रमाबाई रानडे यांच्या ‘सेवासदन’नेच पहिली नर्स देशाला दिली. परंतु रमाबाईंनी १९१६ मध्ये ‘सबअसिस्टंट सर्जन’ हा अभ्यासक्रम सुरू केला. त्यासाठी विद्यार्थिनी मॅट्रिक पास व शास्त्रीय विषयाची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे, ही अट होती. आजही नर्सिग कोर्ससाठी वेगळी सीईटी घेतली जाते. शंभर वर्षांपूर्वी ही सुरुवात रमाबाईंनी केली. केवढी दूरदृष्टी! शंभर वर्षांपूर्वी मुलींना शाळेतही जाण्यासाठी संघर्ष करावा लागायचा तिथे पुढचं शिक्षण घेऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं केवढं धाडसाचं काम पण रमाबाईंनी ते शंभर वर्षांपूर्वी केलं. अनेकींचं आयुष्य मार्गी लागलं..
रमाबाई रानडे यांच्या विचारातून, कष्टातून उभं राहिलेलं, सेवासदन. आजही स्त्रीशिक्षणाची साक्ष देत ठामपणे उभं आहे. मात्र ते घडलं शंभर वर्षांपूर्वी. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांनी सदाशिव पेठेत,‘सेवासदन’मध्ये प्रत्यक्ष येऊन रमाबाईंच्या कामाची पाहणी केली. तो दिवस ‘सेवासदन’साठी महत्त्वाचा ठरला. न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दलचा आदरभाव व रमाबाईंबद्दलचा स्नेहभाव गांधींनी आपल्या भाषणात व्यक्त केला. स्त्रियांना शिक्षणाचा नवा मार्ग रमाबाईंनी दाखवला, याबद्दल गांधीजींनी रमाबाईंची प्रशंसा केली. इथल्या वसतिगृहात शिक्षणासाठी मराठा, ब्राह्मण, मुसलमान, ख्रिश्चन अशा सर्व जातिधर्माच्या मुली राहत होत्या. त्यादृष्टीने १९१५, १९१६, १९१७ ही तीन र्वष रमाबाईंच्या आयुष्यातली महत्त्वाची र्वष ठरली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे उर्फ माधवराव याचं निधन झाल्यानंतर त्यांनी आपलं सारं आयुष्य मुलींच्या शिक्षणावर, त्यांच्या उन्नतीसाठी व्यतित केले. तोपर्यंत त्या माधवरावांच्या तालमीत तयार झाल्या होत्या.
घरच्यांचा विरोध पत्करून रमाबाईंनी शिक्षण घेतलं होतं. अगदी इंग्रजीही त्या उत्तम लिहू बोलू शकत होत्या. न्यायमूर्ती रानडे जिथे जिथे बदली होऊन जात तिथे तिथे आपलं सामाजिक कार्य त्या सुरू करीत. सभा, व्याख्यानं, प्रार्थना समाजाची शाखा, वाचनालय या सर्व कामांत रमाबाई भाग घेत. पुण्यात सुट्टीत आल्यावर अनेक विद्वान मंडळी न्यायमूर्तीना भेटायला येत. त्यात स्त्रीशिक्षणाचा विचार, चर्चा असे. या चर्चासत्रातून काशीबाई कानिटकरांसारखी सुहृद रमाबाईंना लाभली. हा काळ १८८२/८३चा, किती सनातनी, स्त्री-शिक्षणाला प्रतिकूल होता हे आज वाचून आश्चर्य वाटतंच, पण चीड येते. एवढा आपला समाज गतानुगतिक आणि दुष्ट. प्रेम, माया, वात्सल्य, सहानुभूती या मानवी भावनांचा अभाव असलेला असा का होता? ‘स्त्री’ला इतकं हीन का लेखलं जात होतं? शिक्षण म्हणजे काय? जग म्हणजे काय? इंग्रजांचं राज्य होतं तर ते इथे कुठून आले? का आले? हे प्रश्न मूठभर चळवळ्या लोकांशिवाय कुणाला पडतच नव्हते. मुलग्यांना शिक्षण द्यायचं मुलींना नाही. लग्न वयाच्या दहा वर्षांच्या आत. नवरा गेला की केशवपन. पुन्हा लग्न नाही. कायदा झालेला असूनही नाही. सतीप्रथा बंद करण्यात आली. राजा राममोहन रॉय व इंग्रज अधिकाऱ्यांना त्यात यश आलं होतं हे त्यातल्या त्यात समाधान!
