या कथा आहेत, आई मुलांच्या एकत्रित व्यवसायाच्या.. त्यामागे एकच सूत्र.. आईच्या हातची चव! आईच्या स्वयंपाकाच्या आवडीचा, खाऊपिऊ घालण्याच्या उत्साहाचा वारसा पुढे नेला जातो आणि व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली जाते.. आई आणि मुलगा किंवा आई आणि मुलगी, अशा जोडय़ा हौसेहौसेने व्यवसाय पुढे नेतात. कधीकाळी एक घास काऊचा, एक घास चिऊचा म्हणत भरवणारी आणि उष्टय़ाने माखलेल्या बाळाचा कौतुकाने मुका घेणारी आई चक्क बिझनेस पार्टनर होते.. मुलांचे कर्तृत्व आणि आईचा अनुभव यामधून एका छान चवदार अशा यशाचा जन्म होतो..
खास लेख उद्याच्या ‘जागतिक मदर्स डे’ निमित्ताने..
माँ के हाथ का खाना.. किंवा आईच्या हातचे जेवण.. याला आपल्याकडे जरा जास्तच भावनिक मूल्य आहे. त्याचं कारणही कित्येकदा तसं असतंच. कितीही मोठे झालो आणि कितीही काहीही करायला शिकलो तरीही आईच्या हाताची चव वेगळीच असते. आपण जरी कितीही उत्कृष्ट स्वयंपाक करत असलो तरीही अनेक पदार्थ असे असतात की जे आईलाच जमतात. कारण अनेक वर्षांच्या अनुभवांतून, अनेकदा करून करून तिने त्यात ‘मास्टरी’ मिळवलेली असते. प्रत्येकाच्या मनातला एक हळवा कोपरा म्हणूनच तिच्या जेवणाने व्यापलेला असतो. त्यामुळे जेवण किंवा स्वयंपाक या प्रांतात अनेकांचा आदर्श आईच असते. निदान सुरुवातीला तरी. म्हणून सातासमुद्रापलीकडे गेलेला लेक आईला विचारून ‘फोडण्या’ घालतो आणि मुलगी स्वयंपाक करता करताच आईला ‘अमुकची कृती सांग गं पटकन’ म्हणून फोन करते. अर्थात आपल्याच स्वयंपाकघरापुरती मर्यादित असलेली ही आईच्या हातच्या पाककलेची महती अनेकदा पुढे वेगळा आकारही घेऊ शकते. नव्हे तशी ती घेतली आहेच, त्याच्याच या कथा..
या कथा आहेत, आई मुलांच्या एकत्रित व्यवसायाच्या, त्यामागे एकच सूत्र.. आईच्या हातची चव. त्यातूनच आईच्या स्वयंपाकाच्या आवडीचा, खाऊपिऊ घालण्याच्या उत्साहाचा वारसा पुढे नेला जातो आणि व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली जाते.. आणि जिच्याकडून शिकलो तिलाही सामील केले जाते. कधी कधी आईच्याच व्यवसायात पदार्पण होते. आई आणि मुलगा किंवा आई आणि तिची लेक, अशा जोडय़ा मग हौसेहौसेने व्यवसाय पुढे नेतात. कधीकाळी एक घास काऊचा एक घास चिऊचा म्हणत भरवणारी आणि उष्टय़ाने माखलेल्या मुलाचा कौतुकाने मुका घेणारी आई चक्क बिझनेस पार्टनर होते.. मुलाचे/मुलीचे कर्तृत्व आणि आईचा अनुभव यामधून एका छान चवदार अशा यशाचा जन्म होतो.. कधी हे ठरवून घडते तर कधी अपघाताने.. पण ही भागीदारी असते मात्र मजेशीर..
