‘क्लुट’, ‘कमिंग होम’साठी ‘ऑस्कर’ मिळवल्यावर अनेक चित्रपटांनी जेन फोंडा यांच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवला होता. मात्र त्या बरोबरीने त्या समाजकारणातही रमल्या. ज्या तळमळीनं त्यांनी अमेरिकी सरकारच्या व्हिएतनामबद्दलच्या भूमिकेचा निषेध केला होता, त्याच तळमळीनं बुरखा पद्धती, तालिबानी राजवट, स्त्रियांवर होणारी हिंसा, अल्पवयीन मुलांचं शोषण यांच्याहीविरुद्ध आवाज उठवला होता. आज वयाच्या ऐंशीकडे झुकत असताना, आयुष्याच्या संधिप्रकाशातही त्या समाधानी आहेत कारण ‘वर्कआऊट्स’ आणि ‘फेमिनिझम’ या दोन संधींनी तिचं आयुष्य बहरतं ठेवलं आहे.

का कोण जाणे, पण राजकारण आणि चित्रपट कलाकार यांची कुंडली काही जुळत नाही. करिअर संपत आलेला नट राजकारणात जाणार, हा आपल्याकडे आता नियम बनू पाहत असला तरीही! चंदेरी गंधर्वानी आणि अप्सरांनी आपल्या भानगडी कराव्यात; राजकारणात पडू नये, असं आपलंच नाही तर अति प्रगत पश्चिमेचंही मत आहे.

म्हणूनच आपल्याकडे झोपडवासीयांची कड घेणाऱ्या शबाना आझमीचा उपहास होतो, तर व्हिएतनामच्या युद्धाबद्दल स्वत:च्या सरकारचा निषेध करणाऱ्या जेन फोंडाची अमेरिकेत हेटाळणी होते. वास्तविक त्या युद्धाबद्दल अमेरिकन सरकारला विरोध करणारी जेन फोंडा एकमेव नव्हती. तिकडे रोज निषेध मोर्चे निघत होते. पण ते अनाम, अप्रसिद्ध नागरिकांचे होते. त्यांची चर्चा होत नव्हती. जेन फोंडा बडी स्टार होती. तिची कोणतीही कृती- नव्हे, प्रत्येकच कृती ही बातमी होती.

त्या काळात अमेरिकन सैन्यानं केलेल्या बॉम्बवर्षांवामुळे झालेला विध्वंस पाहण्यासाठी जेननं हॅनोई शहराला भेट दिली. या दौऱ्यातल्या एका फोटोमुळे सगळी अमेरिका जेनवर नाराज झाली. त्या फोटोत जेन शत्रुपक्षाच्या ‘अ‍ॅन्टी एअरगन’ या शस्त्राला टेकून उभी होती. अमेरिकन सैन्यावर आग ओकण्यासाठी सिद्ध असलेल्या त्या शस्त्राला टेकणं म्हणजे स्वदेशीय सैनिकांच्या संहाराला पाठिंबा देण्यासारखं होतं. आपल्या कृतीतून निघणारा हा अ(न)र्थ त्या वेळी जेनच्या लक्षात आला नाही. पण त्या दिवशी ती खूप तास उभी होती, दमली होती. अभावितपणे ती त्या शस्त्राला टेकली, आणि नेमका त्या क्षणी कॅमेरा कामाला लागला होता!

त्या एका क्षणानं जेनच्या देशप्रेमाबद्दल संशय निर्माण केला. व्हिएतनाममध्ये लढणारे अमेरिकन सैनिक जेनच्या भूमिकेबद्दल आधीपासून नाराज होते. या फोटोनं आगीत तेल ओतलं. त्याची फार मोठी किंमत जेनला चुकती करावी लागली. आपल्या ‘देशद्रोही’ कृतीबद्दल तिनं एकदा नव्हे, अनेकदा जाहीर माफी मागितली; स्पष्टीकरण दिलं; खुलासे केले. पण दुखावलेले सैनिक आणि जनता यांचं समाधान झालं नाही. या काळात प्रदर्शित झालेल्या तिच्या चित्रपटांनाही या प्रक्षोभाची झळ लागली.

