मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com
‘एक हरलेला माणूस मला पणाला लावूच कसा शकतो? त्याला तो अधिकार आहे का ?’ द्रौपदीचा हा प्रश्न गेली हजारो वर्ष अनुत्तरित राहून, वातावरणात लोंबकळतोय.. द्रौपदीने दिलेलं प्रश्न विचारण्याचं धाडस अमृता प्रीतम यांनीही आयुष्यभर आपल्या लिखाणातून दाखवलं. आजूबाजूच्या पारंपरिक वातावरणातले सारे नकार धुडकावण्याची बंडखोर वृत्ती अंगांगात भिनलेल्या वृत्तीतूनच अमृता यांचं सारं लेखन समाजासमोर अनेक प्रश्न उपस्थित करतं..
महाभारताच्या सभापर्वातील प्रसंग. युधिष्ठिर सारं काही हरला. पांडवांचं तेज पूर्णपणे लुप्त झालं. राजसभेत फरफटत आणली गेलेली रजस्वला द्रौपदी आक्रोश करत होती. अचानक एका क्षणी एकदम आवेगानं, सारे संकेत बाजूस सारत, धाडस करून पंचपतिव्रतांमधील एक अशा त्या द्रौपदीनं साऱ्या राजसभेलाच प्रश्न विचारला, ‘दास झालेला युधिष्ठिर मला पणाला कसा काय लावू शकतो? त्याला तो अधिकार आहे का?’ सत्य जाणून घेण्यासाठी द्रौपदीनं विचारलेल्या त्या प्रश्नाला कुणीच उत्तर देऊ शकलं नाही. पण काही क्षणांमध्ये लज्जा-हतबलता-संताप-धाडस अशा मानसिक अवस्थांतून गेलेल्या द्रौपदीने स्त्रीच्या आत्मबलाचं, परिवर्तनाचं एक उदाहरणच समोर ठेवलं.. पण तिचा तो प्रश्न तेव्हापासून गेली हजारो वर्ष अनुत्तरित राहून वातावरणात लोंबकळतोय..
द्रौपदीच्या या अवस्थांतराने विलक्षण प्रभावित होऊन आठ दशकांपूर्वी एका प्रतिभावंत स्त्रीने नकळतच मनाशी एक निर्णय घेतला. त्या म्हणतात, ‘मी हातात लेखणी धरली तेव्हा माझ्या मना-बुद्धीने तगादाच लावला होता की, माझ्या कथेतील स्त्रीपात्रं अशीच असतील की, जी द्रौपदीसारखी भर सभेत, समाजाला मूळ प्रश्न विचारण्याचं धाडस करतील. त्यांनी आपल्या मनाशी प्रामाणिक राहत आपल्या लेखन प्रवासात कायम तेच केलं. त्यांच्या लेखनप्रवासाचं द्रौपदीच्या या व्यक्तित्व-परिवर्तनाशी काहीसं साम्य सहजच दिसतं. त्या होत्या- बंडखोर लेखिका अमृता प्रीतम! विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांनी विभूषित, कथा-कादंबरीकार ,कवयित्री. त्यांचा साहित्यसंभार विपुल व वैविध्यपूर्ण!
