आईवडिलांचे वैवाहिक जीवन जेव्हा घटस्फोटाने कायदेशीररीत्या संपुष्टात येते तेव्हा त्यांच्या मुलांचा ताबा कुणाकडे सोपवावा हे ठरवण्यासाठीचे दावे कुटुंब न्यायालयासमोर येतात. तो ताबा ठरेपर्यंत मुलांचे काय होते? आईवडिलांमधील कटुतेचा मुलांच्या मनावर नकारात्मक आणि गंभीर परिणामही होऊ शकतो.

‘‘तुम्हीच विचारा त्याला कुठे राहायचे आहे ते. नाही तर त्याचा बाबा परत माझ्यावर आरोप करेल, की मी राजूला पढवून आणले आहे म्हणून.’’ राजूची आई तावातावाने समुपदेशकाला सांगत होती. सोबत असलेला राजू आईचा हात धरून नुसताच उभा होता. राजूचे वय दहा ते अकरा असावे. इंग्रजी शाळेत, सातवीत शिकणारा हा हुशार, चुणचुणीत मुलगा गांगरून नि गोंधळून गेला होता. त्याच्या बाबांनी त्याच्या ताब्यासाठी अर्ज केला होता. राजू गेली सहा वर्षे त्याच्या आजोळी राहात होता. आजोळी त्याची आई, मामा, मामी व आजी राहात होते. तेथेच त्याची शाळा होती. त्याचे बाबा त्याला भेटायला पूर्वी कधी कधी येत असत; पण गेली ४-५ वर्षे ते आले नव्हते. त्याची आई नोकरी करत होती. दिवसभर घरात आजीसोबत तो असायचा. मित्रमंडळी भरपूर होती. बाहेर खेळायला पटांगण होते. शाळा, टय़ूशन व खेळ, थोडा वेळ टी.व्ही. किंवा कॉम्प्युटर खेळण्यात त्याचा दिवस निघून जात असे. वडिलांची त्याला आठवणही येत नसे; पण आता काही महिन्यांपासून त्याला कळले होते की, त्याचे बाबा त्याला त्यांच्या घरी राहायला नेण्याचा विचार करत आहेत व त्यासाठी न्यायालयात त्यांनी दावा दाखल केला आहे. त्याच्या आजोळच्या घरातले वातावरण त्यामुळे अशांत झाले होते. राजूच्याही मनात बरेच प्रश्न होते, पण कोणी नीट उत्तर देत नव्हते. आज आईने तर त्याला थेट न्यायालयातच आणले होते. नाटक-चित्रपटांमध्ये न्यायालयाचा देखावा त्याने पाहिला होता. पणआज तो अनुभवत होता. बाबांना तो ओळखत होता, त्यांच्याशी गप्पा मारायला तो उत्सुक होता; पण त्यांच्याकडे इतक्या वर्षांनंतर जायला तो घाबरतही होता. शिवाय रोजचे सवयीचे घर, आवार सोडायला तो तयार नव्हता. नेमके काय आणि का चालले आहे, या प्रश्नाने तो अस्वस्थ होता.
अशा असंख्य राजूंच्या असंख्य समस्या कुटुंब न्यायालयात पाहायला मिळतात, विशेषत: घटस्फोटित पालकांच्या मुलांच्या बाबतीत. आपल्याकडे मूल हे पालकांच्या हक्काची व्यक्ती मानली जाते. मुलांना स्वतंत्र अस्तित्व आहे याची जाणीव सहसा दिसून येत नाही. त्यांचे हित कशात आहे, त्यांना काय हवे-नको, हे सर्व ठरवतात ते पालकच; पण कधीकधी आई-वडिलांची मुलांबद्दलची कल्पना व मुलांची स्वत:बद्दलची कल्पना यात तफावत असते. त्यामुळे मुले संभ्रमात पडतात, निराश होतात वा त्यांच्या मनात भावनांचा कल्लोळ उठतो. आई-वडिलांच्या भांडणात त्यांना भाग घ्यावा लागतो. कमी वयात मोठे बनावे लागते. आई-वडील भांडतात तेव्हा त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ  शकते. अनिश्चितता, असुरक्षितता, राग या सर्वामुळे त्या कोवळ्या बालमनावर नको तेवढा ताण येतो. या ताणाशी लढताना मुलांना मोठय़ांची मदत लागते; पण तेव्हा पालक आपल्या स्वत:च्या समस्यांमध्ये इतके गुंतलेले राहतात, की मुलांकडे त्यांचे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच घटस्फोट घेताना त्या पालकांनी मुलांच्या मनाचा विचार आधी करायला हवा. त्यांना असुरक्षित वाटू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत, हे या मुलांशी बोलताना जाणवत राहाते.