१९६० पासून सुरू झालेली जेनची रुपेरी कारकीर्द या काळात बहरत चालली होती. आदल्याच वर्षी (१९७१) ‘क्लुट’ या चित्रपटासाठी तिनं ‘ऑस्कर’ पुरस्कार पटकावला होता. हे तिचं पहिलं ‘ऑस्कर’. पुढे १९७८ मध्ये ‘कमिंग होम’ या चित्रपटासाठी तिनं दुसऱ्यांदा ‘ऑस्कर’ मिळवलं. त्यानंतर ‘संडे इन न्यूयॉर्क’, ‘कॅट बलू’, ‘बेअरफूट इन दी पार्क’, ‘दे शूट हॉर्सेस, डोन्ट दे’ या एकामागून एक आलेल्या चित्रपटांनी तिचा प्रगतीचा आलेख चढता ठेवला होता. तिच्या अभिनयाची प्रशंसा होत होती, इतकी की फ्रेड झिनमन हा श्रेष्ठ दिग्दर्शक तिच्या हुकमी अभिनयकौशल्याची तारीफ करताना म्हणाला होता, ‘प्रसंगाच्या मागणीप्रमाणे दोनच अश्रू ढाळणं किंवा बादलीभर अश्रूंचा पाऊस पाडणं हा जेनच्या डाव्या हाताचा मळ आहे.’ तिचे चित्रपट तिकीटखिडकीवर उत्तम व्यवसाय करत होते. शिवाय ‘सेक्स बॉम्ब’ हा खिताबही तिला लाभला होता. फारच थोडय़ा अभिनेत्रींना असं तिहेरी यश मिळतं. ते मिळवणाऱ्या जेन फोंडाची कारकीर्द त्या एका वादग्रस्त फोटोनं धोक्यात आणली.

सक्रिय राजकारणात तिला रस नव्हता. खरं तर राजकारणापेक्षा जेन समाजकारणात रमली होती. ज्या तळमळीनं तिनं अमेरिकी सरकारच्या व्हिएतनामबद्दलच्या भूमिकेचा निषेध केला होता, त्याच तळमळीनं तिनं बुरखा पद्धती, तालिबान राजवट, स्त्रियांवर होणारी हिंसा यांच्याहीविरुद्ध आवाज उठवला होता. किशोरवयीन माता, अल्पवयीन मुलांचं शोषण या विषयांचा ती आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा करत होती. पण ‘त्या’ एका फोटोनं याबद्दलचं कौतुक थांबलं.

त्या अग्निपर्वात झालेल्या जखमांचे घाव पुसट झाले तरी बुजले नाहीत. खंतही मनातून गेली नाही; पण जेन फोंडा संपली नाही. ती उभी राहिली. चित्रपटांतून मिळणारा अफाट पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता यांच्यावर संतुष्ट राहण्याचा जेनचा स्वभाव नव्हता. पैसा, झगमगाट, कौतुक यांचं तिला नावीन्य नव्हतं. हेन्री फोंडा या हॉलीवूडच्या बडय़ा ‘हीरो’ची मुलगी म्हणून लहानपणापासून ती त्यांच्या वर्षांवात भिजत होती. पण तिला हे परावर्तित वैभव नको होतं.  स्वत:च्या पायांवर उभं राहायचं होतं.

जेन फोंडा वयाच्या पंधराव्या वर्षीच नाटकात आणि त्यापाठोपाठ चित्रपटात आली. ली स्ट्रेसबर्ग या विख्यात अभिनयगुरूकडे तिनं रीतसर शिक्षण घेतलं. जेनची ‘ऑडिशन’ घेतल्यावर स्ट्रेसबर्ग उत्स्फूर्तपणे उद्गारला, ‘अस्सल गुण आहेत तुझ्याकडे! मेहनत केलीस तर उत्तम नाव कमावशील!’ तेव्हा कुठे ‘अभिनयच करायचा’ या निर्णयावर जेननं शिक्कामोर्तब केलं. तिचे वडीलही तिच्या ‘टॅलन्ट’ची तारीफ करायचे. पण जेननं ती तारीफ कधी गंभीरपणे घेतली नाही. वडील म्हणून ते आपलं कौतुक करतात, अशी तिची समजूत होती. स्ट्रेसबर्गनं तिला दिशा दाखवली, निश्चयाचं बळ दिलं. ती निर्धारानं कामाला लागली आणि दहा वर्षांत हॉलीवूडच्या आघाडीच्या नायिकांच्या पंगतीत जाऊन बसली. पैसा आणि नाव यांच्या रूपात जेनला भरभरून यश मिळू लागलं. पण ‘स्टार’ झाल्यावर येणाऱ्या असुरक्षिततेनं जेनला घेरून टाकलं. ‘स्टार’पद टिकवण्याकरिता चेहरा टिकवला पाहिजे, ‘फिगर’ राखली पाहिजे, याची तिला जाणीव होती. पण ते अबाधित कसं ठेवायचं, तिला कळत नव्हतं. वयाच्या तिशीकडे निघालेली नायिका स्टार म्हणून कितीही बडी असो, तिच्याकडचं काम कमी होतं आणि काम मिळालंच तरी भूमिका दमदार नसते, हे वास्तव ती बघत होती.

