मासिक पाळी जशी महत्त्वाची तसा मेनोपॉजही. आयुष्यभर जी आपल्या बरोबर राहिली त्या पाळीला विदा करण्यासाठी, ‘सेलिब्रेशन तो बनता है ।’ खूप काही घडून गेलेलं असतं या काळात आणि खूप काही घडत असतं मेनोपॉजनंतरच्या काळात. अनेकदा कौटुंबिक धक्क्यांचीही भर पडते. मुलीचं लव्ह मॅरेज, मुलाचं नोकरीत स्थिर न राहणं, सुनेला वेगळं बिऱ्हाड हवं असणं, नवऱ्याची आजारपणं, वयामुळे वैवाहिक नात्यातला दुरावा. या सगळ्यातून निभावून गेल्यानंतर सहसंवेदनशील मैत्रिणींनी एकत्र येऊन आपले अनुभव शेअर केले तर? खूप आधार, दिलासा मिळू शकतो.. काय हरकत आहे, मैत्रिणींनी एकत्र येऊन करायला, मेनोपॉज सेलिब्रेशन!
निमित्त होतं, मेनोपॉज सेलिब्रेशनचं! रागिणीची शेवटची पाळी येऊन एक वर्ष झालं. म्हणजे आता मेनोपॉजवर शिक्कामोर्तब झालं. एवढी र्वष जिच्या सोबतीनं आयुष्याची वाटचाल झाली, तिच्यामुळे स्त्री असण्याला अनेक अर्थ प्राप्त झाले, मग तिला शेवटचा गोड निरोप नको का द्यायला? या निमित्तानं आमच्या मैत्रिणीनं, रागिणीनं आपल्या निवडक आठ-दहा मत्रिणींना एकत्र बोलावलं. भेटण्याचं कारण सस्पेन्स ठेवलं आणि सर्व जणी जमल्यावर जाहीर केलं, ‘मेनोपॉज सेलिब्रेशन..!’
सीमा, प्राची, अनघा, विनया, सुजाता, सुलभा, स्नेहा, पुष्पा, राजश्री, मेघना आणि रागिणी. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. जणू काही आता हा एक चांगला पायंडाच पडत आहे. पाळी संपून एक वर्ष झालं की, मग सोयीचा एक दिवस निवडून ‘मेनोपॉज सेलिब्रेशन’ करायचं. पाळी सुरू झाली की आई जशी गोडधोड करून झुलवते, अगदी तसंच मत्रिणींकडून कोडकौतुक करून घ्यायचं आणि मग त्यानिमित्ताने सुरुवातीच्या काळातील मासिक पाळीची ओळख नसताना घडलेल्या घटना, मासिक पाळीचे सामाजिक व शारीरिक अर्थ कळल्यानंतर भोगलेले त्रास, केलेली बंडखोरी, कुटुंबीयांची, विशेषत: नवऱ्याची मिळालेली साथ यांची देवाणघेवाण करायची. आणि त्यातूनच पुढील पाळीविना असलेले आयुष्य जगण्यासाठी ताकद मिळवायची.
पौर्णिमेच्या दिवशी आम्ही गच्चीवर, मोगऱ्यांच्या सहवासात पन्ह्य़ाचा आंबटगोड घोट घेत घेत एकेक जणी रागिणीने दिलेल्या १२ विषयांवर मनसोक्त बोललो, गहिवरलो आणि मनमुराद हसलोही. १९७३ ला तिची सुरू झालेली पाळी २०१५ ला संपली. ‘‘जरी हा फक्त एक शारीरिक धर्म असला तरी आपल्या संस्कृतीत तो स्त्रियांच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे. लेकीला पाळी सुरू झाली की आईचा जीव भांडय़ात पडतो खरा, पण त्याचा फार गाजावाजा करायचा नसतो. त्यामुळे माझ्या आईनं आनंदानं, लपूनछपून फक्त खीर केली होती. अर्थात त्या वेळी परिस्थितीही नव्हती. आता कशी मी जरा मोकळा श्वास घेऊ पाहत आहे, तेव्हा म्हटलं, जरा हसत हसत निरोप देऊ या सखीला. तुमच्या साक्षीनं,’’ रागिणीनं सुरुवातीला प्रास्ताविक मांडलं आणि तिची ही कल्पना सर्वाना फारच आवडली.
