विंदा करंदीकर नावाचा कवी मराठी साहित्यात आपल्या विलक्षण प्रतिभेची कविता मागे ठेवून गेला हे आपलं थोर भाग्य! विंदांची मुलाखत मंगेश पाडगावकर यांनी घेतली होती. त्याचा विषय होता ‘काव्यातली प्रतिमा सृष्टी’. आता सर्वच कवी आपल्या काव्य प्रतिमेची जपणूक करतातच. विंदा म्हणाले, ‘कल्पनेच्या पातळीवर का होईना पण आदर्श प्रतिमेला एक प्रकारचे इंद्रियगोचरत्व प्राप्त झालं पाहिजे. तिचं शरीर इंद्रियांना जाणवलं पाहिजे.’ पाडगावकरांनी ज्ञानदेवांचा दाखला देत म्हटलं, ‘तेणें कारणें मी बोलेन। बोली अरूपाचे रूप दावीन। अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी।’ तेव्हा विंदा म्हणाले, ‘अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. प्रत्येक कवीची हीच प्रतिज्ञा असते, हेच बिरुद मिरवीत. प्रत्येक प्रतिमा काव्यात प्रकट होते. निदान तशी झाली पाहिजे.’
विंदांच्या कवितांचा बाज हा विलक्षण वेगळा. त्यांनीच लिहिल्याप्रमाणे ‘१) सबंध भावस्थितीत भेटणारी चिंतनात्मकता २) विषय वासनेची सेंद्रिय आवेगाची अध्यात्माला भिडणारी बेहोशी ३) गद्यप्राय तपशिलाला काव्यात्म बनवील असे आंतरिक विरोधाचे ताण असलेले समाजदर्शन आणि ४) विचारांच्या घणाघाती उद्रेकातून स्फुरणारी भावनिर्भरता या गोष्टी मला प्रथमच जाणवू लागल्या आणि त्याच्या अभिव्यक्तीसाठी मी धडपडू लागलो.’ विंदांनी प्रेमकविता, तालचित्रे, सामाजिक जाणिवेची कविता, व्यक्तिचित्रे, सूक्ते, बालकविता, विरूपिका आणि गझल लिहिली. परंतु गझलबद्दल लिहिताना विंदा म्हणतात, ‘प्रायोगिकतेच्या दृष्टीने गझलांना विशेष महत्त्व नाही. जमल्यास गझलाशी संलग्न असलेली आवर्तनपरता कमी करावी व भावकवितेचा एक प्रकार म्हणून त्याच्या विकासाच्या शक्यता चाचपून पाहाव्यात, असा एक हेतू गझल लिहिताना मनाशी होता. पण त्यात विशेष हाताशी लागले नाही.’
असं जरी विंदांनी लिहिलं असलं तरी इथे त्यांच्या ‘गझल’ या छंदात लिहिल्या गेलेल्या कवितांचा पण विचार करायचा आहे. कारण एका पुरुषाने लिहिलेली स्त्री मनाची, स्त्रीच्या जाणिवेतल्या आंदोलनाची, खोल प्रेम व्यक्त करण्याची मर्मज्ञ अशी संवेदना असलेली कविता कशी लिहिली? हा प्रश्न पडतो. १९९०मध्ये ‘आदिमाया’ हे विंदा करंदीकरांच्या प्रेमकविता आणि त्यांच्या काव्यातील स्त्रीदर्शन हे पुस्तक प्रकाशित झाले. (संपादन- विजया राजाध्यक्ष) यात १०२ कविता आहेत.
सर्वच कवींनी आपल्या खऱ्या आणि काल्पनिक प्रेयसीला उद्देशून प्रेम कविता लिहिली. परंतु विंदांची कविता स्त्री-मनात परकायाप्रवेश करून लिहिली आहे आणि ही अत्यंत अवघड गोष्ट आहे.