जेन लहानपणी ‘बॅले डान्स’ शिकली होती. त्याच्या सरावातून तिनं कारकीर्दीचा पहिला टप्पा पार केला. पण वाढत्या वयात ‘फेस’ आणि ‘फिगर’ राखण्यासाठी ती नृत्यकला पुरेशी नव्हती, हे ती समजूत चुकली होती. सुंदर चेहरा म्हणजेच सर्व काही, हे ऐकत जेन लहानाची मोठी झाली होती. पण जेनला ते यशाचं रहस्य वाटत नव्हतं. उलट त्याचं तिला भय वाटत होतं. चेहऱ्यासाठी ‘मेकअप’ची मदत मिळाली असती; पण ‘फिगर’साठी व्यायामाला पर्याय नव्हता. जेन तो करत होतीच, मात्र ‘स्लिम-ट्रिम’ राहण्यासाठी तिनं अवलंबलेला मार्ग अघोरी होता : भूक भागत नाही म्हणून भरपूर जेवायचं; पण वजन वाढू नये म्हणून ते अन्न उलटून टाकायचं! हा भयानक उपाय करणारी जेन एकटी मात्र नव्हती. हॉलीवूडबाहेरच्या समाजातल्या, पंचविशी उलटलेल्या स्त्रियादेखील हेच करत होत्या. हा उपाय नाही; अपाय आहे, हे कळत असूनही करत होत्या.

प्रत्यक्षात ही सवय अपायही नव्हता. त्यापलीकडे जाऊन तो आजार होता. त्याला नावदेखील होतं- ‘बुलेमिया.’ वाढत्या वयात हा आजार भीषण नुकसानकारक ठरणार, हे लक्षात आल्यामुळे जेन त्याला पर्याय शोधत होती. तो एका अपघातानं सापडवून दिला. ‘कॅट बलू’ या चित्रपटाचं काम चालू असताना एके दिवशी जेन तोल जाऊन जोरात खाली कोसळली. तिचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यातून उठल्यानंतरही ‘बॅले’ करणं जमेना, तेव्हा जेननं लेनी कॅझेन या व्यायामगुरूचं शिष्यत्व पत्करलं. त्यानं तिला ‘एरोबिक्स’ आणि ‘स्ट्रेचिंग’ यांची दीक्षा दिली- आणि एक अफलातून कल्पनादेखील! ‘जेन फोंडा वर्कआऊट’च्या ऑडीओ आणि व्हिडीओ कॅसेट्स हे या कल्पनेचं तंदुरुस्त रूप (किंवा फळ!). गुरुजींनी शिकवलेल्या व्यायामप्रकारांमध्ये काही बदल करून जेननं ते साधेसोपे बनवले. ते शिकण्यासाठी कुणा शिक्षकाची गरज पडणार नाही; नुसते वाचून ते कुणीही करू शकला असता, अशी तिची खात्री होती. म्हणूनच तिनं ‘जेन फोंडा वर्कआऊट्स’ हे पुस्तक लिहिलं. जेनच्या ‘स्टार’पदाचा त्याला लाभ झाला : हे पुस्तक हातोहात खपलं. त्यानंतर लवकरच ऑडीओ आणि व्हिडीओ कॅसेट्सचा जमाना सुरू झाला. आपल्या ‘वर्कआऊट्स’च्या कॅसेट्स बनवाव्या, असं आता जेनच्या मनानं घेतलं.

सिडने गॅलन्टी या कॅसेट उत्पादकानं स्टुअर्ट कार्ल या वितरकाला हाताशी धरून ‘जेन फोंडा वर्कआऊट्स’च्या ऑडीओ आणि व्हिडीओ कॅसेट्स बनवल्या. (१९८२) हा प्रकार दुहेरी प्रचंड प्रभावी ठरला. पन्नाशीकडे निघालेल्या जेनला त्यानं नवं करिअर दिलं आणि दुसरं म्हणजे त्यानं व्हिडीओ प्लेअरचा खप कमालीचा वाढवला. पिझ्झा-बर्गर-हॉट डॉगवर वाढणाऱ्या अमेरिकन माणसाला ‘पोटाचा प्रश्न’ सोडवण्यासाठी उपाय हवाच होता. घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी त्यानं जेनच्या कॅसेट्स घेतल्या आणि त्या चालवण्यासाठी व्हिडीओ प्लेअर्सही घेतले.

