|| अरुण फिरोदिया
‘‘माझी मुले हुशार व कष्टाळू आहेत. त्यांनी योग्य तऱ्हेचे शिक्षण घेतले आहे. त्यांना फार काही सांगावे लागत नाही. धंद्यात अडचणी येतातच. त्यावर धडपडून तेच मात करतात. मागितल्यास मी सल्ला द्यायला आहेच. कारण आपल्या अनुभवाचा पुढील पिढीस लाभ व्हावा ही कोणत्याही पित्याची इच्छा असतेच. पण सचोटीच्या मार्गाने पुढे जावे व कष्टात मागे पडू नये ही माझ्या आजोबांची व वडिलांची शिकवण मीही त्यांना दिली आहे.’’ सुप्रसिद्ध उद्योजक अरुण फिरोदिया सांगताहेत सुलज्जा, अजिंक्य, किमया आणि विस्मया यांच्याविषयी..
माझ्या मुलांपैकी कन्या सुलज्जा व पुत्र अजिंक्य यांनी आपले शिक्षण व नंतर अमेरिकेत अनुभव घेऊन भारतात परत आल्यावर माझ्या उद्योगधंद्यात माझ्याबरोबर काम करायला सुरुवात केली. सुलज्जाने १९९६ मध्ये व अजिंक्यने २००३ पासून.
उद्योगविश्वात येण्याचा त्यांचा प्रथमपासूनच मानस होता. त्यासाठी मी त्यांना सांगण्याचा प्रश्नच आला नाही. त्या दृष्टीने त्यांनी शिक्षण क्षेत्रंही कॉमर्स, इंजिनीअिरग व फायनान्स, बिझनेस मॅनेजमेंट यातच निवडली होती. मला हा त्यांचा निर्णय अर्थातच आवडला. पण त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात जायचे ठरवले असते तर मी त्यांना पाठिंबाच दिला असता. कारण आमच्या कुटुंबात प्रथमपासून लोकशाहीचे वातावरण होते व प्रत्येक जण स्वत:चे कामाचे क्षेत्र निवड व आयुष्याचे निर्णय स्वत: घेऊ शकत होता. पण घरातील सर्वाशी सल्लामसलत करूनच मुले या गोष्टी करीत.
सुरुवातीस काही वर्षे (५ ते १०) मुलांनी माझ्याबरोबर काम केले. आमच्या कायनेटिक कंपनीचा विस्तार प्रचंड वाढला होता. त्यातील प्रॉडक्शन, सेल्स, पर्चेस, मार्केटिंग, एच.आर. या सर्व क्षेत्रांत त्यांनी काम केले. या अनुभवाचा त्यांना खूप फायदा स्वत:चे प्रोजेक्ट करताना झाला. नंतर मी त्यांना काही नवे बिझनेस करायला सुचवले व ते सुरू करून चालवायला मार्गदर्शन केले. त्यातील काही सांगायचे झाले तर ह्य़ुंदाई या कोरियन कंपनीबरोबर कारसाठी ऑटो पार्किंग आणि एलिवेटर्स, तायजिन या तैवानच्या कंपनीबरोबर इलेक्ट्रिक मोटर्स, दाऊ या कोरियन कंपनीबरोबर मॉनिटर्स मॅन्युफॅक्चिरग.
यानंतर गेले काही वर्षांत दोघांनी स्वत:चे प्रोजेक्ट्स निवडले व त्यात ते काम करीत आहेत. सुलज्जा हिने इलेक्ट्रिक व्हेईकल्स मॅन्युफॅक्चिरग व मार्केटिंग हे क्षेत्र निवडले आहे तर अजिंक्य वेगवेगळ्या देशांतील वेगवेगळ्या कंपनीमध्ये कारसाठी गिअर्स, इंजिन्स असे विविध ऑटो पार्ट्सचे मॅनुफॅक्चिरग व सप्लाय करीत आहे. तसेच हाय अॅण्ड बाइक्स या त्याच्या खास आवडीच्या क्षेत्रातही तो जम बसवीत आहे. त्यांच्या पसंतीच्या या कामात मी त्यांनी मागितल्यास सल्ला, रिसर्च व डेव्हलपमेंटमध्ये आनंदाने मदत देतो.
असे पाहा, मी जेव्हा आय.आय.टी. मुंबई व नंतर एम.आय.टी. बोस्टन, यू.एस.ए. येथील इंजिनीअिरग व मॅनेजमेंटमधील शिक्षण संपवून परत भारतात आलो तेव्हा माझ्या वडिलांच्या सल्ल्यानुसार मोपेड्स व नंतर गिअरलेस स्कूटर मॅन्युफॅक्चिरगमध्ये कार्यरत झालो व सुरुवातीस त्यांचे माझ्या प्रोजेक्टमध्ये बारकाईने लक्ष असे व मार्गदर्शनही!
