यंदा प्रथमच सुरू केलेल्या ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कारा’च्या मानकरी ठरल्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे. आपल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी व्यक्त केलेले हे मनोगत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम केलेल्या नऊ स्त्रियांच्या सन्मानाबरोबरच ‘लोकसत्ता’ने स्त्रीशक्तीचाही उत्सव साजरा केला आहे. या विश्वात ज्या वाईट शक्ती आहेत, जे अमंगल आहे, असुंदर आहे त्याचा नाश करणाऱ्या दुर्गाशक्तीचा हा पुरस्कार आहे.
ईश्वराची माझ्यावर मोठी कृपा आहे. त्याने मला सुरांचे दान दिले. संगीत हे माझे उपजीविकेचे साधन असले तरी व्यवसाय म्हणून मला संगीताकडे कधी पाहता आले नाही. त्यामुळे व्यावहारिक स्तरावर माझे खूप नुकसान मी करून घेतले आहे, याची मला जाणीव आहे. मात्र, श्रोत्यांच्या जीवनात मी आनंद निर्माण करू शकते याचे मला खूप समाधान आहे. प्रत्येक मैफलीनंतर मिळणारा आनंद हा एक पुरस्कारच असतो. मात्र, त्याचबरोबर ‘लोकसत्ता’सारख्या प्रतिष्ठित माध्यमाकडून जेव्हा आपल्या योगदानाची दखल घेतली जाते, सार्वजनिक स्तरावर त्याचा सन्मान केला जातो, तेव्हा निश्चितच अधिक बळ मिळते. आज किती तरी वेगवेगळी कार्यक्षेत्रे उपलब्ध आहेत. त्यात कलेचा प्रांत मात्र वेगळा आहे. सर्वाना जोडणारा, या विश्वातील गोष्टीचे एकमेकांशी नाते आहे असे सांगणारा, या विश्वातील जे सुंदर, मंगल, शाश्वत आहे त्याची जाणीव करून देणारा आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर जीवन कसे जगावे हे कलाच माणसाला शिकवते. कुठलेही कार्य करण्यासाठी जे मानसिक संतुलन आवश्यक असते ते कलांच्या सान्निध्यातच मिळू शकते. विज्ञान-तंत्रज्ञानाने मानवाचे भौतिक जीवन निश्चितच सुसह्य़, सुखमय केले. पण जीवनाला कलांचा स्पर्श जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत माणूस एक यांत्रिक जीवन जगत राहतो. मानवी जीवन परिपूर्ण होण्यासाठी विज्ञान – तंत्रज्ञान आणि कला यांनी एकमेकांचा हात धरून सतत चालत राहायला हवे. चंद्रावर रॉकेट पाठवणारा शास्त्रज्ञ जितका महत्त्वाचा आहे, तेवढाच चंद्रावर काव्य लिहिणारा कवीही महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. दुर्दैवाने कलांकडे मनोरंजन म्हणून पाहिले गेले. मात्र, आज कला, कलाकार यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत चालला आहे ही समाधानाची गोष्ट आहे. डॉक्टर, इंजिनीअर होण्यासाठी जेवढा अभ्यास करावा लागतो, त्यापेक्षा किती तरी जास्त साधना कलेमध्ये यश मिळवण्यासाठी करावी लागते. एवढेच नाही तर मंचप्रदर्शनाची संधी, नाव, पैसा, सन्मान अशा गोष्टी मिळवण्यासाठी सध्या आणखी एक वेगळी साधना शिकावी लागते. नशिबाची साथ तर लागतेच लागते.
उत्तम कलाविष्कार हे कोणत्याही कलेचे अंतिम ध्येय असते. परंतु या बिंदूपर्यंत पोहोचणाऱ्या मार्गावर ज्या घटना घडत असतात, जे घटक त्यात कार्यरत असतात त्यांचा अभ्यास केल्याने कलाविष्काराचा दर्जा वाढतो. त्यात शिस्त येते. विज्ञानाच्या कसोटीवरही काही गोष्टी तपासता येतात. परंपरा आणि शास्त्र यात जाणते-अजाणतेपणी शिरलेल्या कालबाह्य़, अनावश्यक गोष्टी आत्मविश्वासाने मागे टाकता येतात. वैश्विक मंचावर भारतीय संगीताला आज मानाचे स्थान मिळाले आहे, ते टिकवायचे असेल, अधिक मजबूत करायचे असेल तर शास्त्र, परंपरा आणि कलाविष्कार यांच्यात मेळ हवा, एकवाक्यता हवी. याच भूमिकेतून संगीत प्रस्तुतीबरोबरच संगीताच्या इतर पैलूंकडेही मी जाणिवेने लक्ष दिले आहे. भारतीय संस्कृतीची मूल्ये जपत, काळाबरोबर वाहत जाणे आज गरजेचे झाले आहे. मी त्या खडतर मार्गावर चालते आहे. आपले विचार ठामपणे मांडण्यासाठी अनेकदा टोकाचा विरोध सहन करावा लागतो. एकीकडे सुरांची साधना करत असताना, दुसरीकडे झगडण्याचीही तयारी ठेवावी लागते. पुरस्कारप्राप्त नवदुर्गाचे कार्य पाहून अभिमान वाटतो. त्यांचे अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते. प्रत्येक व्यक्ती आपल्यातील दुर्गाशक्तीची जोपासना करेल अशी आशा व्यक्त करते.