आळेफाटय़ाचा संतोष धानापुने, गावाकडे त्यांचा हॉटेलचा पिढीजात व्यवसाय होता, जो मुख्यत्वेकरून आईच सांभाळायची. तिच्या हातचे खाऊन, तृप्त झालेल्या अनेकांतल्या एकाने संतोषला मुंबईला यायचे सुचवले आणि संतोष मुंबईला आला. सोबत आईची भक्कम साथ, तिचा दांडगा अनुभव आणि संतोषची कष्टाळू वृत्ती यातून नेरुळ येथे ‘केशवानंद पुणेरी ग्रामीण मिसळ हाऊस’चा जन्म झाला. लालभडक तर्रिदार मिसळ, वडा खायला लोक आवर्जून येतात. या हॉटेलात काम करणारे फक्त चार. बेबीताई धानापुने, त्याचे वडील, संतोष आणि त्याची बायको. सकाळी पाच वाजल्यापासून बेबीताई आणि संतोषचा दिवस सुरू होतो. बेबीताई मसाला तयार करून झपाटय़ाने फोडण्या घालतात. संतोष वाढणे, साफसफाई करतो. मिसळीखेरीज फरसाण, शेव हे पदार्थसुद्धा विक्रीला आहेत. पहाटे पाच वाजता दोघे कामाला जे भिडतात ते संध्याकाळपर्यंत. संतोष स्वत: बी.एस्सी. झालेला आहे, पण गिऱ्हाईकांना वाढणे, टेबल पुसणे, भांडी घासणे या गोष्टी करण्याच्या आड ते येत नाही. बेबीताईंचा दांडगा अनुभव आणि हाताची चव यामुळे अल्पावधीतच हे ‘केशवानंद मिसळ हाऊस’ प्रसिद्ध झालंय..
असाच एक गुरमीत. मुंबईच्या गुरमीत कोचरला अजून ते दिवस आठवताहेत. व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर असणारा आणि मोठय़ा कंपनीत काम करणाऱ्या गुरमीतला उमगले की लोकांना बाहेरचे खाणे आवडते, पण कधी कधीच. इतर वेळी त्यांना हवे असते ते घरचे साधे अन्न अर्थात ‘घर का खाना’. नोकरीनिमित्त त्याचा अनेक लोकांशी संपर्क येत होता. आणि जाणवत होते की इथे आपण ‘काही तरी’ करू शकतो.. गुरमीतच्या खानदानात स्वत:चा व्यवसाय करणे हे नवे नसल्याने त्याने सुरक्षित अशी लठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि २०११ मध्ये ‘स्पाइस बॉक्स’ हा डबा पुरवणारा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीचे काही दिवस त्याच्यासाठी फार कठीण होते. जेवण करणे, डबे भरणे आणि ते स्वत:च्या गाडीतून पोचवणे अशा अनेक आघाडय़ांवर तो लढत होता, सोबतीला होती त्याची आई.. गुरुविंदर कोचर म्हणजेच बीजी. पण आव्हान तेव्हा सुरू झालं जेव्हा या सुरुवातीच्या काही दिवसांतच गुरमीतचा स्वयंपाकी अचानक काम सोडून गेला आणि बीजींना खऱ्या अर्थाने पदर खोचावा लागला. दुसरी काही सोय होईपर्यंत बीजी जवळपास २०० माणसांचा स्वयंपाक करत होत्या.. आपल्या आईच्या कणखरपणाचा त्याला साक्षात्कार झाला तो तेथे.. नंतर हळूहळू परिस्थिती रुळावर आली पण आईने जो भक्कम पाठिंबा गुरुमीतला दिला तो त्याचा आत्मविश्वास वाढवून गेला.. आणि ‘स्पाइस बॉक्स’ची घोडदौड सुरू झाली..
अशाच एका आधीपासून प्रसिद्ध असलेल्या खाद्य व्यवसायाची धुरा सांभाळताहेत जील आणि जयश्रीबेन बादियानी. कांदिवलीत आणि आजूबाजूला ‘राजूभाई ढोकलावाला’ माहीत नाही असा माणूस सापडणार नाही. जयश्रीबेनच्या दिवंगत पतीचा हा मूळ व्यवसाय ज्यात त्यांची भरभक्कम साथ होती. त्यांच्या लेकीने बीएमएम केले, पण नोकरी न करता व्यवसायात उडी घेतली. इथे मिळणाऱ्या एकूणएक पदार्थाची कृती जयश्रीबेनची आहे. त्यात जीलच्या नव्या दृष्टीने बदल केले आणि वेगवेगळे पदार्थ ग्राहकांसमोर आणले, जे तरुणांना खास आवडतील. जयश्रीबेनच्या लुसलुशीत ढोकळ्याला जीलने चीज घालून चीज ढोकळा बनवला. मेयानीज वाटी, पनीर ढोकळा अशा पदार्थाची भर घातली. जयश्रीबेन आणि जील या दोघींनी व्यवसाय हाहा म्हणता वाढवलाय. आज जरी कारखान्यात कामगार असले तरी फाफडय़ातील ओव्याचे प्रमाण आणि ढोकळ्यातील सोडय़ाची चिमूट जयश्रीबेनच्या अनुभवी नजरेखालीच पडते..