माझी ज्येष्ठ कन्या किमया हिने अमेरिकेत कम्प्युटर इंजिनीअिरगची पदवी घेतली व काही वर्षे काम केले. नंतर मुले मोठी होईपर्यंत थोडी वर्षे ती घरी राहिली. आता मुले कॉलेजमध्ये गेल्यावर परत चार वर्षे शिक्षण घेऊन तिच्या आवडीच्या क्षेत्रात एम.ए. इन फाइन आर्ट्स (न्यू मीडिया अॅण्ड वेब डिझायनिंग) ही पदवी सॅन फ्रान्सिस्को युनिव्हर्सिटीमधून प्राप्त केली व या क्षेत्रात पुढे काम करण्याचा तिचा मानस आहे. माझा याबाबत तिला पूर्ण पाठिंबा आहे.
माझी कनिष्ठ कन्या विस्मया हिने प्रीन्यूटन युनिव्हर्सिटी या आयव्हीवाय लीग युनिव्हर्सिटी, अमेरिका येथून इंजिनीअिरग विथ मॅनेजमेंट ही डिग्री मिळवल्यावर न्यूयॉर्क येथे दोन वर्षे कामाचा अनुभव घेतला. २००१ मध्ये भारतात परत येऊन आमच्या कंपनीत ती एक्स्पोर्ट सांभाळत होती. त्यानिमित्त ती थेट ग्वाटेमाला या मध्य अमेरिकापर्यंत लांबच्या देशातही जाऊन आली. २००५ मध्ये विवाहबद्ध झाल्यावर ती मुंबईत स्थायिक झाली. तिला व तिचा पती सुनील यास स्कूबा डायव्हिंगची आवड असल्याने त्यांनी ‘इन्फिनिटी’ हे खास जहाज थायलंडमध्ये बांधून घेतले व अंदमानमध्ये ‘लाइव्ह इन शिप’ आणि स्कूबा डायव्हिंग इन्स्टिटय़ूट चालवली.
विस्मयाने याचे संपूर्ण मार्केटिंग सांभाळले. सर्व देशांमधून स्कूबा लव्हर्स तेथे बुकिंग करून येतात. तसेच त्याची मुंबईत बॅक्स काऊन्सिल ही इंजिनीअिरग फर्म आहे. त्यात जाऊन तेथीलही मार्केटिंग ती सांभाळत आहे. तिला व सुनीलला मी वरचेवर मार्गदर्शन करीत असतो.
माझी अशी धारणा आहे की तुमचे चालू प्रोजेक्ट तुम्ही मुलांवर लादू नयेत. त्यामुळे दोन गोष्टी संभवतात. त्यांना त्यात कमी इंटरेस्ट वाटेल किंवा मुले तुमच्यावरच अवलंबून राहतील. शिवाय बदलत्या काळानुसार नवनव्या प्रोजेक्ट्समध्येदेखील अधिक संधी असतील. त्या घेण्याचे सोडून जुन्या कल्पना व जुन्या गोष्टींना पकडून राहण्यात काय हशील आहे?
सुदैवाने मुलेही हुशार व कष्टाळू आहेत. त्यांनी योग्य तऱ्हेचे शिक्षण घेतले आहे. त्यांना फार काही सांगावे लागले नाही व लागत नाही! धंद्यात अडचणी येतातच. त्यावर धडपडून तेच मात करतात. मागितल्यास मी सल्ला द्यायला आहेच. कारण आपल्या अनुभवाचा पुढील पिढीस लाभ व्हावा ही कोणत्याही पित्याची इच्छा असतेच. पण सचोटीच्या मार्गाने पुढे जावे व कष्टात मागे पडू नये ही माझ्या आजोबांची व वडिलांची शिकवण मीही त्यांना दिली आहे, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. प्रयत्न करणे आपल्या हाती आहे. यश देणे हे देवाच्या हाती!
तेव्हा त्यांच्या भाग्याचे शिल्पकार तेच आहेत, हे मुलांच्या लक्षात यावे व नावलौकिक मिळाल्यास त्याचे श्रेयही त्यांनाच मिळावे ही माझी प्रथमपासून भूमिका आहे. आज त्यांच्या उद्यमशीलतेचे मला कौतुक वाटते व परमेश्वर कृपेने त्यांना त्यांच्या कामात यश मिळो, हाच त्यांना माझा आशीर्वाद!