घटस्फोटाच्या प्रकरणात मुलांचा ताबा कोणाकडे, हाच प्रश्न जास्त जटिल असतो. पालकांपैकी एकाकडे ते मूल कायमस्वरूपी राहायला जाणार असले तरी दुसरे पालकही त्या मुलासाठी महत्त्वाचे असते. म्हणूनच याबाबत निर्णय घेताना न्यायालयातर्फे त्याचा योग्य विचार होतोच आणि त्यात ‘मुलाचे हित’ हाच मुद्दा सर्वात महत्त्वाचा मानला जातो.
पालकांचे मुलांशी असलेले नाते हे अतूट असते. घटस्फोटामुळे हे नाते तुटत नाही; पण अनेकदा मुलांचा उपयोग प्याद्यासारखा केला जातो. मुलांना या भांडणात पडायचे नसते; परंतु त्यांचा अनेकदा मध्यस्थ म्हणून वापर केला जातो. अशा वेळी कसे वागावे हे मुलाला समजत नाही. मूल संभ्रमात पडते, गोंधळून जाते. याची परिणती नैराश्यातही होऊ  शकते. आपली मुलांबद्दलची कल्पना वा अपेक्षा व मुलाची स्वत:बद्दलची कल्पना वा अपेक्षा यात तफावत असू शकते, हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, त्यांना स्वत:ची स्वतंत्र स्वप्ने आहेत, इच्छा व अपेक्षा आहेत हे लक्षात न घेता त्यांना काय हवे ते आम्ही ठरवणार, यावर अनेक पालक ठाम असतात, मुलांवर वर्चस्व गाजवितात. मात्र मूल जसजसे मोठे होऊ लागते, वयात येऊ लागते तसतसे त्याचे स्वतंत्र विचार तयार होतात आणि मग आई-वडिलांचे वर्चस्व त्यांना अनेकदा जाचक वाटू लागते. त्याच दरम्यान जर आई-वडील विभक्त झाले असतील, तर त्यांच्या घटस्फोटाचे कारण काय असावे, याविषयी मुलांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. शिवाय त्यांच्या वेगळे राहण्यामुळे मुलावर जास्त जबाबदारी पडली, तर त्याचा या मुलांना अधिक राग येतो व पर्यायाने एका पालकाचा तिरस्कार ते करू लागतात. अनुपस्थित पालकाबद्दल त्यांच्या मनात विविध ग्रह निर्माण होतात. पालकांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या बालपणावर गदा आली, असे त्यांना वाटत असते. काही वेळा तर याचा आणखी खोल परिणाम मुलावर होतो. समाजातील सर्वच बायका व सर्वच पुरुष असे वाईट असतात असे त्यांना वाटू लागते आणि याचा दूरगामी परिणाम त्या मुलांच्या वैवाहिक जीवनावर होतो. कधीकधी या वाढत्या वयाच्या मुलांच्या स्वत:च्या समस्यांमध्ये आई-वडिलांच्या भांडणाची भर पडली, तर मूल वाईट वळणावर वाहवत जाण्याची शक्यता असते. दारू पिणे, जुगार आदी व्यसनांच्याच नव्हे, तर व्यभिचाराच्याही आहारी जाऊ  शकतात.