तर अंधेरीच्या ईशानची वेगळीच गोष्ट. घरची पाश्र्वभूमी अगदी वेगळी.. वडील वैद्यकीय तज्ज्ञ. ईशान आंबर्डेकरने मात्र ठरवून हॉटेल मॅनेजेमेंटचे शिक्षण घेतले आणि स्वत:चा व्यवसाय काही तरी वेगळे करायच्या ऊर्मीतून थाटला. अंधेरी येथे राहणाऱ्या ईशानने २०१५ मध्ये ‘सलाड’ द्यायच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याची आई मेधाताई यांच्या हातची सूप्स अनेकांना आवडायची. त्यातूनच लेकाच्या व्यवसायात मेधाताईही उतरल्या.. आणि आई-लेकाने आरोग्यपूर्ण सलाड आणि सूपचाच व्यवसाय सुरू केला. ईशान स्वत: उत्तम स्वयंपाक करतो. ही मायलेकराची जोडी महिन्याभराचा पौष्टिक मेन्यू आखतात. ज्यात कुठेही रिपिटेशन नसते. मेधाताई तशा योगायोगानेच उतरल्या ईशानच्या व्यवसायात. ईशानचे अनेक चोखंदळ ग्राहक होते ज्यांना या सलाडसोबत आणखी काही हवे होते आणि ईशानने साहजिकच आईलाच पहिली साद घातली. ईशानने हॉटेल व्यवसायाचे घेतलेले तंत्रशुद्ध शिक्षण मेधाताईंचा अनुभव, हातची चव आणि त्यांनी केलेला आहारतज्ज्ञाचा कोर्स यामुळे यांचे ग्राहक वाढत आहेत. ईशान मुख्यत्वेकरून मेन्यू ठरवणे, सलाडचे घटक, सॉस कोणते असतील ते ठरवतो आणि त्याला अनुसरून मेधाताई सूप्स करतात. सुरुवातीला फक्त या मायलेकरांचीच जोडी राबत होती, पण सध्या एक मदतनीस मिळाली आहे. त्यामुळे थोडा भार हलका झालाय, मेधाताईंनी सांगितलं. मेधाताईंनी ‘इग्नूू’ (इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ) मधून आहारविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला तेव्हा त्यांना वाटलेही नव्हते की ईशानसोबतच्या ‘ग्रीन प्लॅटर’चा आवाका इतका वाढेल म्हणून. पण माय-लेकाची ही जोडगोळी मस्त बिझनेस सांभाळत आहेत.
आईने मुलाच्या मदतीला येणे तसे नवे नाही.. आई आपली एक सपोर्ट सिस्टम असते. कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष.. पण जेव्हा आईच्या काबाडकष्टाचा भार हलका करायला मुलगी उतरते तेव्हा या नात्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. ऐरोलीच्या सावित्री अय्यरने आतापर्यंत पाहिलेत ते आईचे अखंड कष्ट. पहाटे तीन वाजता उठून डब्यांसाठी जेवण करण्याची तिची धडपड. म्हणून कळती झाल्यावर सावित्रीने डबे पोचवण्याची जबाबदारी स्वत: उचलली. आधी महाविद्यालय आणि आता नोकरी सांभाळून सावित्री आपल्या अम्माला, कल्पनाला मदत करतेय. कल्पना अय्यर आपल्या छोटय़ाशा स्वयंपाकघरातून पारंपरिक तमिळ पद्धतीचे शाकाहारी जेवण देतात. एकावेळी जवळपास १०० ते १५० माणसांसाठी मोठाल्या पातेल्यात खमंग सांबार उकळत असतो.. बाजूला मऊसूत इडल्या वाफाळत असतात. मिक्सरमध्ये हिरवीजर्द चटणी तयार होत असते आणि आईच्या कडक शिस्तीखाली तयार झालेली सावित्री पटापट डबे भरत असते.. पोचवत असते.. मायकेलींचा दिवस उजाडतो तो पहाटे पाच वाजता आणि मावळतो कधी ते कळतही नाही. सावित्री आता नोकरीला लागली असली तरी अम्माला मदत पूर्वीएवढीच करते.. कधी स्वयंपाकात तर कधी ते पोचवायला..
