‘‘कुठल्याही कामाला कमी समजू नये, कष्टाला कधी नाही म्हणायचं नाही आणि संसाराचं दुसरं चाक म्हणून आपली जबाबदारी झटकायची नाही अशी माझ्या पालकांची शिकवण माझ्या कामी आली. निर्णय घेतला आणि पोळ्या करून द्यायला लागले. जिद्द आणि कष्ट याच मुळे त्याच्याही पुढे जात आज आम्ही महाराष्ट्रीय पदार्थ देणारं ‘मेजवानी’ हे रेस्टॉरन्ट न्यू जर्सीमध्ये सुरू केलं असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.’’ सुप्रिया शेटय़े यांची ही खाद्यसफर ..
कधी कधी आपण मनात एखादं योजलेलं असतं, पण होतं दुसरंच. एखादं वादळ आयुष्याच्या गाडीला कुठे नेऊन पोहोचवेल हे काही सांगता येत नाही. हे वादळ शमल्यानंतर खंबीरपणे पाय रोवून उभे असणारेच तग धरून आहेत हे समजते आणि त्यांची पुढची वाट मग नक्कीच प्रगतीची असते. न्यू जर्सीच्या ‘मेजवानी’ रेस्टॉरन्टच्या सुप्रिया शेटय़े यांचा प्रवास पाहिल्यानंतर तरी असंच म्हणावं लागेल.
सुप्रिया शेटय़े तशा मुंबईच्या. आई-वडील दोघेही गोव्याचे. वडील नोकरीनिमित्त मुंबईत स्थिरावले. खाऊनपिऊन सुखी असं कुटुंब. तीन भावंडांत सुप्रिया धाकटय़ा, त्यामुळे लाडाच्या. आई गृहिणी असल्याने घरकामाचे संस्कार सगळ्यांवरच झालेले. मात्र धाकटी असल्याने सुप्रिया यांच्या वाटय़ाला स्वयंपाक कधी फारसा आलाच नाही. आई सुगरण असल्याने उत्तम पदार्थ चाखायला मात्र मिळायचे. परळला राहाणाऱ्या सुप्रिया यांचं शालेय शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज शाळेमध्ये झालं. त्यानंतर वाणिज्य शाखेतील पदवी घेऊन कुटुंबाची गरज म्हणून त्यांनी लगेच छोटय़ामोठय़ा नोकऱ्या करायला सुरुवात केली. एका नोकरीदरम्यान त्यांना त्यांचा जीवनसाथीही भेटला. त्यांनी घरच्यांच्या संमतीने प्रेमविवाह केला. दरम्यान शामराव विठ्ठल बँकेत सुप्रिया यांना नोकरी लागली. संसार आनंदाने सुरू होता. मुलगा झाल्याने त्या आनंदावर कळसच चढला जणू. अशी १५ वर्षे गेली. सुप्रिया आता बँकेत अधिकारी पदावर पोहोचल्या होत्या.
इथवर जीवनाचा प्रवास काहीसा संथ आणि तरीही आनंदाचा होता. त्यांचे सासू-सासरे अमेरिकेत वास्तव्याला असल्याने त्यांच्या पतीला तिकडे जाण्याची ओढ होती. दरम्यान, सासऱ्यांच्या निधनानंतर सासूबाई एकटय़ा पडल्याने २००७ मध्ये त्यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया सांगतात, ‘‘मला कधीच अमेरिकेचं आकर्षण नव्हतं. इथलं स्थिर जीवन सोडून ज्याची कल्पनाच नाही अशा ठिकाणी जायचं तर मनात धाकधूक होती. त्याचप्रमाणं इथे रुजलेली आपली पाळंमुळं कुठे दुसरीकडे रुजतील की नाही असंही वाटायचं. नवऱ्याच्या कंपनीने चांगली ऑफर देऊ केल्यानं आम्ही अमेरिकेला जाण्याचा निर्णय पक्का केला. आम्ही इमिग्रेशनवर तिथं गेलो होतो. मात्र तिथं गेल्यानंतर चार महिन्यांतच नवऱ्याची नोकरी गेली. जी काही जमापुंजी होती ती तिथल्या लहानसहान गरजांवरती खर्च झाली होती. हाती पैसा नाही आणि त्यात परदेश. काय करायचं पुढे हा प्रश्न आ वासून उभा होता.’’
सुप्रियांनी तिथे नोकरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची नोकरीच्या ठिकाणी पिळवणूक झाल्यानं त्यांनी नोकरी सोडली. आता तिथे तग धरण्यासाठी काहीतरी हातपाय हलवणं गरजेचं झालं. अखेर खूप निग्रहपूर्वक त्यांनी पोळ्या करून देण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया सांगतात, ‘‘पोळ्या करून देण्याचा निर्णय घेताना मला खूप त्रास झाला. कारण मी त्यापूर्वी असं काही काम केलं नव्हतं. माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या नोकरीसाठी व्हावा, माझ्या इंजिनीअर नवऱ्याला नोकरी लागेल असंच मला वाटत होतं. परंतु कुठल्याही कामाला कमी समजू नये, कष्टाला कधी नाही म्हणायचं नाही आणि संसाराचं दुसरं चाक म्हणून मग आपली जबाबदारी झटकायची नाही अशी माझ्या पालकांची शिकवण माझ्या कामी आली आणि निर्णय घेतला.. पतीने प्रोत्साहन दिलंच पण पूर्णपणे साथही दिली.’’
