‘एक आटपाट नगर होते. त्यातील राजा खूप बुद्धिवान आणि पराक्रमी होता. राणीपण खूपच हुशार आणि सुंदर होती. राजा आणि राणी दोघांना एक सुदृढ, पराक्रमी राजपुत्र होता. राजा आणि राणी दोघांनी ठरवून आपले अंश असलेले काही गर्भ कोषागारात सांभाळून ठेवले होते. उत्तम जनुकीय संरचना असलेले हे गर्भ राज्याच्या दृष्टीनेसुद्धा खूपच महत्त्वाचे होते.’ माझी आई माझ्या लहान मुलांना अशी काही तरी विज्ञानकथा सांगत होती. त्यावर मुलांनी अनेक प्रश्न विचारून कल्ला केला. महाभारतातील शंभर कौरवपण असेच जन्माला आले असतील यावर आमच्या घरात एक चर्चा घडली. या घटनेला काही वर्षे लोटली असतील. गेल्या काही वर्षांत टेस्ट टय़ूब बेबी आणि ‘एम्ब्रियो फ्रीजिंग’ या तंत्राचा वापर आम्हा स्त्री-रोगतज्ज्ञ मंडळींसाठी अगदी नेहमीचा झाला आहे. आमच्या डॉक्टर इंदिरा हिंदुजा यांनी मुंबईतील पहिली टेस्ट टय़ूब बेबी जन्माला घातली त्याला आज तीस वर्षे झाली. त्या हर्षां चावडाने नुकताच एका सुदृढ मुलाला जन्मही दिला. हर्षांच्या जन्मापासून तिच्या मुलाच्या जन्मापर्यंतच्या वर्षांत या तंत्रज्ञानात अनेक शोध लागले. त्यातील एक महत्त्वाचा शोध म्हणजे एम्ब्रियो फ्रीजिंग.

टेस्ट टय़ूब बेबी किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) या संकल्पनेविषयी आता बहुतेक लोकांना साधारण अंदाज आहे. निसर्गात स्त्री व पुरुष बीजाचे मीलन हे स्त्रीच्या गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या नलिकेत होते (fallopian tube)  आणि तो गर्भ हा गर्भाशयात पोहोचतो व वाढतो; परंतु ही नैसर्गिक घटना होत नसेल तर स्त्री बीज आणि पुरुष बीजाचे मीलन हे प्रयोगशाळेत घडवून आणून त्यातून साकारलेला गर्भ हा स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो त्यालाच इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) म्हणतात. या तंत्रज्ञानाने अनेक जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली हे नक्कीच खरे आहे. या तंत्राची सफलता साधारणत: ४५ टक्के धरली जाते. सुरुवातीच्या काळात या तंत्राचा यशस्वीतेची टक्केवारी फार चांगली नव्हती. एक तर महागडे उपचार आणि त्यातून म्हणावा तसा फायदा नाही अशी अवस्था होती. मुळात आयव्हीएफ उपचारात अतिशय जास्त मात्रेत संप्रेरके वापरली जातात. त्यामुळे एकाच वेळी अनेक स्त्रीबीजे तयार होतात. शरीरातील ठरावीक हार्मोन्सचे प्रमाण खूप वाढू शकते. अशा वेळी जर तयार झालेले गर्भ गर्भाशयात सोडले तर म्हणावी तितकी सफलता मिळत नाही. शिवाय प्रयोगशाळेत जर अनेक गर्भ तयार झाले तर त्यांचे करायचे काय, हा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी ‘टेक होम बेबी रेट’ ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.
गर्भ गर्भाशयात सोडल्यावर रुजणे म्हणजे आयव्हीएफ सफल किंवा यशस्वी झाले. हे जरी खरे असले तरी शेवटी जोडप्याला हवे असते ते एक मांडीवर खेळणारे मूल. सर्वच गर्भ जर गर्भाशयात सोडले आणि रुजले तर एका वेळी एका गर्भाशयात अनेक गर्भ वाढायला लागतील. जितके जास्त गर्भ तितका नैसर्गिक गर्भपाताचा धोका अधिक. म्हणजे जरी आयव्हीएफचा रिझल्ट चांगला आला तरी ‘टेक होम बेबी रेट’ कमी राहणार. म्हणजे पुन्हा पंचाईत! या सगळ्या परिस्थितीला एकच उपाय होता आणि तो म्हणजे प्रयोगशाळेत वाढलेले गर्भ हे प्रयोगशाळेतच गोठवून ठेवणे आणि योग्य वेळी आणि सम्यकपणे त्याचा वापर करून गर्भधारणा घडवून आणणे.

