रेल्वे अपघात हे आपल्या नित्य वाचनातले. मात्र जेव्हा एखादा अपघात घडतो तेव्हा अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणं असो की छिन्नविच्छिन्न मृतदेहांची योग्य ती विल्हेवाट लावणं, तसं जिकिरीचं आणि आव्हानात्मक काम. परंतु हे काम मुंबईतल्या पोलीस शिपाई नयना दिवेकर गेली कित्येक वर्षे करीत आहेत. इतकंच नव्हे तर सरकारी नियमांपलीकडे जात बेवारस मृतदेहांचे त्या त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्याचं कामही त्या स्वत: करीत असून आत्तापर्यंत ५०० जणांवर त्यांनी असे अंत्यसंस्कार केले आहेत आणि अनेकदा त्यासाठी त्यांना पदरमोडही करावी लागली आहे. हे धाडसी काम करणाऱ्या मुंबईतल्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला पोलीस आहेत हे विशेष.

आव्हानं पेलणाऱ्या स्त्रिया

‘‘एक स्त्री म्हणून स्त्रियांना पाठिंबा देणं हे मी माझं दायित्व समजते. हे पद स्वीकारल्यानंतर मी रेल्वेतील स्त्री वर्गाच्या कार्याची माहिती घेतल्यावर नयना यांच्या कामाबद्द्ल समजलं. त्यांच्या कामाची माहिती सर्वाना झाली पाहिजे या विचारातून ‘दक्षता’ मासिकात प्रसिद्धी दिली. एकंदरच स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीनं काम करावं असं मला वाटतं, त्यासाठी मी आमच्या खात्यात प्रयत्न केला आणि मला मिळालेला प्रतिसाद पाहता स्त्रियाही आव्हानात्मक काम करण्यास उत्सुक असतात याचाच प्रत्यय मला आला. यातूनच सुरक्षित काम करण्याकडे महिलांचा कल असतो असा अनेकांचा समजही दूर झाला. पुढे मग मुद्देमाल सांभाळणे (जे काम जिकिरीचं मानलं जात असल्याने आतापर्यंत पुरुष वर्गच करत असे.) तसेच निर्भया पथकामध्ये सहभागी होण्यास स्त्रिया स्वत:हून तयार झाल्या. सध्या त्यांच्याकडे ते कामही सोपवण्यात आलं आहे.’’

– रुपाली अंबुरे, रेल्वे पोलीस उपायुक्त

मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे लोकल ट्रेन. मुंबईत राहून तिच्याशी संबंध आलाच नाही असं कोणी सापडणं विरळाच. पण ही ट्रेन जशी जीवनवाहिनी आहे तशीच अपघातांमुळे ती अनेकदा मरणदायिनीही ठरते. मुळातच अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला पाहणं, रक्ताने माखलेला, अनेकदा छिन्नविच्छिन्न झालेला देह उचलणं खूप धाडसाचं काम आहे. हे काम करणं जिथे पुरुष मंडळींनाही कठीण वाटावं तिथे रोजच्या रोज या अपघातातील जखमी व्यक्तींना मदत करणारी एखादी स्त्री असेल तर..

