नामदेव ढसाळ याची कविता स्त्रीविषयक संवेदनांचे जेवढे रंग प्रकट करते तेवढे समस्त मराठी कवींनी मिळून अद्यापपावेतो प्रकट केले नाहीत, असे मला वाटते. ‘बाई’ जातीच्या वैश्विक रहस्याने नामदेव ढसाळ या कवीचे अंतरंग अनेक पातळ्यांवर व्यापून टाकले आहे. ‘बाई : गूढ राहिली कायमची माझ्यासाठी’ असे त्याने म्हटले आहे. हे गूढ विविध रूपांत सतत त्याच्यासमोर येत राहिले आणि आई, मावशी, बहीण, प्रेयसी, बायको, जन्मगावातल्या बायका, आयुष्यात येऊन गेलेल्या अनेक स्त्रिया, वेश्या, अशी बाईची विविध रूपे अनुभवताना नामदेवला मानवी अस्तित्वाचे, त्या अस्तित्वाशी निगडित अशा जगण्याच्या अनेकविध विभ्रमांचे भान येत गेले. ही रुपे अनुभवताना, जवळून न्याहाळताना माणूसपणाच्या आतडय़ाच्या नात्याने त्यांच्याशी तो जोडला गेला. त्यांच्या जगण्याचा अर्थ समजून घेत राहिला.

नामदेवची स्त्रीविषयक कविता ‘रोमँटिक’ नाही. आनंद, तृप्ती, शांती, विश्रांती यांच्या छटा या कवितांतून उमटत नाहीत. तर अस्वस्थता, तडफड, बेचैनी, आत्मक्लेश, अंत:करणातून सुरी फिरत असावी तशी वेदना, आकांत, प्रश्नचिन्हे असे अस्तित्वाशी चिकटून असणारे दु:खद, उदास करणारे रंग या कवितांच्या अवकाशात भिरभिरताना जाणवतात. त्याच्या कवितेतली आई नेहमीची ‘प्रेमस्वरूप’ आई नाही किंवा पत्नी नुसती ‘काळीसावळी लाडकी मादी’ नाही. बायको ही ‘विसाव्याचा खडक’ आहे. ‘या प्रचंड विषमतेच्या देशात’ आपण सुरू केलेल्या लढय़ातली ती ‘कॉम्रेड’, ‘प्राणांतिक साथीदार’ झालेली असते. ‘माझ्या जन्मागावच्या बायका’ या कवितेत नामदेवाच्या नजरेने न्याहाळलेले हे बायकांचे जगणे पाहा : ‘ठळक दुपार.. साळूबाईच्या अंगणात

जमल्यायत समद्या जणी :

कुणी खालच्या आळीची, कुणी मधल्या फळीची;

सुगंधा, यशोदा, यमुनी, हरणा, राही

झाडणं लोटणं। भांडी कुंडी। पाणी लवणी।

कोरडय़ास भाकरी;

न्हाणी धुणी करकरून पार थकून

गेलेल्या  बायका.

सारव भिंती तं म्हणं कोन्हाडं किती!’

एकमेकांच्या प्रपंचाची दु:खे वाटून घेतायत बायका – आणि त्यांची छोटी छोटी मुलं त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत त्यांच्या कैफियती ऐकत राहतात, नवऱ्याने देहावर केलेले दंश आणि पाठीवर ओरखडलेली नखे एकमेकींना दाखवतात – त्यांच्या मुलांना कळत नाहीत ती दु:खे, नामदेव म्हणतो, ‘माझ्या कविते, तू टिपून घे.’

नामदेवची ‘आई’ ही कविता मला फार आवडते. आणखी अनेकही आवडतात, जशी, ‘राहीबाई’, ‘आईच्या समजुतीसाठी’ यादेखील. पण,

‘आई शहरात आली देहाचं झाडवात घेऊन –

कष्ट। खस्ता उपसल्या। भोगल्या

शिळ्या भाकरीचे तुकडे मोडून

तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता

तिच्या देहातली वाद्यंही अशी झंकारत रहायची..

चिक्कार पाहिलं – भोगलं आईनेही.

