सोशल नेटवर्किंगमध्ये आपण इतरांशी फक्त आयुष्याची चांगली बाजूच शेअर करतो आणि प्रशंसा मिळवतो; पण या चॅटिंगच्या आभासी संवादाच्या दुनियेतून बाहेर आलं, की दैनंदिन जीवनाच्या संघर्षांला तोंड देताना आपल्याबरोबर कुणीही नाही, ही भावना फार वेदनादायी तर असते, पण त्याहीपेक्षा आपले दु:ख व्यक्त करायला प्रत्यक्षात कुणीही नाही, ही जाणीव फारच बोचरी असते. त्यातूनच आलेली निराशा टोकाचा निर्णय घेऊ शकते.
आय फोन सिक्स एस घेतलेल्या श्रेयाने काढलेला सेल्फी फेसबुकवर टाकला काय.. आणि अध्र्या तासात ३०० हून जास्त ‘लाइक्स’ त्या फोटोला मिळाल्या, तेही रात्री दीड वाजता. हा जबरदस्त रिस्पॉन्स बघून लगेच फेसबुकवर मिळालेले लाइक्स आणि फोटो व्हॉट्सअॅपवर तिने शेअर केले आणि त्यालाही १५ मिनिटांत पन्नासहून जास्त इमोटीकॉन्स (स्माईली) आल्या. त्या वेळी तिला ऑनलाइन स्टेटस होता रात्री अडीचचा. सध्या, ‘रात्रीस खेळ चाले समस्त नेटकऱ्यांचा’ अशी प्रचीती घरोघरी येत असेल.
श्रेया खासगी बँकेत बिझनेस प्रमुख म्हणून काम करते. कामाची गरज म्हणून तिला मुंबईत राहत असूनही गोव्याला राहायला लागतंय. एकटी असल्याने कामावरून घरी येताना कौटुंबिक जबाबदाऱ्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पूर्ण करणं, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणं आणि सर्व झाल्यावर एकटेपणा दूर करण्यासाठी सोशल नेटवर्किंगवर चॅटिंग करणं, हा तिचा दिनक्रम. श्रेयाचं ऑनलाइन राहणं वेगळ्या कारणासाठी, तर राजेश नुकताच एमबीए झालाय. टाइमपास, क्रेझ म्हणून आठवडय़ाचे सातही दिवस २४ तास ऑनलाइन राहणं हे त्याचं वेड. सोशल नेटवर्किंगवर दररोज डी.पी. बदलून आकर्षति करणारे स्टेटस टाकणं त्याला आवडतं, पण सध्या तो खूप नव्र्हस असतो, कारण भली मोठी फ्रेन्ड्सची यादी, ग्रुप असूनही मत्रिणीला डेटवर घेऊन गेलं, की ती वेगळंच वागते. चॅटिंगवर
तुफान बोलते, पण प्रत्यक्षात डेटच्या वेळी खूप सावधपणे आणि मोजकंच बोलते. राजेशने सोशल नेटवर्किंगमधून मत्रिणी झालेल्या अनेकींबाबत हा अनुभव घेतलाय आणि आता तो स्वत:लाच दोष देतोय. त्याला वाटतंय माझ्यातच काही कमी आहे आणि म्हणूनच राजेशला आता फार एकटं वाटू लागलंय.
श्रेया, राजेश ही प्रातिनिधिक उदाहरणं. आपल्या आजूबाजूला किंबहुना घरातही असतील. गरज किंवा स्वेच्छेनं एकटं राहावं लागणं किंवा सर्वामध्ये असूनही एकटं वाटणं, हीच भावना मनात भीती, काळजी, अस्वस्थता निर्माण करायला पुरेशी असते. आज आपल्याला वाटेल की, एका मुठ्ठीमध्ये मावेल इतक्या छोटय़ा स्मार्टफोननं हवं तेव्हा क्षणात दूरच्या माणसाशी संपर्क करून संवादातून जवळीक साधता येते, तरीही हा एकटेपणा खरंच वाटू शकतो का? टोकाची निराशा येऊ शकते का?
