पैशाने आयुष्यात आनंदाचा शिरकाव होतो का? यावर झालेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, पैशाने सुख विकत घेता येत नाही आणि पैशाचा ओघ स्वत:कडे वळल्यावरच याचा बहुतेकांना शोध लागतो. आणि तरीही आपण लॉटरी लागली तर.. हे स्वप्न पाहणं विसरत नाही.

अमेरिकेत गेल्या आठवडय़ापासून सरकारी लॉटरीच्या आकडय़ात ती अद्याप न जिंकल्याने भर पडत चालली आहे तशीच ती विकत घेणाऱ्यांच्या संख्येतही. १.५ अब्ज डॉलर्सची ही लॉटरी लागली तर? फक्त २ डॉलर्समध्ये मिळणाऱ्या एका तिकिटाला जिंकण्याची शक्यता किती? तर २९० मिलियन तिकिटांतून एक. तरी दरवर्षी जवळ जवळ ७० अब्ज लोक लॉटरी तिकीट खरेदी करतात. या वेळेलाही प्रत्येकाला आपणही जिंकू शकू असा विश्वास वाटायला लागलाय. बातम्या पाहताना आम्हीदेखील घरात लॉटरी लागली तर काय करू याचे बेत करून टाकले. लहानपणी वडील दर महिन्याला लॉटरीचं तिकीट घ्यायचे. कधी ५० रुपयांच्या वर लॉटरी लागली नाही तरी ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’चं तिकीट घरात यायचंच. रोज लॉटरीच्या बातम्या पाहून आज आपणही तिकीट आणू या असा बेत करून टाकला. पण लॉटरी जीवनात आनंद घेऊन येते की शेवटी आनंद हा मानण्यावर हेच खरं?

अमेरिकेत, ‘पॉवर बॉल’ आणि ‘मेगा मिलियन’ ही लॉटरींची दोन मोठी नावं. १९९२ साली सुरू झालेला ‘पॉवर बॉल’ कमीत कमी ४ कोटी डॉलर्स तर १९९६ सालापासून सुरू असलेली ‘मेगा लॉटरी’ची कमीत कमी रक्कम १५ मिलियन डॉलर्स असते. पॉवर बॉलचं १ तिकीट २ डॉलर्सला तर मेगा मिलियनच्या एका तिकिटाची किंमत १ डॉलर. सध्या कुणाकडेच विजेते आकडे नसल्याने पॉवरबॉलची रक्कम वाढत चालली आहे. दर बुधवारी आणि शनिवारी निकाल जाहीर होतो. ६९ चेंडूंमधले ५ आकडे जुळले तर तुमचं नशीब उजळतं. पण त्याव्यतिरिक्त असणारा आणखी १ चेंडू तुमचं आयुष्य बदलून टाकणारा ठरतो. या भाग्यशाली चेंडूवरचा आकडा आणि उरलेले ५ आकडे तंतोतंत जुळले की झालात तुम्ही मिली किंवा बिलिनिअर.

देशात विकली जाणारी सगळीच्या सगळी तिकिटं विकत घेतली तरीही लॉटरीतून तुम्हाला फायदाच होऊ शकतो इतकी लॉटरीची रक्कम जास्त आहे. सर्व तिकिटांची किंमत आहे ५८४ मिलियन डॉलर्स आणि यावेळची लॉटरी आहे ९३० मिलियन डॉलर्सची. अडचण इतकीच की इतकी सगळी तिकिटं विकत घेणं एखाद्या व्यक्तीला शक्यच नाही. पूर्ण देशात तिकीट विक्री होते. प्रत्येक ठिकाणाहूनची सर्व तिकिटं घेणं निव्वळ अशक्य. तरीही फेब्रुवारी १९९२ मध्ये काही कंपन्यांनी एकत्र येऊन हे करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ज्यात सर्वाना मिळून २.५ मिलियन डॉलर्सचीच तिकिटं विकत घेता आली. पण लॉटरीसाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या गेल्याच. अशीच एक घडली २००५ साली. ‘पॉवर बॉल’च्या लॉटरीचे ११० लोकांचे ५ आकडे तंतोतंत जुळले आणि ११० जणांना जवळ जवळ २० मिलियन डॉलर्सही मिळाले. काहीतरी गोंधळ असल्याची शंका अधिकाऱ्यांना आली. आणि लवकरच त्याचं रहस्यही उलगडलं. न्यूयॉर्कमधील वोनटोन कंपनीने त्यांच्या बिस्किटांतून (फॉरच्यून कुकीज) ६ आकडे नशीबवान म्हणून वितरित केले होते आणि प्रत्यक्षात ते खरंच तसे निघालेही. पाच आकडे तर जुळले. जर सहावा आकडाही जुळला असता तर या ११० लोकांना अब्जाधीश होण्याची संधी लाभली असती. बिस्किटांतला ६ वा आकडा होता ४० आणि लॉटरीमधील आकडा होता ४२.