सावित्रीची अम्मा कल्पना पारंपरिक कुटुंबातल्या. त्यामुळे धंदा वा उद्योग म्हणून त्याच्याकडे बघणं त्यांना जमायचं नाही. त्यामुळे त्यांच्या किमतीही बाजारभावापेक्षा कमी. साहजिकच सुरुवातीला तोटाच व्हायचा. शिवाय आपण जेवण देतोय. मापात पाप करायचे नाही ही पापभीरूवृत्ती होतीच. सावित्रीने तिला बसवून सगळे अर्थशास्त्र व्यवस्थित समजावून दिले. इडलीसाठी महाग सोना मसुरी राईस वापरायला हरकत नाही, पण ती इडली त्याच दराने विकायची. रस्त्यावरच्या स्टॉलवरची किंमत त्याला लावून चालणार नाही, हे पटवायला सावित्रीला खूप खटाटोप करायला लागले. सावित्री त्यामानाने मुंबईत वाढल्यामुळे तिला अनुभव बऱ्यापैकी होता. ऐरोली आणि आजूबाजूच्या भागात झपाटय़ाने उभ्या राहणाऱ्या कंपन्या.. आयटी इंडस्ट्रीज आणि तेथील महाविद्यालये यांच्यामध्ये आपल्या व्यवसायाला वाव आहे हे तिने जाणले आणि जाहिरात करायला सुरुवात केली. कल्पनांना सुरुवातीला पटायचे नाही पण शेवटी सावित्रीच्या हट्टासमोर त्यांनी माघार घेतली. गेली पाच वर्षे कल्पना यांच्या छोटय़ाशा स्वयंपाकघरात हजारोपेक्षा अधिक डबे तयार झाले आहेत आणि होत आहेत. भल्या पहाटे उठून आंघोळ करून कल्पना कॉफी ठेवतात आणि सांबाराच्या भाज्या चिरायला घेतात. तोपर्यंत सावित्रीने पायसमसाठी दूध आटवायला ठेवलेले असते.. एका लयीत ‘कौशल्या सुप्रभातम्’ ऐकता ऐकता दोघी पटपट काम उरकतात आणि डबे भरले जातात.. पोहोचवले जातात..
कुटुंबासाठी आईने पदर खोचून काम करणे तसे नवे नाही आणि आईला मुलांनी मदत करणेही तसे अपरिचित नाही. आपल्या आजूबाजूला असंख्य उदाहरणे असतात.. पण जेव्हा आपले मूल काही तरी नवे करू लागते.. बघता बघता व्याप वाढतो, मुलाची होणारी धावपळ बघून आई व्यवसायात उतरते आणि मायलेक मिळून एक छान व्यवसाय सुरू करतात, असंही घडतं. पुण्याच्या ‘स्वीट बुटीक’च्या आदिती गरवारेचे असेच काहीसे झाले. एलएल.बी. केलेल्या आदितीने केकच्या या व्यवसायात तशी आवड म्हणून उडी घेतली. ‘स्वीट बुटीक’ तिच्याच प्रयत्नाचे फळ. तिला मदत करता करता तिच्या आई स्वाती गरवारे कधी या व्यवसायात पूर्णपणे आल्या हे कळलेही नाही. आदितीला केक बेक करताना, त्यावर आयसिंग करताना पाहून स्वातीसुद्धा त्यात पारंगत झाल्या. आणि ‘स्वीट बुटीक’ सोबत ‘गरवारे फूडस’ उभारले गेले. या दुकानात केक्स आणि चॉकलेटसाठी लागणारे सर्व साहित्य मिळते.. कधी तरी आदितीची मदतनीस नसते तेव्हा स्वाती बेकिंग मिक्सिंगही करतात आणि स्वातीची धावपळ होत असेल तेव्हा आदिती असतेच. दोघींचा हा गोड प्रवास एकमेकींना सांभाळत चालू आहे. स्वातीच्या मते, आदितीमुळे त्यांनी हे नवे करिअर सुरू केलेय. पुण्यात मायलेकींच्या पदार्थाचे चाहते आणि ग्राहक खूप आहेत. स्वातीचा पिंड मूळचा शिक्षिकेचा. आदिती केकच्या व्यवसायात आली ती आवड म्हणून. तेव्हा कल्पनाही आली नव्हती की याचा गोडवा इतका वाढेल म्हणून. आदितीचा तर जम बसलाच, पण तिच्या लक्षात आले की वर्कशॉपमध्ये येणाऱ्यांना केकचे टीन, साचे, चॉकलेट मोल्डस असे अनेक काही तरी हवे असते आणि त्यातून मग जन्म झाला गरवारे फूडचा. येथे अंडर वन रूफ सगळे बेकिंग अॅण्ड कन्फेक्शनरी सामान मिळते. आदितीने स्वत: उद्योजिका म्हणून स्वत:ला प्रस्थापित केलेच पण स्वातीलाही स्वतंत्र व्यावसायिक म्हणून पुढे आणले. सकाळपासून दोघी आलटून पालटून दुकान सांभाळत असतात. ‘कस्टमर इज किंग’ हे आदिती आणि स्वाती तंतोतंत आचरणात आणतात.