पहिल्या कॅसेटला मिळालेल्या यशानं जेनला प्रोत्साहन मिळालं. ती नवनवे ‘वर्कआऊट्स’ शोधत राहिली आणि कॅसेट्स बनत गेल्या. एकेक करत जेननं ‘वर्कआऊट्स’ची आणखी चार (एकूण पाच) पुस्तकं लिहिली, तर २३ कॅसेट्स बनवल्या. अलीकडेच चालू काळानुसार त्यांना ‘डिजिटल’ रूप मिळालं. आजही सर्वोच्च खपाच्या यादीत या कॅसेट्स वरच्या क्रमांकावर आहेत.

‘वर्कआऊट्स’ कॅसेट्सनी जेनचा पुनर्जन्म घडवला. नवनिर्मितीचा आनंद तिला ‘वर्कआऊट्स’च्या नव्या आवृत्त्यांतून मिळत होता आवृत्तीगणिक जेन त्यांच्यात बदल करत होती. पन्नाशीनंतर हाडं आणि सांधे साथ देत नसल्यामुळे माणसाला व्यायाम करणं त्रासाचं होतं, हे स्वानुभवानं लक्षात आलं तेव्हा जेननं खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘प्राइम टाइम’ ही नवी व्हिडीओ कॅसेट बनवली.

जेनच्या ‘वर्कआऊट्स’मुळे अमेरिकेतल्याच नाही, तर सगळ्या प्रगत व शिक्षित जगातल्या मध्यमवयीन पिढय़ांमध्ये ‘फिटनेस’बद्दल जागरूकता निर्माण झाली. शहरांमध्ये आज रुळलेल्या ‘जिम कल्चर’चं मूळ जेन फोंडाच्या या कॅसेट्समध्ये आहे. जेनपासून प्रेरणा घेऊन आपल्या रेखानंदेखील नव्वदीच्या दशकात ‘बॉडी टेम्पल’ ही ‘वर्कआऊट कॅसेट’ बनवली होती.

जेनच्या आयुष्यात एक काळ असा आला, की चांगल्या भूमिका मिळत नाहीत म्हणून तिनं निवृत्तीचा निर्णय घेतला. हा बेडर, धाडसी पण धोका असलेला निर्णय होता. अभिनयाप्रमाणे नवनिर्मितीचा आनंद देणारं दुसरं काम मिळालं नसतं, तर आयुष्यात पोकळी निर्माण होण्याचा धोका होता. मात्र ‘वर्कआऊट्स’ आणि ‘फेमिनिझम’ या दोन आवडींनी जेनच्या आयुष्यातली पोकळी दूर केली आणि संधिप्रकाशाकडे पोहोचणारी अंधारवाट प्रकाशमान केली.

‘फेमिनिझम’ म्हणजे स्त्रीमुक्ती. दास्यातून, शोषणातून आणि स्वत:च तयार केलेल्या पिंजऱ्यापासून मुक्ती! मात्र पुरुषप्रधान समाजात या कल्पनेचा चुकीचा अर्थ लावला गेला. स्त्रियांना आपल्यापासून मुक्ती हवी आहे, या कल्पनेनं पुरुष भेदरला. बिथरला. स्त्रीमुक्ती कल्पनेला पाठिंबा देणारी स्त्री म्हणजे पुरुषद्वेष्टी; तिला लग्नाचा, मातृत्वाचा तिटकारा, असा अपप्रचार सुरू झाला. स्त्रीमुक्ती कल्पनेची व चळवळीची यथेच्छ टवाळी होऊ लागली.

जेनदेखील स्त्रीमुक्तीची कट्टर पुरस्कर्ती आहे. स्त्रीमुक्तीचा खरा अर्थ तिला कळला आहे. ती म्हणते, ‘स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांपासून फटकून राहणं नव्हे. मुळात ‘फेमिनिझम’ स्त्रीपुरता मर्यादित नाहीच. तो पुरुषांसाठीसुद्धा आहे. कारण ‘फेमिनिझम’ म्हणजे माणुसकी- माणुसकी वाढवणं आणि जपणं! पितृसत्ताक जीवनव्यवस्थेत स्त्रियांचंच नाही, तर बाल आणि कुमारवयीन मुलग्यांचं शोषण होतं. त्यांच्यावर अत्याचार होतात. त्या वयात झालेल्या अशा आघातांतून अनेक पुरुष आयुष्यभर सावरत नाहीत. स्त्रियांप्रमाणे या पुरुषांनाही भय, असुरक्षितता, अन्याय आणि हुकूमशाही यांच्यापासून मुक्ती मिळाली पाहिजे. अशी मुक्ती मिळवण्यासाठी स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवा.’