तर याचं उत्तर ‘हो’ असं आहे. याचं कारण सोशल नेटवर्किंगमध्ये बहुतांशी आपण इतरांशी फक्त आयुष्याची चांगली बाजूच शेअर करतो आणि प्रशंसा मिळवतो; पण या चॅटिंगच्या आभासी संवादाच्या दुनियेतून बाहेर आलं, की दैनंदिन जीवनाच्या संघर्षांला तोंड देताना आपल्याबरोबर कुणीही नाही, ही भावना फार वेदनादायी तर असते, पण त्याहीपेक्षा आपले दु:ख व्यक्त करायला प्रत्यक्षात कुणीही नाही, ही जाणीव फारच बोचरी असते. असंच काहीसं झालं असावं ते टी.व्ही. सुपरस्टार प्रत्युषा बॅनर्जीच्या बाबतीत. स्टारडम हे एक मायाजालच. त्यात तिच्या भूमिकेत तिचे फॉलोअर लाखांच्या घरात. अशातच ज्यांना तिनं ‘जवळ’ केलं ते ‘दूर’ जाऊ लागले आणि प्रशंसा करणारे कुठे ‘दूर’ गेले ते तिला कळलंच नाही. एकाच वेळी दोन्हीकडून नाकारलं जाणं हे तिच्या २४ वर्षे वयाला मनाचा तोल जाण्यासाठी भक्कम कारण असू शकत होतं. तिनं उचललेलं पाऊल हे अनेक गोष्टींचा परिपाक होता. उदाहरणार्थ, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आई-वडिलांपासून दूर येऊन राहणं, स्पध्रेत दीर्घकाळ कसं टिकता येईल याची काळजी, आपण टी.व्ही. इंडस्ट्रीत टिकलो नाही तर पुढे काय, ही भीती, बॉयफ्रेन्डकडून फसवलं जाणं, तसंच आर्थिक गणित बिघडणं. अतिशय लहान वयात असा ताण दररोज सहन होणं अजिबात शक्य नाही म्हणूनच मग सोशल फंक्शन्स, सोशल नेटवर्किंगचं अॅडिक्शन होणं साहजिकच होतं. म्हणूनच ती शेवटचा व्हॉट्सअॅपचा स्टेटस ‘मृत्यू’संबंधी ठेवून निघून गेली असावी. आजही तिच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध सुरूच आहे.
सोशल नेटवर्किंगमध्ये अॅक्टिव्ह राहणारे लोक म्हणतात,
‘‘लिखित संवाद वा टेक्स्टिंग केल्याशिवाय चन पडत नाही. त्यानं मस्त मूड बनतो. आनंद वाटतो.’’ पण संशोधकांच्या मते, हा आभास आहे. त्यांच्या मते, स्मार्ट फोनवरील संवादाने नराश्यात वाढ होते आणि तुम्ही जर आलेलं नराश्य घालवण्यासाठी स्मार्टफोनवर लिखित संवाद करत असाल, तर अशा संवादानं उलट नराश्यात आणखी वाढ होते. हे संशोधन ‘मिशिगन युनिव्हर्सिटी’च्या ‘कॉलेज ऑफ कम्युनिकेशन आर्ट्स अॅण्ड सायन्सेस’ इथं झालं. या संशोधनात महत्त्वाचा वाटा आहे तो युनिव्हर्सिटीचे डीन आणि भारतीय वंशाचे संशोधक प्रभू डेव्हिड यांचा. याच संशोधनाला पूरक संशोधनाचे निष्कर्ष आले आहेत ते ‘लोक सोशल नेटवर्कचे अॅडिक्ट होताहेत का?’ हे बघण्यासाठी केल्या गेलेल्या अभ्यासातून. नॉव्र्हे येथील युनिव्हर्सिटी ऑफ बर्गेन यू.आय.बी.मधील डॉ. सिसिली अॅड्रसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा अभ्यास केला. यातील काही निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत.