मात्र आत्तापर्यंत जितक्या लोकांना लॉटरी लागली. काही मिलिनियर झाले. पण त्यातील फार कमी जणांनी ती खऱ्या अर्थी उपभोगली. बाकीच्यांना लॉटरीबरोबर आलेले ताण-तणाव झेपले नाहीत. अनपेक्षित धनलाभाने आयुष्यं खऱ्या अर्थी बदलतं. कधी सुखी जीवनाच्या मार्गावर पाऊल पडतं तर कधी हा पैसा डोकेदुखी होऊन जातो. अचानक तुमचं आयुष्य प्रकाशझोतात येतं. असंख्य समाजसेवी संस्था, उपचारांसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा असणाऱ्या रोग्यांचे नातेवाईक, गुंतवणुकीसाठी गळ घालणाऱ्या कंपन्या असे कितीतरी फोन वेळी अवेळी घणघणायला लागतात, कधीही न पाहिलेल्या नातेवाइकांचा जीवनात अलगद शिरकाव होतो, मित्र-मैत्रिणींची जवळीक नको तितकी वाढायला लागते. अशी एक ना अनेक उदाहरणं.
२००५ साली लॉटरी जिंकल्यावर लुईसने आपली स्वप्नं पूर्ण केली. नवीन घर घेतलं. दाराशी नवीन गाडी आली. लुईसच्या नवऱ्याने, किथने बेकरीतली नोकरी सोडली आणि दिवस अंगावर यायला लागला. मन रमविण्यासाठी तो दारूकडे वळला. व्यसनाधीन झाला. दारूच्या व्यसनातून तो प्रयत्नपूर्वक बाहेर तर पडला पण जेम्स नावाच्या अनोळखी गृहस्थाने नफ्याचं आमिष दाखवीत वेगवेगळ्या धंद्यात त्याला पैसे गुंतवायला भाग पाडलं. त्याने गुंतवलेले सगळे धंदे नामशेष झाले. हातातला पैसा संपला तसा पुन्हा तो दारूकडे वळला. आत्तापर्यंत साथ देणारी त्याची पत्नीही कंटाळून वेगळी झाली. बेकरीतील कामगारांचं साधंसुधं जीवन पैसा आल्यावर रसातळाला गेलं आणि आलेल्या ताणातून, दारू मुळे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने किथचा २०१० मध्ये मृत्यू झाला.

केली रॉजरने ३ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकल्या जिंकल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींवर गाडी, घर अशा महागडय़ा भेटवस्तूंचा वर्षांव केला. कपडे, सुंदरतेचा हव्यास बाळगत त्या पायी केलेल्या अतोनात उधळपट्टीतून हाती आलेला पैसा केव्हा वाहून गेला ते केलीला समजलंही नाही. मित्र-मैत्रिणीं फक्त तिच्या पैशावर डोळा ठेवून तिच्याशी मैत्री करत आहेत असं तिला वाटायला लागलं. आलेल्या अनुभवांनी निराश होत दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्नही तिने केला आणि अखेर सर्व पैसा गमावल्यावर आता मोलकरणीची कामं करणारी केली लॉटरीपायी आलेले अनुभव विसरून आनंदी जीवन जगण्याची इच्छा व्यक्त करते.

५५ वर्षांच्या कत्रांटदार कंपनीचे अध्यक्ष असलेल्या व्हिटेकरनी ३१५ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली तेव्हाच त्यातील बरीचशी रक्कम देणगी, ट्रस्ट यासाठी राखली; इतकंच नाही तर जिथून त्यांनी हे तिकीट घेतलं होतं त्या दुकानातील कर्मचारी स्त्रीलाही त्यांनी घर, गाडी आणि रोख रक्कम दिली. असं असताना मग काय चुकलं? व्हिटेकर मित्र-मैत्रिणींसमवेत आनंद साजरा करायला वेगवेगळ्या क्लबमध्ये जायला लागले, दारूच्या अधीन झाले, जुगाराचा नाद लागला. मुलीला, नातीला वेळोवेळी आवश्यकता नसताना ते पैसे देत राहिले आणि त्यांच्याबरोबरीने त्या दोघी अमली पदार्थाच्या आहारी गेल्या. त्यातच दोघींनी आपला जीव गमावला. सुखासीन आयुष्य जगणाऱ्या व्हिटेकर कुटुंबाचं आयुष्य लॉटरीमुळे धुळीला मिळालं.
डेनीसने लग्नाला २५ वर्षे झाल्यावर अचानक घटस्फोट मागितला. या अनपेक्षित मागणीचं नवल वाटलं तरी थॉमसनी तिला बंधनातून मोकळं केलं. २ वर्षांनी थॉमसला घटस्फोटापूर्वी डेनीसने लॉटरी जिंकल्याचं आणि स्वत:च्या वकिलालाही अंधारात ठेवून घटस्फोट घेतल्याचं कळलं. थॉमसनी पत्नीला न्यायालयात खेचलं. लॉटरी लागल्याचं जाहीर न करणं हा कायद्याचा भंग आहे असं नमूद करत न्यायालयाने डेनीसना, पतीकडे लॉटरीची सर्व रक्कम सुपूर्द करण्याचा आदेश दिला.
३१ मिलियन डॉलर्सची लॉटरी अब्राहमनी जिंकली. सुरुवातीची ३ र्वष सुखासमाधानातही गेली. पण अचानक एके दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा खून करणाऱ्या स्त्रीला अटक झाल्यावर अब्राहमनी लॉटरी जिंकल्यावर त्यांच्याशी मैत्री करून जवळ जवळ २ मिलियन डॉलर्सला त्यांना लुबाडल्याचं आणि नंतर मारल्याचं तिनं कबूल केलं.