बालपणीच मातृसुखाला पारख्या झालेल्या अमृता यांना वडिलांनी वाचनाची गोडी लावली. यमकरचना शिकवली. अट एकच होती की, सांप्रदायिक, धार्मिक रचना करायच्या. सोळाव्या वर्षी त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला (अमृतलहरें), लग्नही झालं. तत्कालीन पंजाबी लेखिका पारंपरिक स्त्रीजीवनाची महती सांगत, भक्तिपर, घरगुती विषयांवर लेखन करीत होती. अमृतांच्या त्या संग्रहातील कविताही पारंपरिक पद्धतीने प्रीतीचा सौम्यपणे निर्देश करणाऱ्या, प्रचलित जीवनमूल्यांची महती सांगणाऱ्या होत्या. पण काळाने दस्तक दिलीच.. वयाच्या सोळाव्या वर्षांनं आकाशातील ताऱ्यांना हातात घेण्याची ऊर्मी, सळसळत्या तारुण्याने तनामनावर केलेला कब्जा त्यांना अस्वस्थ करू लागला. आजूबाजूच्या पारंपरिक वातावरणातले सारे नकार धुडकावण्याची बंडखोर वृत्ती अंगांगात भिनत चालली. अशा मन:स्थितीत त्यांनी उत्कटतेनं कविता लिहिल्या. आयुष्य भरभरून जगण्याची ओढ, दिवसागणिक वाढतच गेली. वडिलांचा धार्मिक परंपरा व काव्याचा आग्रह त्यांनी लेखनात व वागण्यातही धुडकावला. त्यांच्या बहुतेक कवितांमध्ये रोमँटिसिझिम हाच गाभा राहिला. अपवाद फक्त ‘नौ सपने’ किंवा ‘अज्ज अखान’सारख्या सामाजिक कवितांचा. कथात्मलेखनात त्या अधिक सखोलतेनं स्त्रीजीवनातली बंधनं, विविध अवस्था आणि नाती यांचा मुळाशी जाऊन विचार करतात. यात लहानपणी आजीकडून ऐकलेल्या १८५७ च्या युद्धाच्या संदर्भात ऐकलेला ‘बंड’ हा शब्द त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतीक बनला.
प्राचीन परंपरांचा मागोवा घेताना त्यांच्या लक्षात आलं की स्त्रीची गुलामी आर्थिक कारणांमुळे आहे. त्यांची नायिका म्हणते, स्त्रीचा विचार हा नेहमी पुरुषाच्या संदर्भातच होतो. दोघांमध्ये काही ना काही उणिवा या असतातच. आर्थिक बाबी पुरुषांच्या हातात असल्याने त्याच्या उणिवा जोर-जबरदस्तीच्या रूपात व्यक्त होतात. स्त्रीच्या उणिवा मात्र आर्थिक परावलंबनामुळे वैर, ईष्र्या अशा रूपात दिसतात.
‘डॉ. देव’ (१९५०) या कादंबरीची नायिका ममता हिनं मनात योजलेलं आयुष्य समाजाने हिरावून घेतलं, आणि आपल्या प्रथांप्रमाणे तिला जे आयुष्य देऊ केलं, ते तिला न पटल्यानं ती त्यापासून दूर झाली. नंतर तिच्या या माजी पतीला जेव्हा मदतीची गरज भासली तेव्हा तिने मनापासून ती मदत केली. त्या मदतीबद्दल तो तिला काही देऊ करतो, तेव्हा ती म्हणते, आपण सगळे साधनंच तर आहोत. करविते नाही. केवळ कर्म आहोत. मला काही नको. मी पत्नी म्हणून तुम्हाला काही दिलं नाही. आणि जरी दिलं असतं तरी माझं पत्नीपण मी या प्रकारे विकलं नसतं. ही ममता आपल्या कृत्यांची, निर्णयांची जबाबदारी आपणच उचलते आहे आणि माणुसकीनं वागते आहे.
अमृता यांनी स्त्री-पुरुष संबंधांचा विचार अनेक पैलूंमधून केला. त्यातील किती तरी पैलू जाहीरपणे मांडणं, त्या काळाच्या संदर्भात फार धाडसी होतं. आपल्या मनातला पुरुष मिळावा आणि त्याच्यासाठी आपण आपल्या मौल्यवान तारुण्यासह जवळचं सारं काही लुटून टाकावं, अशी प्रत्येक तरुणीची आस असते. अमृतांच्या कथा- कादंबऱ्यांतून ती व्यक्त होते.