गुन्हेगारीचे प्रमाणही मुलग्यांमध्ये जास्त आढळते. म्हणूनच गरज असते ती पालकांनी समजुतीने वागण्याची, नवरा-बायको म्हणून आपण एकमेकांना पूरक आहोत का हे तपासायची, स्वत:मध्ये आवश्यक ते बदल करण्याची; परंतु जर आपले यापुढे कधी पटूच शकणार नाही, एकमेकांबरोबर राहणे अशक्य आहे याची ठाम खात्री पटते तेव्हा मात्र वेळीच विवाहबंधनातून मुक्त होणे मुलांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरते.
अर्थात घटस्फोटाचा निर्णय झाल्यानंतरही मुलांचा ताबा कुणाकडे सोपवावा, हा प्रश्न अनेकदा किचकट ठरू शकतो. असे दावे जेव्हा कुटुंब न्यायालयासमोर येतात तेव्हा मुलांच्या हिताच्या व कल्याणाच्या दृष्टीने काय श्रेयस्कर आहे याचाच विचार न्यायालयाला करावा लागतो. यासाठी जे मुद्दे विचारात घ्यावे लागतात त्यात मुलांचे वय व लिंग, मुलांचे आई-वडिलांशी असलेले नातेसंबंध, कुटुंबामधील मुलांचे स्थान, मुलांच्या मूलभूत व शैक्षणिक गरजा, त्यांचे भविष्य, मुलांची व आई-वडिलांची इच्छा व अपेक्षा इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागतो.
मुलांच्या दृष्टीने रोज भांडत राहणाऱ्या पालकांबरोबर राहण्यापेक्षा एकाच पालकासोबत शांत वातावरणात राहणे केव्हाही हितावह ठरते. मुलांचे वय लहान असेल तरी त्यांना काहीच समजत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरते. आई-वडिलांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या भांडणाबद्दल समजेल अशा भाषेत चर्चा केली, तर ते त्यांच्या दृष्टीने समंजसपणाचे ठरते. याबाबतीत मुलांना गृहीत धरले जाण्याने मुलांवर त्याचे विपरीत परिणाम होतात. मुलांना घरातले वातावरण गढूळ झालेले जाणवत असते, तेव्हा त्यांच्यापासून हा निर्णय लपवून उपयोगाचा नसतो. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत तर शक्यतो दोन्ही पालकांनी त्यांच्याशी आपापले चांगले नाते टिकवून ठेवण्याची गरज असते. आम्ही दोघेही तुझे आहोत, ही भावना त्यांना जाणवायला हवी.
दुसऱ्या पालकाबद्दल मुलांच्या मनात राग भरवणे, ही नीती काही पालक स्वीकारतात. त्याचा गैरपरिणाम असा होतो की, काही वेळा मूलच आई-वडिलांच्या एकमेकांबद्दलच्या रागाचा उपयोग करून घेतात. मूल ज्या पालकाकडे असते त्या पालकाकडून आपल्याला हवे ते मिळविण्यासाठी दुसऱ्या पालकाबद्दलच्या रागाचा फायदा करून घेतात. तोच मुद्दा पुनर्विवाहाचा. घटस्फोटानंतर पुनर्विवाहाचा विचार करताना मुलांच्या मनाचा विचार महत्त्वाचा असतो. या विवाहामुळे मुलांच्या जीवनात परत एकदा अनिश्चितता निर्माण होण्याचा संभव असतो. ते टाळण्यासाठी मुलांची आधीच मानसिक तयारी करून घेतली, त्यांच्या मनातील शंका-कुशंकांचे समाधान केले, तर मुलांना त्रास होत नाही.
न्यायालयात मुलांचा ताबा ठरविताना खालील बाबी बारकाईने पाहिल्या जातात.