‘फेसबुक’च्या आहारी तरुण, मध्यमवयीन लोक जातात.
याच्या आहारी स्त्रिया जास्त जाऊ शकतात.
सोशल नेटवर्किंगच्या आहारी गेलेले लोक रात्री खूप उशिरा झोपतात व खूप उशिरा उठतात.
ते सामाजिकदृष्टय़ा असुरक्षित व चिंताग्रस्त असतात.
सोशल नेटवर्किंगच्या अतिरेकी वापरानं निद्रानाश, एकलकोंडेपणा, नकारात्मक भावना वाढणं, भावनांचे हेलखावे, अलिप्तता आदी समस्यांना तोंड द्यावं लागतं.
या शास्त्रोक्त अभ्यासावरून एक गंभीर गोष्ट लक्षात येईल की, सोशल नेटवर्किंगची सुरुवात मानवी मनामनांतील ‘संवादसेतू’ निर्माण करण्यासाठी झाली तरीही अंतिमत: त्याच्या अतिरेकी वापरामुळे वापरणाऱ्यांच्या मनारोग्यावर फारच विपरीत परिणाम होत आहेत. हे परिणाम बाहेरून दिसत नाहीत, पण वाळवीसारखे मन पोखरतात. हे टाळायचे असेल तर प्रत्येकाने आपली ‘ताण निर्मूलन करणारी व्यवस्था’ (स्ट्रेस रीलीज प्लॅन) निर्माण करावी.
आज जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष, स्पर्धा करावी लागतेय. म्हणून ताण येणे साहजिकच आहे. जसा तो दुष्काळग्रस्तांत येतो तसा तो शैक्षणिक- व्यावसायिक स्पध्रेत स्वत:ला टिकवण्यासाठी, सिद्ध करणाऱ्यांनाही येतो व घर चालविणाऱ्या सर्व स्त्रियांनाही येतो म्हणूनच * ताणतणाव हा जीवनसंघर्षांतील अविभाज्य भाग आहे. म्हणून तो शांतपणे स्वीकारून त्यांना सामोरे जायचं हे प्रथम ठरवलं पाहिजे. * हा ताण- संघर्ष आपलाच असल्याने आपल्या एकटेपणाच त्याला सामोरं जायचंय हेही मनानं स्वीकारायलं हवं. हे एकदा झालं, की मग जीवनातील संघर्षांना सामोरं जाताना उपयोगी येईल असे स्वत:चे कुटुंब आणि मित्रपरिवारांनी नातेसंबंध घट्ट करावेत. आपल्या जीवनात काही तणाव आहेत हे मोकळेपणाने सांगता येतील अशी परिवारातील नाती दृढ करावी. घट्ट आणि दृढ नाती एकटेपणाच्या वळणावर कधीच आणून सोडत नाहीत.
आर्थिक शिस्त महत्त्वाची
महत्त्वाचं म्हणजे तरुण असो किंवा नुकतीच नोकरी लागलेली व्यक्ती असो अथवा प्रसिद्धीच्या शिखरावर एका रात्रीत पोहोचलेली व्यक्ती असो, प्रत्येकाने आर्थिक शिस्त स्वत:ला लावून घ्यायलाच हवी. आज जसं आपण जगतोय, तसं उद्या कोणतेही काम नसेल तरी कुणावरही अवलंबून न राहता जगता येईल, असं अर्थ नियोजन करायलाच हवं. याचप्रमाणं आपण ज्या क्षेत्रात काम करतोय, ते करण्यासाठी आपण किती सक्षम आहोत, आपलं काम अल्प काळात संपलं तर दुसरे काय पर्याय आहेत? याचं नियोजन आजच्या पिढीनं करायलाच हवं, किंबहुना घरच्या ज्येष्ठांनी असा विचार करायला तरुणाईला शिकवलंच पाहिजे, अगदी त्यांना आवडलं नाही तरीसुद्धा. त्याचप्रमाणे कॉलेज, माध्यमं, सोशल नेटवर्किंग साइट्स यांचा उपयोग करून अर्थसाक्षरता, अर्थनियोजनाचे महत्त्व या पिढीवर तज्ज्ञांनी बिंबवलं पाहिजे.