या आहेत, दादर मध्य रेल्वेच्या पोलीस शिपाई नयना दिवेकर. लोकल अपघातात जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या. सध्या त्यांचं काम आहे स्टेशन डय़ुटी सांभाळण्याचं, परंतु या पूर्वी म्हणजे दादरला बदली होण्यापूर्वी कुर्ला पोलीस ठाण्यांतर्गत एडीआर म्हणजेच अपघाती मृत्यू विभागात काम करत असतानाचं त्यांचं काम धाडसाचंच म्हणता येईल. अपघात झाल्याचं कळलं की अपघात झालेल्या व्यक्तीला स्टेशन हमालांच्या साहाय्याने उचलून जवळपासच्या सरकारी रुग्णालयात नेणं, हे सांगताना खूप सोपंही वाटतं, पण प्रचंड घाबरलेल्या त्या अपघातग्रस्त व्यक्तीला धीर देणं, तिला रुग्णालयात नेल्यानंतर तिच्यावर तात्काळ उपचार होतील हे पाहणं, ते झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेणं, त्यांना अपघाताची माहिती देणं अनेक गोष्टी त्यांना कराव्या लागतात. मात्र अनेकदा त्या अपघातातल्या गांभीर्याचं प्रमाणही कमी-जास्त असतं. हात, पाय तुटणं हे तर नेहमीचंच, अशा वेळी त्या देहाची नीट काळजी घेणंही महत्त्वाचं ठरतं. पण अपघातात जागच्या जागीच ठार झालेल्यांचं काय. तर त्यांनाही उचलून आणण्याचं काम नयना करतात. हमाल नसतील तर बरेचदा त्यांना स्वत:लाही त्या अपघातग्रस्त व्यक्तीला उचलण्याचं काम करावं लागतं. नयना सांगतात, ‘‘अनेकदा अशी स्थिती येते की ऐन वेळी हॅण्डग्लोव्हजही नसतात, मग अशा वेळी प्लास्टिकच्या पिशव्या हाताला गुंडाळून मृतदेह मी उचलले आहेत. मी गर्भवती असतानाही हे काम केलंय. एकदा तर पावसाळ्यात हमाल नव्हते, अशा वेळी सात महिन्यांची गर्भवती असताना मी आणि माझ्या सहकाऱ्याने अपघातात दोन्ही पाय गेलेल्या व्यक्तीला उचलून प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम केलं.’’ त्या मृतदेहाला सरकारी रुग्णालयात नेऊन शवविच्छेदनासाठी पाठवायचं, शवविच्छेदन झालं की शवागारात ठेवायचं. त्या मृतदेहाचे फोटो काढून ठेवायचे आणि ते वरिष्ठांना द्यायचे. मृतदेहाजवळील वस्तूंवरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घ्यायचा. हे त्यांच्यासाठी नित्याचं झालं.

हे सरकारी काम असताना यात वेगळेपणा तो काय.. मुंबईच्या एडीआर विभागात हे काम करणाऱ्या नयना सध्या तरी एकमेव महिला आहेत. खरं त्या २००० मध्येच पोलीस दलात रुजू झाल्या. तेव्हापासून डोंबिवली, पनवेल आणि मग कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात त्यांनी ‘स्टेशन डय़ुटी’ केली. मिल कामगारांची मुलगी असणाऱ्या नयना यांचं शिक्षण दहावीपर्यंतच. घरची परिस्थिती खाऊन-पिऊन सुखी होती तरी प्रत्येकानं काम करणं गरजेचं होतं. त्यामुळे लहानपणी कमवा आणि शिका अशा प्रकारे त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. एका मैत्रिणीच्या सल्ल्याने पोलीस भरतीचा अर्ज भरला आणि निवड झाली. लहानपणी भित्र्या स्वभावाच्या असणाऱ्या नयना यांनी आपण मोठेपणी वेगळं असं काही तरी काम करायचं हे निश्चित केलं होतं. हां, पण वेगळं म्हणजे काय ते कुर्ला पोलीस स्टेशनला रुजू होईपर्यंत तरी त्यांना समजलं नव्हतं. २०११ मध्ये तिथे एडीआर विभागात जागा रिक्त असल्याचं समजल्यावर त्यांनी स्वत:हून त्यांच्या वरिष्ठांकडे कामाबद्दल विचारणा केली. तोपर्यंत या विभागात असं काम करणारी कोणतीही महिला कर्मचारी नव्हती. त्यांच्या वरिष्ठांनी परीक्षा म्हणून  शवागारातल्या मृतदेहाचे फोटो काढण्यास त्यांना सांगितले. १५ वर्षांच्या मुलीचा छिन्नविच्छिन्न झालेला तो देह. नयना यांनी तिचे फोटो काढले आणि वरिष्ठांकडे सोपवून त्या घरी गेल्या. दुसऱ्या दिवशी त्यांना कामावर हजर झालेल्या पाहिल्यावर वरिष्ठांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहिला नाही, कारण स्मशानशांतता असलेल्या शवागारात जाऊन आणि तिथलं काम केल्यावर त्या घाबरून येणारच नाहीत, असं त्यांच्या वरिष्ठांना वाटलं होतं. मात्र नयना यांच्या दुसऱ्या दिवशीच्या उपस्थितीनं नयना हे काम करू शकतील हा विश्वास आणि खात्रीही वरिष्ठांना पटली. अशा प्रकारे नयना यांचा एडीआर विभागात प्रवेश झाला. पहिल्या दिवशी शवागारात भीती नाही का वाटली, हा प्रश्न जीभेवर असतानाच त्या म्हणाल्या, ‘‘वरिष्ठांना वाटलं त्याप्रमाणे मला भीती वगैरे काही वाटली नव्हती. शवागारात निपचिप पडलेल्या, चेतनाहीन, विच्छिन्न शरीरांची काय भीती वाटून घ्यायची?’’ ज्या मुलीचे त्यांनी फोटो काढले होते, तिच्या नातेवाईकांचा खूप तपास करूनही शोध लागला नव्हता. मग तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचं कामही नयना यांनी केलं आणि नयना यांना त्यांचं काही तरी वेगळं असं काम सापडलं. २०११ पासून ते गेल्या पाच वर्षांत नयना यांनी जवळपास ५००हून अधिक व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत.