विंदांनी लिहिलंय, ‘केशवसुत आणि माधव जूलियन यांचा माझ्या काव्य वृत्तीवर महत्त्वाचा संस्कार झालेला आहे.’ कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात माधव जूलियन त्यांना शिकवायला होते. या कवींचा प्रभाव विंदांच्या कवितांवर दिसतो. उदाहरणार्थ केशवसुतांची सामाजिक कविता, घराची ओढ, इत्यादी तर माधव जूलियनांनी ते फारसी भाषेचे प्राध्यापक आणि अभ्यासक असल्याने त्यांनी गझल प्रकार मराठीत आणला. विंदांच्या अन्य प्रेमकवितांबरोबर गझलमधली कविता काळजाला घरं पाडणारी आहे. स्त्री मनाची, अंतरंगाची इतकी सखोल अनुभूती त्यांनी कशी आत्मसात केली असेल? याबद्दल मी त्यांच्या कवितांवर कार्यक्रम केला (१९९८ मध्ये) तेव्हा त्यांना विचारलं होतं. तेव्हाचं त्यांचं उत्तर माझ्या आजही लक्षात आहे. विंदा म्हणाले, ‘‘मी कॉलेजमध्ये इंग्रजीचा प्राध्यापक असताना जेव्हा तास नसे. तेव्हा मी प्राध्यापकांच्या दालनात वाचत बसलेला असे. तेव्हा काही प्राध्यापिका माझ्याशी बोलायच्या, आपली दु:ख त्या मला सांगत आणि हे नेहमीच घडत असे. मी त्यांच्या वैयक्तिक दु:खाशी कुठेतरी वेदनेने जोडला गेलो आणि जणू परकाया प्रवेश करावा, तशी ती कविता लिहिली गेली.’’
‘मागू नको सख्या रे माझे न राहिलेले’, ‘फाटेल शीड जेव्हा’, ‘माझ्या घरी मी पाहुणी’, ‘मी चांद झेलला गं, घेऊन जा सर्व माझे’. अशांसारख्या कविता म्हणजे प्रेमात वाटय़ाला येणाऱ्या विरहाची, वेदनेची, दु:खाची, वर्षांनुवर्ष झालेली मुस्कटदाबी. स्त्रीला जितकं काही सोसावं लागतं त्याचा हा दस्तावेज आहे. यापेक्षा वेगळं कोणी लिहू शकणार नाही. इतकी या कवितेतल्या शब्दांची ताकद, शब्दाच्या आशयात अर्थच्छटामध्ये आणि भावभावनांमध्ये तुडुंब भरलेली आहे. ही भावगर्भ कवितेची रूपं तरल संवेदनशीलता असलेल्या वाचकाच्या हृदयात थेट उतरतात, त्यात व्यक्त केलेला भावार्थ, आपल्याला त्या संवेदनांतर्फे मूक आणि स्तब्ध करतो. आपल्यापाशी ती कायमच वास्तव्याला असावी, अशी दृढ भावना मनात घर करून राहते.
यातल्या दोन कविता सुरुवातीला इथे देत आहे म्हणजे मला जे नीट, पूर्णपणे मांडता आलं नसेल. विवेचक वाचकाच्या मनात उतरेलंच कारण ते शब्द विंदाचे आहेत. हे शब्द स्त्री-मनाची हजारो वर्षांपूर्वीची आंदोलनं वाचकांपर्यंत थेट आणून सोडतात.
‘सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी’ या कवितेचं शीर्षकच ‘माझ्या घरी मी पाहुणी’ हे आहे. यातलं मला जाणवलेलं आशयघन अर्थभान इथे मांडते आहे. त्याला सर्वस्व देऊनही घरदार खायला येतं. आठवणींना दया नाही. त्या छळतात. स्वप्नातला अंधारही बोलका होतो. सभोवती संरक्षक कवच म्हणून ती आपल्या जगाची भिंत घालते. पण ती काच ठरते. त्यातून तो दिसतोस. कशी तरी आयुष्याची वाट ती तुडवते आहे, हुंदका दाबून. ती म्हणते, ‘‘पण तू मला रोज सती जायला लावतोस; नव्हे ती तुझी ती आज्ञा आहे. इतकं अग्निदिव्य करते तरी वास्तव तेच आहे. मग काय करू माझं प्राक्तन ही तुझी छाती समजून त्यावर रेलते. विसावते. पण ते आभासी आहे. तो शीतल वाटणारा भास हे जळतं चांदणं आहे; त्यात मी जळते आहे.’’ मनाचे सगळे कप्पे, पापुद्रे, मनातले डोह यात हजारो र्वष आवरणाखाली जबरदस्तीने केलेली स्त्रीची मुस्कटदाबी समोर येते. ती ‘सती’ या एका शब्दात बरंच काही सांगून जाते.