या दोन्हीबरोबरच संघर्षमय काळात महत्त्वाचं म्हणजे मनाचं आरोग्य टिकवणं. प्रथम म्हणजे आपल्या स्वभावात होणारा बदल आपण ओळखायला हवा. मन अस्थिर असणं, अचानक एकटं राहावंसं वाटणं, जवळच्या माणसांशी संवाद नको वाटणं, नकारात्मकता वाढणं, प्रत्येक अपयशात स्वत:लाच दोषी मानणं, निराश वाटणं, असं वाटल्यास कुटुंबीयांना कल्पना द्या. संकोच, लाज बाळगू नका. तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. असे विचार कमी तीव्रतेचे पण अस्वस्थ करणारे असतील तर समुपदेशकाची मदत घ्या. अशाबरोबर महत्त्वाचं असतं ते आपले चुकीच्या दृष्टिकोनावर आधारलेले अविवेकी विचार बदलणं. ज्याला रॅशनल िथकिंग अर्थात विवेकाधिष्ठित विचार म्हणतो तो करायला शिकणं. असा विचार करायला शिकल्यावर मनाच्या विरुद्ध घडलेल्या कोणत्याही परिस्थितीत माणूस टोकाची भूमिका घेत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी स्वत: किंवा विश्वासू माणसाच्या सल्ल्याने ‘पर्याय’ शोधून परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. असा विचार करायला तज्ज्ञ मंडळी शिकवू शकतात. तसा वेळ नसेल तर अध्यात्मशास्त्रातील कोणताही ग्रंथ गुरुस्थानी मानून तो नियमित वाचला तरी विचारसरणी बदलता येते. उदाहरणार्थ भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी इत्यादी. आज टेक्नोसॅव्हीसाठी यातील काही गोष्टी, पुस्तके नेटवर आहेत. तीही मराठी व इंग्रजीत भाषांतरित आहेत.
अपयशाची भीती
मनाच्या उद्वेगाचे महत्त्वाचे कारण म्हणजे मनाच्या विरुद्ध झालेल्या घटना न स्वीकारणं आणि अवास्तव अपेक्षा ठेवणं. या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी विवेकी विचार करण्याशिवाय पर्याय नाही. नोकरी- व्यवसायात कामाला सुरवात करताना त्या टप्प्यावर ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन्’- फलाची अपेक्षा न करता कर्म करीत राहाणं हे खऱ्या अर्थानं आत्मसात केलं तर ‘फीयर ऑफ फेल्युअर’ वा ‘अपयशाची भीती’ वाटणारच नाही आणि मन आहे त्या स्थितीत शांत राहील. विचारांप्रमाणे नियमित ध्यानधारणा, श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र, ओंकार किंवा नामस्मरण हे नियमित केलं तरी मन शांत राहायला मदत होते.
शेवटी, आयुष्य आपलं आहे ते आनंदाने, समाधानानेच घालवायला हवं. जर ते तसं नसेल तर त्याची कारणे मुळापासून शोधायला हवीत. त्याची उत्तरे शोधायला हवीत. स्वत:ला जमत नसेल तर ते प्रश्न सोडवू शकतील अशांची विनासंकोच मदत घ्यायला हवी. आभासी दुनियेत स्वत:च्या भावनांना लपवत राहाणं फार काळ तग धरू शकत नाही. संवाद करा प्रत्यक्ष, समोरासमोर आणि खराखुरा..
– संगीता वझे
(लेखिका मुंबईच्या शुश्रुषा रुग्णालयात समुपदेशक आहेत.)