सासर-माहेर दोन्ही ठिकाणी कुणालाही व्यवसायाचा गंधही नव्हता, पण आर्थिक गरजेतून उद्योगाचे दरवाजे उघडले गेले आणि हातातली कला आणि बोलण्यातला गोडवा या दोन गोष्टींच्या भांडवलावर त्यांनी नानाविध उद्योग करत नसरतपूरसारख्या खेडय़ात आपले उद्योजिकत्व सिद्ध केले त्या वनिता दंडे यांच्याविषयी.
हिंगोली जिल्हय़ातील वसमत तालुक्यातील नसरतपूरमधल्या त्या एक यशस्वी उद्योजिका – वनिता अशोकराव दंडे. हातातली कला
आणि बोलण्यातला गोडवा या दोन गोष्टींच्या भांडवलावर त्यांनी नानाविध उद्योग करत नसरतपूरसारख्या खेडय़ात आपले उद्योजिकत्व सिद्ध केले आणि अनेकांसाठी उद्योगाची पायाभरणीही केली.
वनिता लहान वयातच शालेय शिक्षण अर्धवट सोडून सासरच्या छायेत आल्या. दोन्ही घरांत उद्योग-व्यवसाय याचा गंध नाही. आर्थिक सुबत्ताही फारशी नव्हती. मात्र या गोष्टी त्यांच्या उत्कर्षांच्या आड कधीच आल्या नाहीत. शिवणक्लास, चित्रकला, पेंटिंग, एम्ब्रॉयडरी यांचे क्लास, ब्युटी पार्लर काढणे, सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करणे असा समर्थ व्यवसाय प्रवास त्यांचे कर्तृत्व अधोरेखित करतो.
अर्थातच वनिताताई यांचा हा प्रवास सहज नक्कीच नव्हता. अनेक कर्तबगार स्त्रियांचे यशस्वी जीवन ऐकून, पाहून त्यांनाही आपण काही तरी करायला हवे असे वाटत होते. त्यासाठी शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर आठवीपर्यंतच शिक्षण झालेल्या वनिताताईंनी लग्नानंतर १० वर्षांनी बी.ए. केले, पण उद्योगाला सुरुवात त्यापूर्वीच केली होती. अर्थात घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. उद्योगासाठी भांडवल आणणार कुठून? त्यावर त्यांनी उपयोगात आणली ती आपल्या हातातली कला आणि घरच्या घरीच बिनभांडवली उद्योग सुरू केला तो कपडे शिवण्याचा. शिवणकलेतून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळाला. आवड आणि सतत काही नवीन करण्याच्या इच्छेतून वेगवेगळ्या फॅशनचे कपडे शिवण्यात त्या लवकरच तरबेज झाल्या. आणि गावातल्या ‘फॅशन डिझायनर’ झाल्या. हा अनुभव इतका प्रोत्साहन देणारा, आत्मविश्वास वाढवणारा होता की, त्यांनी कपडे शिवण्याबरोबर शिवणक्लास घ्यायलाही सुरुवात केली. पुढे जाऊन शिवणक्लासबरोबर चित्रकला, पेंटिंग, एम्ब्रॉयडरी याचे क्लासही त्या घेऊ लागल्या. या व्यवसायातून मिळालेल्या नफ्याचा विनियोग त्यांनी ‘ब्युटी पार्लर’चा कोर्स करण्यात केला. कलेचा पैसा कलेतच वापरून ‘पूजा ब्युटी पार्लर’ उघडले. नसरतपूर खेडेगाव असले तरी ब्युटी पार्लर ही संकल्पना बऱ्याच जणींना माहीत होती. अर्थात आर्थिक तडजोडी होत्याच, त्यामुळे त्यांनी सुरुवातीला फक्त साधी खुर्ची, छोटा आरसा, दोरा, कात्री एवढय़ाच सामग्रीनिशी पार्लर सुरू केले; पण हातात कला आणि बोटात जादू आणि मुख्य म्हणजे बोलण्यात गोडवा असल्याने हे पार्लर लवकरच लोकप्रिय झाले. पार्लरही उत्तम नावाजले जाऊ लागले आणि याही व्यवसायात त्यांचा जम बसला.
थोडय़ाच दिवसांत त्यांनी १० बाय १५ चौरस फुटांच्या खोलीतून मोठय़ा घरात प्रवेश केला. आपली कला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावी आणि आर्थिक गणितेही जुळावीत यासाठी त्यांनी नंतर ब्युटी पार्लरचा कोर्स शिकवायलाही सुरुवात केली. ग्राहकराजाच खरा सखा मानल्याने प्रेमाचे बंध-अनुबंध बांधले. शिवाय शिकवणेही मनापासून असल्याने विद्यार्थिनीही भरपूर येऊ लागल्या. हे सर्व करत असतानाच बेन्टेक्सचे दागिने विकायला त्यांनी सुरुवात केली. जागेचा इंच इंच वापर तो हाच.