यानिमित्तानं, मासिक पाळीच्या अनुषंगानं मनात साठलेल्या गोष्टींचा निचरा व्हावा म्हणून तिनं आमच्यासाठी एका बाऊलमध्ये काही चिठ्ठय़ा ठेवल्या व एकेकीनं एकेक चिठ्ठी उचलून दिलेल्या विषयावर आपले अनुभव व्यक्त करायचे असं ठरलं. इतरांनीही अर्थात त्यांचे अनुभव सांगायला हरकत नव्हतीच.
पहिली चिठ्ठी-मेनोपॉजमध्ये नवऱ्याने कशी साथ दिली?
जिला चिठ्ठी मिळाली तिनं आपला अनुभव सांगायला सुरुवात केली. ‘‘नेमक्या मेनोपॉजच्या काळातच मला काही कौटुंबिक धक्के मिळाले. मेनोपॉजमुळे होणारा त्रास आणि कौटुंबिकधक्के त्यामुळे मी पुरती कोसळत होते. माझ्या नवऱ्याला मेनोपॉजबद्दल काहीही माहिती नव्हती, त्याने इतर पुरुष व स्त्रियांच्या मदतीने मेनोपॉजवरील पुस्तके वाचून मला समजून घेतलं व कुटुंबीयांनाही समजून घेण्यास भाग प6ाडलं. वेळी-अवेळी माझ्या बाजूने उभा राहिला व मी या अवस्थेतून सहीसलामत बाहेर पडले. या वेळी सुनंदा व अनिल अवचटांची आठवण झाली. सगळेच पुरुष अवचटांसारखे संवेदनशील झाले तर खरंच मेनोपॉज काळात मनावर कोणतेही ओरखडे न पडता आपण स्त्रिया या अवस्थेला सहज सामोरे जाऊ.’’
दुसरी चिठ्ठी – दु:खाच्या प्रसंगी नवऱ्याची भावनिक साथ मिळते का, मिळत असल्यास कशी मिळते? –
‘‘माझा नवरा तर कितीही विपरीत घडलं तरी फक्त ‘बरं! बघू!’ एवढंच म्हणतो. यापलीकडे त्याला माझं सांत्वन करता येत नाही, मला गोंजारता येत नाही.’’ जिला चिठ्ठी मिळाली होती त्या मैत्रिणीने, आपल्या नवऱ्याबाबतची ही उणीव जाणून हे मांडलं खरं, पण, यावर सर्वच जणी एका सुरात जवळजवळ ओरडल्याच, ‘‘अगं! तुझ्या नवऱ्यात वावगं असं काही नाही. थोडय़ाफार फरकाने सगळेच पुरुष याबाबत सारखेच आहेत, त्यांची दु:खद प्रसंगी अजिबात मानसिक वा भावनिक हवी तशी साथ मिळत नाही. त्यामुळे काळजी नसावी.’’ आता प्रत्येक नवऱ्याबाबत हे कितीसं खरं आणि कसं आपापलं ठरलेलचं बरं!
तिसरी चिठ्ठी – आत्तापर्यंत रूढी-परंपरांबाबत काय बंडखोरी केली? –
यावर एकीने आपला अनुभव सांगितला. तिला अजिबात वटसावित्रीची पूजा करणं पटत नव्हतं. लग्नानंतर एकदोन र्वष केली, नंतर नवऱ्याला व सासूबाईंना सांगून टाकलं. फक्त एक दिवस नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करायचं हे काही मला पटत नाही, मी रोज सर्वाच्याच सुखासाठी देवापुढे प्रार्थना करते, त्यामुळे मी वटपौर्णिमेची पूजा, उपवास, बाहेर जाऊन वडाला दोरा बांधून करणार नाही व घरी वडाची फांदी आणूनही करणार नाही. या तिच्या बंडखोरीचा त्रास तिच्या घरापासून सुरू होऊन नातेवाईकांच्या घरापर्यंतही पोहोचला व अजूनही अधेमधे धुमसतो आहे. तिनं सांगून टाकलं.
खरं तर वडाच्या फांद्या घरी आणून पूजा करणे, ही कल्पना तर सर्वानाच फार गमतीची वाटते पण काय करणार? तरी करतो, असे सर्वानीच नमूद केले.