या विषयावरील शास्त्रीय संशोधनाला सुरुवात अनेक वर्षांपूर्वी झाली. १९७२ मध्ये सस्तन प्राण्यांमध्ये हा प्रयोग केला गेला. Alan Trounsan & Linda Mohr यांनी १९८३ मध्ये पहिल्या गोठवलेल्या मानवी गर्भाचे रोपण करून गर्भधारणा घडवली, पण दुर्दैवाने गर्भपात झाला. पूर्वी धिम्या गतीने तापमान कमी करण्याची पद्धत होती. आत मात्र vitrification  या पद्धतीत झपाटय़ाने तापमान कमी करून ते उणे १९६ डिग्रीपर्यंत नेले जाते. यासाठी द्रवरूप नायट्रोजनचा वापर केला जातो.

आज एम्ब्रियो फ्रीजिंग या तंत्राचा वापर करून हे गर्भ काही काळापर्यंत गोठवलेल्या अवस्थेत ठेवले जातात. गोठवलेले गर्भ किती वर्षे ठेवता येऊ शकतील हे अजूनही नक्की माहीत नाही. आजतागायत तेरा वर्षांपर्यंत गोठवलेल्या गर्भापासून सफल गर्भधारणा झालेली आहे. गोठवलेल्या गर्भापासून जन्माला आलेल्या मुलांमध्ये अधिक प्रमाणात व्यंग असतात असा एक गैरसमज आहे, तो मात्र खरा नाही. गोठवण्याच्या प्रक्रियेत मात्र काही गर्भ खराब होऊ शकतात. अर्थातच अशा गर्भाचा वापर करून काही फायदा होत नाही.

अनेक तज्ज्ञ पहिल्या महिन्यात स्त्रीबीज मिळवणे, गर्भधारणा करणे, गर्भ गोठवून ठेवणे आणि त्यातील चांगल्या गर्भाचे रोपण पुढील महिन्यात करून सफल गर्भधारणा घडवून आणणे या तंत्राचा वापर नेहमीच करतात. त्या महिन्यात जर गर्भधारणा झाली नाही, तर उरलेले गर्भ पुढील महिन्यात वापरता येतात. एका वेळी दोन किंवा तीनच गर्भ गर्भाशयात सोडून अनेक धोके टाळता येऊ शकतात.
गोठवलेल्या गर्भाची तपासणी करता येते. त्यात काही जनुकीय बिघाड नाहीत ना हेही तपासता येते. त्यामुळे जन्मणारे मूल हे जेनेटिकली सुदृढ आहे किंवा कसे हे तपासणे शक्य आहे. गोठवलेल्या गर्भाला दुसऱ्या आईच्या गर्भाशयात रोपण करून वाढवणे आता शक्य आहे. त्यालाच सरोगसी म्हणतात.

नुकतीच माझ्या क्लिनिकमध्ये विशीची तरुणी आली होती. दुर्दैवाने तिला इतक्या कमी वयात ओवरी म्हणजेच बीजाशयाचा कर्करोग झाला असल्याचे निदान मी केले. साहजिकच तिला शस्त्रक्रिया करावी लागणार होती आणि दोन्ही ओवरीज काढून टाकाव्या लागणार होत्या. आता या मुलीला स्वत:ची बीजे गोठवलेल्या अवस्थेत ठेवून भविष्यात आई बनणे शक्य आहे ते केवळ फ्रीजिंग तंत्रामुळे.
गोठवलेले गर्भ दान करता येणे शक्य आहे. स्त्रीबीजे किंवा पुरुष बीजे नसणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी हे दान सत्पात्री दान ठरू शकते. त्याचबरोबर संशोधनाच्या कामासाठी या गर्भाचा वापर करून अनेक शास्त्रीय सत्यांवर प्रकाश पडणे शक्य आहे.

हल्लीच्या काळात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्र गाजवताना दिसतात. अनेकदा करियर करणारी स्त्री कमी वयात मातृत्वाची जबाबदारी घेऊ इच्छित नाही. शास्त्रीयदृष्टय़ा पाहता कमी वयात स्त्रीबीजे ही अधिक चांगल्या दर्जाची असतात. जसे वय वाढते तसा स्त्रीबीजांचा दर्जा घसरतो आणि त्या परिस्थितीत गर्भधारणा होणे हे अधिक कठीण होऊ शकते किंवा गर्भात जनुकीय दोष होण्याचे प्रमाण वाढू शकते. मग अशा वेळी तिच्या मदतीला येते ते फ्रीजिंगचे तंत्र. कमी वयात स्वत:चे गर्भ गोठवून ठेवून नंतर ती कधी तरी आई बनू शकते. त्यामुळे कमी वयातच चांगल्या दर्जाची स्त्रीबीजे गोठवून किंवा गर्भ गोठवून सावकाशीने मातृत्व स्वीकारणे हे आता शक्य आहे. डायना हेडन ही अभिनेत्री अलीकडेच याच पद्धतीने चाळिशीत आई झाली.