अत्यंत तरल अशी प्रेम विरहवेदनेची ही स्त्री-मनाची कविता विंदांनी लिहिली. त्या वेळी म्हणजे १९६५ ची ही कविता आहे. ज्या स्त्रियांनी आपली दु:खं, वेदना विंदांना सांगितली त्या आधीच विंदांच्या मनात आपल्या देशातलं हजारो वर्षांचं स्त्रीचं बंदिस्त जिणं असणारच. बालपणीच नवरा गेला म्हणून केशवपन केलेल्या, पुनर्विवाहाला बंदी म्हणून आयुष्याचं पोतेरं झालेल्या स्त्रिया, टाकून दिलेल्या, कोंडलेलं आयुष्य जगणाऱ्या, ज्यांच्या कधी कुणी मायेने, प्रेमाने पाठीवर हात फिरवला नाही. एकही शब्द प्रेमाचा उच्चारला नाही, अशा लाखो स्त्रियांचं कवडीमोल जिणं कवीच्या अंतर्यामी रुतलेलं असणार. दुसऱ्या कवितेत ती म्हणते, ‘मागु नको सख्या जे माझे न राहिलेले, ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले.’ इथेही ती म्हणते,
स्वप्नातल्या करांनी, स्वप्नातल्या तुला मी
होते न सांगू का रे सर्वस्व वाहिलेले?
प्रश्न विचारून ती म्हणते,
स्वप्नात वाहिलेले म्हणूनी कसे असत्य?
स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले।
ती सांगते, मला परीला फक्त स्वप्नात पंख असतात. दिवसा मी पंगू आणि हातही शापलेले असतात. मला स्वप्नातच ठेव आणि माझे डोळे घेऊन जा, कारण मी स्वप्नांध पांगळी. आता काही पाहायचं उरलंच नाही. किती पराकोटीचं हे दु:ख! असे शब्द विंदाच लिहू जाणे. अशी ही विरहाने व्याकुळ झालेली प्रेयसी एकदा मात्र जगाला ठणकावून सांगते. कविता आहे, ‘फाटेल शीड जेव्हा’
जे व्हायचे असेल ते खुश्शाल होऊ दे रे
हा हात फक्त माझ्या हातात राहू दे रे
जनरीत सोडली मी अन् तोडलीच दोरी
आता किमान होडी दर्यात वाहू दे रे
आता काय व्हायचं ते होईल. जग समजून घेईल पाहिजे तर, माझं पाप बुडेल किंवा पुण्य तरेल तरी, ते एकदा मलाच समजून घ्यायचं आहे. ‘हा हात फक्त माझ्या हातात राहू दे रे’ या एका ओळीत केवढा तरी आशय भरलेला आहे.
इतकंच काय या होडीचं शीड फाटेल तेव्हा
पडणार शील गाठी
नुस्तीच डोलकाठी
पाण्यात तेऊ दे रे
असं तिला एकदा ठणठणीतपणे जगासमोर यायचं आहे. सगळ्या कविता इथे देता येत नाहीत. पण विंदाच्या काव्यातलं स्त्री-दर्शन असंच चकित करणारं आहे.
तुडुंब भरलीस मातृत्वाने,
काजळ वाहवले गालावर
मोहर गळला मदीर क्षणांचा
कुणी प्रकटली निवले अंतर
ती गर्भवती आहे, एक नवनिर्माण तिच्या उदरात वाढतं आहे. एका उत्कट झेपेत ती पुढच्या क्षितिजावर पोचली. तिच्यातला मातृत्वाचा लसलसता कोंभ तिला तेज देतो आहे ते पाहून तो वैषम्याने म्हणतोय,
मला उमगले मी अनावश्यक ।
फितुर जाहले तुजला अंबर
तालचित्रे- ‘संगीत’ हा विंदाचा आणखी एक जाणीवनिष्ठ असलेला विषय. संगीताच्या भाषेचा उपयोग किंवा प्रयोग विंदा रूपक, प्रतिमा यांच्या आविष्कारातून करतात. स्त्री चित्रणासाठी ते अनेक ताल वापरतात- दीपचंदी, दादरा, रूपक, झपताल.