सुप्रियांनी गरज म्हणून हे काम स्वीकारलं होतं, मात्र जे काही करायचं ते पूर्ण सर्वस्वाने, हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे त्यांनी सगळं मन लावून केलं. पहिल्यांदा मिळालेली १०-१२पोळ्यांची ऑर्डर वाढून ती २०० ते २५० पोळ्यांपर्यंत गेली. त्या सांगतात, ‘‘मी पहिल्यापासूनच वेळेला खूप किंमत दिली. ग्राहकांच्या वेळा आणि त्यांना दिलेला शब्द तंतोतंत पाळला, त्याचेच फळ म्हणजे माझे ग्राहक वाढत होते. कारण सुप्रिया सगळं वेळेतच देणार हे त्यांच्याही लक्षात आलं होतं.’’ पोळ्या करणं हे काही फार नफ्याचं काम नव्हतं. त्यांचे पती दोन दोन तास ड्राइव्ह करून पोळ्यांची ऑर्डर पोहोचवायला जात. त्यामुळे फार फार तर पेट्रोलचे पैसे निघायचे, मात्र व्यवसायवृद्धीसाठी, ओळखी व्हाव्यात, प्रसिद्धी व्हावी यासाठी त्यांनी हे नेटानं केलं.
सुप्रिया म्हणाल्या, ‘‘पोळ्या करण्याबरोबरच मी लोकांच्या घरी स्वयंपाक करायला जायचे, बेबी सिटिंगही केलं. हळूहळू जेव्हा माझी प्रसिद्धी होऊन लोक स्वत:हून ऑर्डर घेऊन यायला लागले तेव्हा घरगुती जेवणाच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. न्यूजर्सीला मुंबईतील लोक मोठय़ा प्रमाणात राहतात. मी करत असलेलं जेवण हे खोबऱ्याच्या वाटणातलं असल्याने त्यांना माझ्याकडचं जेवण आवडायचं.’’
‘‘मी कधीही साठवून ठेवलेलं म्हणजे आधी तयार करून ठेवलेलं जेवण दिलं नाही. जे काही करायचं ते ताजं. त्यासाठी कॅन फूडचा वापरही जेवढा कमीत कमी करता येईल तेवढा करते. भाज्या, इतर साहित्य हे ताजंच आणलं जातं. सोलकढीसाठीही नारळ फोडून त्याचं दूध वापरलं जातं. मुंबई आणि गोव्याहून मागवलेले कोकम वापरते. त्याची वेगळी चव ग्राहकांच्या लक्षात येते. न्यू जर्सीला सुरमई, पापलेटसारखे मासे मिळतात, त्यामुळे माशांचे प्रकारही मालवणी पद्धतीने करता येतात.’’
‘‘माझा व्यवसाय हळूहळू वाढत होता. लोक दोन दोन तास ड्राइव्ह करून खास माझ्याकडचं जेवण घ्यायला यायला लागले. माझी जागा लहान होती. बरोबरीने काम करायला नवऱ्याशिवाय कोणी नव्हतं. १६-१६ तास काम करावं लागायचं, म्हणजे आताही करतेच. पण ते सातत्यानं केल्यानेच व्यवसाय वाढला होता. इतका की कधी कधी मी केलेलं जेवण अवघ्या तासाभरातच संपून जाई.’’
सुप्रियांनी सलग सहा वर्षे मेहनत केल्यानंतर व ग्राहकांची पसंती, गर्दी वाढल्यानंतर स्वत:चं रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्यांच्या पतीनेही सात-आठ ठिकाणी नोकरी करून पाहिली. मात्र त्यांचाही तिथे जम बसत नसल्याने त्यांनीही पूर्णवेळ त्यांना मदत करायची ठरवलं आणि अशा रीतीने डिसेंबर २०१५ मध्ये त्यांनी ‘मेजवानी’ रेस्टॉरंट सुरू केलं.
‘‘मेजवानीमध्ये खासकरून मांसाहारी जेवण आम्ही बनवतो, म्हणजे त्याच जेवणाच्या जास्त ऑर्डर असतात. तेही त्या त्या दिवशीच करतो. ते सोडलं तर इतर कोणतेही पदार्थ आम्ही आधी तयार करत नाही. ग्राहक आल्यानंतर तो जर महाराष्ट्रीय असेल तर तो कुठला आहे हे विचारून त्यांच्या पद्धतीचं जेवण त्याला दिलं जातं. म्हणजे तो जर कोकण, मुंबई, गोव्याकडचा असेल तर त्याला खोबरं टाकलेल्या भाज्या चालतात. पण जर ग्राहक सोलापूर, कोल्हापूर भागातला असेल तर त्याच्यासाठी दाण्याचा कूट असलेल्या आणि तिखट भाज्या बनवल्या जातात. पोळ्या-भाकरीही ग्राहकाने ऑर्डर दिल्यावरच बनवल्या जातात. त्यांना देण्यात येणारं डेझर्टही त्यांच्या आवडीचं असतं.’’ सुप्रिया सांगत होत्या.
