते यामुळेच.

मुकुंद टांकसाळे हे लेखकनाम विनोदी साहित्यातले महत्त्वाचे नाव आहे. ‘मिस्किलार’ (कथासंग्रह) ‘ही चाल तुरुतुरु ’, ‘नाही मनोहर तरी’, ‘टिकल ते पोलिटिकल’ अशा अनेक कथांमधून आणि त्यांच्या ललित लेखांमधून स्त्रीचा आल्हाददायी वावर असतो. उदाहरणार्थ ‘पाच सुवासिनी’ (हसंबद्ध) या कथेत, अध्यक्ष महाराजांना ओवाळणाऱ्या ‘संभाव्य पाच सुवासिनी’ म्हणजे धमाल विनोदी स्त्री व्यक्तिरेखा आहेत; पण त्यांचा तो सहज वावर स्त्रीला कुठेच ‘टार्गेट’ करून विनोद निर्माण करीत नाही.
साधारणपणे १९९० ते २००० या काळात प्रहसनात्मक विनोदी नाटके लिहिली गेली; पण त्यात विनोदनिर्मितीसाठी म्हणून (टुनटुन किंवा गुड्डी मारुतीसारख्या) लठ्ठ स्त्रिया, वेडसर कुरूप मुली, अशा शरीरव्यंगावर बेतलेल्या स्त्रिया रेखाटल्या नाहीत. विनोदी साहित्यात दिसणाऱ्या स्त्री प्रतिष्ठेच्या संदर्भातले बदल हे आस्ते आस्ते होत गेले. जसा भवताल बदलत गेला, तशा स्त्रियाही बदलत गेल्या. स्त्रिया बदलत गेल्या, तशी साहित्यकारांची त्यांच्या व्यक्तिरेखा रेखाटताना लागणारी जाणही बदलत गेली. सवंगतेकडून सकारात्मकतेकडचा प्रवास विनोदी साहित्याला साजेशा प्रसन्नतेनेच झाला.
विनोदी साहित्यातला महत्त्वाचा प्रकार म्हणजे विडंबन कविता, त्या कवितेतून पूर्वी दिसणारी कजागबाई, तापट आई, सुंदर शेजारीण, खाष्ट बायको, द्वाड बॉसबाई अलीकडच्या विडंबन कवितेतून गायब होताना दिसते. (विडंबन कविता सामाजिक किंवा सांसारिक विषयांकडून राजकारणाकडे वळत आहे. हेही एक कारण असावे.) त्यासाठी उदाहरणार्थ ५० वर्षांपूर्वीची एक आई पाहा (सदाफुली- ल.म. कुकडे) प्रेमस्वरूप आई। वात्सल्यसिंधू आई॥
कवि कोण बरळला। आणा तया समोरी॥
हे प्रेमस्वरूप कसले?
साक्षात ध्यान गमते संतप्त चंडिकेचे॥
आता ‘नवी नलुताई’ला विडंबन कवितेत भेटु या..
– भिशीचे पैसे हाती खुळखुळले- आणि नलुताईचे पाय तुळशीबागेत पडले. बेन्टेक्सच्या चमचमाटाने नलुताई भुलली- पाचशे रुपयांत सुवर्णमंडित झाली. पावलापासून डोळ्यापर्यंत नलुताई सजली- पाचशे रुपयांची भिशी कामी आली. चिमुकल्या ठमीच्या बोलण्याने तंद्री भंगली. ‘‘आई, मराठी वाक् प्रचार सांग-’’ ठमी म्हणू लागली.
‘‘बाईंनी सांगितले तर लिहायला हवे- लिही ठमे, चकाकते ते सोने नव्हे’’ यात नलुताईच्या परिस्थितीचा अधिक्षेप नाहीच. उलट, थोडक्यात आनंद घेण्याची वृत्ती व्यक्त झाली आहे. असो! प्रस्तुत लेखविषय हा मोठय़ा आवाक्याचा अभ्यास विषय आहे. त्याचा हा अंशभाग समजू या.
लेखाचा समारोप करताना एक ग्रीक मिथ सांगते. ग्रीक साहित्यात प्रत्येक साहित्य प्रकाराची एक देवता आहे. तिला अलंकृत असे सगुण रूप आहे. ‘थिलिया’ ही विनोदी साहित्याची अधिष्ठात्री देवता आहे. तिचा सर्व साहित्य प्रकारातून संभाव्य वावर आहे म्हणून तिला फार मान आहे. थिलिया हे स्त्रीचे रूप आहे. मराठी साहित्यात या रूपाचा फक्त प्रसन्न वावर असावा. अधिक्षेप नसावा. इति अलम्।

१९८० नंतरच्या काळात विनोदी साहित्य गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने आविष्कृत होत गेले. सुभाष भेंडे, बाळ गाडगीळ,
राजेंद्र बनहट्टी यांनी विनोदाची बहार उडवून देताना शहरी जीवन, त्यातली मध्यमवर्गीय राहणी आणि विचारसरणी यांचा खुसखुशीत वेध घेताना, स्त्री-पुरुषांना एकाच तराजूत तोलले. पुरुषांनी करायचा चेष्टा-विषय म्हणून स्त्री चित्रणे केली नाहीत किंवा ‘नटापट्टा’ या विषयाला वाहिलेल्या तकलुपी बायकाही रंगवल्या नाहीत.

 

 – डॉ. सुवर्णा दिवेकर
drsuvarnadivekar@gmail.com