आई आणि मुलांच्या मधले हे वात्सल्याचे नाते बघता बघता एका वेगळ्या दिशेला गेलेले आढळते.. नवे करू पाहाणाऱ्या धडपडणाऱ्या लेकाला भक्कम साथ म्हणून गुरमीतच्या मदतीला धावते त्याची आई गुरुविंदर, बीजी तर कधी आदितीच्या केकच्या व्यवसायात स्वाती उतरतात आणि स्वत:चेही वेगळे विश्व उभारतात. मेधाताई आंबर्डेकर ईशानबरोबर वेगवेगळी सलाड, सूप्स तयार करतात आणि एका आरोग्यपूर्ण रुचकर व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवतात.. तर कधी आईचे कष्ट पाहून आपसूक समजूतदारपणे सावित्री अय्यर काम करू लागते आणि बघता बघता आईचा भार संपूर्ण उचलते. कधी आईबरोबर घरचाच व्यवसाय म्हणून जील बादियानी उभी राहाते आणि परंपरागत कौटुंबिक व्यवसायाला आपल्या नजरेने एक वेगळी चव देते.. कधी तरी आळेफाटय़ावरचा संतोष धानापुरेने ठरवून मुंबईत येतो आणि गावाकडची अस्सल ग्रामीण ठसकेबाज मिसळ चटकदार फरसाण देणारा व्यवसाय आईच्या, बेबीताईच्या मदतीने सुरू करून लोकप्रिय होतो. वात्सल्याचे हे नाते एका व्यवसायात रूपांतरित होते.. कधी आईबरोबर लेक तर कधी मुलासोबत आई.. कधी आईकडून शिकून लेक पुढे जाते तर कधी आईला शिकवून लेक तिला भरारी घ्यायला मदत करते.
आई ही पहिली गुरू असते असे आपल्याकडे मानले जाते. आतापर्यंतच्या या सर्व यशोगाथा वाचल्यावर पटते की या गुरूने ‘बढियाँ शिष्य’ तर घडवले आहेतच, पण अनेकदा ‘गुरु गूड तर चेला चिनी’ झालाय.. एकमेकांना समजून घेत.. मदत करत.. कधी वाद घालत तर कधी समजूतदारपणे व्यावसायिक यशाची अनेक शिखरे काबीज करू पाहणाऱ्या या मायलेकरांच्या जोडय़ा.. एक प्रेमळ भागीदारी.. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता.. या मायलेकरांच्यात वाद झालेत.. मतभेद झालेत.. अस्सल पंजाबी स्वयंपाक करणाऱ्या गुरविंदर बीजींना त्यांचा लेक गुरुमीत जे नवे पदार्थ करत होता ते अनेकदा पटले नाही आणि नेहमीच्या पारंपरिक ढोकळ्याला चीज आणि पनीरमध्ये पेश करण्याचा जीलचा प्रयत्न जयश्रीबेनच्या पचनी पडला नाही. पण कधी हट्ट करत तर कधी समजावत मुलांनी नेहमीप्रमाणे आईचे मन वळवले आणि नवनवे प्रकार घडत गेले.. नात्यामध्ये व्यवसाय करू नये, असे म्हणतात पण आई मुलांच्या या व्यावसायिक भागीदारीच्या यशस्वी वाटचालीकडे पाहून ते विधान खोटे ठरतेय. कारण या जोडय़ा आजही टिकून आहेत आणि पुढेपुढे जात आहेत.
‘मदर्स डे’ला आईला गिफ्ट, फुले देऊन अनेक जण तो साजरा करतात.. इथे असणारी मुले तो रोजच साजरा करतात आईबरोबर.. एक प्रेमळ व्यवसाय करून..
हॅपी मदर्स डे !
शुभा प्रभू साटम shubhaprabhusatam@gmail.com