एकाच घरात नानाविध व्यवसाय गुण्यागोविंदाने नांदत होते. उद्योगाला दिशा मिळत होती, मात्र वनिताताईंची व्यवसायसरिता सहज वाहती नक्कीच नव्हती. मधल्या काळात त्यांच्या पतीचे प्रदीर्घ आजारपण, त्याचा खर्च, डॉक्टरांच्या फेऱ्या अशा अनंत अडचणी सुरूच होत्या. घरातल्या या अनेक जबाबदाऱ्यांबरोबर मातृत्वाची प्रेमळ जबाबदारी त्यांना उभारी देत होती. मात्र या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी शिकत राहणे हेच त्यांचे ‘टॉनिक’ होते.. म्हणूनच ब्युटी पार्लर आणि त्याचे क्लासेस जोरात सुरू असतानाच त्यांना त्यासाठी लागणारे साहित्य, क्रीम, फेसपॅक आदी आपण बनवायला हरकत नाही, हा विचार मनात आणला आणि लगेच त्यांनी तो प्रत्यक्षातही आणला. त्यांनी पनवेल इथे जाऊन ब्युटी पार्लरची वेगवेगळी आयुर्वेदिक क्रीम बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. मुळात हे प्रशिक्षण होते तीन महिन्यांचे. मात्र एवढे दिवस घर, व्यवसाय यांच्यापासून दूर राहणे शक्यच नव्हते. वनिताताईंनी तोच कोर्स एका महिन्यात पूर्ण केला. कोर्स पूर्ण करून नसरतपूरला परतल्यानंतर लगेचच त्यांनी क्रीम बनवायला सुरुवात केली. हायड्रो ऑल पर्पज पॅक, अशोका हर्बल हेअर ऑइल, प्रीतम पिंपल पावडर अशा उत्पादनांची त्यांनी निर्मिती केली. यासाठी त्यांनी ‘मागणी तसा पुरवठा’ हे व्यवसायातले सूत्र पूर्णपणे अंगीकारले. जिल्हा उद्योग केंद्राचे रजिस्ट्रेशनही त्यांना मिळाले आणि त्यांच्या उत्पादनांना सरकारी मान्यता मिळाली.
उत्पादनांच्या प्रचार आणि प्रसाराबरोबरच आपल्यासारखा आणखी काही जणींना रोजगार मिळावा या भावनेतून त्यांनी २००९ मध्ये ‘पूजा बचत गट’ स्थापन केला. प्रथम स्टेट बँकेकडून २५ हजारांचे कर्ज घेऊन विविध प्रदर्शनांत भाग घेतला. या सगळय़ा प्रवासात त्यांना मदतीचा हात देऊ केला तो मीनलताई मोहाडीकर यांनी आणि त्यांनी तो सार्थ ठरवला.
व्यवसायाचा वटवृक्ष आज चांगलाच फोफावला आहे. थोडय़ाशा आर्थिक गुंतवणुकीचे त्यांनी सार्थक केले. त्यांच्याकडे असलेल्या कलेचे त्यांनी फार योग्य रीतीने नियोजन केले. फारसे भांडवल लागत नाही असेच व्यवसाय निवडले. २००१ला जागा घेण्यापासूनचा प्रवास आज दोनमजली घर बांधून थांबला आहे. तळमजल्यावर ब्युटी पार्लर व दुसऱ्या मजल्यावर उत्पादन. या कारखान्यात ५ मशीन्स आहेत. दोन्ही व्यवसाय मिळून १५ कर्मचारी आहेत. यात त्यांना सासू-सासरे, बहीण या सर्वाची मदत आहेच, शिवाय पतीचाही भक्कम आधार आहे. आज त्या समाधानी आहेत. एक मुलगी आय.टी. इंजिनीअर, दुसरी एम.बी.ए., मुलगा १२ वीत. मुलींची लग्नं झाली आहेत. त्यांचे दोन्ही जावईही व्यावसायिक आहेत. दंडे कुटुंब वनिताताईंनी सुरू केलेल्या व्यवसायात व्यग्र आहे.
‘उद्योगिनी’ पुरस्कार जेव्हा त्यांना देण्यात आला, तो घेतल्यावर आपले मनोगत त्यांनी ज्या पद्धतीने हजारो लोकांसमोर व्यक्त केले ते पाहाता, वसमत वा नसरतपूरसारख्या खेडेगावातून आलेली एक स्त्री इतके काही घडवू शकते हेच अनेकांसाठी आश्चर्यच होते. भाषण संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या टाळ्या होत्या, आपल्या अंगी उद्योगाचे स्फुल्लिंग चेतवून त्यांना वेगवेगळ्या उद्योगधंद्यांनी सतत चेतवत ठेवणाऱ्या एका खेडेगावातल्या बाईसाठी, तिच्यातल्या शहरातल्या उद्योजिकेलाही लाजवील अशा आत्मविश्वासासाठी..
सुलभा आरोसकर
उद्योगिनी : कलेतून बहरलेला व्यवसाय
हिंगोली जिल्हय़ातील वसमत तालुक्यातील नसरतपूरमधल्या त्या एक यशस्वी उद्योजिका - वनिता अशोकराव दंडे
Written by दीपक मराठे
आणखी वाचा
First published on: 19-09-2015 at 03:56 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artistic business