१७ नोव्हेंबर १८८४ रोजी पुण्यात बुधवार पेठेत किबे वाडय़ात मुलींची शाळा सुरू झाली. पण त्यापूर्वी जी सभा घेण्यात आली तेव्हा गव्हर्नर सर जेम्स फग्र्युसन यांना बोलवण्यात येऊन त्यांच्यापुढे शाळेची मागणी करण्यात आली. तेव्हा सभेला पुढारी, सरकारी अधिकारी, सरदार अशी प्रतिष्ठित स्त्री-पुरुष मंडळी होती. त्या सभेत जे निवेदन वाचायचं होतं ते इंग्रजीत होतं. माधवरावांनी सोप्या भाषेत लहान लहान वाक्यांत लिहून देऊन ते रमाबाईंना वाचायला सांगितलं. प्रथम रमाबाई घाबरल्या. पण नंतर अवसान गोळा करून त्यांनी ते सभेत वाचलं. माधवरावांनाही समाधान वाटलं. श्रोत्यांना भाषण आवडलं. पण घरी इंग्रजी भाषणाचं वृत्त समजताच आगडोंब उसळला. रमाबाईंबरोबर माधवरावांनाही बोलणी खावी लागली. इतकं की, ‘दोन हजार लोकांसमोर बायको इंग्रजी वाचते याची लाज कशी वाटली नाही? डोक्यावरचे पागोटे तरी राहिले कसे?’ असं खूप काही. रमाबाई व माधवराव यांनी उत्तर दिलं नाही. पण त्यांनी रमाबाईंना उपदेश केला. म्हणाले, ‘त्यांचे वाटेल तसे बोलणे मुकाटय़ाने ऐकून घेणे त्रासाचे आहे हे मी जाणतो पण आज होणाऱ्या त्रासापासून सोशिकपणा आपण जो शिकू तो जन्मभर उपयोगी पडेल. काही न बोलता योग्य दिसेल ते करायचे सोडायचे नाही.’ माधवरावांचा त्यांना खराखुरा आधार होता. मात्र रानडे यांचं १६ जानेवारी १९०१ रोजी निधन झालं. रमाबाईंवर आकाशच कोसळलं. घरातली सावत्र सासू, नणंद आणि अन्य स्त्रीपुरुष यांच्या म्हणण्याला न जुमानता रमाबाईंनी केशवपन करायला ठाम नकार दिला. आनुषंगिक वस्त्रंही नाकारली (लाल अलवण). त्यांनी वर्षभर स्व:ताला घरात बंद करून घेतलं मात्र याच काळात त्यांच्या पुढच्या आयुष्याची आखणी तयार झाली असावी. त्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवेला वाहून द्यायचं ठरवलं.
माधवराव गेल्यावर वर्षभरानंतर त्यांना प्रथम बाहेर पडावंस वाटलं ते धोंडो केशव कर्वे यांच्या अनाथ बालिकाश्रमाला भेट देण्यासाठी. याचं कारण प्रो. कर्वे यांचं स्त्रीशिक्षणाचं कार्य आणि अनाथ बालिकाश्रम यात त्यांना कुठे तरी दिशा दिसली. कर्वे यांनाही रमाबाई आश्रम पाहायला आल्याचा आनंद झाला. लोकांचा रोष पत्करून ते विधवांना शिक्षण देत होते. आश्रम पहिल्यावर या कार्याला आपला हातभार लागावा म्हणून १२ जुलै १९०४ पासून अनाथ बालिकाश्रमाच्या व्यवस्थापनाचं अध्यक्षपद रमाबाईंनी स्वीकारलं.
रमाबाईंच्या पुढील कार्यावर दृष्टिक्षेप टाकला तर जाणवणाऱ्या ठळक गोष्टी खालीलप्रमाणे :- अल्पवयीन मुलींचं देवधर्माच्या नावाखाली केलं जाणारं लैंगिक शोषण थांबवावं, यासाठी सर भांडारकरांनी गव्हर्नरला पत्र लिहिलं. त्याखाली पुण्या मुंबईतील २१५ सुधारकांनी सह्य़ा केल्या. त्यात दोन स्त्रिया होत्या. काशीबाई कानिटकर आणि रमाबाई रानडे.
