हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काळाच्या पहाडावर ज्यांनी आपली नावं कोरलेली आहेत त्यापैकी हे एक चिरंतन नाव- कवी श्रेष्ठ सुरेश भट! समीक्षक डॉ. द.भि. कुलकर्णी यांनी केशवसुत, तांबे व मर्ढेकर यांच्याबरोबरच सुरेश भट यांना ‘युगप्रवर्तक कवी’ अशा विशेषणानं गौरविलेलं आहे; आणि ते सार्थच आहे. मुक्तछंदाच्या सपाट रस्त्यावरून जाणाऱ्या त्या काळातील कवितेला कविश्रेष्ठ सुरेश भटांनी नवे वळण देऊन पुन्हा एकदा वृत्तबद्धतेकडे नेऊन राजरस्त्यावर आणून सोडले. पुढील काळात मराठी गझल क्षेत्राचे ते अनभिषिक्त सम्राट झाले, याबद्दल कोणाचेही दुमत होणार नाही. इथून पुढच्या विवेचनात मी प्रत्येक वेळी ‘कविश्रेष्ठ’ ही उपाधी वापरलेली नाही; ती तिथे आहेच, हे वाचकांनी समजून घ्यावे.
गझल हा कवितेचा एक प्रकार आहे; एकाच वृत्तातले अनेक शेर काफियाच्या धाग्यात गुंफून गझल बांधली जाते व प्रत्येक शेर अर्थदृष्टय़ा स्वयंपूर्ण असतो. एका गझलमध्ये विविध विषयाचे शेर गुंफण्याचे स्वातंत्र्य कवीला असते, ही प्राथमिक माहिती आता सर्व रसिकांना आहेच. ही पुन्हा सांगण्याचे कारण इतकेच की सुरेश भट यांच्या गझलांमधून स्त्रीविषयक चिंतनाचे प्राकटय़ असलेले शेर विखुरलेल्या स्वरूपात मिळतात. त्यांच्या काही स्त्रीप्रधान कविता आहेतच, मात्र त्या गझला नाहीत.
सुरेश भट यांच्या कवितांमधील स्त्री ही त्यांची प्रेयसी आहे; कधी कविता ही त्याची सखी आहे; तर कधी मराठी भाषेला त्यांनी आई या रूपात पाहिलं आहे – गीत तुझे मी आई, गाइन
शब्दोशब्दी अमृत ओतुन..
भावफुलांना पायी उधळुन
मम प्रतिभेचे झिजवुनि चंदन
आयुष्याचा कापुर जाळुन
तुझे सारखे करीन पूजन..
अशा तऱ्हेचा आदरयुक्त भाव व्यक्त करीत कवीने मराठी भाषेला आईचे स्थान देऊन गौरविले आहे. त्यांच्या मनातील स्त्रीला प्रथम ते आईच्या रूपात पाहतात. तिचे पांग फेडण्यासाठी ‘प्रतिभेचे चंदन उगाळणे’, आयुष्याचा कापूर जाळणे व पूजन करणे, हे संकल्प त्यांच्या मनातील ‘आई’ या नात्याबद्दलची उदात्त भावना स्पष्ट करून जातात. वैयक्तिक जीवनातही भट आपल्या आईशी अधिक जवळ होते. त्यांना कवितेचा वारसाही आपल्या आईकडून लाभला होता. वरील भाव ‘मायबोली’ या कवितेत व्यक्त झाला आहे. १९६१ नंतर मधल्या दीर्घ कालावधीनंतर १९७४ मध्ये ‘रंग माझा वेगळा’ हा दुसरा संग्रह प्रसिद्ध झाला. त्यातही हेच नातं सांगणारी कविता वाचायला मिळते. देशाला आईच्या रूपात पाहणे (मातृभूमी) हा संस्कार असतोच.
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे।
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे..
आई, तुझ्यापुढे मी। आहे अजून तान्हा
शब्दात सोड माझ्या। आता हळूच पान्हा
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी।
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी..
आईच्या वत्सलतेची ओढ या कवितांमधून दिसून येते. ‘भीमवंदना’ ही ‘एल्गार’ या तिसऱ्या संग्रहातील (१९८३) कवितेतही कवीने ‘भीमरायां’कडून याच वत्सलतेची हक्काने मागणी केलेली आहे.