* मुले बोलता येण्याजोगी असतील, तर त्यांच्या इच्छा काय आहेत, त्यांना कुणाकडे राहायचे आहे याविषयी मुलांशी बोलावे लागते. त्यांचे मन जाणून घेताना त्यांचे वय, आकलनशक्ती याची खात्री करून घ्यावी लागते. मूल ज्या पालकाकडे राहत असते त्यांना खूश ठेवण्यासाठी बऱ्याचदा त्यांच्याबद्दल चांगलेच बोलत असतात व दुसऱ्या पालकाविषयी वाईट बोलत राहतात. हे त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पढवलेले असू शकते. मनीषच्या बाबतीत असेच झाले आहे, असे त्याच्या आईचे म्हणणे आहे. मला आठवतेय, ‘‘माझी आई वाईट आहे, तिने मला व आम्हा सर्वाना खूप त्रास दिला आहे. ज्या बाईला आपल्या पोटच्या मुलाची काळजी नाही त्या बाईचे मला तोंडही पाहायचे नाही.’’ माझ्या समोरच मनीष तावातावाने बोलत होता. हे बोलणे खरे तर कोणा प्रौढ व्यक्तीच्या तोंडचे वाटते, पण १२ वर्षांच्या मनीषच्या तोंडची ही वाक्ये होती.  त्याच्या मनात आईबद्दल खूप राग आणि चीड होती. मनीष गेल्या ६-७ वर्षांपासून बाबांबरोबर राहत होता. घरी आजी, आत्या, काका व काकू होते. आईची भेट घडवण्यासाठी त्याला आज न्यायालयात बोलावले होते. मनीषच्या आईच्या सांगण्यानुसार तिच्या चारित्र्यावरून मनीषचे वडील वारंवार संशय घेत व मारहाण करत. शेवटी असहय़ झाल्याने तिने पोलिसात तक्रार दाखल केली आणि घर सोडले होते. त्या वेळी मनीषला तिच्या सोबत जाऊ  दिले नव्हते. नंतर त्याला भेटण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले, पण असफल राहिले व त्यामुळे आज जवळजवळ चार वर्षांनंतर ती त्याला पाहत होती आणि तिला पाहून त्याची प्रतिक्रिया ही अशी होती.
* मुलाच्या शारीरिक व मानसिक गरजा काय आहेत हे पाहाताना मुलांचे वय, लिंग, त्याला काही शारीरिक, मानसिक व्यंग आहे का हे जसे पाहावे लागते तसेच मुलांचे पालकाविषयी पूर्वीच्या अनुभवामुळे काही पूर्वग्रह आहेत का याचासुद्धा विचार करावा लागतो. कधी मुलांनी वडिलांनी आईला मारताना पाहिलेले असते, कधी रागाच्या भरात आईने त्यांना कोंडून ठेवलेले असते, असे लहानपणीचे कटू अनुभव मुलांच्या कोवळ्या मनात खोलवर रुजून राहिलेले असतात. ताबा देताना अशा प्रसंगांचा विचार करावा लागतो.
* समजा मुलांचा ताबा एका पालकाकडून दुसऱ्या पालकाकडे द्यायचा आहे, तर मुलांच्या मनावर या बदलाचा काय परिणाम होईल हेसुद्धा विचारात घ्यावे लागते आणि या बदलासाठी मुलाच्या मनाची तयारी करावी लागते व हे काम समुपदेशक करत असतात.
* मुलाची पार्श्वभूमी काय आहे हे पाहाणे गरजेचे असते. समजा, वडील मुंबईत आहेत, आई गावी आहे जेथे शिक्षणाची सोय नाही व वडील मुलांच्या शिक्षणाची व सांभाळण्याची जबाबदारी घ्यायला तयार आहेत, तेव्हा ताबा देण्याचा कल वडिलांकडे झुकू शकतो. जर मूल मानसिकरीत्या कमकुवत आहे, त्याला मानसिक व्यंग आहे, अशा वेळी आई मुलाला जास्त चांगल्या प्रकारे सांभाळू शकण्याचा संभव असतो.
* ताबा देताना मुलांना काही नुकसान तर होणार नाही ना याचा विचार करावा लागतो. वडील गुन्हेगारी जगतातील आहेत किंवा तुरुंगवास भोगून आलेले आहेत, अशा वेळी ताबा वडिलांकडे देताना मुलांच्या भवितव्यावर याचा काय परिणाम होईल हे तपासावे लागते.
* ताबा ठरवताना अखेरचे मूल्यमापन म्हणजे आई व वडील यांमध्ये मुलांना सांभाळ करण्यासाठी कोण जास्त सक्षम आहे हे पाहायचे असते. म्हणजे मुलांच्या मानसिक, शारीरिक, शैक्षणिक, आर्थिक गरजा पुरवण्याची कुवत कुणामध्ये जास्त आहे याचा विचार होत असतो. मुलाची पूर्ण वाढ कोणाकडे जास्त चांगल्या प्रकारे होऊ  शकते याचा अभ्यास केला जातो.