मुंबईत असताना १८९४ मध्ये रमाबाईंनी हिंदू लेडीज सोशल अॅण्ड लिटररी क्लब स्थापन केला होता. त्याच पद्धतीचा क्लब पुण्यात १९०२ मध्ये आपल्या वाडय़ात स्थापन केला. स्त्रियांच्या उन्नती करता हा क्लब होता. आनंदीबाई भट त्यांच्या सहकारी होत्या. त्यासाठी संस्थेच्या वतीने उद्बोधक व्याख्यानं, कीर्तनं, सणांच्या निमित्ताने मेळावे भरत. त्यात हिंदू, पारशी, मुसलमान, ख्रिश्चन, गुजराथी वगैरे निरनिराळ्या जातिधर्माच्या २०० च्यावर स्त्रिया येत. क्लबतर्फे दुपारचे स्त्रियांसाठी वर्ग चालवले जात. मराठी, इंग्रजी शिकवत. प्रथमोचार, शिवण आणि धार्मिक ग्रंथांचं वाचनही असे. पुण्यात येणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नरांच्या पत्नीही रमाबाईंच्या कामात सामील होत्या. हे काम म्हणजे ‘सेवासदन’चं पायाभूत काम होतं.
रमाबाईंचं आजपर्यंत चालू असलेलं महत्त्वाचं काम म्हणजे ‘सेवासदन’ ही संस्था. मुंबईत पारशी सुधारक बहेरामजी मलबारी व दयाराम मिट्टधमल यांनी १९०७ मध्ये ‘सेवासदन’ ही संस्था सुरू केली. त्या संस्थेचे सल्लागार सर भालचंद्र भाटवडेकर यांनी रमाबाईंना पत्र पाठवून संस्था कशी असावी याची योजना तयार करायला सांगितली. वेगवेगळ्या समित्या स्थापन करून माननीय स्त्री-पुरुष सदस्य झाले आणि ११ जुलै १९०८ रोजी रमाबाईंच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन रीतसर ‘सेवासदन, मुंबई’ ही संस्था स्थापन झाली. या संस्थेचे उपनाव ‘सिस्टर्स ऑफ इंडिया सोसायटी’. मुंबईतील ‘सेवासदन’ नीट चालू झाल्यावर पुण्यात ‘सेवासदन’ सुरू करावं असं ठरलं.
रमाबाईंच्या घरी जो क्लब होता त्यात व्याख्यानाखेरीज जे शिक्षण वर्ग होते त्याचं काम १५ मार्च १९०९ पासून पद्धतशीर करण्यात आलं. रँग्लर परांजपे यांच्या पत्नी सीताबाई परांजपे, भांडारकरांची सून सीताबाई, जानकीबाई भट, यमुनाबाई भट इत्यादींनी शिक्षणासाठी परिश्रम घेतले. वर्गात शिकणाऱ्या मुलींच्या परीक्षा घेतल्या. या सर्व प्रौढ स्त्रिया होत्या. त्यात विधवा, कुमारिका १४ ते ३५ असा वयोगट होता. २ ऑक्टोबर १९०९ रोजी रानडेवाडय़ात रमाबाईंनी क्लबची सभा घेतली. तेव्हा ‘सेवासदन’ संस्थेची पायाभरणी केली गेली. रमाबाईंनी संस्थेचा उद्देश, नियम वाचून दाखवले. या संस्थेत शिक्षणावर भर होता. संसारी स्त्रियांसाठी दुपारी दोन ते पाच या वेळेत वर्ग घ्यायचं ठरलं. १९१० मध्ये सहा वर्ग झाले. मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित हे विषय कसे शिकवायचे, त्यांचं नियोजन केलं. डॉ. गोखले, डॉ. शिखरे शारीरिक शिक्षण, आरोग्य, प्रथमोपचार यावर व्याख्यानं देत.
संस्थेसाठी सदस्य योजना आखली व त्यांच्याकडून वर्गणी आणि देणग्या स्वरूपात पैसे गोळा झाले. या सदनात ग्रंथसंग्रहालयही सुरू झालं. ‘सेवासदन’तर्फे विद्यार्थिनींना नर्सिग कोर्सला पाठवण्यासाठी ससून हॉस्पिटलचे कर्नल स्मिथ यांना विनंती केली. रमाबाई ससून हॉस्पिटलच्या सल्लागार समितीवर होत्या. ‘सेवासदन’च्या सदस्यांना, विद्यार्थिनींना त्या हॉस्पिटल पाहायला घेऊन जात. त्यासाठी त्यांनी एक टांगा ठेवला होता. देशातील पहिली भारतीय नर्स ‘सेवासदन’ने तयार केली, असं ‘सेवासदन’चे कार्यवाह देवधर अभिमानाने सांगत. मुख्यत: सर्वाबरोबर रमाबाईंनी आपलं तनमनधन या संस्थेसाठी अर्पण केलं. या विद्यार्थिनींसाठी रमाबाईंनी आपल्या राहत्या वाडय़ात मुलींचं वसतिगृह सुरू केलं. मग रास्तापेठेत वाडा भाडय़ाने घेऊन नर्सिगसाठी बोर्डिग सुरू केलं. यात विधवांचा भरणा होता. परंतु ‘सेवासदन’ला स्वत:ची इमारत हवी होती. त्यासाठी जागा, पैसा, सर्वच तयारी करायची होती. रमाबाईंनी स्वत:चे पाच हजार देऊन निधी संकलन सुरू झालं. स्त्री-पुरुष सर्व जण या कामासाठी झटू लागले. रानडे पती-पत्नींनी गोळा केलेलं मनुष्यबळ रमाबाईंच्या बरोबर होतंच.