‘कोकली’सारख्या कथेत मच्छीमार समाजात योनिशुचितेच्या नावाने केल्या जाणाऱ्या नववधूच्या अपमानाचं वर्णन, वाचताना अविश्वसनीय वाटतं. पण दुर्दैवाने आपल्या देशात आजच्या काळातही अशी चित्रं सापडतात. कवितेच्या लयीत जाणारी ही छोटीशी कथा मानवात दिसणारा आदिमानवी अंश, मर्दानगीच्या दुष्ट समजुती यांचं भेदक आणि कलात्मक चित्रण करते, तीही अल्पाक्षरी शैली वापरत..मी त्याच्याबरोबर गोष्टी करेन..छोटय़ा शिंपल्या वेचीन. तो गाणी म्हणेल.. आणि मग.. तो बाहूंची वल्ही मारेल..मी त्याच्या शरीराच्या नावेत बसेन. अशी स्वप्नं पाहणाऱ्या कोकलीला नवऱ्यानेच केलेल्या भयानक अत्याचाराला तोंड द्यावं लागतं आणि मग.. ती एक मुलगी नव्हती, एक मासळी होती.. ही सौभाग्यशय्या नव्हती, एक जाळं होतं..आणि आता ती लग्नाच्या गाळात फसलेली होती.. अशी तिची अवस्था होते.
‘फ्रॉइडपासून फ्रिजिडेअर’पर्यंत (१९७५) या कथेमधील अचला म्हणते, मी समाजाच्या दृष्टीनं सुखी आहे. पण गरजांची पूर्ती ही ओठांची तहान भागवणाऱ्या पाण्यासारखी असते. ती नशा नसते. रोमान्स एक नशा असते. ही नशा रात्रीच्या गाढ निद्रेत स्वप्नं बनून बोलते. दिवसाच्या जागृतीत ओठांवरचं गाणं बनून बोलते. ती पुरुषाच्या डोक्यावर चढून बोलते. स्त्रीच्या उरात उतरून बोलते. तन्वीरने- माझ्या पतीने या नशेचा घोट कधी घेतलाच नाही. ही रोमान्सची नशा अमृताला नेहमीच अत्यावश्यक वाटे आणि ती स्पष्टपणे व्यक्तही करे.
स्त्री-पुरुष संबंधांप्रमाणेच दोन स्त्रियांमधील नाती, संबंध हेही तिच्या लेखनातून जगावेगळ्या रीतीनं व्यक्त होतात. ‘शाह की कंजरी’ ही गाजलेली कथा. पतीची प्रेमिका ही कुणाही पत्नीची वैरीणच. पत्नीजवळ विवाहाची सनद. दुसरं कसब नाही, लावण्य तर नाहीच. प्रेमिकेजवळ मात्र सौंदर्याचं किमती आणि चलनी नाणं, शिवाय ती कलाकार, समाजमान्य अशी कोणत्याच नात्याची सनद तिच्याजवळ नाही. एकाच पुरुषाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या या स्त्रिया त्या पुरुषाच्या मुलाच्या लग्नानिमित्ताने आमनेसामने येतात. एकमेकींवर कुरघोडी करण्याची संधी शोधत. प्रेमिकेच्या लावण्याचा व गाण्याचा माहोल सगळीकडे पसरलेला. पत्नी मुलावरून पैसे ओवाळून तिच्यावर फेकण्याच्या तयारीत असताना प्रेमिका म्हणते, ‘राहू दे. शाहजी नेहमीच मला भरपूर देतात.’ पत्नी म्हणते, ‘घे गं. ते तर नेहमी देतातच. पण माझ्याकडून तुला कधी मिळणार ?’ स्त्रीला आपला मान मिळवायला केवळ कला, कसब असून भागत नाही तर समाजमान्य नात्याची सनद असावी लागते. कित्येक दशकांपूर्वीची ही कथा आजही समकालीन वाटते.
अमृतांच्या कथांमधील उपरोध कधी जीवनसत्यांची प्रखर जाणीव करून देतो. मलिका व राणी या दोन बहिणींची गोष्ट. मलिका असफल प्रेमाच्या अनुभवाने शहाणी झाली आहे. मलिका आजारी पडते. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तेथील कारकून व मलिका यांचा संवाद या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे.
तुमचे मालक कोण ?
मी काय एखादी वस्तू आहे, मला मालक असायला?
तुमचे साहेब कोण?