मुलांचे मत जाणून घेण्यामध्ये मोठी अडचण जर कुठली असेल, तर ज्या पालकाकडे मूल आहे, बहुतेक वेळा तो पालक मुलाला दुसऱ्या पालकाविषयी खोटेनाटे सांगून त्याचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा वेळी ते मूल खूप गोंधळून जाते. अशा परिस्थितीत काही वेळा मूल शाळेत असताना समुपदेशक मुलाशी बोलतात ज्यामुळे कुणाच्याही दबावाशिवाय मूल स्वत:चे मत प्रदर्शित करू शकते. एका आठ वर्षांच्या मुलाची भेट त्याच्या आईने मागितली होती. तो मुलगा वडिलांकडे होता व ते आईला मुलाला भेटू देण्यास नाखूश होते. वडिलांना माझ्या कार्यालयाबाहेर बसवून आईची व मुलाची भेट घडवून आणायची होती. आई मुलाच्या जवळ जाताक्षणी मुलगा एवढा घाबरला की, त्याच्या नाकातून रक्त यायला लागले. ही एक भयंकर भीतीपोटी निर्माण झालेल्या मानसिक स्थितीची शरीरावर झालेली प्रतिक्रिया होती; पण वडिलांनी, आईने मुलाचे डोके खिडकीवर आपटले, अशी तक्रार केली. वास्तविक असे काहीच झालेले नव्हते. पुढे  असे लक्षात आले की, वडिलांनी मुलाला सांगितले होते की, ‘‘तुझी आई हडळ आहे व ती तुला खाणार आहे.’’ अशी प्रकरणे समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने सोडवाव्या लागतात.
मुलांचा ताबा ठरवताना मुलांना कुठे राहायचे आहे, असा प्रश्न विचारला, तर बहुतांशी मुले गोंधळून जातात. मुलांच्या मुलाखती घेताना त्यांच्या वयानुसार विविध तंत्रे वापरावी लागतात. लहान मुलांशी खेळाच्या माध्यमातून संवाद साधावा लागतो. विविध प्रकारचे खेळ/बाहुल्या/चित्रकाम इत्यादींचा वापर केला जातो. चित्रकला, मातीचा वापर, वाळूचा वापर- विविध प्राण्यांची चित्रे, गप्पागोष्टी इत्यादींचा वापर करून मुलांचे मन जाणून घेतले जाते. हे सर्व मुलांच्या कलाने, वेळ देऊन करावे लागते. विवाह समुपदेशक या तज्ज्ञ व्यक्ती या सर्व विविध पद्धतींचा वापर करून त्यानुसार अनुमान काढून न्यायाधीशांना याबद्दल अहवाल सादर करतात व असा अहवाल न्यायाधीशांना त्या मुलाचे हित ठरवण्यासाठी मार्गदर्शक ठरतो.
एकापेक्षा जास्त मुले असल्यास भावंडांमधील नातेसंबंध कसे आहेत व ही भावंडे एकाच पालकाकडे आहेत की वेगवेगळ्या यांचा विचार करावा लागतो. न्यायालयातर्फे शक्यतो सर्व भावंडांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ही भावंडे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्यास त्यांच्या भेटी घालून देऊन त्यांच्यात चांगले नाते प्रस्थापित करण्याचे प्रयत्नही केले जातात.
कुटुंब न्यायालयात न्यायाधीशांना त्या मुलाच्या परिस्थितीची माहिती मिळण्यास तसेच त्या मुलाशी इतरांचे नाते कसे आहे याविषयी माहिती मिळण्यास, मुलाची शैक्षणिक स्थिती, मुलाची इच्छा, पालकांची इच्छा इत्यादी सर्व बाबींची माहिती मिळण्यास समुपदेशक खूप उपयोगी कार्य करतात. कधीकधी न्यायाधीश व समुपदेशक एकत्रितरीत्या मुलाशी बोलतात. मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे याचे भान पालकांना वारंवार करून द्यावे लागते. त्याचा उपयोग प्यादय़ाप्रमाणे केला जाऊ  नये याची काळजी न्यायालयातर्फे घ्यावी लागते.
