भारतात आजच्या घडीला सुमारे ५ कोटी लोकांना मधुमेह आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत मधुमेह हे मृत्यूच्या कारणांपैकी सातवे महत्त्वाचे कारण असेल. म्हणूनच आत्तापासून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे, त्यासाठीच यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे बोधवाक्य आहे, ‘उत्कृष्ट राहा; मधुमेहावर मात करा!’
जगात एका मोठय़ा प्रमाणावर वाढणाऱ्या आरोग्य स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने २०१६ च्या आरोग्य दिनाचे घोषवाक्य दिले आहे, ‘उत्कृष्ट राहा : मधुमेहावर मात करा आणि त्याचे वाढणारे प्रमाण रोखा’  (Beat Diabetes and halt the Rise) ही हाक जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगासाठी दिली असली तरी भारताने त्याकडे खूप गंभीरपणे पाहायला पाहिजे. कारण भारतातील त्याचे प्रमाण जास्त वेगाने वाढते आहे.

जगभरामध्ये आज ३५ कोटी लोकांना मधुमेह आहे, जी संख्या येत्या वीस वर्षांमध्ये दुपटीपेक्षाही जास्त होऊ शकते. २०१२ मध्ये जगात १५ लाख लोकांचा मृत्यू मधुमेहामुळे झाला. २०१४ मध्ये जगभरातील अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ९ टक्के लोकांना मधुमेह होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत मधुमेह हे मृत्यूच्या कारणांपैकी सातवे महत्त्वाचे कारण असेल.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Little Boy Viral Video
“तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच
What Vikrant Messy Said About Muslims
Vikrant Massey : “देशातल्या मुस्लिमांना धोका नाही, कुणीही..”, विक्रांत मेस्सीचं वक्तव्य; टीकेचा भडीमार

भारताची स्थितीही लक्षात घ्यायला हवी. २०१५ मध्ये भारतामध्ये ६ कोटी ९२ लाख (एकूण लोकसंखेच्या ८.७ टक्के) लोकांना मधुमेह झाल्याचे आढळून आले. पुढील पाच वर्षांत ७ कोटी ७२ लाख १८ वर्षांच्या वरील व्यक्तींना मधुमेह असण्याची शक्यता आहे. २०१२ मध्ये १० लाख भारतीयांचा मृत्यू या व्याधीमुळे झाला, संपूर्ण देशभरात या रोगाचा प्रभाव आढळून येतो. ग्रामीण भागाच्या तुलनेने शहरी भागात याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या तीस वर्षांत शहरी भागातील मधुमेहाचे प्रमाण १ .२ टक्क्यांवरून १२.१ टक्के इतके जास्त झाले आहे म्हणजे दहापट जास्त झाले आहे! भारत हे विकसनशील राष्ट्र असूनही मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा आजार वयाने मोठय़ा माणसांमध्येच आढळून येत होता. पण सगळ्यात महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे भारतात मधुमेह हा कमी वयातच होऊ लागला आहे. परिणामत: त्याचा मेंदू, हृदय आणि मूत्रपिंड या अवयवांवर अनिष्ट परिणाम होऊन, हे अवयव निकामी होतात आणि त्यामुळे लवकरच मृत्यू येऊ शकतो.

मधुमेह म्हणजे नक्की काय? आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होणे. ही साखर रक्तात येते कुठून आणि त्याचं रक्तातील प्रमाण नियंत्रण कोण ठेवतं? आपण जेपण काही जेवतो, पोळी-भाजी, फळे, भाज्या, अगदी चटणी-भाकरीदेखील त्याचं पचन होऊन, त्याचं साखरेत (ग्लुकोजमध्ये) रूपांतर होतं. हे ग्लुकोज शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत घेऊन जाण्याचं काम स्वादुपिंडातील बिटा पेशीतून निर्माण होणारे हे संप्रेरक इन्सुलिन करते, प्रत्येक पेशी हे ग्लुकोज आपल्या कार्यासाठी वापरते, त्यामुळे मानवी शरीराला विविध कामांसाठी ऊर्जा मिळते आणि रक्तातील साखरेचे प्रमाणदेखील नियंत्रित राहते आणि अशा तऱ्हेने रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहते. जेव्हा स्वादुपिंडातील बिटा पेशी इन्सुलिन कमी प्रमाणात बनवतात किंवा लठ्ठपणामुळे बनलेले इन्सुलिन अपुरे पडते तेव्हा रक्तातील साखर वाढते, या स्थितीलाच मधुमेह असे म्हणतात.

बिटा पेशी नष्ट का होतात? विषारी पदार्थ, विषाणुसंसर्ग, आनुवंशिकता किंवा लठ्ठपणा अशा काही कारणांमुळे बिटा पेशी नष्ट झाल्या किंवा इन्सुलिन कमी प्रमाणात स्रवू लागल्या किंवा इन्सुलिनच्या कार्यपद्धतीमध्ये काही बिघाड झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे अवघड होते. रक्तातील साखर वरचेवर वाढत जाते आणि शरीराच्या इतर पेशींनादेखील योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात ऊर्जेचा पुरवठा होत नाही. अपुऱ्या ऊर्जेमुळे चक्कर येणे, सतत मरगळ किंवा खूप थकवा येणे, प्रमाणापेक्षा जास्त तहान व भूक लागणे अशी लक्षणे दिसू लागतात. तर रक्तातील प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या साखरेचा परिणाम हृदय, मेंदू, मूत्रपिंड, दृष्टिपटल यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर होऊन त्यांचे कार्य व्यवस्थित चालत नाही आणि मग अधिकच गुंतागुंत निर्माण होते.