नयना सांगतात, ‘‘आम्ही मृतांच्या वारसांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न करतो. कारण जी व्यक्ती मरण पावली ती पुन्हा कधीच त्याच्या जवळच्यांना भेटणार नसते, दिसणार नसते. साधारणत: आठ दिवस ते महिनाभर आम्ही तो मृतदेह शवागारात ठेवतो. त्या कालावधीतही ज्यांचे कुणी नातेवाईक सापडत नाहीत त्यांच्यावर सरकारी नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जातातच. मात्र हे काम किमान विधिवत आणि सन्मानानं व्हावं यासाठी मी पुढाकार घेतला. बेवारस व्यक्ती कोणत्या धर्माची आहे हे आम्ही केलेल्या तपासावरून कधी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांकडून समजून घेऊन त्या-त्या धर्माच्या विधींप्रमाणे अंत्यसंस्कार केले आणि आताही अशी व्यक्ती माझ्या कार्यक्षेत्रात असतील तर करते. हे काम करताना मी स्त्री आहे, मी हे काम करू शकेन की नाही किंवा अंत्यसंस्कार करणं महिलांचं काम नाही, असे प्रश्न कधी माझ्या मनात आले नाहीत. मात्र हे करताना अडचणी खूप आल्या. बरेचदा शासकीय रुग्णालयातून मृतदेह उचलून नेण्याचं कामही मला करावं लागलं आहे. सरकारकडून अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत मिळते मात्र ती अनेकदा पुरेशी ठरत नाही. अशा वेळी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी पदरमोड करून अंत्यसंस्कार केले आहेत. अनेकदा तर मृतांचे वारस मिळायचे, परंतु ते इतके गरीब असायचे की त्यांना मुंबईत येऊन आपल्या नातेवाईकाचा मृतदेह गावी घेऊन जाणं किंवा त्याच्यावर स्वखर्चानं अंत्यसंस्कारही करणं जमायचं नाही. अशा वेळी त्यांच्या जाण्यायेण्याचा खर्च करण्याचं कामही मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं केलं आहे. त्यासाठी आम्ही फंडही जमा केला होता. त्यातून मग त्यांच्या राहण्या-खाण्याचा खर्च करायचो. यामागे केवळ त्यांना मदत करत आहोत हीच भावना असते. या कामात आत्मिक समाधान मिळतं एवढं मात्र नक्की.’’

नयना यांच्या या कामासाठी त्यांच्या घरून त्यांना नेहमीच पाठिंबा मिळाला. त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांच्या सासरच्यांनाही त्यांच्या कामाचा अभिमानच आहे. आजवर त्यांना साथ देणाऱ्या पतीची साथ मात्र सहा महिन्यांपूर्वीच सुटली. आता एकटीनेच संसाराचा गाडा ओढताना त्यांच्या १२ वर्षांच्या मुलाची आणि १० वर्षांच्या मुलीची साथ आहे. नयना म्हणतात, ‘‘माझे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशिवाय मी कधीच हे काम करू शकले

नसते. वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास आणि सहाकाऱ्यांनी केलेली मदत यामुळेच मी हे काम आजवर करू शकलेय.’’

सहकाऱ्यांबरोबरच नयना विशेष आभार मानतात, मध्य रेल्वेच्या पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांचे. त्यांच्यामुळेच आपले कार्य लोकांसमोर आल्याचे त्या सांगतात. त्यांनी नेहमीच आपल्या कार्याचे कौतुक करून आपल्याला प्रोत्साहन दिल्याचेही नयना आवर्जून सांगतात.

रेश्मा भुजबळ

pradnya.talegaonkar@expressindia.com

Story img Loader