आज आधुनिक संस्कृती आणि ग्लॅमरने भारलेले जग तरुणाईसाठी आव्हानात्मक आहे. बॉलीवूड, टी.व्ही. स्पोर्ट्स, मॉडेलिंग अशी अनेक क्षेत्रं त्यांना खुणावत आहेत. प्रत्युषासारख्या ऐन तारुण्याच्या उंबरठय़ाशी असलेल्या अनेक मुलींना ग्लॅमरच्या या मायावी जगात प्रवेश मिळतो. अशा वेळी या स्वर्गीय भासणाऱ्या मायाजालात स्वत:ला झोकून देणेही सोपेच असते. ग्लॅमरच्या भोवती सौंदर्य, तारुण्य, वैभव व प्रसिद्धीची वलयं आहेत, पण काही नैसर्गिक व काही मानवी प्रयत्न अपुरे पडल्याने ही टिकणारी वलये नाहीत. हे अनेकदा कळत नाही आणि मग निराश झालेली हीच तरुणाई आत्महत्येसारखा पर्याय स्वीकारते. जगभरात दरवर्षी सुमारे ८० लाख लोक आत्महत्या करतात. तरुणांत आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. १७ ते २४ वयोगटातल्या प्रत्येक १०० ते २०० आत्महत्येच्या प्रयत्नांमागे एक आत्महत्या घडतेच घडते. प्रत्येक १०० मिनिटांमध्ये एक तरुण आत्महत्या करतो, असे जागतिक संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक) सांगते. हे टाळायचे असेल तर त्यांच्या ‘हाका’ ऐकायला हव्यात, त्यांच्या भावनिक स्थैर्यासाठी जवळच्यांनी आधार द्यायलाच हवा ..

प्रत्युषा बॅनर्जी या टीव्ही मालिकेतील अभिनेत्रीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, असं म्हटलं जातंय. (कारण या ़िवषयीचा पोलीस तपास अद्याप सुरूच आहे.) त्या तरुण अभिनेत्रीच्या आत्महत्येबरोबर तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचे तिचे संबंध, तिच्या आई-वडिलांचे त्याच्याबद्दलचे आरोप, त्याचे व त्याच्या आई-वडिलांचे तिच्या आई-वडिलांवरचे आरोप, तिच्यावर असलेला आर्थिक बोजा, मायानगरीतील तिचे असुरक्षित अस्तित्व अनेक प्रश्न, चर्चा व वादविवाद माध्यमांमध्ये दिसू लागले आहेत. त्यापूर्वीही आत्महत्येसारखा जगभर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय लोकांसमोर आला तो अशा विविध अभिनेत्रींच्या आत्महत्येच्या निमित्ताने. यापूर्वी जिया खान, विवेका बाबाजी, नफिसा जोसेफ, आणि त्याही पूर्वी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या भडक ग्लॅमरने प्रसिद्धीस आलेली सिल्क स्मिता हिचीही अकस्मात आत्महत्या अशी प्रकरणे उघडकीस आली आहेत. अर्थात आत्महत्या काही प्रसिद्ध व्यक्ती करतात असे नाही, अगदी सर्वसामान्य माणसांचे घरसुद्धा आत्महत्येने हादरलेले आहे.

Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Moshi International Exhibition Center, garbage dump,
पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

जगभरात प्रत्येक वर्षी जवळजवळ ८० लाख लोक आत्महत्या करतात. जेवढे लोक आत्महत्या करतात त्याच्या ८ ते २५ पट लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. प्रत्येक आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या मागे किमान ४ ते ५ माणसे कुटुंबातली असतील किंवा मित्रपरिवारातील असतील, ही माणसे भावनिकदृष्टय़ा विद्ध होतात व काही वेळा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही आघात होतो. आत्महत्येच्या तुलनेत आत्महत्येचा प्रयत्न करणारी माणसे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुलनात्मकरीत्या अधिक महत्त्वाची आहेत. कारण त्यांचा आत्महत्येचा सिग्नल आपण समजून घेतला तर एक मोठी समस्या आपल्याला टाळता येईल. याशिवाय तरुणांत आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. सर्वसाधारणपणे प्रेमभंग, शिक्षण व नोकरीसारख्या कारणांमुळे अपेक्षाभंग हे दोन घटक तरुणांच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरले जातात. जगात अनेक कारणांनी होणाऱ्या तरुणांच्या मृत्यूमध्ये आत्महत्या हे कारण तिसऱ्या क्रमांकावर आहे. १७ ते २४ वयाचा गट हा तरुण वर्गात मोडतो आणि या गटात प्रत्येक १०० ते २०० आत्महत्येच्या प्रयत्नामागे एक आत्महत्या घडतेच. प्रत्येक १०० मिनिटांमध्ये एक तरुण आत्महत्या करतो असे जागतिक संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक) सांगते.