दीपचंदी – त्यांची प्रेयसी प्राजक्ताखाली गंधवती होते. ‘मुखडा’ मिरवीत पुढे येऊन समेवर केशराची चूळ थुंकून लयफुली होते. ते चौदावं पाऊल दंवाने ओलावलेलं असतं.
दादरा – अशावेळी दादऱ्यात मिसळून तुला पितात ते माझे ओठ सहा मात्रेचे असतात. शेवटी तर तिच्या अभोगी दादऱ्याची दर्द मिठी हवी असते.
रूपक – ती अर्धीमुर्धी रात्र स्वप्नधीट, तिचे त्रिदल नेत्र; गात्र गुंफा, चांदण्याने चिंब चिंब
झपताल – दिवसभर कष्ट करणाऱ्या स्त्रीच्या संदर्भात त्यांनी ‘झपताल’ वापरला.
त्याची सुरुवात अशी – ओचे बांधून पहाटे उठते. तेव्हापासून झापझपा वावरत असतेस
तिच्या कामाचं वर्णन केल्यावर ते लिहितात, स्वागतासाठी ‘सुहासिनी’ असतेस, वाढताना ‘यक्षिणी’ असतेस, भरवताना ‘पक्षिणी’ असतेस, साठवताना ‘संहिता’ असतेस, भविष्याकरता ‘स्वप्नसती’ असतेस, संसाराच्या दहा फुटी खोलीत, दिवसाच्या चोवीस मात्रा, चपखल बसवणारी तुझी किमया मला अजून समजलेली नाही.
एकूण कविता १६ ओळींची आहे. सुरुवात आणि शेवट दिला आहे. जिज्ञासूंनी ती पूर्ण वाचावीच. स्त्रियांची व्यक्तिचित्रे विंदानी कवितेतून मांडली. त्यात सरोज नगरवाली, ईव्ह, मीरा, कावेरी डोंगरे, मथुआत्ते, बऱ्याच दिवसांनी माहेरी आलेली माहेरवाशीण ‘थोडी सुखी थोडी कष्टी’ या कवितेत आहे. स्त्री ही प्रेयसी, ती मातृरूपात, ती मुक्तरूपात, वासनामय रूपात, पत्नीरूपात, माहेरवाशीण, नातलग स्त्री अशी स्त्रीची अनेक रूपं विंदांना गहिरे उत्कट अनुभव देऊन जातात. इथे विंदा म्हणतात, ‘भावकवितेचा, तर काव्यांतर्गत प्रतिमांचा संबंध हा मुख्यत: आत्मगत भावस्थितीशी निगडित असतो.’ स्त्री ही बहुरूपिणी आहे. याचा प्रत्यय कवीला जेव्हा जेव्हा जाणवत राहतो त्यातून व्यक्तिचित्रण व्यक्ती दर्शन होत राहातं. – इथे मधुआत्ते म्हातारी, बकी, ईव्ह, मीरा, वेडी, सरोज नगरवाली, कावेरी डोंगरे. या स्त्रियांवरच्या कविता म्हणजे विंदांची स्त्रीबद्दलची आत्मीयता जाणवते.
सरोज नगरवाली आणि बकी (बकुळा) या दोघीही देह विकून जगणाऱ्या त्यांचं प्राक्तन विंदांना अस्वस्थ करतं. संध्याकाळी नटलेली, काजळ घातलेली. मोहक नखरा दाखवणारी, सरोज सकाळी मलूल अवस्थेत जाडेभरडे तांदूळ निवडत दारात बसलेली आणि डोळ्यातून पाण्याचे ओघळ. तर ‘बकी’ रस्त्यावर उभी राहणारी, खराखरा डोकं खाजवणारी. तिला पाहून गिऱ्हाईक बिचकायची. संध्याकाळी ती दत्तापुढे उदबत्ती लावायची. म्हणायची एकटय़ा दत्तावर किती भार घालायचा म्हणून सोबतीला साईमहाराज तसबीर तिने आणली होती.