‘फेमिनिझम’चा आपल्याला कळलेला अर्थ प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण आता जगतो आहोत, असं जेन फोंडा आज सांगते. स्त्रिया, लहान आणि अल्पवयीन मुलं यांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी आपल्या ‘फाऊंडेशन’मधून काम करते आहे. सुखी होण्यासाठी नाती जपली पाहिजेत, हा जेनचा पूर्वीपासूनचा ‘फंडा’ आहे. वडिलांबद्दल अपार प्रेम असूनही आपल्यात दुरावा निर्माण झाला आहे, हे लक्षात आल्यावर जेननं खास त्यांच्यासाठी एक चित्रपट स्वखर्चानं बनवला- ‘द गोल्डन पाँड.’ त्यातल्या भूमिकेसाठी हेन्री फोंडांना आयुष्यातला ‘ऑस्कर’चा एकमेव पुरस्कार लाभला.

झगमगीत चंदेरी कारकिर्दीत निवृत्तीचा निर्णय घेण्याची वेळ जेव्हा तिच्यावर आली, तेव्हा तो प्रत्यक्षात आणताना ती कचरली नाही. कधी ना कधी चांगली भूमिका मिळेल, ही आशाही तिनं सोडली नाही. ती पूर्ण होण्यासाठी तिला तब्बल १५ वर्षे वाट पाहावी लागली. पण त्यानंतर ‘नाईन टू फाईव्ह’ हा सुरेख चित्रपट तिच्या हाती लागला. नोकरदार स्त्रियांच्या कथा सांगणाऱ्या  या खुसखुशीत चित्रपटातून जेननं यशस्वी पुनरागमन केलं.

‘मॉन्स्टर-इन-लॉ’ या चित्रपटात जेनला पुन्हा एकदा असंच यश लाभलं. या चित्रपटातून जेननं पडद्यावरच नाही तर आनंदी जीवनातही पुनरागमन केलं. ‘लाइफ सो फार’ या आपल्या आत्मचरित्राचा पुढचा भाग ‘प्राइम टाइम’ या समर्पक नावानं तिनं जगासमोर आणला. त्याचं पहिल्या भागाइतकंच उत्साहानं स्वागत झालं. लेखनाइतकंच वाचन जेनला प्रिय आहे. ती आठवडय़ातून तीन पुस्तकं वाचते. रोज ‘ब्लॉग’ आणि ‘ट्वीट’ करते. जमेल त्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जाते.

चंदेरी दुनियेतली माणसं स्वत:पलीकडे विचार करत नाहीत आणि त्यापलीकडे जगतही नाहीत. या आत्ममग्नतेतून बहराच्या काळात उत्कृष्ट कलानिर्मिती होते. पण पानगळ सुरू झाली की हीच गोष्ट कलाकाराला व्यसनाकडे आणि आत्मनाशाकडे घेऊन जाते. जेननं हे दुष्ट वर्तुळ वेळीच भेदलं. अभिनय कधीच सोडला नाही, पण ‘फिटनेस’ आणि ‘फेमिनिझम’मध्ये जीव रमवला. त्यातून माणुसकीशी नातं जोडलं आणि जपलं. म्हणूनच ऐंशीव्या वर्षी तिची खेळकर वृत्ती कायम आहे. अलीकडेच एका पत्रकारानं तिला विचारलं, ‘कलाकार म्हणून आजच्या काळात जन्म घ्यायला तुम्हाला आवडलं असतं का?’

‘कल्पना वाईट नाही, पण..’ जेन मिश्कील हसत उत्तरली, ‘मी जन्मले आणि जगले तो काळ काही वाईट नव्हता. आम्हाला दिवस-रात्र पत्रकार आणि फोटोग्राफर यांचा ससेमिरा सहन करावा लागत नव्हता. ‘ऑस्कर अ‍ॅवॉर्ड्स’च्या वेळी चित्रपटांची, कला, अभिनय यांची चर्चा व्हायची. अ‍ॅवॉर्ड्स नाईटला तुम्ही कोणते कपडे घालणार असले प्रश्न विचारले जात नव्हते. फॅशन डिझायनरचं महत्त्व कलाकारापेक्षा मोठं नव्हतं. आज मला कुणी विचारलं की, ‘ऑस्कर नाइट’ला तुम्ही काय घालणार? तर माझं उत्तर असेल कपडे!!!’

अरुणा अन्तरकर chaturang@expressindia.com

Story img Loader