आत्महत्येची भूमिका ही अचानक आली आहे का? पूर्ण तयारीनिशी/योजनेनुसार झाली आहे का? हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्यामागची पाश्र्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्याला शरीरातली एखादी गोष्ट दुखते आहे हे कळते. उदाहरणार्थ पाठ दुखते आहे, डोके दुखते आहे, कुठेतरी वेदना होत आहेत त्याक्षणी आपण वेदानाशामक गोळ्या घेऊन वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतो. कारण वेदनाशामक गोळ्या आपल्याला बाजारात मिळू शकतात. पण वेदना जेव्हा मानसिक असते तेव्हा अशी चटकन् ती वेदना कमी करणारी ती गोळी बाजारात मिळत नाही. बऱ्याच तरुणांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचल्यानंतर कबूल केले आहे, त्यावेळी त्यांच्या मनातील वेदना व हुरहुर त्यांना सहन होत नव्हती. ती जणू जीवन जगण्याचीच वेदना होती. त्या वेदनेतून सुटका करून घ्यायचे म्हणजे जीवनातूनच सुटका करून घ्यावी इतकेच त्यांना त्याक्षणी वाटत होते. त्यावेळी समोर जगण्याचा मार्ग सापडत नव्हता. जिवाची तडफड होत होती. ती तडफड सहन करायला आवश्यक सहनशीलता व जगण्याची इच्छा त्याक्षणी तरी त्यांच्यात त्यांना स्वत:ला जाणवत नव्हती. ही मानसिक वेदना किंवा ‘सायकॉलॉजिकल पेन’ ही अतिशय महत्त्वाची चावी आत्महत्येमागे आहे. त्याचबरोबर जवळजवळ सगळ्यांनाच असेही वाटत असते की ही वेदना कुणीतरी समजावून घ्यावी आणि त्यातून सहीसलामत बाहेर येण्याचा मार्गही दाखवावा. बहुधा आजूबाजूला असणारी मंडळीच या वेदनेमागच्या कारणाचा भाग असू शकतात किंवा मूळ कारणही असू शकतात. कसाबसा बारावीपर्यंत पोचलेल्या, गरीब घराण्यातल्या श्रीधरने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला नोकरी नव्हती, वडिलांना पक्षाघाताचा झटका आला होता. भावंडं शाळेत जात होती. त्यात एक बहीण अठरा एकोणीस वर्षांची, लग्नाला आलेली. त्याची आई कशीबशी घरकाम करून घर जगवायचा प्रयत्न करत होती. अशा सर्व संकटांनी भरलेल्या घरात श्रीधर जबाबदारी घेऊन नोकरी करत नव्हता. घरात आर्थिक मदतही करत नव्हता. त्यामुळे आई खूप चिडत होती. त्याला निकामी, कुचकामी म्हणून हिणवत होती. आपली आई असा सर्रास आपला पाणउतारा करते आहे याचा श्रीधरला संताप आला. त्याला तो आवरता येत नव्हता. आता मी या जगातून गेलो की तिला माझे महत्त्व समजेल, या विचाराने त्याने विष प्राशन केले होते. अर्थात श्रीधरला त्याच्या आईच्या डोक्यावर जो प्रचंड तणाव होता व जबाबदारी होती त्याची जाणीव झालेली नव्हती. त्याला आपली आई आपला अपमान करते इतकेच जाणवत होते. प्रगल्भ शहाणपणा व विचारी माणसाला असलेली जबाबदारीची जाणीव तरुण श्रीधरमध्ये कमी पडत होती. म्हणून घरच्या परिस्थितीचे गंभीर अवलोकन न करता फक्त स्वत:पुरतीच वेदनेची अनुभूती घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा संकुचित दृष्टिकोन आत्महत्येला विशेषत: तरुणांना आत्महत्येला प्रवृत्त करतो. कारण तसा जीवनाचा अनुभव कमी, सारासार विचार गांभीर्याने करायची जाणही तेवढीशी त्यांच्यात नसते व भावनिक हलकल्लोळ मनात दाटून असतो. अशा वेळी तारतम्य बाळगून निर्णय घेण्याची क्षमता तरुणाईत कमी पडते व त्यांचा तसा कलही नसतो.