चौथी चिठ्ठी – स्त्री असण्याबद्दल अभिमान कधी वाटला? –
हे सांगताना मैत्रीण म्हणाली, ‘‘माझ्या आईने ५० वर्षांपूर्वी दोन मुलींवर ऑपरेशन केले. आम्हा दोघी बहिणींना सन्मानानं वाढवलं आणि तीच गोष्ट माझ्याबाबतीत घडली तेव्हा आईचा वारसा पुढे चालवताना आभाळ ठेंगणं वाटलं, एक वेगळंच स्फुरण आलं. स्वत:बद्दल, आईबद्दल आणि स्त्री असण्याबद्दल अभिमान वाटला. कौतुकानं मुलींना वाढवलं. दोन्ही मुली करिअर करून परदेशी स्थिरावल्या आहेत आणि मी माझ्या ८२ वर्षांच्या आईला अभिमानाने सांभाळत आहे.’’ आईची जेवणाची वेळ झाली म्हणून ही आमची सतारवादक सखी काळजीने लवकर घरी गेली. दोन मुली घडवण्याची मिळालेली संधी आईच्या पावलावर पाऊल ठेवून निभावली हे तिनं अभिमानानं सांगतिलं.
पाचवी चिठ्ठी – आईचा सर्वात जास्त राग केव्हा आला? –
यावर बोलताना एक जण म्हणाली की, कौतुकाने आपण आईला घरी आणतो, वाटतं, जरा तिला हवं-नको ते पाहावं, तिची सेवा करावी, आवडीचं खाऊ घालावं. ऐंशीच्या पुढची आपली आई असते, पण आपण किचनमध्ये असलो की बाहेरून आवाज येतो, दुधावर झाकण ठेवलं का ? अमकी फोडणी अशी दे, तशीच दे, कांदा चांगला परतू दे. इत्यादी.. जावई आलेत तरी या सूचना काही संपत नाहीत. त्याचा फार राग येतो.
सहावी चिठ्ठी – स्त्री असण्याचा राग केव्हा आला? –
मासिक पाळीच्या बाबतीत मांडलेले एकीचे विचार सगळ्यांच्याच मनात फारच रुतले, तिच्याही डोळ्यात पाणी आलं. अकरावीचा निकाल लागला. त्या काळी निकाल वर्तमानपत्रातून कळत असे. पास झाले होते, पण कौतुक करून घ्यायला शाळेत जाता आले नव्हते, कारण आईला काही करायचं
नव्हतं, तिची पाळी आलेली होती. स्वयंपाक, भांडी, धुणी, सारवणं करण्यासाठी घरीच थांबावं लागलं. शेजारच्या म्हणाल्या की ‘अगं, तू इथे काय करतेस, तू शाळेत पहिली आली आहेस. तुझं कौतुक होतंय, जा शाळेत.’ पण तरीही शाळेत जाता आलं नाही. सत्कार समारंभाच्या दिवशी आई प्रथम शाळेत आली, तोपर्यंत आपली लेक कुठल्या शाळेत जाते, याबाबत काहीही कोडकौतुक नव्हतं. हे झालं लग्नाच्या आधीचं. लग्नानंतरचं काही विचारू नका. एकाच खोलीत ते चार दिवस काढायचे म्हणजे शरमेने आणि कुचंबणनेने जीव नकोसा व्हायचा. यावर उपाय म्हणून खास एक सोफा घेतला, का ठाऊक आहे, एका खोलीत मासिक पाळीतला संसार (वेगळे ताट वाटी, अंथरूण-पांघरूण) लपवून ठेवायला जागा नव्हती, सोफ्याखाली ठेवताना सुरक्षित वाटलं. येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरा चुकवता आल्या.
सातवी चिठ्ठी – स्त्रीदाक्षिण्य दाखवलेले आवडते का? –
सगळ्या जणी गमतीने म्हणाल्या, ‘‘होऽऽऽ! सोईने आवडतं.’’ जिला चिठ्ठी आली ती म्हणाली, ‘‘फक्त पुरुषांनीच स्त्रीदाक्षिण्य दाखवण्याची काही गरज नाही, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घ्यावे, हेही स्त्रीदाक्षिण्यामध्ये अपेक्षित आहे. पूर्वी नाशिकमध्ये थिएटरच्या बाहेर स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी तिकीट विकण्याच्या स्वतंत्र रांगा असायच्या, नेहरू उद्यानात संध्याकाळी फक्त मुले व स्त्रियांनाच प्रवेश होता किंवा आताही कधीमधी स्त्री व पुरुषांची पेट्रोलसाठीची रांग स्वतंत्र असते. स्त्रियांच्या व्यवहार्य गरजा ओळखून दाखवलेले स्त्रीदाक्षिण्य असावे, मग ते कोणीही दाखवले तरी चालेल.’’