एक आम्ही जाणतो, आमुची तू माउली
एवढे आहे खरे की, आमुची तू सावली
घे अम्ही त्यांना दिलेल्या उत्तरांची वंदना..
भीमराया, घे तुझ्या या लेकरांची वंदना..
आपल्या श्रद्धास्थानाला आपण आईच मानून जवळीक साधतो (उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माउली); यावरून आई हेच कवीच्या मनातील पूज्य असे स्थान आहे, हे अधोरेखित होते. या चार ओळीतील ‘ते’ म्हणजे प्रस्थापित वर्ग. ज्यांची सुखे ही दुसऱ्यांच्या (पीडित-शोषितांच्या) दु:खांवर आधारलेली असतात, तो हा वर्ग! सुरेश भटांनीच ही व्याख्या एके ठिकाणी केली आहे.
सुरेश भट यांचे श्रीकृष्णाशीही एक वेगळं नातं आहे. पुढील कवितेत त्यांनी आईच्या- यशोदेच्या- वत्सल भूमिकेतून श्रीकृष्णाला जागविणारी भूपाळी म्हटली आहे.
चल ऊठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली..
मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा
अन् चोरपावलांनी आला पहाट वारा
गालांवरी उषेच्या आली हळूच लाली..
चांदण्याला हलकेच जाग येणे, ही भट यांची शब्दयोजना एक हळुवारपणाचा भाव वाचकाच्या मनात जागा करून जाते. शुक्रतारा मंद होतो, पहाटवाराही चोरपावलांनी येतो! यशोदेच्या लाडक्या मुकुंदालाही तिला ‘हलकेच’ जागवायचे आहे.
आणखी एक सौंदर्यस्थळ मला या कडव्यात दिसतं आहे. पहाटवारा चोरपावलांनी का यावा बरं? आणि पावलं वाजलीच नाहीत, तर तो आल्याचं उषेला कळलं तरी कसं? तिच्या गालांवर लाली उगीच तर नाही ना येणार? त्यानं हळूच बिलगून तिचं चुंबन घेतलं असणार! हो ना?
यशोदा मुकुंदाला पुढे आणखी सांगते, ऊठ आता; ‘तुज शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली’! राधेची मधुरा भक्ती आणि मुकुंदाचं प्रेम याची तिला जाण होती. तिला माहीत होतं की राधेचं नाव ऐकलं की हा तत्क्षणी उठेल! या उत्कट बिंदूशी कविता संपते पण त्यापूर्वी आपल्या मन:चक्षूंसमोर हे गोड चित्र उभं करण्यात भट पूर्ण यशस्वी झालेले असतात.
सुरेश भट देव वगैरे मानत नसत, पण श्रीकृष्ण हे त्यांचं आवडतं व्यक्तित्व होतं. श्रीकृष्ण व राधा यांच्या गूढ प्रेमाबद्दल त्यांना एक वेगळंच आकर्षण असावं. ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी’ आणि ‘वाजवि मुरली देवकिनंदन’ या दोन कवितांतही, ‘अनंगरंगरास’ खेळण्यात दंग होणारी राधा आपल्याला सापडते; आणि मुरली ऐकताना राधेचे सरलेले मीपण पाहून प्रेमाच्या उच्च पातळीची जाणीव होते. स्त्री-प्रेमाच्या उत्कट रूपाचे दर्शन राधेच्या माध्यमातून सुरेश भट आपल्याला करून देतात. कृष्णप्रेमात समर्पित झालेली राधा, द्वैत सरून कृष्णाशी एकरूप झालेली राधा, हिच्यात कवीला आपल्या चिंतनातील आदर्श स्त्री दृग्गोचर होत असावी! हे आध्यात्मिक पातळीवरील प्रेम कवीच्या ‘कृष्ण-कवितां’मध्ये प्रकट झालं आहे.
कृष्ण दीप! राधा ज्योती। कृष्ण शिंप! राधा मोती
कृष्ण-राधेचं अतूट नातं वर्णन करताना त्यांनी या जोडय़ा मार्मिकतेने निवडल्या आहेत; नाही का?