बहुधा परीक्षेत नापास झालो आहे वा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडने प्रेमात धोका दिला म्हणून आत्महत्या करणारी किंवा त्याचा विचार करणारी निराश तरुणाई खूप प्रमाणात आढळते. यामध्ये केवळ निराश झालो आहोत म्हणून आत्महत्या करणे आलेच पण त्याचबरोबर आपल्याला स्वत:बद्दल आत्मविश्वास वाटत नाही. दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा किंवा दाखवून देण्याआधीही स्वत: जगण्यासाठी लायक नाही अशी स्वत:चेच खच्चीकरण करणारी प्रतिमा मनात निर्माण झाल्यामुळे बरेच तरुण स्वत:ला संपवून टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कधी सांगता येत नाही किंवा त्यांना उमजत नाही पण आयुष्याच्या ज्या घडीला स्वत:ला प्रेरित करावयाची ऊर्जा माणसाला गरजेची असते तेव्हा नेमकी ही तरुण मंडळी स्वत:च समस्येच्या आहारी जातात. ज्या कारणांसाठी त्यांना आत्महत्या करावयाची गरज भासते त्या कारणांशी दोन हात करत, सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत जगणारी मंडळीही आहेत. पण त्या कठीण समयी मार्ग शोधता येत नाही हे दुर्दैव आहे. तरुण मंडळीत भावनेच्या भरात स्वत:चे खच्चीकरण जितके सहज होते तितकेच निराशेच्या भरात आक्रमकपणाही सहज येतो. बऱ्याच वेळा प्रेमभंगात आपला प्रियकर/ प्रेयसी आपल्यापासून दूर निघून गेल्यामुळे आपण भावनिकदृष्टय़ा विकल झाले आहोत आणि आपल्याला आता या प्रेमाशिवाय जगणे अशक्य आहे या ‘एक दुजे के लिये’ भावना जशा असतात तशाच तू मला टाकून आरामात माझ्याविना जगू शकणार नाहीस. आता तुला धडा शिकवीन, असा आततायी बदला घ्यायचाही सूर असतो. अशा वेळी आत्महत्येचा प्रयत्न हा संतापाच्या भरात असतो अशा प्रेमभंगात प्रियकर हा कुणा दुसरीसाठी आपल्याला सोडून गेला या भावनेने अपमानित झालेल्या प्रेयसीचा भावनिक उद्रेक अधिक असतो. कित्येक तरुणींसाठी आत्महत्येचा प्रयत्न हा मदतीच्या हाकेसाठीही असतो. प्रेमात फसलेली, नवीन लग्न होऊन लग्नात स्थिरावता न आलेली आयुष्याच्या असुरक्षिततेचा व अस्थिरतेचा अनुभव घेता घेता थकलेली स्त्री शेवटी जीव नकोसा झाला आहे कुणीतरी मदत करा हो, असे आक्रंदून सांगण्याचा प्रयत्न आत्महत्येच्या प्रयत्नांतून करत असते.