शहरातही तिने तवलीत अन्न शिजवलं,

पैठणीचे रंग न्याहाळता न्याहाळता,

जुनेराला थिगळ लावलं.

बापा आगोदर मरून,

तिने असं अहेवपण जिंकलं!

आई अगोदर बाप मेला असता तरी,

मला त्याचं काही वाटलं नसतं; दु:ख याचं आहे:

तोही तिच्या करारात सामील होता!

दोघांनीही दारिद्रय़ाचे पाय झाकले, लक्ष्मीपूजनला दारिद्रय़ पुजलं. प्रत्येक वेळी दिवाळी ही अशी माझ्यासाठी, एक एक पणती विझवत गेली.. आईची श्रद्धा. तिचा नियंत्यावरचा विश्वास, ‘येरझारांच्या वाटेवर,.. दीड वितीच्या पोटातील आग विझवण्यासाठी  एका गावाकडून गावाकडे जाताना, चिंध्यांच्या देवीला पदराची दशी फाडून  तिच्या काठीला बांधत तिचे नतमस्तक होऊन हात जोडून उभे राहाणे, हे सारे आठवताना ‘डोळे माझे येतात पाण्याने भरून.. ही देवी कसली, ही तर साक्षात माझी आई.. हे जाणवणे मराठी कवितेत प्रथमच अवतरले आहे.

आई, तू आयुष्यभर शोषित राहिलीस, एकदाही हंबरली नाहीस तळागाळातून. तुझ्या चीत्कारण्याने एकदाही ढवळलं नाहीस आभाळ, चीर गेली नाही जमिनीला.. बाजारात स्वत:च्या देहाचा विक्रय करणाऱ्या आणि रस्त्यात भीक मागणाऱ्या बाया पाहिल्या की आई, मला तुझी आठवण होते असे म्हणणाऱ्या नामदेवने, ‘बिन्नी, विनती, जहिदा, फ्रीडा, लोरा, सलमा’ असे ‘सहा पाकळ्यांचे छिन्न  विच्छिन्न कमळ’, ‘वस्त्रे तडकलेली, मांडी फोडलेली, वेदनांकित षोडशा’ अशी मंदाकिनी पाटील, ‘राहीबाई. तुझ्या कमाईचे बिघे तुझा भाऊ पिकवतो आहे.. तुझ्या देहाची कमाई खाऊन बघ ऊस कसा पोसला आहे’ – ती कित्येक शतकांच्या व्यथा वेदनांचा इतिहास सांगणारी लाल दिव्यांची वस्ती आणि तीत राहणारी, अर्धागवायू झालेली, उपदंशाचे भोग भोगणारी राहीबाई – या स्त्रियांबद्दलचा विलक्षण जिव्हाळा व्यक्त केला आहे. या स्त्रिया हा नामदेवच्या संवेदनेला झडझडून जागवणारा, विव्हळ करणारा हळवा कोपरा आहे. त्यांच्या जगण्यातल्या यातनांचे कल्लोळ, त्यांचे दुबरेध, क्लिष्ट, कठीण, गुंतागुंतीच्या व्यवहारांनी चिरफाळलेले विश्व शब्दांत आणताना नामदेव नवी रूपके, नव्या प्रतिमा योजतो.

‘आमच्या भुयारी डोळ्यांतले

आदिवासी शिल्पकाम

कुठल्याही माणसाला, टांगेवाल्याला,

दिव्याच्या खांबाला, रस्त्यातल्या इमारतीला वाचता येत नाही. ७० एम्. एम्. मध्येही.

आम्ही कपुरी अंगाने आल्या गेल्याच्या

तळव्याखाली जाऊन होरपळतो.

दे माय, धरणी ठाय!’

वास्तविक पाहता, ‘ऋतुधर्म सुरू झाल्यावेळचं वय, लैंगिक ज्ञान झाल्यावेळचं वय, पहिला संभोग रक्तस्राव, संभोगोत्तर मन:स्थिती, आवडनिवड, गर्भधारणा, वय, उंची, बांधा. असे स्वत:चे शरीर मन समजून घेत जगण्याऐवजी, ‘हिशोब ठेवला तिनं हाडा चामडय़ाचा चिखलाचा..’