मी बेरोजगार आहे. लग्न झालं की, पुरुष साहेब आणि स्त्रिया नोकर. पाहा ना, प्रत्येक नोकरीत बढती असते. पण लग्नाच्या नोकरीत बढती नाहीच, उलट अवनतीच असते. बायको जन्मभर बायकोच राहते. वयानुसार उलट तिला कमीच गणलं जातं. पण नवरा मात्र साहेबच राहतो. मनात आणलं तर नवरा प्रियकर होऊ शकतो आणि ती प्रेयसी होऊ शकते, पण तसं होत मात्र नाही.
मलिकाप्रमाणेच कधी ‘बंद दरवाजा’मधील कम्मी म्हणते, स्त्रीचा जेवढा गुन्हा असतो, तेवढाच पुरुषाचाही असतो. पण या जगात शिक्षा मात्र स्त्रीलाच भोगावी लागते, ती का? तिलाही नेहमी अनुत्तरित असणारे प्रश्न पडतात. आणि दुर्दैवाने आजही हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.
फाळणीच्या विदारक अनुभवांची साक्षीदार असलेल्या अमृतांनी सूफी कवी वारिसशाहला उद्देशून लिहिलेली दीर्घकविता आजही पंजाबचं शोकगीत मानली जाते. त्याच सुमाराच्या काळाचं चित्रण करणारी ‘पिंजर’ ही कादंबरी. दोन देश आणि धर्म यांच्यातील अकारण वैरामध्ये झालेली सरळ-साध्या माणसांची फरफट, आणि आपली आयुष्यं बरबाद होऊनही माणुसकीला जागत स्त्रियांचे अपहरण व अत्याचार यांना थोपवणाऱ्या पुरो व रशीदची चटका लावणारी कहाणी आहे.
लेखिका अमृता आणि स्त्री अमृता यांच्यात लेखिकाच वरचढ राहिली, पण साहिरबरोबरच्या काही क्षणी माझ्यातील स्त्रीच प्रभावी होती, असं सांगणारी अमृता. माझ्या दु:खाचा मी सिगरेटप्रमाणे खोल, दमदार झुरका घेतला. त्यातून काही कविता उरल्या, त्या मी सिगरेटच्या राखेसारख्या झटकल्या, असं म्हणणारी विरही अमृता. तिची विविध रूपं. तिच्या पात्रांमधून तिचेच अनुभव शब्दरूप धारण करतात.
आपल्या लेखनातून काळाची पावलं ओळखत त्यांचं सूचन करणारी, समाजसंकेत धुडकावत, स्त्रियांच्या आणि पुरुषांच्याही मनाचा खोलवर ठाव घेत नाजूक वा अनुक्त विषय धाडसानं हाताळणारी अमृता..
मनात प्रश्न उभा राहतो, स्त्रीजीवनाच्या अनेक समस्यांबद्दल तळमळीने विचार मांडताना त्यांनी कल्पना तरी केली असेल का की, आज एकविसाव्या शतकातही अकल्पनीय हिंसाचार होतोय, स्त्रीचा शारीरिक, मानसिक छळ होतोय, त्याला पुरुषांप्रमाणे काही प्रमाणात स्त्रियाही जबाबदार आहेत. समाजहित, मानवता, मानवकल्याण हे शब्द शब्दकोशात तरी उरले आहेत? मग आता अमृता कोणत्या वारिस शाहला साद घालील?
निवडक पुस्तके
कवितासंग्रह
अमृतलहरें, जिउन्दा जीवन, पथ्यर गीतें, कागज ते कॅनव्हास, लोकपीड, सुनेहडे, पंजाब दी आवाज, कस्तुरी
कादंबरी
पिंजर, डॉ. देव, जलावतन, जेबकतरें, एक थी अनीता, दिल्ली की गलियाँ
कथासंग्रह
कहानियों के आँगन में, दस प्रातिनिधिक कहानियाँ, दो खिडकियाँ, दीवारों के साये में
आत्मचरित्र
रसीदी टिकट, अक्षरों के साये में, काला गुलाब
chaturang@expressindia.com