‘‘गरम, ताजं आणि ग्राहकांच्या पद्धतीचं जेवण त्यांना दिल्यानं ते खूश असतात आणि हेच कदाचित ‘मेजवानी’चं वैशिष्टय़ आहे, जे ग्राहकांच्या पसंतीस उतरलं आहे. त्याचा त्रास झाला तरी मला चालेल, पण इथं येणाऱ्या ग्राहकाला घरी जेवल्याचा आनंद, समाधान मिळावं अशी माझी इच्छा असते. म्हणून हा खटाटोप मी करते.’’ त्या कौतुकाने सांगत होत्या.
हे सगळं काम अर्थात तिथले कायदे आणि नियम पाळूनच सुरू होतं. त्या म्हणाल्या, ‘‘आम्हाला इथे मराठी कामगार मिळाले नाहीत. आता एक मदतनीस आमच्याकडे येतो. तसंच योगायोगाने माझी मुंबईची एक मैत्रीण इथे आली असल्यानं तिचीही मदत होते. एकंदर सगळी कामं आम्ही चौघंच करतो.’’
सुप्रिया यांना सणांच्या काळात पुरणपोळी, मोदक यांच्याही ऑर्डर असतात. न्यू जर्सीहून जवळच्या शहरांमध्ये त्यांच्या पुरणपोळ्या पार्सल केल्या जातात. तसंच त्यांना पूजेच्या जेवणाचीही ऑर्डर असते. हे जेवण कांदा-लसूणविरहित बनवावं लागतं आणि ते त्याच पद्धतीनं बनवलं जाणार याची खात्री आता स्थानिकांना झाली आहे. सुप्रिया सांगतात, ‘‘एवढी र्वष झाली आहेत इथे काम सुरू करून, मात्र अजूनही आम्हाला पार्टी, लग्न किंवा इतर ऑर्डर असतील तर आम्ही त्या पुरवल्यानंतर हमखास फोन करून त्यांना आवडलं की नाही, काही सूचना आहेत का हे विचारतो. त्यातूनच आमच्यामध्ये सुधारणा करता येते.’’
‘‘इथे सगळे कार्यक्रम वीकेंडला ठेवले जातात. त्यामुळे त्या काळात कामाचा ताण जास्त असतो. म्हणून सोमवारी आम्ही हक्काची सुट्टी घेतो. कारण भाज्या, साहित्य आणण्यापासून ते अगदी अनेकदा भांडी घासण्यापर्यंत सगळी कामं आम्हीच करतो. अजूनही पदार्थ बनवण्यासाठी आमच्याकडे मशीन्स घेतलेली नाहीत. शिवाय ग्राहकांच्या आवडीनुसार पदार्थ बनवत असल्याने सकाळच्या वेळी तर ४ ते ५ तासांत ४० ते ५० पदार्थ बनवण्याची कसरत सुरू असते. त्यामुळे एक दिवस आराम आता गरजेचा वाटतो. अर्थात सणाच्या काळात सोमवारीही काम सुरूच असतं. आता मागे वळून पाहताना वाटतं केलेल्या कष्टाचं प्रत्येक वेळी चीज होत गेल्यानेच तिथे राहता आलं. अनेकदा थकून जायला व्हायचं, मात्र ग्राहकांची मिळालेली दाद उभारी द्यायची थकवा पळून लावायची. इथं प्रत्येक कामाचा तो करणाऱ्याला एक प्रकारचा सन्मान मिळत असल्याने आम्ही दोघांनाही अधिकारपदावरून येऊन रेस्टॉरंटचं काम करायला कधी कमीपणा वाटला नाही.’’ त्या सांगत होत्या, ‘‘ज्या सासूबाईंसाठी आम्ही भारत सोडला त्यांचं मात्र आम्ही इथे आल्यानंतर सहा महिन्यांतच निधन झालं. आम्ही इथे येणं आणि हा पुढचा प्रवास कदाचित आमचं प्रारब्धचं असावं, जे घडून गेलं.’’ त्यांचा आवाज हळवा झाला होता..
त्यांनी केलेल्या कष्टाचं ग्राहकांच्या पसंतीमुळे चीज झालंच, शिवाय मराठी जेवणाचा प्रसार केल्याचा आनंद मिळतोय तो वेगळाच. त्या आनंदाची ‘मेजवानी’ त्या अशाच देत राहोत, ही शुभेच्छा.
रेश्मा भुजबळ – reshmavt@gmail.com