१३ फेब्रुवारी १९१५ रोजी सदाशिव पेठेत प्रत्यक्ष महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांनी ‘सेवासदन’मध्ये येऊन रमाबाईंची प्रशंसा केली. लक्ष्मी रस्त्यावर ‘सेवासदन’ इमारत बांधण्याचं काम सुरू झालं होतं. मार्च १९१५ पासून ‘सेवासदन’चं स्वत:च्या वास्तूत सर्व वर्ग व कार्य सुरू झालं. महात्मा गांधी यांनी नावाजलेली संस्था ‘सेवासदन’ असं कौतुक होऊ लागलं. रमाबाई रानडे यांची ‘सेवासदन’ संस्था त्यांच्या वाडय़ातच १९०९ मध्ये सुरू झाली. नंतर भाडय़ाने वाडे घेणं, मुलींच्या वसतिगृहाची सोय करणं, या संघर्षांत त्यांनी ‘सेवासदन’ची वास्तू उभारायचं ठरवलं. स्वत: सुरुवातीचे पैसे घालून सभासद योजना राबवून, प्रदर्शनं भरवून पैसे उभारले. त्यादृष्टीने १९१५, १९१६, १९१७ ही तीन र्वष रमाबाईंच्या आयुष्यातली महत्त्वाची र्वष ठरली आहेत. १९ फेब्रुवारी १९१५ रोजी रमाबाईंनी रानडे वाडा सोडला व त्या ‘सेवासदन’मध्ये आल्या. कारण न्या. रानडे यांनी मृत्युपत्रात लिहिलं होतं, नानू (दत्तक मुलगा) २१ वर्षांचा झाला की वाडा त्याला द्यायचा. ते रमाबाईंनी तंतोतंत पाळलं. त्या ‘सेवासदन’मध्ये आल्या. १९१६ मध्ये रमाबाईंनी ‘सेवासदन’मध्ये एक महत्त्वाचा अभ्यासक्रम सुरू केला. त्याला या वर्षी १०० र्वष झाली. नर्सिगचं शिक्षण ‘सेवासदन’मध्ये होतंच. ‘सेवासदन’नेच पहिली नर्स देशाला दिली. परंतु रमाबाईंनी ‘सबअसिस्टंट सर्जन’ हा अभ्यासक्रम सुरू केला. त्यासाठी विद्यार्थिनी मॅट्रिक पास व शास्त्रीय विषयाची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे, ही अट होती.
आजही नर्सिग कोर्ससाठी वेगळी सीईटी घेतली जाते. शंभर वर्षांपूर्वी ही सुरुवात रमाबाईंनी केली. केवढी दूरदृष्टी! या कोर्ससाठी सात जणी दाखल झाल्या. त्यात मराठा, ब्राह्मण, ख्रिश्चन, मुस्लीम मुली होत्या. त्या सर्व एकत्रच राहात असत. १४ ऑक्टोबर १९१७ रोजी ‘सेवासदन’ संस्थेची स्वतंत्र नोंदणी झाली. पुण्यात फ्लूची साथ आली तेव्हा ‘सेवासदन’ने परिचारिका पुरवल्या.
रमाबाईंच्या ‘सेवासदन’ संस्थेचा व्याप वाढत राहिला. पुण्यात पाच व संस्थेच्या अन्य शाखांमध्ये सात अशी बारा वसतिगृहं शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी झाली. १२० गरीब विद्यार्थिनींचा सर्व खर्च ‘सेवासदन’ करीत असे. मुख्य आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतका सनातनी काळ, पुणं म्हणजे सनातन्यांचा बालेकिल्ला असं असताना रमाबाई संस्थेत धर्म, जात, पंथ, प्रांत असा कोणताही भेदाभेद करीत नसत. त्यामुळे सर्व जाती-धर्माच्या मुली इथे शिकायला येत. न्या. रानडे यांच्याबरोबर रमाबाई प्रार्थना समाजाच्या उपासनेला जात. तिथेही ‘भेदाभेद अमंगळ’ असा उपदेश केला जात असे.