एरवी, ‘मनगटावरच्या चमेली गजऱ्यात कवळ्या कलेजीची शिकार उकरून शेवटच्या बसची वाट पाहणारे’ लोकच सर्वत्र आढळतात पण नामेदवसारखी सर्वव्यापी करुणा क्वचित.

नामदेवच्या प्रेमकवितांमधून प्रकटणाऱ्या स्त्रियांविषयीच्या जाणिवाही अनोख्या आणि अनोख्या प्रतिमांतून व्यक्त झालेल्या आहेत. त्यांच्याशी असणारे या कवितांतील पुरुषाचे नाते गुंतागुंतीचे आहे.

..‘पिकासोच्या गुर्निकात जशा आहेत भविष्यातल्या सर्व भयानक गोष्टी तसे झाले, या क्षणीचे आयुष्य माझे!

निष्पाप, निरागस मुली, माझ्या हातावर प्राजक्ताची फुले ठेवून कशाला उघडलास अचानक आदिम सनातन प्रेमाचा दरवाजा?

नामदेवच्या स्त्रीविषयक कविता वाचताना पुरुष कवींच्या प्रेम कवितांमध्ये आढळणारी आनंद, तृप्ती, सौख्य यांच्याशी निगडित भावना दिसत नाही. शरीर तृष्णा आहे पण तिच्याशी लगटून सतत ‘जन्मभराचे दु:ख, दारिद्रय़ यातना’ आहेत. स्वत:त दडलेला ‘सैतान’, रानटी ‘पशू’च अधिक जाणवतो आहे. आत्मछळ, वैफल्य, यातनांचा हलकल्लोळ, शरीरवासना, आसक्तीबरोबरच आयुष्यात सुरू असलेले काळोख आणि प्रकाश यांचे युद्ध विसरले जात नाही. ‘विनती जाधव’ या कवितेत ‘एका व्याकूळ प्रेम कथेतली पात्रे’ असणारा निवेदक आणि ती जात-धर्म-रूढी-परंपरा यांच्या जाचाने शेवटी दुरावतात पण अजूनही ती दिसली की उगाचच गलबलून येतं.. मागचं, सारं विसरून माझ्या कवितेचं जग विशुद्ध संवेदनेने भरून जातं..’ ‘नसलेल्या परमेश्वराजवळ,’ ‘शुभदे..’ ‘प्रश्न, ज्याला उत्तर नाही’, ‘रत्नमाल निळे,’ ‘शोभा परब’ अशा अनेक कवितांमधून ‘प्रेम’ या अनुभवातली विलक्षण गुंतागुंत परोपरीने व्यक्त झालेली आहे.

नामदेवाची मार्क्‍सवादी विचारधारा त्याच्या स्त्रीविषयक कवितांमधून सतत वाहताना दिसते. ‘आईच्या समजुतीसाठी’तील आई जिला गावगाडय़ाच्या रगाडय़ातून पांगता आले नाही, जी हयातभर ठिगळं जोडत राहिली हृदयाला, जी आयुष्यभर शोषित राहिली आणि अद्यापही शरण जाते आहे व्यवस्थेला – ती प्रातिनिधिक आहे. तिच्यात, ‘निसर्गदत्त निर्भरता’ आहे, ‘काम करण्याचा शोष’ आहे, ‘निर्णय घेण्याची ऐपत’ आहे, ‘उत्पादनाचं नवं तंत्र शिकण्याची जिज्ञासा आहे, ‘स्वातंत्र्याची निष्ठा आहे’ – कोणत्याही स्त्रीमध्ये असणारे हे कर्तृत्व पुरुषप्रधान संस्कृतीने नष्ट केले, तिला चूल आणि मूल या गोष्टीतच सडत ठेवले, ‘किडय़ांचे जननयंत्र’ म्हणूनच तिच्याकडे पाहिले गेले आणि ती अज्ञानी राहिली. ‘हजारो वर्षांची गडद आंधळी आई’ – जिला शोषणाची जाणीव नाही, माणसांच्या खरेदी-विक्रीच्या सनावळ्या माहीत नाहीत, इतिहासातले भीषण हत्याकांड माहीत नाही – त्या आईला नामदेव ‘तू माझ्या शस्त्राचा आधार हो’ – असे म्हणतो आहे. आपल्या ‘काळ्यासावळ्या लाडक्या मादी’ ला, ‘तू फक्त मला आधार दे आणि बघ मी कसा मरणाला सामोरा जातो, कसा दुनियाला जाग लावतो ते..’ म्हणतो.