मधुमेहाचे काही प्रकार आहेत का? मधुमेह तीन प्रकारांमध्ये विभागला जातो. पहिल्या प्रकारामध्ये स्वादुपिंडाच्या काही रोगांमुळे किंवा आनुवंशिक कारणाने बिटा पेशी नष्ट झाल्यामुळे इन्सुलिन मुळीच तयार होत नाही. अशा रुग्णांना कृत्रिम इन्सुलिन उपचार म्हणून घ्यावे लागते. याला ‘टाइप वन डायबेटीस’ असे म्हणतात. दुसऱ्या प्रकारामध्ये आनुवंशिकता, लठ्ठपणा, निष्क्रिय जीवनशैली, गोड पदार्थाचे अतिरिक्त सेवन अशा कारणांमुळे इन्सुलिनची कार्यपद्धती बिघडते किंवा प्रमाण कमी पडते याला ‘टाइप टू डायबेटीस’ असे म्हणतात. हे गोळ्या, औषधाने नियंत्रित होते. तिसरा प्रकार आहे, काही स्त्रियांना गरोदरपणात मधुमेह होतो, त्या काळात इन्सुलिन द्यावे लागते, बाळंतपणानंतर साखर नियंत्रणात ठेवण्याची क्रिया पूर्ववत होते. ९० टक्के मधुमेही हे दुसऱ्या प्रकारात मोडतात, म्हणजे गोळ्या औषधाने नियंत्रणात येणारा. गेल्या काही वर्षांत या प्रकारच्या मधुमेहात लाक्षणिक वाढ झाली आहे इतकंच नाही तर पूर्वी हा चाळिशीनंतर दिसणारा रोग अलीकडे विशीतच दिसू लागला आहे.

रक्तात साखरेचे प्रमाण वाढले तर काय होते?
मधुमेहामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका अधिकच वाढतो. ५० टक्के मधुमेही रुग्णांच्या मृत्यूचे कारण हे हृदयविकार आणि पक्षाघात आहे. रक्तात वाढलेली साखर आणि कमी झालेला रक्तपुरवठा यामुळे चेतापेशींना इजा होते. त्यामुळे पायांची संवेदना कमी होते. जखमा झाल्यानंतर जंतुसंसर्ग वाढतच जातो आणि प्रसंगी पायदेखील कापावा लागतो. जगातील अंध लोकांपैकी १ टक्के अंधत्व हे मधुमेहाच्या दृष्टिपटलावरील परिणामामुळे होते. मूत्रपिंड निकामी होऊन डायलिसिस करायला लागण्याचेदेखील महत्त्वाचे कारण मधुमेह हे आहे. मधुमेहासाठी लागणाऱ्या उपचारांचा खर्चदेखील बराच जास्त आहे. २०११ मध्ये भारताचा ३८ अब्ज डॉलर्स एवढा खर्च केवळ मधुमेहामुळे झाला. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालानुसार भारतासारख्या विकसनशील देशामध्ये साधारण कुटुंबाचे जवळपास २५ टक्के उत्पन्न फक्त मधुमेहाच्या उपचारांसाठी खर्च होते. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी हे एक मोठे आव्हान आहे.
या मागची कारणे कोणती? मानवाने नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. मग ती आर्थिक, सामाजिक किंवा भौतिक असो. या धावपळीमध्ये काही अपरिहार्य बदल माणसाच्या जीवनशैलीमध्ये झाले. शारीरिक हालचालींचा अभाव, स्निग्ध आणि अतिगोड पदार्थाचे अतिरिक्त सेवन, वरचेवर वाढत चाललेला ताणतणाव, शारीरिक स्थूलता आणि वाढलेली आयुर्मर्यादा यांमुळे मधुमेहाच्या प्रमाणामध्ये अधिकच भर पडत आहे.

पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची नेमकी कारणे निश्चित नसल्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आव्हानात्मक आहे. पण दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा प्रतिबंधात्मक उपायांनी नियंत्रित करता येऊ शकतो. वाढत्या वजनावर नियंत्रण, नियमित योग्य व्यायाम, योग्य वेळी योग्य पोषक आहार, आरोग्यदायी दिनचर्या व निव्र्यसनी जीवनशैली यांमुळे मधुमेहापासून स्वत:चा बचाव करता येतो.
मधुमेह हा आजार आणि त्यामुळे होणाऱ्या गुंतागुंतींची व्यापकता लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी जागतिक आरोग्य दिनाची मध्यवर्ती कल्पना/बोधवाक्य हे त्याच्याशी निगडित ठेवली आहे. ती म्हणजे ‘उत्कृष्ट राहा; मधुमेहावर मात करा!’ उत्कृष्ट राहा यामध्ये-मधुमेहाचा वाढता प्रभाव थांबवणे, सक्रिय राहणे, आरोग्यदायी खाणे, वैद्यकीय सल्ला पाळणे आणि जर शंका आली तर स्वत:ची तपासणी करून घेणे या सर्व बाबी समाविष्ट आहेत.

येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या संकटावर मात करून अखंडपणे भव्यतेच्या दिशेने वाटचाल करणे हा मानवजातीचा गुणधर्म आहे. या झटपट बदलणाऱ्या काळामध्ये वातावरणात अचानक होणारे बदल, वाढती पाणीटंचाई यांसारख्या समस्यांबरोबरच आरोग्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. असे केले तरच मानवाचा विकास शाश्वततेच्या दिशेने होईल. येत्या गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक दिनाच्या पाश्र्वभूमीवर निरोगी राहण्यासाठी सर्वाना आरोग्यदायी शुभेच्छा..!
डॉ. कामाक्षी भाटे, डॉ. अश्विनी यादव
(लेखिका डॉ. कामाक्षी भाटे या मुंबईच्या के. ई. एम. रुग्णालयात प्राध्यापक असून
डॉ. अश्विनी यादव आर. एम. ओ. आहेत.)