‘सप्तरंग’ हा २००२ मध्ये प्रकाशित सुरेश भट यांचा पाचवा संग्रह. त्यापूर्वी निवडक कवितांचा संग्रह, नुकत्याच दिवंगत झालेल्या कवयित्री शिरीष पै यांनी संपादित केला होता. त्यामुळे ‘सप्तरंग’मधील कविता त्यात सापडत नाहीत. या संग्रहात एका लावणीचा समावेश आहे. तिला त्यांनी ‘कोल्हापुरी लावणी’ असं म्हटलेलं आहे. विशेष असे की यामधील ‘नायक’देखील मनमोहनच आहे! नायिका विचारतेय..
पाहिला का कोणी माझ्या मनमोहनाला?
पाहिले का सांगा कोणी माझ्या पावण्याला?..
दिसला का कोण्या घरी
भेटला का वाऱ्यावरी
पाहिले का कोणी माझ्या सजणसख्याला?..
लावणी हा काव्यप्रकार सादर करणाऱ्या स्त्रीनेही कृष्णाला ‘सखा’ मानले आहे व त्याच्या विरहात ती कावरीबावरी झालेली दिसत आहे! नेहमीच्या पद्धतीची ही उत्तान शृंगारिक लावणी नाही.
या नृत्यांगनेप्रमाणेच विरह जेव्हा नायकाला सहन करावा लागतो तेव्हा असा शेर उतरतो..
कुठे होतीस तू जेव्हा दिशा झंकारल्या होत्या?
कुठे गेलीस तू जेव्हा ऋतू गंधाळुनी गेले?..
किंवा..
नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते..
शेवटी कवी हताशपणे पण विश्वासपूर्वक म्हणतो,
कोठेही जा दूर दूर तू माझ्यापासून
माझे गीत तुला तेथेही काढील शोधून!..
थोडय़ा विरहानंतर, ती जेव्हा समोर येते तेव्हा तिच्या अनुपम दर्शनाने कवी विस्मयचकित होऊन म्हणत आहे,
कोवळी काया तुझी लावण्य सामावेल का?
लाजता तू, घाबऱ्या माझ्या मनाला वाटले..
इथे तिच्या लावण्याचं ओसंडून जाणं कवीनं फार सुंदर व्यक्त केलं आहे. हे अपरिमित लावण्य तिच्या कायेत तरी मावेल का? असा प्रश्न करून भाषेला जणू नवा अलंकार दिला आहे! उर्दूसारखीच ‘नजाकत’ या मराठी शेरात भट आणू शकले आहेत. एक शेर आठवतो,
अल्ला रे जिस्मे-यारकी खूबी कि खुद-ब-खुद
रंगीनियों में डूब गया पैराहन तमाम..
कवी म्हणतोय की तिच्या देहसौंदर्याचाच हा परिणाम, की तिचा पोशाख आपोआपच रंगित झालाय. इथे भट म्हणत आहेत, की तुझं हे कायेत न मावणारं लावण्य तुझ्या लाजण्याबरोबर इतकं काही वाढलंय् की ते उसळून सांडेल की काय, अशी मला भीती वाटतेय्! केवळ लाजबाब!!
लौकिक पातळीवर, समाज व स्त्री, कुटुंब व स्त्री किंवा आजची मुक्त स्त्री इत्यादी विषयांच्या झरोक्यातून भटांनी स्त्रीकडे पाहिलेलं नाही. पण जिवाभावाची सखी, प्रेयसी, प्रणयिनी, सहचरी अशा किंचित् भिन्न भिन्न स्वरूपात ती कवितेतून आपल्याला भेटते.
वात्सल्य व शृंगार हे दोन महत्त्वाचे रस भटांच्या रचनांमध्ये प्रकर्षांने दिसतात. या दोन्ही भावांत उत्कटतेची दोन टोके रसिक अनुभवतात.