‘बायकोसाठी’ या कवितेतल्या, ‘तू माझी जनित्रे, तू माझी ऊर्जा’, ‘किती सहजगत्या या पशूला तू माणसात आणलेस’, आणि बायको, या सोंगा-ढोंगांच्या दुनियेत मी माझ्याजवळ असो नसो, तू माझ्या जवळ आहेस’.. या ओळीतून ती अस्तित्वाचा अतूट भाग असल्याची भावना उत्कटपणे व्यक्त होतेच आणि, ‘स्तन आणि जननेंद्रियाच्या दरम्यान’ मी शोधत राहतो स्वत:लाही तुझ्यासोबत’ असे वाटणे हेही ती अस्तित्वाचा, मनाचा, सर्वस्वाचाच भाग असते अशीच भावना व्यक्त होते. पुरुषाला स्त्री शरीर किती वेगवेगळ्या नजरांतून, वेगवेगळ्या दृष्टीने आकळले आहे ते नामदेवने नि:संकोचपणे, खुल्या दिलाने आणि परोपरीने व्यक्त केले आहे.

पुरुषाला स्त्रीविषयी वाटणाऱ्या शरीर इच्छांपोटी स्त्रियांच्या वाटय़ाला येणाऱ्या दु:ख भोगांचे सहस्रकमळही नामदेवच्या कवितेत उभे होते. ‘प्रिय पत्नी’, ‘माझ्या मुलांची आई’, ‘मला जन्म देणारी आई’ असा पुरुषांच्या कवितेत येणारा नेहमी आढळणारा गुळगुळीत गौरव नामदेवाच्या कवितेत कुठेही आढळत नसून ‘स्त्री’त्वाचा, स्त्रीच्या स्त्री असण्याचा ‘बाई’पणाचा असा गौरव फक्त नामदेवच्याच कवितेत दिसतो.

या लाल दिव्यांनी कित्येक शतकांच्या व्यथा वेदनांचा

इतिहास सांगितला मला.

राहीबाई, तुझं अर्धागवायू झालेलं कासव कधी मेलं?

गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत रांगलं ते तुला

जडलेल्या उपदंशाचं लळीत होतं.

पहिल्यांदा आली होतीस जेव्हा या वस्तीत तेव्हा वाऱ्याच्या 

वरातीत तूच नवरी होतीस :

तोडे, बाजूबंद, पुतळ्यांच्या माळा, नवथराची लाज,

कोल्हापुरी साज..

भपक्यासारखी भपकन मोठी झालीस. अन् लगेच काजळी

जडून विझून गेलीस.

ना यल्लमानं तुला नीट केलं, ना काळूबाईनं.

परडी, भंडारा, कवडय़ांच्या माळा..

शिणल्या माथ्यावरला सोन्याचा देव्हारा

तू उचलून ठेवलास भाचीच्या डोक्यावर;

नातीची नथनी उतरलीस आणि अदृश्य झालीस –

तुझ्या नशिबाचे भोग तिला न सांगताच निघून गेलीस.

राहीबाई, तुझ्या कमाईचे बिघे तुझा भाऊ पिकवतो आहे.

तू घेऊन दिलेली खिल्लारी बैलं आता मोटा ओढत नाहीत :

भाऊ बटन दाबतो, येरीवरलं इंजिन सुरू होतं भकभक

राहीबाई, तुझ्या देहाची कमाई खाऊन बघ ऊस कसा

पोसला आहे.

तुझ्या भावाला आता तुझी आठवण होत नाही –

तो शोधत हिंडतो ऊसतोडय़ा मजुरांना ऊसतोडणीसाठी.

(‘चिंध्यांची देवी’मधून साभार, लोकवाङ्मय गृह प्रकाशन)

 

– प्रभा गणोरकर

vasantdahake@gmail.com