पण उशिराचे मातृत्व हे शक्य असले तरी अगदी सोपे मात्र नक्कीच नाही. विशेषत: पस्तिशीनंतर गर्भधारणेमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, बाळाचे वजन कमी असणे, कमी महिन्यांची प्रसूती होणे इत्यादी गुंतागुंत होऊ शकते. मुलांना जन्म दिल्यानंतर काही जबाबदारी संपत नाही, उलट ती वाढते. बाळ आणि पालक यांच्या वयातील खूप जास्त फरक हा एक महत्त्वाचा विषय आहे. मुलांचे संगोपन आणि त्यांना लागणारा शारीरिक तसेच मानसिक आधार हे सर्व देण्याची जबाबदारी पालकांवर असते हे विसरून चालणार नाही. आजी-आजोबाच्या वयाच्या पालकांना ही जबाबदारी घेण्याचे भान असायला हवे हेही तितकेच खरे.

गोठवलेल्या गर्भाना नीट सांभाळून ठेवणे हे एक फार मोठे नैतिक जबाबदारीचे काम आहे. त्यांचा दुरुपयोग हा लिंग परीक्षेसाठी होत नाही ना हे बघणे गरजेचे आहे. गोठवलेल्या गर्भाचा अनैतिक संशोधनासाठी दुरुपयोग होणार नाही ना? त्यांची तस्करी होणार नाही ना? असे अनेक नैतिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. हे गर्भ व त्यांचे पालक यांच्या नीट नोंदी करणे आवश्यक आहे. त्याच्यात गफलत होऊन चालायची नाही. या गर्भाची मालकी नेमकी कोणाची यावर नेमके आजच्या घडीला काही उत्तर नाही. समजा एका जोडप्याने गर्भ गोठवले आणि पुढे जोडप्याचा घटस्फोट झाला तर नेमके काय करायचे? डॉक्टरांनी नेमके कोणाला विचारायचे?

या गोठवलेल्या गर्भाचे दान करून समजा मूल जन्माला आले तर त्यांचे नेमके आईवडील कोण? जन्म देणारे की ज्यांची बीजे वापरली आहेत ते? मग अशा मुलांचे नेमके अधिकार काय? त्या मुलांना आपले खरे म्हणजे जनुकीय आईवडील माहीत असण्याचा अधिकार आहे का? जर हे माहीत नसेल आणि त्यामुळे जर भविष्यात जनुकीयदृष्टय़ा बहीण-भाऊ असलेल्या स्त्री-पुरुषांच्यात संकर झाला आणि त्यातून विकृत अपत्यप्राप्ती झाली तर त्याला जबाबदार कोण? असे शेकडो प्रश्न अनुत्तरित आहेत. विशेष म्हणजे आपल्या देशात अजूनही याविषयीचा कायदा संसदेत संमत झालेला नाही. आपल्या राजकीय पुढाऱ्यांना असल्या फालतू(?) विषयांवर लक्ष द्यायला बहुतेक वेळ नसावा!
थोडक्यात काय? एम्ब्रियो फ्रीजिंग हे तंत्रज्ञान मानवासाठी वरदान ठरणार की शाप हे शेवटी आपणच ठरवायचे आहे. मानव हा पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राणी आहे, असे म्हणतात; पण तंत्रज्ञानाचा वापर तो कसा करणार, हा प्रश्न आज तरी गोठलेलाच आहे हे खरे.

– डॉ. निखिल दातार
(लेखक डॉ. निखिल दातार हे वरिष्ठ स्त्री-रोगतज्ज्ञ (क्लाऊड नाइन हॉस्पिटल समूह) आहेत.)

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….

maharashtra assembly election 2024 rahul gandhi criticized pm modi at campaign rally
पंतप्रधानांना संविधानाची जाणच नाही; गोंदिया येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांची टीका

Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…

banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

Queen Elizabeth II's wedding cake slice sold in auction
Queen Elizabeth wedding cake: ८० वर्षे जुन्या केकची किंमत तब्बल २ लाख रुपये; काय आहे नेमकं प्रकरण? राणी एलिझाबेथचा काय संबंध?

Archaeologists discover a 4000-year-old coffin inside another coffin of Egyptian priestess
Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?