याच काळात परदेशात एमिली पंखहर्स्ट स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून लढत होती ते लोण इथेही आलं. त्याच वेळी देशात स्त्रियांना मताचा अधिकार द्या, अशी चळवळ सुरू झाली होती. पार्लमेंटला निवेदनं पाठवली गेली. नंतर मुंबई इलाख्यातील स्त्री मताधिकारच्या चळवळीसाठी वीस प्रमुख स्त्रियांची समिती नेमण्यात आली. त्यात रमाबाई प्रमुख अधिकार पदावर होत्या. लंडनमध्ये सरोजिनी नायडू, अॅनी बेझंट या स्त्रिया त्यासाठी कार्यरत होत्याच. अन्य स्त्रियांबरोबर रमाबाई रानडे यांनी ‘सर्व्हट्स ऑफ इंडिया’ या साप्ताहिकात पत्र लिहून चळवळीचा जोरदार प्रसार केला. मुंबई कायदे कौन्सिलात मताधिकार मिळवण्यासाठी मार्च ते जुलै १९११ असा पाच महिने जोरदार लढा दिला गेला. रमाबाई ‘विमेन्स इंडिया असोसिएशन’च्या पुणे शाखेच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी पुण्यात अनेक सभा घेतल्या. शेवटी २७ जुलै १९२१ रोजी ‘विशिष्ट नियमांमुळे मतदार यादीत नाव नोंदवण्याबाबत स्त्रियांची जी स्त्रीत्वमूलक अपात्रता आहे ती सर्वथा रद्द करण्यात यावी.’ हा ठराव मंजूर झाला. अधिवेशनात ठराव मांडताना रमाबाईंनी इंग्रजीतून केलेली भाषणं वाचनीय आहेत. त्यांचं हे कार्य लक्षात घेण्यासारखं आहे.
‘सेवासदन’व्यतिरिक्त येरवडा तुरुंगाच्या रमाबाई मानद पर्यवेक्षक होत्या. तिथेही त्यांनी तुरुंगातील स्त्रियांना साक्षर करणं, त्यांना समुपदेशन देणं ही कामगिरी वीस र्वष केली. कुठेही सामाजिक असमानता दिसली की त्या तिथे जाऊन काम करीत. त्यांची मानस कन्या सखू हिने सांगितलं म्हणून रमाबाईंनी माधवरावांच्या सहवासातल्या आठवणी लिहून काढल्या. ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे पुस्तक १९१० मध्ये प्रकाशित झालं. न्या. रानडे याची ‘धर्मपर व्याख्याने’ हे पुस्तक रमाबाईंनी वैद्य यांच्या मदतीने प्रकाशित केलं.
मार्च १९२२ पासून रमाबाईंना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. पुन्हा दोन वर्षांनी १९२४ मध्ये रमाबाईंना कर्करोगाचा प्रादुर्भाव झाला. त्या आजारातच २६ एप्रिल १९२४ रोजी दुपारी त्या अज्ञाताच्या प्रवासाला गेल्या. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या वर स्त्री-पुरुष होते. स्त्रिया स्मशानात जात नाहीत तरीही अनेक स्त्रिया अंत्ययात्रेला होत्या. स्मशानात रँगलर परांजपे व बनुताई भट यांची भाषणं झाली. त्यांच्या भावाने त्यांना अग्नी दिला. इच्छापत्र करताना रमाबाईंनी आपली स्वत:ची मिळकत ‘सेवासदना’ला दिली.
न्या. रानडे यांचे विचार आजही परिप्लुत आहेत आणि रमाबाईंनी उभं केलेलं ‘सेवासदन’चं कार्य अजूनही या २१ व्या शतकात चालू आहे. समाजकार्य आणि ‘सेवासदन’ यांच्याशी त्यांचं प्रेमाचं व आपलेपणाचं नातं जुळलं होतं आणि मनात, विचारात माधवराव वसलेले होते.
एक अशिक्षित चिमुरडी माधवरावांच्या आयुष्यात येते आणि नुसती सुशिक्षितच नव्हे तर ज्ञानकर्मी होऊन नवऱ्याचं जीवितकार्य पुढे नेऊन ठेवते. केवढं हे आमूलाग्र परिवर्तन! उच्चकोटीच्या मनुष्यपदाला रमाबाई पोचल्या. त्या शिक्षणाने, ज्ञानाने आणि नवऱ्याच्या अभंग प्रेमाच्या बळावर.
संदर्भ –
आमच्या आयुष्यातील काही आठवणी – रमाबाई रानडे
रमाबाई महादेवराव रानडे – व्यक्तित्व आणि कर्तृत्व – ले. विलास खोले
मधुवंती सप्रे