कुसुमचे लग्न होऊन ती आपल्या आई-वडिलांपासून खूप दूरच्या शहरात जाऊन राहिली होती. लग्नाच्या सुरुवातीपासूनच तिचा तिच्या नवऱ्याकडून व सासरच्या मंडळीकडून छळ सुरू झाला होता. रोजचा शब्दांचा भडिमार, शिवीगाळ. सासरच्या घरात ती कशी नालायक आहे याचा नित्य पाठ २२ वर्षीय कुसुमला अस्वस्थ करीत होता. त्यात गेल्या काही महिन्यांपासून तिच्या आई-वडिलांच्या नावाने शिव्याशाप देत तिच्या सासरच्या मंडळींनी तिची पुरती दमछाक करून ठेवली होती. ती नवीन शहरात गेल्यामुळे आसपास कुणी नातेवाईक नाहीत. मैत्रिणी नाहीत. बोलायला, सांगायला, मन मोकळे करायला, कोणी नाही. घरी आई-वडिलांना सांगितले तर वडिलांना हृदयरोग. ती बिचारी स्वत:च सगळे मुकाटपणे सहन करीत होती. हे वैवाहिक आयुष्य आपण आयुष्यभर कसे सहन करणार? हा छळ सहन करत कसे जगणार? दुसरा कुठला मार्ग नाही. कुणाचा आधार नाही. अशा या दुष्टचक्रात आपण कायमचे बद्ध झाले आहोत ही असाहाय्य भावना तिला घेरू लागली. तिला आपण याच्यातून सुटलेच पाहिजे, असे अगदी उतावीळपणे वाटले. त्यामुळेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

आत्महत्येच्या प्रयत्नामागे किंवा आत्महत्येमागे काय कारणे असतात या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास जितक्या आत्महत्या तितकीच कारणे आहेत म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पण काही सर्वसाधारण कारणे तरुणांच्या आत्महत्येशी निगडित आहेत. मानसिक आजार हे त्यातील महत्त्वाचे कारण आहे. वयात येताना काही आजार सुरू होतात व त्यामुळे पौगंडावस्थेत व तरुणपणात आत्महत्येचे प्रमाण वाढते. डीप्रेशनचा किंवा उदासीनतेचा आजार हा अतिशय महत्त्वाचा मानसिक आजार आत्महत्यांमध्ये आढळतो. आपल्या देशात मानसिक आजारांबद्दल नकारात्मक भूमिका असल्याने त्यांचे निदान लवकरात लवकर होत नाही. नैराश्यासारख्या आजारात उपचार देणे शक्य आहे. जेणेकरून आत्महत्या टाळता येतात. तरुणाईचा काळ तसाही आव्हानात्मक समस्यांनी भविष्यकाळाच्या विचारांनी व स्पर्धात्मक परिस्थितीने गजबजलेला काळ. त्यात निराशाग्रस्त तरुणाला स्वत:विषयी, जगाविषयी आणि भविष्याविषयी नकारात्मक वाटत राहिले तर पाठीचा कणाच मोडून पडला आहे असे समजावे. मग थोडय़ाशा कठीण घटनांनीसुद्धा मनाचा तोल जातो. या घटनांमध्ये जिवाभावाच्या व्यक्तीचा मृत्यू, आर्थिक नुकसान, कर्जबाजारीपणा, नोकरी सुटणे, कर्करोगासारखा आजार, घटस्फोट इत्यादी घटना महत्त्वाच्या मानल्या आहेत. याशिवाय स्किझोफ्रेनियासारख्या आजारातही आत्महत्या दिसून येते. आमच्या रुग्णालयात एक १९-२० वर्षांची मुलगी दाखल झाली होती. तिने तिच्या गच्चीतून उडी मारली होती. तिची मानसिक स्थिती अस्थिर होती. ही उडी मारायच्या आधी चार-पाच दिवसांपासून तिला ‘खाली ये आम्ही वाट पाहतो आहोत’ असे आवाज ऐकू येत होते व शेवटी तिने उडी मारलीच. तिचे व तिच्या नातेवाईकांचे सुदैव म्हणूनच ती वाचली म्हणायची. एकूण तरुणांच्या आत्महत्येचा विचार करताना आपण प्रेमभंग वा परीक्षेत नापास झालो इत्यादी घटनांबद्दल गंभीर असतो. पण मानसिक आजाराबद्दल विचारही खूप महत्त्वाचा आहे.