त्यांच्या ‘रूपगंधा’ (१९६१) या पहिल्याच काव्यसंग्रहात ‘रूपगंधा’ याच शीर्षकाची पहिलीच रचना वाचायला मिळते व रसिक स्तिमित होऊन जातो! कवयित्री शिरीष पै यांनी ही रचना ‘भावगीत’ या सदरात टाकली आहे. पण प्रत्येक शेर स्वतंत्र या निकषावर ही ‘मुसलसल गझल’ (क्रमबद्ध गझल) म्हणण्यास, माझ्या मते, काही प्रत्यवाय नाही.
मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे..
लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की
राजसा, माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे..
रे! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे तू मला बिल्गून जावे..
शृंगार हा या गझलेचा विषय आहे, हे स्पष्ट आहे. सुरेश भट यांच्या शृंगारिक रचनांचे वैशिष्टय़ थोडे वेगळे आहे. त्यात दुय्यम भूमिका स्वीकारणारी संकोची स्त्री नाही. त्यांनी रंगवलेली प्रेयसी ही लाजरी-बुजरीही नाही. ती आपल्या प्रियकराकडून प्रणयाची नि:संकोच मागणी करते. शारीर पातळीवर तिच्या अपेक्षा ती त्याला सांगते.
दुसऱ्या दोन गझलांतील प्रेयसीही धीट व पुढाकार घेणारी अशी पाहायला मिळते. ‘रंग माझा वेगळा’ या संग्रहात या गझला आहेत.
मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
राजसा, किती दिसात लाभला निवांत संग..
गार गार या हवेत घेउनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग..
काय हा तुझाच श्वास दर्वळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग..
दुसऱ्या गझलेचे शेर –
तरुण आहे रात्र अजुनी राजसा, निजलास का रे?
एवढय़ातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?..
सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू?
उमलते अंगांग माझे..आणि तू मिटलास का रे?..
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे? हाय! तू विझलास का रे?..
‘चांदण्यावर उठणारा तरंग’ रेकॉर्डिग’ झाल्यानंतरही लता मंगेशकरांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहिला होता! रात्र तरुण आहे; अशावेळी क्लांत झालेल्या प्रियकराला प्रणयिनी जागवते आहे व तिच्या उमललेल्या अंगांगाचा दाह शमविण्याचा आग्रह धरते आहे! आशा भोसलेंनी या रचनेला आपले मधाळ सूर दिले आहेत. वरील गझला स्त्रीभूमिकेतून लिहिलेल्या आहेत. पुढील गझलेतील शेर पुरुष भूमिकेतून लिहिलेले आहेत. मात्र आशाजींनी गायले आहेत.
केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली..
अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली..
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली..
‘रात्र’ निघून गेल्याचे ही गझल सांगत आहे. प्रत्यक्षात ‘रात्र’ या प्रतिमेतून कवी आपल्या प्रणयिनीबद्दलच सांगत आहे. गजऱ्याच्या सुगंधाद्वारे ती रात्रीच्या गोड आठवणी ठेवून गेली आहे. जराशा सुटलेल्या मिठीतून पहाटे ‘ती निसटून’ गेलीय, यावरून हा चोरटा प्रणय असावा हे सूचित होत आहे! दुलईला येणारा मोगऱ्याचा सुगंध त्या रात्रीचं अप्रत्यक्ष वर्णन करत आहे.
‘गौळण’ ही कविता स्वप्न-शृंगाराचाच सुंदर आविष्कार आहे.
सखि, मी मज हरपुन बसले ऽ ग
आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ऽ ग
साखरझोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ऽ ग
त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले ऽ ग
त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजत उमलत झुलले ऽ ग
त्या घनश्यामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले ग
दिसला मग तो देवकीनंदन अन् मी डोळे मिटले ऽ ग…
गोकुळात असताना कान्हा लहान होता; गोपी त्याच्याशी मधुरा भक्तीने एवढय़ा जोडल्या गेल्या होत्या त्या कृष्णाला आपल्या प्रियकराच्या रूपातही पाहात होत्या. कृष्णही गोपींसाठी कोणत्याही वयाचे रूप धारण करत असे, असा भागवतात उल्लेख आहे. कृष्णाने स्वप्नात येऊन गोपीबरोबर जो शृंगार केला त्याचे वर्णन ती सखीला सांगत आहे! साखरझोप आणि पहाट यांच्याशी संलग्न असा प्राजक्ताचा उल्लेख येणे स्वाभाविकच आहे. प्राजक्तासम ‘टिपले’, यातील गर्भितार्थ रसिकांनी समजून घ्यायचा आहे. म्हणून तर श्वासांनी थरथरणे स्पष्ट होत आहे. स्पर्शाने आत्मसाक्षात्काराचा जीवनातीत अनुभव (विजेचे लखलखणे) गोपीला दिल्यानंतर (ती राधाही असू शकेल) कान्हा पुन्हा आपल्या मूळ बालक-रूपात तिला स्वप्नात दिसला. म्हणून तर इथे कवीने ‘देवकीनंदन’ हे नाव वापरले आहे. आता त्या स्वप्नानुभवाचा पुन:प्रत्यय घेण्यासाठीच तिनं डोळे मिटले आहेत! अशी ही ‘गौळण’ आपल्याला शृंगाराकडून भक्ती या प्रीतीच्या चरम अवस्थेकडे घेऊन जाते.