मधुआत्ते आणि म्हातारी या तर खेडय़ातल्या एकाकी स्त्रिया. मन विषण्ण करणारं त्यांचं जगणं. तर कावेरी डोंगरे शहरातली नोकरी करणारी प्रियकराने फसवल्यावर रोज खर्डेघाशी करताना फाटक्या चिटोऱ्यावर लंब वर्तुळं काढणारी. त्यात तिला बाळाचं तोंड, जावळ दिसे. मग तिच्या देहातून गरम मृदुता पाझरायची.
विंदांनी ही स्त्री व्यक्तिचित्रं लिहिली. ती ‘स्त्री’च्या वंशवृक्षावरील गूढगाणी ऐकणं हे त्यांच्या कवितेचं महत्त्वाचं प्रयोजन आहे. असं समर्पक मूल्यमापन विजया राजाध्यक्ष यांनी केलं आहे. तर्ककठोर आणि भावनाशील ही विंदांची रूपं अनुभवाला येतात.
विंदांच्या कवितेने विलक्षण वळणं घेतली. त्यांनी अनेक प्रयोग केले. परंतु त्यांनी जी स्त्री-मनाची कविता लिहिली त्याला तोड नाही. अनेक मोठय़ा कवींनी प्रेमकविता विपुल लिहिली, परंतु विंदांनी ज्या प्रकारे स्त्रीच्या मनाचं, अंतर्मनाचं प्रतिनिधित्व केलं त्या मागे प्रसिद्ध कवी पुरुष असून स्त्रीबद्दल मनात असलेली माया, प्रेम, वात्सल्य आणि स्त्रीला भोगाव्या, सोसाव्या लागणाऱ्या कळा, यातना, दु:ख याबद्दलची सहानुभूती, कळकळ दिसत आली.
‘आदिमाया’ हा विंदांच्या स्त्रीजाणिवेचा १०२ कवितांचा संग्रह प्रा.विजया राजाध्यक्ष यांनी संपादित केला. त्याला विवेचक प्रस्तावनाही लिहिली. त्यामुळेही विंदा करंदीकरांची ही आंतरिक तळमळ वाचकांसमोर एक अमूल्य ठेवा या स्वरूपात आली. विंदांच्या कवितेचं विलक्षण प्रतिभासामथ्र्य विजयाबाईंनी वाचकांना, अभ्यासकांना उपलब्ध करून दिलं. याबद्दल विजयाबाईंचं मनापासून अभिनंदन. आणि स्त्रियांच्या अनमोल अशा भावभावनांना, विचारांना मर्मबंधातल्या जाणिवांना समाजासमोर आणून आम्हा स्त्रियांना ज्यांनी उपकृत केलं आहे त्या विंदांना प्रणाम!
भारतीय स्त्रियांसाठी ‘स्थानगीत’ ही कविता तर स्त्री-जीवनाचं यथार्थ चित्रण आहे. यात शेवटी ते लिहितात – झीज झीज झिजा शिजवा आणि शिजा ‘माझ्या घरी मी पाहुणी’, आणि ‘मागु नको सख्या रे’ आणि आणखी काही कवितांना यशवंत देव यांनी अप्रतिम चाली दिल्या आणि या कविता आकाशवाणीमुळे संवेदनशील लोकांपयत पोहचवल्या. हा या कवितांचा आणखी एक वाचकांशी असलेला भावबंध न विसरता येणारा. अशा अनेकानेक कवितांनी मराठी भाषा किती समृद्ध आहे हे विंदांनी आमच्या मनात ठसवलं.
सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी
सांगु कसे सारे तुला सांगु कसे रे याहुनी.
घरदार येते खावया नसते स्मृतींना का दया?
अंधार होतो बोलका वेडय़ापिशा स्वप्नातुनी.
माझ्या सभोती घालते माझ्या जगाची भिंत मी;
ठरते परी ती कांच रे दिसतोस जेव्हा त्यातुनी.
माझे जगी जे मानले, माझे न आता राहिले;
मी ‘मी’च का मग राहिले हे घाव सारे साहुनी.
संसार मी करते मुका दाबून माझा हुंदका;
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी.
वहिवाटलेली वाट ही मी काटते दररोज रे
अन् प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी.
(‘जातक’मधून साभार, पॉप्युलर प्रकाशन)
– मधुवंती सप्रे
madhuvanti.sapre@gmail.com