आठवी चिठ्ठी- सासूच्या सुखदु:खाशी किती एकरूप झालात? –
एकीने सांगितलं, माझ्या सासूला सासऱ्यांना विचारल्याशिवाय घरातील एकही कृती करण्याची परवानगी नव्हती. सासऱ्यांनी मोजूनमापून दिलेल्या गोष्टींवरच कुटुंबाच्या गरजा भागवायच्या, असा फतवा होता. पुढे काही दिवसांनी सासऱ्यांचे िहडणे-फिरणे बंद झाल्यावर सासूबाई व्यवहार पाहू लागल्या. तेव्हा प्रत्येक बाबतीत सासरे चुका, उणिवा काढायचे, हिशोब मागायचे याचा सासूबाईंना त्रास व्हायचा, तेव्हा मात्र सासूबाईंच्या बाजूने खंबीरपणे मी उभी राहिले व सासऱ्यांना ठणकावले. सासूही एक स्त्री आहे. सासू ही तिची भूमिका आहे, हे समजून घ्यायला हवे.
नववी चिठ्ठी – पुढील जन्मी कोण व्हायला आवडेल व का? –
‘‘स्त्रियांच्या भावविश्वाचे इतके शोध लागत आहेत की पुढील जन्मीही स्त्रीचाच जन्म आवडेल. आपण स्त्रिया फक्त सोपस्कार म्हणून कोरडेपणाने जगत नाही, दिवसागणिक आपल्या भावविश्वात होणारे बदल ही या पृथ्वीवरील एक सुंदर गोष्ट आहे,’’ असे या सखीला वाटले. आपलं लाजणं, आनंदणं, प्रेमात झोकून देणं, कुटुंबासाठी कष्ट करणं, अस्तित्वासाठीचा सततचा संघर्ष, स्त्रीकेंद्री समाजासाठी वाट पाहणं या सगळ्या अवस्था स्त्रीजन्मामुळेच लाभल्या, असं ती मानते.
दहावी चिठ्ठी – स्त्रिया राजकारणात येऊन काय फायदा झाला? –
स्थानिक पातळीवरचे एक दोन बदल सोडले तर याबाबत ठोस असं काही झालं नाही, असं या मैत्रिणीचं म्हणणं. याउलट पत्नी भूषवीत असलेल्या पदाचा कारभार तिच्या वतीने नवरा पाहतो, बरे-वाईट निर्णय घेतो आणि अशा वेळी भ्रष्टाचार घडला तर पदस्थ म्हणून पत्नीला जबाबदार धरले जाते. स्त्रियांनी असा स्वत:चा उपयोग होऊ देऊ नये. स्त्रियांमुळे राजकारणात बदल घडण्यासाठी अजूनही आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आणि ती पाहायची, हताश व्हायचं नाही.
अकरावी चिठ्ठी – पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं का? –
‘‘आज माझ्या हातात पसा आहे, पण त्या वेळी गाण्याचा क्लास लावायला फीचे १० रुपये नव्हते. इयत्ता पहिलीतच शाळेतल्या बाईंकडून लेकीला गाण्याचा गळा आहे हे समजले आणि तिनं शास्त्रीय संगीतात करिअर करायचं ठरवलं, जे खरं तर माझं स्वप्न होतं. आपली इच्छा लेकीने पूर्ण करण्यात आनंद मानायचा. आज तिनं शास्त्रीय संगीतात करिअर केलंय,’’ हे सांगताना त्या सखीला हुंदका आवरला नाही.
बारावी चिठ्ठी – अतिरेक्यांच्या तावडीत सापडली तर..! –
‘‘वा ! काय मज्जा. सेलिब्रेटी होण्याचं सुख मिळेल. भीतीही वाटेल, पण तरीही प्रथम त्याच्या कलेने घेईल, त्याच्याशी संवाद साधून त्याच्यातला माणूस शोधून त्याला त्याची ओळख करून देईन, जन्मत: कुणीही अतिरेकी होत नाही, परिस्थिती वाईट असते, म्हणून त्याला समजून घेईन.’’ एकीने फारच आशावादी विचार मांडला.