सामाजिक घटनांकडे पाहता लहानपणापासून अस्थिर वा तणावग्रस्त कौटुंबिक कलह मुलांना मानसिकदृष्टय़ा चंचल व विकल बनवितो. बऱ्याचदा तणावग्रस्त कुटुंबात स्वत:ला सांभाळणारी मुले एखाद्या हाताबाहेर गेलेल्या घटनेमुळे विचलित होतात व त्याक्षणी आयुष्य संपवितात. काही मुले लहानपणापासूनच तणावग्रस्त असतात, संवेदनशील असतात आणि त्याच्या आयुष्यातील अस्थिरतेमुळे वा विपरीत परिस्थितीमुळे त्यांच्यात आत्महत्येचा धोका प्रसंगानुरूप येत राहतो. काही मुलांच्या व्यक्तिमत्त्वात आक्रमकता, स्वत:ला त्रास करून घ्यायची सवय, आवेशात वागायची प्रवृती असते. त्यामुळे वडिलांनी महागडा मोबाइल दिला नाही, आई रागावली, बॉस ओरडला यासारख्या कारणांमुळे तरुण-तरुणी आत्महत्या करतात आणि पालक हैराण होतात. यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेणे गरजेचे आहे. विचारांचा प्रगल्भपणा, प्रौढ समज, सहनशीलता व माणसांशी, प्रसंगाशी जुळवून घ्यायची प्रवृत्ती तरुणांना आत्मविकासासाठी, व वस्तुस्थितीला समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरते. कौटुंबिक नाती निरोगी असणे व सक्षम असणे तरुणांसाठी आवश्यक आहे. कुटुंबसंस्था बदलली असल्याने लहानपणापासून विकसित होणारी नात्यांची जडणघडण व बांधिलकी आज तेवढी दिसत नाही. एखादा टोकाचा निर्णय घेताना आपल्या आई-वडिलांवर वा भावंडांवर काय परिणाम होईल हा विचार आपल्या घरातच नातेसबंधांतून घडत असतो. घट्ट स्थिरावलेली व सुस्थापित नातेसंबंध व्यक्तीला स्वयंकेंद्रित होऊ न देता परिपक्व बनवितात. यामुळे एखादी कठीण परिस्थिती, दारुण प्रसंग, अपेक्षाभंग यासारख्या क्लिष्ट व करुण प्रसंगापासून आपण स्वत:ला आपल्या प्रियजनांना त्रास होऊ नये म्हणून स्वत:च सावरतो. कधी कधी आपल्या प्रिय व्यक्तींना या आपल्या कठोर प्रसंगाची कल्पनासुद्धा त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण देत नाही. उत्तम कौटुंबिक नात्यांचा आधारवड खूप मोलाचा ठरतो. कठीण प्रसंग येतात व जातातही पण या काळात प्रियजनांच्या आधाराने ती व्यक्ती सावरु शकते.

तरुण पिढीच्या स्वत:ला संपविण्याच्या विचारांमागे घोर निराशा जितकी महत्त्वाची तितकेच बदलत्या जगाची संस्कृतीही महत्त्वाची आहे. आजच्या संस्कृतीत नात्यांची वीण सैलावत चालली असताना स्वयंकेंद्रित वृत्ती तरुणाईत फोफावलेली जाणवते. अर्थात स्वयंकेंद्रित वृत्तीमागे आपण स्वार्थी वर्तनावर हल्लाबोल करायला नको. कारण बऱ्याच अंशी स्वयंकेंद्रित वृत्तीमागे आपण पुढे पोहोचायचा प्रयत्न केला नाही तर आहे तिथेच अडकून पडू हा भाव आहे. म्हणजेच आज जो तो ज्याला त्याला जमेल त्या मार्गाने पुढे पोहोचायचा प्रयत्न करत असतो. या रेसमध्ये मागे पडल्यामुळे किंवा ईप्सित साध्य न झाल्यामुळे येणारी निराशा जगायची उमेद घटवत असते. स्पर्धेत टिकायचे व स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी पुढे पुढे पळायची गती सुद्धा आज भन्नाट झालेली आहे. थांबून आपल्या आयुष्याकडे क्षणभर पाहू या. प्रियजनांबरोबर थोडासा खुला श्वास घेऊ या, हे मनात आले तरी कृतीत आणता येणारी आश्वासकता तरुणाईला मिळत नसावी. साहजिकच याचा परिपाक म्हणजे मनाची अस्थिरता व ससेहोलपट जी आयुष्याच्या कठीण समयी घात करते. आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय याच अस्थायी मनोवृत्तीतून घडतात.

