कोकण रेल्वेने ‘श्रावण सेवा’ नावाची अत्यंत उपयुक्त हेल्पलाइन सुरू केली आहे. कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं सामान गाडीत चढवायला तसंच गाडीतून उतरवायला मदत करण्यासाठी ही हेल्पलाइन आहे. ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासाच्या वेळेआधी चार तास आपण प्रवास करणार असलेल्या गाडीचं नाव, पी.एन.आर. क्रमांक, डबा क्र., आसन क्र. ही माहिती मोबाइल क्र. ०९६६४०४४४५६ वर एस.एम.एस. करून पाठवायची. चिपळूण, रत्नागिरी, थिविम, करमाळी, मडगाव या स्थानकांवर ही सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे. माहिती कळवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कोकण रेल्वेच्या स्वयंसेवकांकडून मदत मिळते.
पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या समस्यांमध्ये कायदेविषयक सल्ला देण्यासाठी ‘पुणे डिस्ट्रिक्ट लीगल सव्‍‌र्हिस अ‍ॅथॉरिटी’ नावाची तेरा सदस्यीस समिती नेमण्यात आली आहे. पुण्याबाहेरील ज्येष्ठ नागरिकांना सल्ल्यासाठी त्यांच्या जवळच्या सल्ला केंद्रांची माहिती या समितीकडून दिली जाते. संपर्कासाठी पुणे. दू. क्र. – ०२०-२५५३४८८१. स.११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत येथे संपर्क साधता येतो.
फ्री लीगल एड सेंटर फॉर वुमेन अँड सिनिअर सिटिझन्स नावाची एक हेल्पलाइन ‘भारती विद्यापीठा’तर्फे सुरू करण्यात आली आहे. त्यांचा पत्ता – फ्री लीगल एड सेंटर फॉर वुमन अँड सिनिअर सिटिझन्स, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, एज्युकेशन कॉम्प्लेक्स, एरंडवणे, पौड रोड, पुणे ४११०३८.

मुंबई पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक सुरक्षा विभाग सुरू केला आहे. त्याचा दू. क्र. आहे – १२९१. या विभागातील अधिकारी स्वत: ज्येष्ठ नागरिकांच्या घरी येऊन त्यांची विचारपूस करतात. त्यांच्या तसंच त्यांच्या घराच्या सुरक्षेचा आढावा घेतात. त्यांच्याकडे असलेल्या मदतनीसांवर लक्ष ठेवतात आणि आवश्यकता असल्यास लागेल ती मदत करतात.

ठाणे ग्रामीण विभागातील पोलिसांच्या हेल्पलाइनचा दू.क्र. आहे – १०९०.
स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असलेल्या हेल्पलाइन्सची माहिती आपण घेतली. आता आपण पुरुषांसाठी असलेल्या हेल्पलाइन्सची माहिती पुढल्या शनिवारी करून घेऊ या.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com