जागतिकीकरणाच्या रेटय़ात समाजातील सर्व घटकांवर परिणाम होतो आहे. स्त्रियाही त्याला अपवाद नाहीत. गेल्या काही वर्षांत स्त्रियांचे शिक्षण, आर्थिक स्थिती, मानसिकता, अनेक क्षेत्रातील तिचा सहभाग यात फार मोठा बदल घडला आणि घडतोय. बदलत्या महाराष्ट्रातील  ‘ती’ खरंच बदलली आहे का? हा बदल नेमका कसा आहे, तो सकारात्मक आहे की अजूनही नकारात्मकच आहे, स्त्रिया या बदलाकडे कशा पाहताहेत याची चर्चा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर येत्या ९ व १० मार्च रोजी केली जाणार आहे.
‘बदलता महाराष्ट्र’ या संकल्पनेंतर्गत ‘कर्ती करविती’ हा स्त्री विशेष कार्यक्रम सहा सत्रांत आयोजित केला जाणार असून यातील चर्चामध्ये नामवंत  सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९ मार्च रोजी सकाळी सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतरच्या पहिल्या सत्रात ‘प्रशासनातली ती’ यावरील चर्चेत आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर,  एसएनडीटीच्या कुलगुरू वसुधा कामत, पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर,आणि ओएनजीसी,फायर इंजिनीअर हर्षिणी कान्हेकर सहभागी होणार आहेत.
‘‘ती’चा लढा’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात   अभिनेत्री शुभांगी गोखले आणि मुस्लीम महिला आंदोलनाच्या कार्यकर्त्यां नूरजहॉं साफिया निहाज, फॅशन क्षेत्रातील अ‍ॅलिशिया राऊत आपले एकटीने लढतानाचे अनुभव सांगतील. ‘अग्निपरीक्षा : आणखी किती?’ याविषयावर गुरुवारचे अखेरचे सत्र असेल. यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर शुभा राऊळ, महिला राजसत्ताक आंदोलनाच्या नीला लिमये सहभागी होणार आहेत.

‘ती आणि धर्म’ या विषयावरील चर्चेने गुरुवार, १० मार्चचे पहिले सत्र रंगणार आहे. स्त्रीवादी लेखिका आणि इतिहासाच्या अभ्यासक मंगला सामंत, लेखिका ऊर्मिला पवार, सामाजिक कार्यकर्त्यां व लेखिका मोहसिना मुकादम, या चर्चेत सहभाही होणार आहेत. दुसऱ्या सत्राचा विषय ‘वेगळ्या वाटेवरचे काटे’ असून यात संशोधक शुभा टोळे, चित्रपट-मालिका निर्माती अश्विनी यार्दी, जाहिरात क्षेत्रातील प्रीती नायर  आणि राइट टू पी आंदोलनाच्या समन्वयक सुप्रिया सोनार आपले वेगळ्या वाटेवरचे अनुभव  मांडतील. तिसरे आणि अखेरचे सत्र ‘पक्षीय भेदापलीकडची ती’ या विषयावर असेल. यात आमदार मेधा कुलकर्णी, आमदार विद्या चव्हाण आणि आमदार प्रणिती शिंदे राजकीय पक्षापलीकडे स्त्रियांसाठी काय करता येणे शक्य आहे याचा उहापोह करतील.

दोन दिवस चालणाऱ्या या विशेष कार्यक्रमाचा समारोप सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत टीजेएसबी बॅँक आणि सहप्रायोजक आहेत एमइपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर लिमिटेड.