आज आधुनिक संस्कृती आणि ग्लॅमरने भारलेले जग तरुणाईसाठी आव्हानात्मक आहे. ग्लॅमर युग हे तसे पूर्वीच्या तुलनेत विस्तृत आहे. बॉलीवूड, टी.व्ही. स्पोर्ट्स, मॉडेलिंग अनेक क्षेत्रं आज तरुणांना खुणावत आहेत. आपण अनेक यशस्वी नट-नटय़ांनी केलेला प्रवास, कुटुंबाला लपवून व घरदार सोडून मुंबईसारख्या शहरात आपले राज्य प्रस्थापित केल्याचे ऐकून आहोत. पण आज जेव्हा भारावलेली तरुणाई ग्लॅमरच्या जगातले हे क्षेत्र पादाक्रांत करायच्या आकांक्षेने मुंबईसारख्या महानगरात पोहोचतात तेव्हा काही स्वप्नांतच हरवतात. प्रत्युषासारख्या काही मुली मात्र तिथे पोहोचतात. ऐन तारुण्याच्या उंबरठय़ाशी असलेल्या या मुलींना ग्लॅमरच्या मायावी जगात अलगद आणि अनपेक्षित प्रवेश मिळतो. अमाप पैसा असतो, प्रसिद्धी असते, अशा वेळी या स्वर्गीय भासणाऱ्या मायाजालात स्वत:ला झोकून देणेही सोपेच असते.

स्वर्गीय आनंद अनुभवण्यात पृथ्वीतलाच्या सत्य वस्तुस्थितीपासून आपण किती दूर चाललो आहोत हे लक्षात येत नाही. ग्लॅमरच्या भोवती सौंदर्य, तारुण्य, वैभव व प्रसिद्धीची वलयं आहेत, पण काही नैसर्गिक व काही मानवी प्रयत्न अपुरे पडल्याने ही टिकणारी वलये नाहीत. ग्लॅमरच्या मायाजालात एक मोहनिद्रा आहे. त्या मोहनिद्रेत आभास आणि वस्तुस्थिती कायमसाठी दुरावलेली आहे. मोहजालात अडकलेल्या तारुण्याला जमिनीवर पाय ठेवायचे म्हणजे काय कदाचित कळत नसावे. म्हणूनच निरागस तरुणी भूलभुलैयात फसून भविष्यात घातक ठरणाऱ्या नात्यांमध्ये फसतात. स्वप्नातले राजकुमार/राजकुमारी जिवाला भुरळ घालत त्यात कधी फसतात हेही त्यांना कळत नाही. ही बाब ग्लॅमरस करिअर विकसित करणाऱ्या तरुणींच्या बाबतीत चिंतेची आहे. सगळे भराभर घडते, पापणी मिटायच्या आत लक्ष्मी पायाशी लोळण घेत असते. नवी संस्कृती वेगळीच असते. सोशलाइज्ड व्हायच्या प्रक्रियेत पाटर्य़ा आल्या, दारू आली आणि त्याबरोबर तकलादू नातीही आलीत. खरे तर बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड संस्कृती या दुनियेत तशी टिकावू भासत नाही. सेटवर जितक्या त्वरेने मेकअप व कॉस्च्युम बदलतात तितक्या वेगाने बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंडही बदलतात. ही तकलादू नाती सांभाळायची व पेलायची क्षमता सगळ्यांमध्ये असेलच असे नाही. कित्येक संवेदनशील तरुणींना अशा विद्ध नात्यातून बाहेर पडता येत नाही.