अर्थात लॉटरीचा पैसा व्यवस्थित गुंतवून, आपला दिनक्रम व्यवस्थित सांभाळणारीही माणसं अनेक आहेत. एमा आणि ल्युक त्यातलेच एक. ल्यूक आणि एमा मॅकडोनल्डमध्ये काम करता करता प्रेमात पडले, पण स्वतंत्र घरासाठी दोघांचा एकत्रित पगारही पुरेसा नसल्याने पालकांच्या घरीच त्यांना राहावं लागत होतं. मिलियन डॉलर्सची लॉटरी लागल्यावर नोकरी सोडायची नाही हा निश्चय काही काळापुरता टिकला. पण मुलाबरोबर वेळ घालवण्याला दोघांनी प्राधान्य दिलं, त्याचबरोबर नोकरीचा राजीनामा. पण काही दिवसांतच सहकारी, नोकरी यांच्या आठवणीने चैन पडेनासं झालं. ल्यूकने पुन्हा जुन्याच जागी नोकरीला सुरुवात केली. लॉटरी पैशावर मिळणारं व्याजही त्या दोघांच्या पगारापेक्षा जास्त होतं. पण दैनंदिन जीवन न बदलता लॉटरीच्या पैशाचा आनंद उपभोगणं दोघांना जास्त सुखावह वाटलं.

रॉबिन्सनने लॉटरी जिंकल्यावर शाळेतील शिक्षकांमुळे प्रेरित होऊन मुलांसाठी कार्यशाळा उभी करण्यासाठी लॉटरीतील बरीचशी रक्कम देऊ केली. आज २० वर्षांनंतर ती कार्यशाळा उत्तमरीत्या चालविली जात आहे. बऱ्याच जणांनी मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे गुंतवले तर काहीजणांनी आपल्याला लॉटरी लागली आहे हे काही महिने इतरांना कळू न देता पुढचे ताण टाळण्याचा प्रयत्न केला. बहुतेकांनी सामाजिक जाणिवेने आपल्याला मिळालेल्या रकमेतील बरेच पैसे देणगी म्हणून देण्याला प्राधान्य दिलं. थोडक्यात, काही जण श्रीमंत झाले. मनाने होतेच आता आर्थिकदृष्टय़ाही.

खरंच पैशाने आयुष्यात आनंदाचा शिरकाव होतो का? यावर झालेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, पगारवाढ झाली की नक्कीच सुखात भर पडते. पण एका विशिष्ट वाढीनंतर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. किंबहुना पैशाने सुख विकत घेता येत नाही, ह्यचाच पैशाचा ओघ स्वत:कडे वळल्यावर बहुतेकांना शोध लागतो.
आणि तरीही आपण लॉटरी लागली तर.. हे स्वप्न पाहणं विसरत नाही!
(१ मिलियन म्हणजे दहा लाख, १ बिलियन म्हणजे १ अब्ज आणि सध्याची डॉलर्सची किंमत आहे सुमारे ६७ रुपये. करा आता हिशेब. )

– मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर
mohanajoglekar@gmail.com

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा

Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?

Robbery at sister house to play online gambling in Pimpri Pune print news
पिंपरी: पाच एकर जमीन विकून जुगारात हारला; ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी

Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?

Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश

Success Story Of IAS Siddharth Palanichamy
Success Story: यूपीएससीच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाची मदत; पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश; वाचा, देशातील सर्वांत तरुण IAS ची गोष्ट

Lucknow Auto Driver Murder case
Lucknow Murder case: प्रेयसीचे वडील समजून रिक्षावाल्याची हत्या; प्रेमप्रकरणाला गंभीर वळण

Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?

Story img Loader