या सगळ्यांचे चिठ्ठय़ानुरुप अनुभव मांडून झाले. एक वेगळाच आनंद सगळ्यांना झाला आणि मग इतरही अनुभव सांगितले गेले.
काही सख्या ‘मेमरी क्लब’ चालवतात, सेवानिवृत्त, मेनोपॉज आलेल्या स्त्रियांसाठी. त्याचं कारणही तसंच आहे. विस्मरणाचा धोका ओळखून या क्लबची सुरुवात झाली. विस्मरण होणं, सहसंबंध नसलेल्या गोष्टी बोलणं, इत्यादीमुळे काही जणी एकत्र आल्या व त्यांनी ही एक नामी युक्ती शोधून काढली. मेंदूला चालना मिळण्यासाठी, मेंदू कार्यरत राहण्यासाठी असे काही खेळ, कोडी या क्लबमध्ये आळीपाळीने करून घेतले जातात. त्यामुळे स्मरणशक्तीही शाबुत रहाते आणि एकत्र येण्याचा आनंदही मिळतो.
एक सखीचा ‘जलपरी’ व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. पोहायला आवडणाऱ्या मत्रिणी एकत्र जमतात, तरणतलावात पोहायचे व्यायाम करतात आणि त्यात छान रमतात. आज असं एकत्र येणंही गरजेचं झालेलं आहे.
मेनोपॉज अवस्थेत अनेकदा कौटुंबिक धक्क्यांचीही भर पडते. मुलीचं लव्ह मॅरेज, मुलाचं एका नोकरीत स्थिर न राहणं, सुनेला वेगळं बिऱ्हाड हवं असणं, नवऱ्याची आजारपणं, वयामुळे वैवाहिक नात्यातला दुरावा यांसारख्या काही गोष्टींना अनेकदा सामोरं जावं लागतं, अशावेळी मत्रिणींची साथ, आधार व लैंगिकता शिक्षण प्रक्रियेतून मिळालेल्या दृष्टिकोनामुळे अनेकींना यातून बाहेर पडायला मदतच होते. यानिमित्ताने जाणवलं की आपण स्त्रिया एकत्र येण्याने, कनेक्ट राहण्याने वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या भावनिक, मानसिक स्थित्यंतरावर सहज मात करू शकतो. असा ग्रुप, मत्रिणी ही आपली हक्काची जागा असते, पण एक मात्र खरं, या मत्रिणीही तेवढय़ाच संवेदनशील हव्यात, शेअर करणं हे गॉसिप होणार नाही, ही खात्री देणाऱ्या.
दुसरं असं की आपण मध्यमवर्गीय स्त्रिया भलेही आता जरा आयुष्यात स्थिरावलो आहोत, संसार / नोकरीतून निवृत्त आहोत, युरोपची टूर करण्याची आíथक क्षमता आपल्यात आली आहे, पण यामागे खूप कष्ट आहेत. एका खोलीतला संसार, रॉकेलच्या स्टोव्हवर, चुलीवर स्वंयपाक. एकत्र कुटुंब, वष्रेनुवष्रे नवऱ्यापासून दूर राहणं, काटकसर करत करत, इच्छा असताना, नसताना रूढी-परंपरा जपत, सासूरवास काढत येथपर्यंत पोहोचलो आहोत, सोयीसुविधा नसतानाही आपापले संसार घडवले आहेत, प्रत्येकीनं कष्टानं, संघर्षांनं आणि तरीही संयमानं कमावलेल्या आयुष्याची कथा युनिक आहे. आताच्या तरुण मुली असा त्रास सहन करून संसार रेटतील का? मात्र असं म्हणताक्षणी, सर्व जणी म्हणतात, आताही संसारात आव्हाने, ताण आहेतच, पण त्याचं स्वरूप वेगळं आहे.
थोडक्यात काय, संवेदनशील मत्रिणींचा समवयस्क गट मेनोपॉजच्या अवस्थेत सुखद गारवा देतो. घडणाऱ्या घटनांचे गॉसिप न होऊ देता समजून घेतल्याने आधार मिळतो. असंच काहीसं घडलं रागिणीच्या मेनोपॉजनंतरच्या काळात आणि म्हणून कृतज्ञ होण्यासाठी आभार मानण्यासाठी या मेनोपॉज सेलिब्रेशनचा हा गोड घाट!
– सुलभा शेरताटे