अशात महानगरांत कुणी एकटं राहात असेल, जवळच्यांचा भावनिक आधार नसेल तर मानसिक तोल ढासळू शकतो. एकंदरीत अशी ग्लॅमरच्या भोवती घडलेली ही नाती ग्लॅमरचा बहर ओसरला की गळून पडतात. ग्लॅमरचा बहर कधी ओसरेल याची कुणालाच कल्पना नाही. कधी काही गुणी कलाकार एका मालिकेपुरते टिकतात, पण भपक्याच्या दुनियेत स्थिरावलेले मन आणि स्थिरावलेली नातीच व्यक्तीला टिकाऊ बनवतात. ग्लॅमर मिळवणे सोपे नाही, पण त्याहीपेक्षा ते टिकवणे अधिक दुरापास्त आहे. एकटेपणाला कंटाळून चुकीच्या पोकळ नात्यांमध्ये गुंतण्यापेक्षा एक सक्षम व प्रगल्भ नजर जगण्यासाठी आवश्यक आहे. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी त्यात असणाऱ्या दिखाऊ संस्कृतीत हरवलेले अनेकजण व्यसनी होतात. जगण्याचे दुसरे मार्ग शोधू शकत नाहीत. अशा असह्य़ परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या जाळ्यात तरुणींना अडकवणारे प्रेमवीर मायानगरीत अनेक आहेत. म्हणूनच ‘सावधान’ राहून स्वत:चे रक्षण स्वत:च करण्याचे कसब आजच्या या पिढीला शिकणे आवश्यक आहे. या क्षेत्रात प्रसिद्धीच्या मार्गावरून घसरणे होतच असते. पण स्वत:ला सावरून स्वत:चे जग अभंग ठेवण्याची जाणीव स्वत:त निर्माण करणे गरजेचे आहे. आपले कुटुंब, आपला समाज व संस्कृती मनात जगली तरच आपण एका अनेळख्या ग्लॅमर जगात हरवून स्वत:चे अस्तित्व गमावणार नाहीच, पण या मायावी दुनियेत जमिनीवर पाय ठेवून जिवंत राहू शकतो.

बऱ्याच वेळा तरुण मंडळी धिटाईने आपण आपले आयुष्य संपवून टाकू असे सिग्नल देत असतात. सर्वसामान्यपणे ज्याला आत्महत्या करायची आहे ते असे जाहीरपणे बोलत नाहीत ते करूनच दाखवितात. विशेषत: तरुण लोकांना धमकी देऊन बघायचे असते असा गैरसमज आहे. आत्महत्येबद्दल जर कोणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संदेश दिलेला असेल तर तो गंभीरपणे घेतला पाहिजे. याशिवाय आत्महत्येबद्दल बोलणारे लोक फक्त दुसऱ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसे करतात हाही गैरसमज आहे. कदाचित त्या व्यक्तीला मदत मिळविण्यासाठी इतर मार्ग अवलंबिल्यानंतर त्याच्या मनातली निराशेची भावना कुणाकडे तरी व्यक्त करायची आहे आणि आपण त्याची ही भावना गंभीरपणे घेऊन त्याला मदत केली तर त्याचे आयुष्यही वाचू शकते.
आत्महत्या ही टाळता येण्याजोगी मानवी इमर्जन्सी आहे. त्यासाठी या व्यक्तींच्या मनातली वेदना व आत्महत्येचे विचार ओळखणे आवश्यक आहे. या तरुण पिढीची बदलती दुनिया त्यांच्या समस्या व त्यांच्या विचारांना गंभीरपणे घेतले पाहिजे. हे पालकांसाठी व सुहृदांसाठी खूप कठीण आहे. बऱ्याच वेळा त्यांनाच थकून गेल्यासारखे वाटते. पण मानसिक आरोग्य व रोग याचबरोबर तरुणांचे सामाजिक प्रश्न, त्यांच्या भावनिक समस्या यांची व्यवस्थित सांगड घातली पाहिजे. नैतिक व भावनिक आधार देणे जितके महत्त्वाचे तितकेच त्यांना वेळ देणेही महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा अनेक समस्या तरुणांच्या बाबतीत एकत्रित आलेल्या असतात. अशा वेळी समस्यांची गुंतागुंत सोडवायला त्यांना आवश्यक ती मदत द्यायला हवी. प्रत्युष्याच्या बाबतीतही तिने तिच्या भावनिक उद्रेकाची कल्पना द्यायचा प्रयत्न तर केला होता. पण तिची वेदना इतकी जीवघेणी आहे याचा अंदाज कुणाला आला नाही. म्हणूनच भावनांनी घायाळ व समस्यांनी बेजार तरुण पिढीला भावनिक स्थैर्य येईपर्यंत आधार देण्याची गरज आहे.

– डॉ. शुभांगी पारकर
(लेखिका केईएम रुग्णालयात मानसिकरोग तज्ज्ञ आहेत.)

Story img Loader