अशा किती रचनांचा आस्वाद इथे घ्यायचा? ही एक न संपणारी सुगंध-यात्रा आहे! कवितेच्या करपाशी धुंद होऊन कवी जगाला विसरत आहे. कधी वीज लखलखावी तशी त्याची ‘ती’ भेटते; केव्हा पूर्णिमेचे चांदणे वेणीत माळून, अधिऱ्या आठवांची आरती हृदयात घेऊन ती येते, तर कधी मराठमोळ्या रूपात गीतगंगेच्या तटावर घागर घेऊन येते! कुठल्याही रूपात येवो, कवी तिची उत्कंठेने वाट पाहत आहे! ती आली तेव्हा काय झालं?
प्रत्यक्ष भेटीत मात्र काहीवेळा कवी गोंधळून का जातो, हे एक कोडे आहे!
तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!..
कधीतरी ती नुसतीच हवेच्या झोतासारखी अंगावरून निघून जाते..भट लिहितात,
कोण जाणे कोण हे जवळून गेले
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले..
‘ती’च होती ती. पण मग भेटली का नाही?
मला टाळत तर नाही ना?
तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते
मजपाशी पण तुझियासाठी केवळ गाणे होते..!
सुरेश भट हे जितके दु:खाचे कवी आहेत तितकेच ते प्रेमकवीही आहेत. प्रेमकविता व प्रेमाला अर्पित शेर तुलनेने कमी असेनात का, पण ते अत्यंत उत्कट आहेत. त्या कवितांमधील प्रेमरस रसिक वाचकाच्या ओठांवर मधाप्रमाणे रेंगाळत राहतो. त्यांमधील ‘फुलराणी’ रूपाची स्त्री जवळीक साधून वाचकाच्या मनात मोहर फुलवीत राहते.
जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरीही।
गडे, तुझा हा सुगंध माझ्या न मालकीचा।।
*****
तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता।
जरा ऐकून घे माझा
इरादा चांगला होता।।
तुझ्या तारुण्यवर्खाची
अशी काही मजा आली।
विडाही रंगला होता
दिवाही लाजला होता।।
*****
का तुझा हे ऐकताना
चेहरा आरक्त झाला।
का तुलाही आज माझ्या
वेदनेचा रंग आला।।
*****
हा असा चंद्र..अशी रात फिरायासाठी।
तूच नाहीस इथे हात धरायासाठी।।
*****
हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही।
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही।।
*****
उजाडल्यावरी सख्या
निघून जा घराकडे।
अजूनही उशीवरी
टिपूर चांदणे पडे।।
*****
अजूनही कसे तुझे
लबाड ओठ कोरडे।
तुला मला विचारुनी
फुटेल आज तांबडे।।
*****
ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची।
तापलेल्या अधीर पाण्याची।।
*****
राग नाही तुझ्या नकाराचा।
चीड आली तुझ्या
बहाण्याची..।।
*****
मनातल्या मनात मी
तुझ्यासमीप राहतो।
तुला न सांगता तुझा
वसंत रोज पाहतो..
(सुरेश भट यांच्या वेगवेगळ्या कवितांमधील कडवी, काही शेर)
– संगीता जोशी
sanjoshi729@gmail.com