पालकांना आपले मूल कसे आहे हे माहीत असते. त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांच्याकडून गफलत होणे टळते व मुलावर पालकांच्या समस्यांमुळे होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करता येते. पालकांना हे नजरेस आणून दिल्यास त्यांच्याकडूनही भेटी देण्यात वा ताबा ठरवण्यास सहकार्य मिळू शकते. काही वेळा मुलाचा ताबा व भेटी या पालक, न्यायाधीश, समुपदेशक यांच्या मार्गदर्शनाने, संमतीने ठरवतात.
त्यातलीच एक गृहभेट देणे. मुलांना कुठल्या वातावरणात ठेवणे जास्त इष्ट आहे हे पाहाण्यासाठी समुपदेशकांना मूल जेथे राहत आहे ती जागा, तो परिसर, त्याचप्रमाणे ज्यांनी ताबा मागितला आहे अशा पालकाची राहण्याची जागा, आजूबाजूचे वातावरण, घरातील इतर व्यक्ती ज्या मुलाच्या संगोपनात मदत करतील, या सर्वाचा अभ्यास करणे आवश्यक असते आणि अशा तऱ्हेने मुलाचा ताबा किंवा पालकत्व ठरवताना न्यायालयासमोर येणे आवश्यक असते. कुटुंब न्यायालय कायद्याच्या कलम १२ मध्ये न्यायालयाला वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांची मदत घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार एखाद्या मुलाची मानसिकता किंवा स्वभाव कळण्यासाठी त्याला शासकीय किंवा अशासकीय संस्थांमध्ये पाठवून त्याबद्दलच्या अहवालाचा आधार न्यायालय ताबा ठरवताना घेऊ  शकते.
कुटुंब न्यायालयामध्ये मुलांचा ताबा व त्याचे पालकत्व ठरवताना अनेकदा मन हेलावून जाते. मधल्या मधे मुलांची होणारी फरफट नकोशी वाटते. विशेषत: मुलाची दोन्ही पालकांशी सारखीच जवळीक असली व दोन्ही पालक बालकांस वाढवण्यास सारखेच समर्थ असले, की अशा दाव्यांमध्ये मुलाचा ताबा ठरवणे हे फारच जिकिरीचे काम असते. काही वेळा अशा दाव्यांमध्ये दोन्ही पालकांनी एकत्र पालकत्व (ख्रल्ल३ उ४२३८ि) घेणे हितावह ठरते. असंच घडलं संतोषबाबत. ‘‘मला दोघांकडे राहायचंय.’’ त्याचा धोषा सुरू होता.  आईने त्याला न्यायालयात आणले होते ते बाबांना भेटायला. तोही खूप उत्साहाने, आनंदाने बाबांना मिठी मारून त्यांच्याशी गप्पा मारत होता. मधूनमधून त्यांना त्यांच्यासोबत यायचे, असे सांगत होता, पण आईलापण न्यायचे, असाही आग्रह धरत होता. आईबाबांना एकत्र आणणे अशक्य होते, पण त्याला मात्र दोघेही हवे होते. त्या कोवळ्या मनाची होणारी घालमेल डोळ्यांत पाणी आणणारी होती..
हे सारे अनुभव त्रासदायक ठरतात अनेकदा. वाटतं, आईवडिलांचा घटस्फोट होत असतो पण त्याचे स्फोट मुलांच्या मनात होतात. ते टाळता येणं शक्य आहे का?

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल

(बागेश्री  पारीख या  निवृत्त न्यायाधीश, कुटुंब न्यायालय, मुंबई. असून डॉ. सुजाता चव्हाण या निवृत्त विवाह समुपदेशक, कुटुंब न्यायालय, मुंबई आणि सहायक प्राध्यापक, टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई आहेत)    

drsujatachavan61@gmail.com

Story img Loader